स्टार्टअप का जमाना
नवीन उद्योग सुरू करणाऱ्या तरुणाईच्या संदर्भातले ‘स्टार्टअप का है जमाना’ हे लेख वाचले. निहारिका पोळ आणि कोमल आचरेकर यांनी तरुणाईच्या कथा चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. अभिनंदन!
प्रदीप आराध्ये
(याच आशयाचे पत्र राजन लिंगायत, औरंगाबाद यांनीही पाठवले आहे.)

छोटी कंपनी मोठा अनुभव
आजच्या काळातील तरुणाईला स्वत:चे नवे उद्योग सुरू करण्याचे वेध शिकत असतानाच लागतात. अनेकांना छोटय़ा कंपनीपासून किंवा फर्मपासून आपलं करिअर सुरू करावंसं वाटतं. कारण तिथून सगळ्या गोष्टी शिकता येतात. मीदेखील माझं करिअर एका छोटय़ा निर्यातदार कंपनीपासून सुरू केलं. तिथे अकाउंटिंग, परचेस, निगोसिएशन्स, फॉलो-अप हे सगळंच शिकायला मिळालं. संपूर्ण आयात-निर्यातीची प्रोसेस जाणून घेता आली. तो सगळा अनुभव हा विषय वाचताना आठवला. खूपच छान मांडलेला विषय.
राहुल नातू

जहाँ तुम ले चलो
दिनांक १४ ऑगस्टच्या लोकसत्ता ‘व्हिवा’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘जोडी कमाल की!’ हा लेख वाचला. लेख सुंदरच आहे. पण काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. गुलजारसाहेबांचा वाढदिवस १६ तारखेला नसून १८ ऑगस्ट रोजी असतो. शिवाय लेखात नमूद केलेल्या चित्रपटगीतांबरोबरच गुलजार-विशाल जोडीचा आणखी एक चित्रपट नमूद करावासा वाटतो. १९९९ साली प्रदर्शित झालेला देश दीपक दिग्दर्शित ‘जहाँ तुम ले चलो’ हा चित्रपट. सोनाली कुलकर्णी यात मुख्य भूमिकेत होती. हरिहरन यांनी गायलेले ‘अठन्नी सी जिंदगी’ अगदी कालसमर्पक आहे. सुरेश वाडकर यांच्या आवाजातील ‘थक गयी हो तो’ आणि ‘देखो तो आसमाँ’ आणि रेखा भारद्वाज यांच्या स्वरातील ‘ये कैसी चाप’ ही गाणी अजिबात चुकवू नयेत, अशी आहेत. तगडी स्टारकास्ट नसल्याने चित्रपटाने व्यवसाय केला नाही. पण या स्तंभात अशा दुर्लक्षित पण मौल्यवान गानरत्नांचाही उल्लेख व्हावा.
सुरेश शेलार, मुंबई</strong>

शब्दसखा भावतोय
रश्मी वारंग यांचे शब्दसखा हे सदर खूपच वाचनीय आहे. मागच्या आठवडय़ात त्यांनी दिलेले ‘अनियन आख्यान ’ खूपच भावले. उद्यापासून ‘अनियन पकोड’च म्हणणार. शब्दाचा योग्य उच्चार काय, रुळलेला उच्चार कोणता यातला फरक यामुळे समजायला सोपा जातो.
’  अभय धोपावकर
(याच आशयाचे पत्र मनीषा प्रधान यांनीही पाठवले आहे.)
viva.loksatta@gmail.com
व्हिवा पुरवणीतील लेख, सदरे कशी वाटतात, तरुणाईचे कोणते विषय यात आले पाहिजेत असे वाटते, ते आम्हाला ई-मेल करून नक्की कळवा.