News Flash

नवं दशक नव्या दिशा : दोन ओंडक्यांची होते..

मानवजातीचाच विचार केला तर आपण आपला स्वत:चा विनाश करण्याची क्षमता कधीच प्राप्त केलेली आहे.

या विश्वामध्ये आपण एकटेच आहोत, या मानवजातीच्या धारणेलादेखील सॉलीप्सीस्टिक म्हणावं लागेल.

सौरभ करंदीकर  : viva@expressindia.com

जीवनाचा अर्थ काय? या विश्वामध्ये आपलं स्थान काय? या आणि अशा अनेक प्रश्नांचं उत्तर शोधणाऱ्या विचारप्रवाहांना ‘तत्त्वज्ञान’ म्हणून ओळखलं जातं. त्यातील विचारधारांपैकी एक, ‘सॉलिप्सीझम’ ही तशी गमतीची संकल्पना आहे. सॉलिप्सीझम सांगतं की या विश्वात ‘मी’ हा एकच घटक आहे. माझ्या सभोवतालची सर्व सृष्टी ही केवळ माझ्यापुरती आणि माझ्यासाठीच तयार केली गेली आहे. इतर व्यक्ती, इतर जीव, इतर घडामोडी या माझ्या रंगमंचावरील, माझ्याभोवती रचलेल्या गोष्टी आहेत. परंतु जेव्हा असाच समज इतरांचादेखील झालेला दिसतो, तेव्हा हा विचार गुंडाळून ठेवावा लागतो! परंतु ही विचारधारा नवीन नाही. इसवीसनपूर्व ३०० वर्षांपूर्वी ही कल्पना गॉर्जियास नावाच्या ग्रीक शिक्षकाच्या लिखाणात मांडलेली आढळते. नवजात बालकांनादेखील आपल्या भोवतालच्या जगाबद्दल असंच वाटत असतं, हे बाल-मानसशास्त्राचा अभ्यास करणारे आपल्याला सांगतील. आपल्यासारखाच अनुभव इतर बालकांना येतोय याची जाणीव झाली की मात्र ते अशी कल्पना सोडून देतात.

या विश्वामध्ये आपण एकटेच आहोत, या मानवजातीच्या धारणेलादेखील सॉलीप्सीस्टिक म्हणावं लागेल. या प्रचंड, अथांग, अनंत विश्वाची रचना केवळ आपल्यापुरती झालेली आहे असं मानणं हे मानवी गर्विष्ठपणाचं लक्षण आहे. अथांग विश्वाचं सोडून द्या, पण आपल्या मंदाकिनी (मिल्की वे) आकाशगंगेत आपली मानवी संस्कृती एकमेवाद्वितीय आहे असं समजणं अशास्त्रीय ठरेल. हा लेख लिहिला जाईपर्यंत तरी परग्रहवासीयांनी (एलियन्सनी) आपल्याला भेट दिलेली नाही, हे खरं. पण म्हणून मानवेतर संस्कृती अस्तित्वातच नसतील असं आपण खात्रीलायकरीत्या म्हणू शकतो का? आपल्या सौरमालिकेतल्या इतर ग्रहांवर जीवसृष्टी असेल, असा अंदाज अनेक शास्त्रज्ञांनी आणि तंत्रज्ञांनी पूर्वीपासून मांडला होता. १८९६ साली निकोला टेस्ला याने आपल्या विद्युत दूरसंचार यंत्रणेने मंगळापर्यंत संदेश पाठवता येतील असं जाहीर केलं. तिथे ते संदेश स्वीकारायला कुणी तरी असतील आणि ते प्रत्युत्तर देतील असा त्याला विश्वास वाटत होता. १९०० साली रेडिओ लहरींवर झालेल्या संशोधनानंतर या प्रकारच्या शोधकार्याला वेग आला. खुद्द रेडिओचा जनक मानल्या जाणाऱ्या मार्कोनीने आपल्या यंत्रांवर प्राप्त झालेल्या काही लहरी मंगळावरून आल्या असाव्यात असं म्हटलं होतं!

