रिलेशनशिप ‘टाइमपास’ नाही
‘व्हिवा’च्या २४ जानेवारीच्या अंकातलं अनघा पाटीलचं रिलेशनशिप स्टेटसवरचं आर्टिकल वाचलं. ते खरंच खूप भावलं. मला वाटतं, दुसऱ्यांच्या भावभावनांशी खेळणाऱ्या या पद्धतीवर सगळ्यांनाच कधी ना कधी गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे. आजकाल तशीच पद्धत असली तरी प्रेम ही काही केवळ ‘टाइमपास’ गोष्ट नक्कीच नाहीय, ती आयुष्यातली एक खूप सुंदर गोष्ट आहे. आपण त्याकडे कसं बघतो हे म्हणूनच महत्त्वाचं आहे.
– प्रतीक पाटील,

कॉलेज कट्टय़ावर नेणारा ‘दुनियादारी’
‘व्हिवा वॉल’मधलं व्यक्त होणं आणि आपली आवड सांगणं आवडलं. आजपर्यंत मी पाहिलेल्या सगळ्या मराठी चित्रपटात सर्वात जास्त आवडलेला चित्रपट दुनियादारी. हा चित्रपट तरुणाईचं विश्व अतिशय वास्तवदर्शीरीत्या मांडणारा आहे. अप्रतिम कथा, पटकथा, संगीत, अभिनय, पाश्र्वसंगीत, कलाकारांची निवड अशा सर्वच पातळ्यांवर सिनेमाने धमाल केली. तरुणाईचा विषय तरुणांपर्यंत ज्या पद्धतीने पोहोचायला हवा, त्याच पद्धतीने विषयाची मांडणी करण्यात आली. सिनेमातील प्रत्येक भूमिकेसाठी दिग्दर्शकाने केलेली कलाकारांची निवड खरंच परफेक्ट आहे. खास करून शिरीन(सई) आणि श्रेयसचा(स्वप्नील) रेल्वे स्टेशनवरचा सीन मनाला भिडून जातो. हा सिनेमा बघताना आपल्याला तो कॉलेज कट्टय़ावर नक्कीच घेऊन जातो, म्हणूनच ‘तेरी मेरी यारी पुन्हा बघूया दुनियादारी’
– प्रियांका कुलकर्णी