News Flash

सजावटीला थर्माकोल वापरताय? मग हे वाचा!

गणेशोत्सवाची सजावट म्हणजे थर्माकोलची मखर, असं समीकरण अलीकडे झालं होतं. हळूहळू पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होतेय तसा थर्माकोलचा वापर घरगुती गणपतीच्या सजावटीतून कमी होतोय.

| August 29, 2014 01:13 am

गणेशोत्सवाची सजावट म्हणजे थर्माकोलची मखर, असं समीकरण अलीकडे झालं होतं. हळूहळू पर्यावरणाबाबत जागृती निर्माण होतेय तसा थर्माकोलचा वापर घरगुती गणपतीच्या सजावटीतून कमी होतोय. सार्वजनिक मंडळं मात्र अजूनही विघटन न होणारा थर्माकोल आणि प्लॅस्टिक मखरीच्या सजावटीसाठी वापरतात. मखर बनवताना वजनाने हलका, ने-आण करण्यास सुलभ आणि डेकोरेशन करण्यासाठी सोयीचा असा हा थर्माकोल गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणात वापरला जातो. पण त्याच्यानंतर या थर्माकोलचं करायचं काय? हा प्रश्नही सर्वासमोर उभा राहतो. आपण घराजवळच्या कचराकुंडीत मखर फेकून देऊन शांत होतो, पण या अविघटनशील थर्माकोलचा कचरा दरवर्षी साठत जातो.
यावरचा इलाज शोधलाय व्यवसायानं सेट डिझायनर असलेल्या सुमित पाटील या युवकानं. २७ नाटकं, सात- आठ चित्रपट, कॉमेडी एक्स्प्रेस सारख्या अनेक सीरिअल्सचे सेट डिझाईन करणाऱ्या सुमितने यंदा परळच्या पंचगंगा मंडळासाठी कोल्हापूरच्या जोतिबाच्या मंडळाचा सेट उभारला आहे. हा सेट उभारताना पूर्णपणे इकोफ्रेंडली साहित्यच वापरायचं ठरलं. त्यानुसार संपूर्ण सेट हॅण्डमेड कागद, लाकूड आणि कापडाच्या साहाय्याने बनवला गेला आहे. परंतु त्यातही काही प्रमाणात थर्माकोल वापरला गेला. या थर्माकोलचं दहा दिवसांनतर विघटन कसं करायचं, या प्रश्नाचं उत्तर डॉ. देविदास नाईक यांच्या ‘असिटोन’च्या साहाय्याने केलेल्या विघटनाच्या प्रयोगातून मिळालं. सुमित पाटील केवळ स्वत:च्या सजावटीच्या थर्माकोलची विल्हेवाट लावून थांबणार नाहीय. तर डॉ. देविदास नाईक यांच्या मदतीने ‘पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळा’मध्ये या थर्माकोलचं विघटन कशा प्रकारे करता येऊ  शकेल, याचं प्रशिक्षण तो देणार आहे.  
डॉ. देविदास नाईक यांच्या या प्रयोगामध्ये एका हवाबंद बाटलीमध्ये सुमारे एकतृतीयांश अ‍ॅसिटोन घेतलं जातं. त्यात थर्माकोलचे छोटे छोटे तुकडे टाकून बाटलीचं झाकण बंद केल्यावर पाच मिनिटांत त्याचं विघटन होण्यास सुरुवात होते. ‘थर्माकोलमध्ये ९८ टक्के हवा असल्यानं ती यादरम्यान मुक्त होऊन खाली फक्त थर्माकोलचा लगदा उरतो. हा लगदा थंड झाल्यावर त्याचं ‘अ‍ॅक्रेलिक’सारख्या मटेरीअलमध्ये रूपांतर होतं. त्यामुळे हा लगदासुद्धा टाकाऊ  नसून त्यापासून टिकाऊ  शोभेच्या वस्तू बनवणं शक्य असतं,’ असं सुमितनं सांगितलं. गणपतीचे दहा दिवस या प्रयोगाची प्रात्यक्षिकं तो करणार आहे. या लगद्यापासून तयार केलेली छोटी गणपतीची मूर्ती मंडळाच्या मुख्य मूर्तीपुढे विराजमान असणार आहे. रिसायकल केलेल्या थर्माकोलच्या इतर अनेक शोभेच्या वस्तूंचं प्रदर्शनही या दहा दिवसांत इथे पाहायला मिळणार आहे.
विसर्जनानंतर तुमच्या घरातील थर्माकोलच्या मखराचे विघटन करावयाचे असल्यास तुमच्या घरी येऊन तुमची मदत करण्याची तयारीही सुमितने दर्शवली आहे. या प्रयोगानंतर सुमारे ९८ टक्के थर्माकोलचे विघटन होऊन केवळ २ टक्के लगदा शिल्लक राहतो. त्यामुळे यंदा मखर बनवताना थर्माकोलचा वापर करणार असाल तरी त्याचे विघटनसुद्धा योग्य रीतीने करता येईल याकडे कटाक्षाने लक्ष द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 1:13 am

Web Title: read it for thermocol decoration of ganpati
Next Stories
1 रूप मनोहर
2 मराठवाडय़ातही ‘ढोल बाजें’
3 सेलिब्रिटी गणपती
Just Now!
X