पाऊस येणार येणार म्हणत लांबला खरा.. पण आता त्याचे खरोखर वेध लागले आहेत. हा शॉपिंगसाठी ‘हाय अलर्ट’ इशारा. आता मागच्या वर्षी वापरलेला रेनकोट पुन्हा वापरणं, हे स्टेट्ससाठी हानिकारक असतं, हे घरच्यांना कसं पटवून सांगायचं? जीन्सवर चिखलाने मनापासून केलेली नक्षी घासून काढण्याचं काम आपल्यावरच येतं, तेव्हा मात्र आई हात वर करते. पण तेच दोन शॉर्ट स्कर्ट किंवा केप्री घेते म्हटलं, की खर्चाचं गणित ऐकवून दाखवते. त्यात नुकताच लागलेला रिझल्ट हे दुधारी शस्त्र असतंच दिमतीला. या सगळ्या गोंधळात एकच पर्याय उरतो. पावसाळी खरेदीच्या बरोबरीने कपाटातल्या जुन्या काही कपडय़ांची सांगड घालून स्वत:चं एक ‘एक्स्क्लुझिव्ह डिझायनर पावसाळी कलेक्शन’ तयार करायचं आणि त्यात खरं तर जास्त गंमत आहे.
पावसाळ्यात सगळ्यात जास्त उपयोगी पडतात ते थोडे शॉर्ट, सुटसुटीत, पटकन वाळणारे कपडे. त्यामुळे केप्री, क्रॉप टॉप, गंजी, टी-शर्ट्स, डार्क रंगाचे ड्रेस या सगळ्यांची एक यादी करा. एरवी लेअरिंगच्या मदतीने आपण स्टायलिंगची शक्कल लावू शकतो. पण पावसाळ्यात हे शक्य नसतं. त्यामुळे कपडय़ांचे पर्याय अजूनच कमी होतात. पावसाळ्याच्या कपडय़ांची यादी करताना आधी रंग निघणारे, अतिपारदर्शक कपडे वेगळे करा. पावसाळ्यात असे कपडे वापरणे म्हणजे स्वत:हून पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. त्यामुळे काही छोटय़ा क्लृप्त्या लक्षात घेऊन तुम्ही तुमचं ड्रेसिंग स्मार्ट करू शकता.
पावसाळी ड्रेसिंग टिप्स
* पावसात भिजल्यावर शिफॉन, जर्सी, लायक्राचे टॉप पारदर्शक होतात. अशा वेळी आत स्लीप घातलेली असेल, तरी ती ओंगळवाणी दिसते. त्याऐवजी वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रिंट्सचे गंजी वॉडरोबमध्ये असू द्या. कॉन्ट्रास्ट मॅचिंगचे गंजीसुद्धा स्मार्ट दिसतात.
* डे ड्रेस अर्थात गुडघ्यापर्यंत लांबीचा ड्रेस.. त्यातही शर्ट ड्रेस पावसाळ्यात उत्तम.
* ड्रेस किंवा टी-शर्टवर श्रग किंवा जॅकेट घालायची संधी पावसाळ्यात मिळत नाही. पण एखादा ओव्हरसाइज शर्ट घाला. लुक बदलतोच, पण सोबतच शर्टमुळे टी-शर्ट फारसा भिजत नाही. त्यामुळे दिवसभर ओला टी -शर्ट घालून बसण्याची पाळी येत नाही.
* जुने ओव्हरसाइज टी शर्ट, टय़ुनिक्स कपाटात असतील, तर त्यांना समोरच्या बाजूने कात्री मारून श्रग म्हणून वापरता येतील. शर्टच्या ऐवजी लेअरिंग म्हणून त्यांचा वापर करता येईल.
* केप्रीज्ला पर्याय म्हणून गुडघ्याच्या लांबीचा डेनिम स्कर्ट वापरू शकता.
* फ्लेअर स्कर्ट शक्यतो पावसाळ्यात टाळा. फ्लेअर स्कर्ट ड्रेस म्हणून वापरू शकता. स्कर्टची वेस्टलाइन बस्टपर्यंत घ्या आणि एखादा मोठा, छानसा बेल्ट वेस्टलाइनला बांधा. अर्थात यासाठी स्कर्टला इलास्टिक असणं गरजेचं आहे. ही अशी मॉडिफाइड फॅशन करण्यासाठी थोडं धैर्यही लागतं आणि कॅरी करायचा कॉन्फिडन्सही!
* अँकल लेन्थसोबत अँकलच्या तीन-चार इंच वर हेम असलेल्या डेनिम्सचा सध्या ट्रेंड आहे. पावसाळ्याच्या मुहूर्तावर जुन्या डेनिम्सना कापून हा प्रयोग नक्कीच करता येईल.
* पावसाळ्यात मेटल ज्वेलरी गंजण्याची, पाणी लागून खराब होण्याची शक्यता असते. त्याऐवजी प्लॅस्टिक आणि फायबरची ज्वेलरी बाजारात आली आहे. ती वापरू शकता. एखादं फायबर किंवा प्लॅस्टिकचं फंकी घडय़ाळ अशा वेळी छान वेगळी अ‍ॅक्सेसरी ठरू शकतं.