13 December 2019

News Flash

सुरेख बंधन

‘रक्षाबंधन’ या सणाला भावाबहिणींना जोडून ठेवणारा महत्त्वाचा धागा म्हणजे राखीचा.

(संग्रहित छायाचित्र)

|| गायत्री हसबनीस, तेजश्री गायकवाड

‘रक्षाबंधन’ या सणाला भावाबहिणींना जोडून ठेवणारा महत्त्वाचा धागा म्हणजे राखीचा. या राखीच्या निमित्ताने भाऊ-बहीण आयुष्यभर एकमेकांना जपण्याचा निर्धार दृढ करतात. पूर्वी राखी म्हणजे फक्त एक रेशीमधागा होता. पुढे त्यात मणी, रुद्राक्ष, गोंडे असे एकेक प्रकार जोडत गेले. कधीकाळी रेशीमधाग्यांनी सुरू झालेला हा राखीचा प्रवास आता अगदी डिझाइनर राख्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे..

राखीचे महत्त्व पारंपरिक आहे त्यामुळे  ती राखी बघताच क्षणी खास आणि सुंदर वाटावी या उद्देशानेच त्याची रचना केली जाते. यंदा बाजारात तुम्हाला अगदी टिपिकल लाल, केशरी, सोनेरी आणि पिवळ्या रंगांच्या रेशीमधाग्यांच्या राख्या दिसतीलच. मात्र त्याच्या बरोबरीने ज्वेलरी डिझाइनर्सनी खास डिझाइन केलेल्या राख्यांमधील असंख्य प्रकार तुम्हाला मोहून टाकतील. सध्या इकोफ्रेंडलीचा आग्रह वाढला असल्याने कापडी राख्या हमखास पाहायला मिळतात, त्याही यंदा  मुलायम आणि स्किन फ्रेंडली स्वरूपात उपलब्ध आहेत.

कुंदनच्या राख्यांना गेल्या काही वर्षांत जास्त मागणी असलेली दिसते. या कुंदनच्या राख्यांमध्येही सेमी प्रेशियस स्टोन आणि डायमंड राख्याही तितक्याच ट्रेण्डिंग आहेत. कस्टमाइझ्ड पद्धतीच्या राख्यांमध्ये गोटा वर्क असलेल्या राख्यासुद्धा आहेत. कुंदनच्या राख्यांप्रमाणे मेटल जाल वर्कच्याही राख्या आल्या आहेत. या राख्यांमध्ये खाली जयपुरी झुमके आणि घूमर लटकन पद्धतीने लावलेले दिसतात. क्रिस्टल कुंदन आणि मेटॅलिक कुंदन राख्याही सध्या पाहायला मिळत आहेत. मणी आणि मोत्यांची सुंदर डिझाइन्स यावर पाहायला मिळतील. राजाराणी, भैया-भाभी, राजपुत्र-राजकन्या अशी चित्रकारी असलेल्या आणि मुघल चित्रकारी असलेल्या राख्या हे यंदाचे वैशिष्टय़ आहे. अत्यंत स्टायलिश पद्धतीच्या या राख्यांवर वेगळ्या धाटणीचे स्टोन वर्कसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल.

