News Flash

विष्णूज् मेन्यू कार्ड : नारंगी

संत्र हे फळ दोन हंगामात येतं. नागपुरी संत्री प्रसिद्ध असली तरी सध्या सगळीकडेच संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. संत्र्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात

| November 15, 2013 01:04 am

संत्र हे फळ दोन हंगामात येतं.  नागपुरी संत्री प्रसिद्ध असली तरी सध्या सगळीकडेच संत्री मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. संत्र्यात लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याने रक्तवृद्धी होते. अशा बहुगुणी नारंगीच्या या वेगळ्या रेसिपीज् आजच्या मेन्यू कार्डमध्ये..
संत्री चवीला आंबट-गोड असणारे फळ आहे. संत्रे म्हणजे िलबाचीच एक जात. संत्र्याला ‘नारंगी’ असेसुद्धा म्हणतात. मला संत्र तर अतिशय प्रिय आहे, कारण माझे मूळ गाव संत्र्याच्याच भागातलं. मी नागपूरचा. त्यामुळे संत्री मला खूप आवडायची. संत्र्याची एक गंमत मला आठवते. लहानपणी आम्ही संत्री खाता खाता त्याची साल दुसऱ्याच्या डोळ्यात पिळायचो. साल पिळल्याबरोबर डोळ्यात आग व्हायची. म्हणून माझं कुतूहल जागं झालं की, यामध्ये असे काय असावे? थोडय़ा शोधानंतर असं लक्षात आलं की, यामध्ये कुठलातरी ज्वलनशील पदार्थ आहे व मी ती संत्र्याची साल आगीवर पिळली व असे दिसले की त्या रसाने पेट घेतला. तो एक प्रकारचा खेळच झाला मग.
संत्र्याला उष्ण हवा मानवते. भारत, मलेशिया व चीन हे देश संत्र्याचे मूळ स्थान समजले जाते. येथून ती दुसऱ्या देशांत व तेथून युरोप, आफ्रिकेत गेली. भारतात प्राचीन काळापासून संत्रे परिचित आहे. बीचे रोप बनवून व कलम करून अशा दोन्ही प्रकारे संत्र्याची लागवड केली जाते. संत्र्याचे झाड लहान आकाराचे, पुष्कळ फांद्या असणारे व बाराही महिने हिरवेगार असते. त्याची पाने मोसंबीच्या पानांपेक्षा लहान व अत्यंत मऊ असतात. त्याची फुले पांढरी, गोलाकर व चार ते आठ पाकळ्यांची असतात. फूल पिकू लागले की पिवळे होते व पिवळे होता होता लालसर बनते. या फुलाचा वास अत्यंत गोडसर असतो. संत्र्याच्या फुलाची साल अगदी सुटी पडते. साल पिवळसर लाल रंगाची असते. संत्र्याचा पहिला मोसम ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत आणि दुसरा मोसम मार्च ते मेपर्यंत असतो. त्याला आंबीया व मृग बार असे म्हणतात. पहिल्या मोसमातील फळे आंबट असतात. दुसऱ्या मोसमातील फळे गोड असतात व ती उत्तम प्रतीची समजली जातात.
मध्य प्रदेशात संत्र्याला वसंत-ग्रीष्म ऋतूंत फळे येतात. ती अधिक गोड असतात. संत्र्याचे झाड लावल्यानंतर पाचव्या वर्षी त्याला फळे लागतात. एका झाडावर साधारणत: दोनशे ते चारशे फळे येतात. त्याचे झाड वीस ते पंचवीस वर्षांपर्यंत फळ देत असते.
संत्री दोन प्रकारची असतात. आंबट आणि गोड. लाडू, कलवा, रेशमी, नागपुरी, खानदेशी, सीलहटी आणि व सहरानपुरी अशा संत्र्याचे अनेक जाती आहेत. भारतात गुजरात, आसाम, बंगाल, मध्य प्रदेश, पुणे, अहमदनगर व खान्देशात संत्र्यांची लागवड केली जाते. पुणे, धुळे, तसेच खान्देशातही संत्र्यांचे विशाल मळे पाहायला मिळतात.
मध्य प्रदेशात उत्तम प्रकारची संत्री मोठय़ा प्रमाणात होतात. नागपूरची संत्री सर्वात उत्तम समजली जातात व ती खूप प्रसिद्धही आहेत. नागपूरमध्ये संत्र्याच्या मोठमोठय़ा बागा व मळे आहेत. तेथील संत्री मोठी आणि गोड असतात. खान्देशी व कुर्गी संत्रीही त्यांच्या मधुर स्वादासाठी प्रसिद्ध आहेत. सिक्कीमची संत्रीही सुंदर वासासाठी व गोडव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आसामी संत्री आकाराने लहान; परंतु अत्यंत गोड असतात. मोझाम्बिक बेटातून जी संत्री भारतात येतात ती खूपच स्वादिष्ट व पौष्टिक असतात. वैज्ञानिक मताप्रमाणे, संत्र्यामध्ये जीवनसत्त्व ‘ए’, ‘बी’ सामान्य प्रमाणात, जीवनसत्त्व ‘सी’ जास्त प्रमाणात आणि ‘डी’ कमी प्रमाणात असते. त्यात लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्याने संत्री खाल्ल्याने वजन वाढते व रक्तवृद्धी होते. रक्तातील फिकटपणा दूर होतो व रक्त लाल रंगाचे बनते. तसेच दात व हाडे मजबूत बनतात. संत्र्यात फॉस्फरस व खनिज द्रव्येही असतात. संत्र्याच्या काही वेगळ्या रेसिपीज-

