|| प्रियांका वाघुले

कलाकार म्हणून तिची ओळख आहेच, पण निर्माती, लेखिका म्हणूनही जिने आपली ओळख निर्माण केली आहे ती अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे. आपल्याला जन्मत:च एक धर्म प्राप्त होतो. पण आपल्याला स्वत:ला काय हवं हे समजलं की मग आपल्याला आपल्या निवडी ठरवता येतात, असं म्हणणारी राधिका फिटनेस हा तिने स्वत:साठी निवडलेला तिचा धर्मच आहे, असं मानते. फिटनेस हा शरीराची गरज म्हणून नाही तर स्वत:ची इच्छा, मानसिक गरज म्हणून फिटनेसला महत्त्व देत असल्याचं राधिका सांगते.

आयुष्यात एखादी गोष्ट समजण्यासाठी वेळ लागतो. पण, एकदा ती समजली आणि आपण ती करत नाही आहोत हे लक्षात आल्यानंतर आपल्या चुकीची दुरुस्ती करून पुन्हा सगळे नेटके करण्याची जिद्द असायला हवी, असे राधिका आवर्जून सांगते. गेल्या काही वर्षांत काही कारणास्तव आपल्या देहबोलीत झालेला बदल आणि त्यामुळे जीवनशैलीवर त्याचा झालेला परिणाम यामुळे राधिका फिटनेसपासून दूर झाली होती. मात्र फिटनेस न ठेवल्यामुळे जे नुकसान झाले ते लक्षात आल्यानंतर मात्र फिटनेस हा तिचा धर्मच बनल्याचे ती म्हणते.

राधिका फिटनेससाठी साधारण वर्षभराचे नियोजन करते. त्यानुसार वर्षभर फिटनेसचे ते नियोजन ती प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात आणते, असे तिने सांगितले. दरवर्षी फिटनेसचे नियोजन बदलण्यामागची मुख्य दोन कारणे आहेत, असं ती म्हणते. एक म्हणजे स्वत:ला वेगवेगळ्या गोष्टी करण्याची आवड असल्याने तो बदल साधता येतो. आणि दुसरं कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास त्याची शरीराला सवय होत असल्याने दरवेळी नवीन फिटनेस प्रकाराचीही सवय होते, असं तिने सांगितलं.

साधारण तीन ते चार महिने नियमितपणे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटे मोकळ्या वातावरणात धावणे कसोशीने करत असल्याने तिने सांगितले. पावसाळ्यात या गोष्टीला मर्यादा येतात. रोजच्या रोज धावणे शक्य होत नाही, अशा वेळी त्याला पर्याय म्हणून मग ती नियमितपणे जिममध्ये जाऊन व्यायाम करते, असे तिने सांगितले. तर साधारण पावसाळा संपल्यानंतर हॉर्स रायडिंग आणि सायकलिंगवर मोठय़ा प्रमाणात भर देत असल्याचे ती म्हणते. व्यायाम हा फिट राहण्यासाठी असला तरी तो मुळातच करायला आवडतो. व्यायाम करणे मनापासून आवडणे अगदी महत्त्वाचे असल्याचे राधिका आवर्जून सांगते.

viva@expressindia.com