पर्सनलाइज्ड राख्यांचाही ट्रेण्ड यंदा आहे त्यामुळे  तुम्हाला हवी असलेली नाव आणि फोटो काढून राख्या बनवून घेऊ शकता. बीड्सचे डिझाइन असलेल्या राख्यांमध्ये रेड, मेटल, गोल्डन असे प्रकार आहेत जे खासकरून रेशमी राख्यांवर खुलून दिसतात. मेटॅलिक बर्ड्स, मोरपंख, मासे, नानाविध शस्त्रं यांचे डिझाइन असलेल्या हटके राख्याही बाजारात आल्या आहेत. पंछ्छी पद्धतीच्या राख्या यंदा प्रथमच पिवळ्या, राखाडी, लाल, निळ्या रंगात आहेत. ज्यात फ्लोरल डिझाइन्स आहेत आणि त्याचबरोबर लटकन म्हणून एसिमेट्रिक पद्धतीची डिझाइन्सही आहेत. लोट्स फ्लोरल, मिनाकारी ग्लास वर्क, पर्ल डिझाइन, रोझ पॅटर्न अशी काही वैशिष्टय़ं असलेल्या राख्या जोरदार ट्रेण्डमध्ये आहेत. राख्यांचे एकूणच आकार – प्रकार आणि रंगातल्या वैविध्यांमध्ये पाच ते सहा प्रकार मिळतील आणि तसे सेट्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही ब्रेसलेट राख्याही घेऊ  शकता ज्यांची किंमतही कमी आहे. या राख्यांमध्ये वूडन, लेदर, कॉइन, पेंडन्ट अशा प्रकारच्या राख्याही उपलब्ध आहेत. याशिवाय ‘बॅटमॅन’, ‘गेम ऑफ थ्रोन्स’, ‘मिनियन्स’, ‘सुपरमॅन’, ‘कॅप्टन अमेरिका’ आणि ‘स्पायडरमॅन’च्या राख्याही गिफ्ट्ससह उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने सिम्पल डिझाइन्स मिळतील, परंतु यापेक्षाही वेगळं काहीतरी हवं असेल तर मार्बलच्या राख्याही उपलब्ध आहेत. तसेच ऑक्सिडाइज्ड सिल्वरप्रमाणे ऑक्सिडाइज्ड गोल्डन राख्याही विकत घेण्यासारख्या आहेत. अत्यंत नाजूक अशा कडी कुंदनच्या राख्या आहेत ज्याला ज्यूटचा धागा आहे. गोटा वर्क, गणपती वर्क, मंदिर डिझाइन, स्टोन फिनिशिंग आणि चंदेरी राख्याही सर्वत्र उपलब्ध आहेत. ऑनलाइन साइट्सवर या सर्व राख्या डिस्काउंट रेटमध्ये मिळत आहेत. थोडय़ा अ‍ॅन्टिक मेटलच्या राख्याही यंदा ट्रेण्डमध्ये दिसतील. त्यात पिकॉक, बटरफ्लाय, एलिफंट, पक्ष्यांच्या डिझाइनच्या राख्यांत भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. राख्यांचे हे नानाविध प्रकार नक्कीच बघा आणि त्यातून तुम्हाला आवडतील असे पर्याय निवडा. पानांच्या, फुलांच्या पाकळ्या, माळा आणि तोरणं या डिझाइनच्या राख्याही सहजपणे बाजारात उपलब्ध आहेत.

नेहमीच्या राख्यांबरोबरच काही ना काही संदेश असलेल्या किंवा नावे लिहिलेल्या राख्या गेल्या काही वर्षांपासून प्रसिद्ध झाल्या आहेत. याही वर्षी या राख्या बाजारात आल्या असून ‘छोटा भाई’, ‘ब्रो’, ‘बडे मिया’, ‘विरे’, ‘स्वॅग भाई’ अशा हटके नावांच्या डिझाइनर पेंडन्ट राख्याही यंदा  लक्ष वेधून घेत आहेत. अशाच काही हटके  डिझाइन केलेल्या राख्या ‘तालिस्मान’ या ब्रॅण्डने बाजारात आणल्या आहेत. त्याविषयी ब्रॅण्डचे मालक रिषभ कोठारी सांगतात, ‘आपल्या सणांमध्ये बदल झाला नसला तरी त्याच्या सेलिब्रेशनमध्ये नक्कीच झाला आहे. हेच हेरून आम्ही आमच्या ब्रॅण्डअंतर्गत काही खास राख्या डिझाइन केल्या. काळानुसार भावाबहिणीचं नातंसुद्धा बदललेलं आहे. हेच बदललेलं नातं आम्ही आमच्या राखी डिझाइन्समधून दाखवत आहोत. मेटलपासून बनवलेल्या या राख्या तुम्ही स्टाइल स्टेटमेंट म्हणून अगदी वर्षभरही घालू शकता’. सिल्वरप्रेमी लोकांसाठी ब्लेज आणि प्लेटेड राख्याही सर्वत्र उपलब्ध आहेत. ‘इंडिजिन’ या फॅशन ब्रॅण्डनेदेखील काही लक्षवेधी डिझाइन असलेल्या राख्या  बाजारात आणल्या आहेत. ज्यात त्यांनी अपसायकल फॅब्रिकचा वापर केला आहे.

तुम्हाला जरा हटके लुक राखीच्या डिझाइनमध्ये हवा असेल तर पेस्टल पिंक, राखाडी, पिस्ता कलर, अबोली रंग, नेव्ही ब्ल्यू आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेल्या राख्या नक्कीच उठून दिसतील. राख्यांबरोबरच पर्सनलाइज्ड आणि कस्टमाइज्ड गिफ्ट्सही बाजारात तुम्हाला मिळतील. ज्यात पारंपरिक दागिने, मिठाई, ताट, वाटी, चमचे अशा गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे यंदा लाडक्या भावासाठी राखी विकत घेताना तुम्हाला असंख्य पर्याय बाजारात उपलब्ध आहेत आणि त्यातून तुमची खास राखी निवडताना तुमचा कस लागणार आहे हे निश्चित!

viva@expressindia.com

First Published on August 9, 2019 12:02 am

Web Title: raksha bandhan rakhi mpg 94
Just Now!
X