संत्र्याचा जॅम
साहित्य : संत्र्याचा गर ३ वाटय़ा, साखर ३ वाटय़ा, एका संत्र्याची साल, सायट्रिक अॅसिड- छोटा पाव चमचा, रेड ऑरेंज रंग- जरुरीपुरते.
कृती : संत्र्याचा गर व साखर एकत्र करून घट्ट होईस्तोवर उकळून घ्या. उकळतानाच त्यामध्ये सायट्रिक अॅसिड व रेड ऑरेंज रंग घाला. थंड झाल्यावर त्यात एका संत्र्याच्या सालाचा वरचा भाग किसून घाला किंवा चांगल्या दर्जाचा इसेन्स घाला. नंतर बाटलीत भरून ठेवा.

संत्र्याच्या सालीचे लोणचे
साहित्य : ५ संत्र्यांची साल (सालीचे बारीक तुकडे करून घेणे), १० िलबांचा रस (िलबाच्या सालीही बारीक करून घेणे) साखर १ वाटी तेलात परतून घेणे, मेथी दाणे.
कृती : साखरेत भिजेल इतपत पाणी घालून पातळ करणे, िलबाचा रस व उर्वरित जिन्नस घालून १ उकळी येऊ देणे. थंड करून बरणीत भरून ठेवणे.

संत्र्याची बर्फी
साहित्य : संत्र्याचा गर २ वाटी, साखर १ वाटी, मिल्क पावडर १ वाटी, संत्र्याचा इसेन्स अर्धा चमचा, रंग पाव चमचा.
कृती : संत्र्याच्या गरात साखर घालून त्याचे पाणी आटेस्तोवर घट्ट शिजवून घ्या. नंतर यात इसेंस व रंग घाला. मिश्रण थंड झाल्यावर त्यात मिल्क पावडर घाला. नंतर हे मिश्रण एकत्र करून एका थाळीत पसरवा व त्याच्या वडय़ा कापून खायला द्या.

पनीर ऑरेंज
हा एक भाजीचा प्रकार म्हटला तरी चालेल. याला भाताबरोबर किंवा ब्रेडबरोबर खातात.
साहित्य – संत्र्याचा रस १ वाटी, पनीरचे लांब तुकडे १ वाटी, चिली फ्लेक्स अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, लोणी १ चमचा, बारीक चिरलेला लसूण अर्धा चमचा, कॉर्नस्टार्च १ चमचा, स्टारफूल २-३.
कृती :- पातेल्यात लोणी गरम करून त्यात लसूण परतून घ्या. नंतर त्यात संत्र्याचा रस घालून उकळवा. उकळी आल्यावर त्यात चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, स्टारफूल व पनीर घालावे. कॉनस्टार्चच्या पाण्याने घट्ट करून वरून फ्रेश क्रीम घालावे व ब्रेडबरोबर सव्र्ह करावे.

मार्मलेड
साहित्य : संत्र्याची साले, साखर, लिंबू रस
कृती : दोन संत्र्यांची साले भांडय़ात पाणी घालून ठेवावी. आठ-दहा तास ती साल भिजली की, चहाचे चमच्याने सालीतील आतले दोरे खरडून टाकून, स्वच्छ करावी, धारदार सुरीने अगदी बारीक किसाप्रमाणे चिरावी व पाण्यात धुवून त्यात २ कप पाणी घालून नरम शिजवावे. यानंतर २ संत्र्यांचा गर काढून त्यातील बिया काढून टाकाव्यात. मग तो गर अॅल्युमिनियमच्या भांडय़ात गॅसवर ठेवून एक वाफ आली की, त्यात मिश्रणाएवढी साखर घालून ते भांडे उतरून ठेवावे. नंतर दुसऱ्या दिवशी नरम शिजलेल्या सालांतले पाणी टाकून त्यात साखरमिश्रित संत्र्याचा गर व अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर शिजवावा. मिश्रण घट्टसर झाले की एक िलबाचा रस व त्यात आवश्यकतेनुसार रेड ऑरेंज रंग घालावा. थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 1:04 am

Web Title: recipe of orange food
Next Stories
1 खाऊचा कट्टा : चहा आणि फक्कड गप्पांचा फड
2 व्हिवा दिवा
3 क्लिक
Just Now!
X