यंदा सुवर्णमहोत्सवी वर्षांत पदार्पण करणारी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. उत्तराखंडाच्या प्रलयापासून शिवाजी महाराज आणि अलेक्झांडर ग्रॅहम बेलपर्यंत अनेक वेगळे विषय या स्पर्धेतून हाताळले गेले. सामाजिक विषयांना हात घालताना विद्यार्थ्यांमधली संवेदनशील सर्जनशीलता दिसली.
पुण्याची पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ही तरुणाईला एकांकिकेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारं मोठं व्यासपीठ. गेलं अर्धशतक ही स्पर्धा सुरू आहे आणि त्यातून अनेक मोठे कलाकार घडले आहेत. नुसते कलाकार नाही तर तरुण पिढीची जडण- घडण यातून घडते, त्यांच्या विचारांना वाट मिळते. यंदाच्या वर्षीच्या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला. वेगवेगळे आणि नवीन विषय, उत्तम लेखन, दिग्दर्शन, सकस अभिनय आणि प्रॉपर्टीजचा सुरेख वापर ही या वेळच्या करंडक स्पध्रेची काही वैशिष्टय़ं होती.
पुरुषोत्तम करंडकाचं वेगळेपण ठरतं ते म्हणजे नाटकांच्या विषयांच्या निवडीत. यंदाही भरपूर वेगवेगळे विषय विद्यार्थ्यांनी मांडले. त्यांना जवळचे वाटणारे, समाज हादरवणारे, इतिहास सांगणारे आणि काही अगदी वेगळ्याच विश्वात नेणारे. एकीकडे ‘विष्णुगुप्त’ हे आर्य चाणक्यांवर आधारित नाटक असेल तर दुसरीकडे ‘क ला काना का’ सारखं शिक्षणव्यवस्थेची मर्यादा दाखवणारं नाटक होतं.
‘एका रात्रीची बाई’मधून माणुसकीचं दर्शन घडलं. स्त्री भ्रूणहत्या, वेश्याव्यवसाय, रॅलीज् अशा सामाजिक विषयांवरही तरुणाई नाटकांद्वारे प्रकाश टाकत होती. ‘दोज फ्यु पेजेस’सारखा ‘टाइम मशीन’च्या थीमवरचा प्रयोग होता तर दुसरीकडे ग्रॅहम बेल, चाणक्य यांसारखी ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या मंडळींच्या कामावर बोलणारी नाटकं होती.
उत्तराखंडात पुराने माजलेला कहर नाटकरूपात मांडणं हे तसं ‘हक्र्युलियन टास्क’ पण तेही विद्यार्थ्यांनी पेललं. आपल्या यंगिस्तानमधले नाटकवेडे फ्रेंड्स ग्रॅहम बेलचा टेलिफोनचा शोध ते उत्तराखंडची आपत्ती इतक्या ‘वाइड रेंज’मधल्या विषयांकडे तटस्थपणे पाहत आहेत आणि त्यावर सारासार विचार करून भाष्य करते आहे, हेच यातून अधोरेखित झालं. या वेळच्या करंडकातल्या नाटकांनी तरुणाईची संवेदनशील वृत्ती आणि क्रिएटिव्ह िथकिंग यांच्या उत्तम मिलाफाचं दर्शन घडवलं.
उत्तराखंडाच्या प्रलयापासून शिवाजी महाराज आणि ग्रॅहम बेलपर्यंत
पुण्यातून या वर्षी ५२ कॉलेजेस या स्पध्रेत करंडकावर आपलं नाव लिहायला उतरली होती. ‘एका रात्रीची बाई’ , ‘ पेष्टी’, ‘चॉकलेटचा बंगला’ ,’आम्ही तिघे आणि’, ‘साम्बरी’ , ‘उळ्ळागड्डी’ ही स्पर्धेतली काही उल्लेखनीय नाटकं. गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सने मतिमंद मुलांच्या पालकांच्या व्यथा ‘चॉकलेटचा बंगला’ मधून उलगडल्या तर मोच्रे, रॅलीज् यासारख्या सामाजिक घटनांचे विविध पलू दाखवले ते ‘फ्लॅशमॉब’ या मॉडर्न कॉलेजच्या नाटकाने. फग्र्युसन कॉलेजचं ‘साम्बरी’ नाटक वन्य जमातीतल्या लोकांचे नातेसंबंध, परंपरा यावर बोलून गेलं. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने सादर केलेली ‘एका रात्रीची बाई’ स्त्री-पुरुष भेदभावात न अडकता ‘माणूस’ म्हणून वागवण्याचा संदेश देऊन गेली.
या स्पध्रेत तिसरं स्थान पटकावलं ते एम.आय.टी.च्या ‘ क ला काना का’ या नाटकाने. ‘आपल्या पुस्तकात ज्यांच्या पराक्रमाचे किस्से आपण वाचतो त्या शूर शिवाजी महाराजांना लिहिता-वाचता येत होतं का’ या प्रश्नाचा एका चिमुकलीने घेतलेला शोध अशी एकंदरीत थीम होती. तिच्या प्रश्नाचं उत्तर शोधताना तिला सध्याच्या शिक्षणातल्या काही मर्यादाही लक्षात येतात. उत्तम सेट आणि दर्जेदार अभिनयाने नटलेला असा इतिहासाच्या पुस्तकी मांडणीवर भाष्य करणारा प्रयोग.
‘बेल’ ही एकांकिका स. प. महाविद्यालयाला दुसऱ्या स्थानावर घेऊन गेली. ‘अलेक्झांडर ग्राहम बेल याला टेलिफोनचा शोध कसा लागला’ याचं सादरीकरण म्हणजे हे नाटक. त्या काळातली परिस्थिती, वेशभूषा, भाषा आणि नेपथ्य वठवण्यात ही मंडळी यशस्वी ठरली. नाटकाला साजेसं दिग्दर्शन आणि वाखाणण्याजोगा अभिनय यामुळे नाटक उठावदार ठरलं.
viva.loksatta@gmail.com