‘सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीअल इंटेलिजन्स’ (सेटी) म्हणजेच ‘अंतराळातील बुद्धिमान जीवसृष्टीचा शोध’ या नामाभिधानाने ओळखल्या जाणाऱ्या शोधमोहिमा विसाव्या शतकात आकार घेऊ लागल्या. १९६१ साली सेटीचं पहिलं शास्त्रीय अधिवेशन भरवण्यात आलं. त्या अधिवेशनात डॉक्टर फ्रँ क ड्रेक या शास्त्रज्ञाने ‘ड्रेक इक्वेशन’ नावाचं समीकरण सादर केलं. या समीकरणाच्या आधारे आपल्या आकाशगंगेत नेमक्या किती ‘बुद्धिमान जीवसृष्टी’ असू शकतील त्याचा अंदाज घेता येईल असं त्यांनी जाहीर केलं. आपल्या आकाशगंगेत आपल्या सूर्यासारखे सुमारे ४०० कोटी तारे अस्तित्वात आहेत. त्या ताऱ्यांपैकी केवळ एकचतुर्थांश (२५%) ताऱ्यांभोवती ग्रहांची मालिका असते. अशा प्रत्येक ग्रहमालिकेत किमान दोन ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी पोषक वातावरण असतं असं मानू या. म्हणजे (२०० कोटी उमेदवार ग्रह). अशा ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी मात्र अनेक योगायोग घडावे लागतात. असं धरून चालू की ५० टक्के ग्रहांवर या ना त्या कारणांनी जीवसृष्टीची रचना होऊ शकत नाही (राहिले १०० कोटी ग्रह). अशा ग्रहांवर जीवसृष्टी निर्माण झाली तरीही अशा जीवसृष्टीने मानवजातीप्रमाणे तंत्रज्ञान विकसित करणं हे काही प्रमाणातच शक्य होतं. काही शास्त्रज्ञांच्या मते हे प्रमाण १ टक्का इतकं कमी असेल, तर काही शास्त्रज्ञांचं म्हणणं असं आहे की, हीदेखील अतिशयोक्ती ठरेल. सारासारविचार करून आपल्या उमेदवार ग्रहांचा आकडा १० लाखांवर आणू या. या दहा लाख जीवसृष्टी तंत्रज्ञानाच्या प्रगतिपथावर आहेत असं मानलं, तरी त्यापैकी काही तग धरून राहतात तर काही स्वत:चा विनाश करून घेतात. मानवजातीचाच विचार केला तर आपण आपला स्वत:चा विनाश करण्याची क्षमता कधीच प्राप्त केलेली आहे. मानवी स्वार्थ आणि अहंकार यांचं कुठलं मिश्रण आपल्याला कधी शेवटाकडे नेईल ते तरी कुठे सांगता येतंय?

कार्ल सेगन या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या मते ‘ड्रेक इक्वेशन’ आपल्याला शेवटी ‘१०’ इतका छोटा आकडा देतं. याचाच अर्थ आपल्याखेरीज या आकाशगंगेत केवळ नऊ बुद्धिमान संस्कृती अस्तित्वात आहेत. मात्र इतर अनेक शास्त्रज्ञ हा आकडा लाखांच्या घरात जातो, असंही म्हणतात. ४०० कोटी ग्रहांवर काही लाख म्हणजे काही मोठा आकडा नाही. त्याशिवाय त्यापैकी कुणी आपल्यापर्यंत प्रवास करून येण्याची तसदी घेईल हेही सांगता येत नाही. सध्या तरी त्यांची वाट न पाहता अंतराळातून त्यांच्या अस्तित्वाचे संकेत मिळतात का, ते आपल्या रेडिओ वेधशाळा तपासत आहेत. १५ ऑगस्ट १९७७ रोजी एका स्वयंसेवकाने अमेरिकेतील ओहायो येथील ‘बिग ईअर’ नावाच्या वेधशाळेत परग्रहावरून आलेल्या एका शक्तिशाली रेडिओ संदेशाची नोंद केली. त्या नोंदीला ‘वॉव सिग्नल’ म्हटलं गेलं. अनेक शास्त्रज्ञांनी मोठय़ा उत्साहाने त्या संदेशाचा पाठपुरावा केला. तो अंतराळाच्या ज्या भागातून आला त्याचं कसून निरीक्षण केलं, पण आजतागायत त्या संदेशाची पुनरावृत्ती झालेली नाही. ती नोंदणी चुकीची होती, की त्या परग्रहवासीयांनी नुसतं ‘हाय’ म्हणून त्यानंतर आपल्याशी संपर्क साधायचा नाद सोडून दिला, कल्पना नाही.

‘असे परग्रहवासी जर खरंच बुद्धिमान असतील तर ते मानवजातीकडे ढुंकूनदेखील बघणार नाहीत,’ असं खोचक मतदेखील व्यक्त केलं जातं आणि आपली ढासळलेली सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता गमतीनं का होईना, ते मान्य करावंसं वाटतं. परंतु परग्रहांचं अवलोकन करण्याचं तंत्रज्ञान अधिक विकसित होत आहे. रिटायरमेंटला आलेला, पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणारा ‘हबल टेलिस्कोप’ असेल किंवा त्यापेक्षा अनेक पटीने शक्तिशाली असलेला, परग्रहावरील वातावरणाची मोजणी करू शकणारा आगामी ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ असेल, अशा उपकरणांच्या आधारे मानवी नजर आपल्या आकाशगंगेच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. आपणच एखादा संदेश सर्वदूर प्रसारित करू आणि कुणी आपल्या हाकेला ‘ओ’ देतो का? ‘दोन ओंडक्यांची सागरात भेट’ होते का? ते पाहू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2021 12:09 am

Web Title: psychology of solipsism solipsism fun concept zws 70
Next Stories
1 ‘फेन्ड्स’ फॉरेव्हर!
2 जुन्या पद्धती नवा ट्रेण्ड
3 निवांत सुट्टी!
Just Now!
X