||  राधिका कुंटे

जिद्द आणि जिज्ञासेच्या बळावर मेहनतीने अभ्यास करून करिअर कसं आकारतं  ते राजकुमार मिसाळच्या संशोधनाच्या दिशेने झालेल्या प्रवासावरून दिसतं. 

राजकुमार मिसाळ. राहणार वरकुटे खुर्द, इंदापूर, पुणे. पहिली ते चौथी दगडे वस्ती प्राथमिक शाळा. पाचवी ते दहावी महात्मा फुले विद्यालय वरकुटे खुर्द. अकरावी-बारावी केतकेश्वार महाविद्यालय निमगाव केतकी. त्याचे आजोबा शिक्षक होते. त्यामुळे वडिलांना वाटायचं त्याने शिक्षक व्हावं. तो तितकासा हुशार नव्हता अकरावीपर्यंत. शेतीकाम करून होईल तसं शिकणं सुरू होतं. शिक्षणाबद्दल फार आस्था होती असंही नाही. त्याच्या वडिलांना व्यावहारिक ज्ञान आणि सामाजिक भान खूप. तो बारावीत असताना त्यांनी पैज लावली की बारावीला ७० टक्के मिळवलेस तर हवी ती टू व्हीलर घेऊन देईन. म्हणजे त्याला डीएडच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल, हा त्यामागचा उद्देश. त्या आशेवर त्याने अभ्यास केला आणि ६९.३३ टक्के मिळालेही, मात्र तेव्हा टू व्हीलर घेण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याने समजून घेतलं. त्याच्या घरी शिक्षणाचं महत्त्व खूप असून वडिलांनी आम्हा चारही भावंडांना खूप शिकवलं. राजकुमार सांगतो की, ‘डी. एड.च्या प्रवेशासाठी चार ठिकाणी विचारपूस करून अकलूजला प्रवेश घ्यायचं पक्कं झालं. माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान पुण्यातील बँकेत अधिकारी पदावर होते. त्यांनी वडिलांना सांगितलं की ग्रामीण भागात प्रवेश घेतल्यास तो चौकटीत अडकेल. त्याला पुण्याला पाठवल्यास त्याच्या करिअरला आकार मिळेल. पैशांच्या अडचणीमुळे वडिलांना चटकन निर्णय घेता येईना. तेव्हा सचिन सरोदे- माझ्या दाजींनी त्यांना आश्वास्त करत माझी जबाबदारी घेतली. माझी मोठ्या भावासारखी काळजी घेतली. त्यांच्या घरी हडपसरला राहून मी हिंगणे खुर्दमधील ‘ज्ञानगंगा डी. एड. कॉलेज’मध्ये डी. एड. केलं. आई मात्र खूश नव्हती. तिच्या मते, मी आणखी मोठं ध्येय साध्य करायला हवं होतं. एकीकडे मी एमपीएससीचाही अभ्यास सुरू केला. डी. एड.नंतर ‘आबासाहेब अत्रे विद्यालया’त सहा महिने प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलं. दरम्यान, हडपसरमधल्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात बी. ए.चं शिक्षण सुरू होतं. नोकरीच्या कालावधीतच दुसऱ्या वर्षांची परीक्षा सुरू झाली. शाळा ते महाविद्यालयात यायला दोन तास लागायचे. कधी पेपरला पोहोचायला उशीरही व्हायचा. भाषिक कौशल्य आत्मसात झाल्याने अडीच तासांत पेपर देऊन पुन्हा शाळेत परतायचो’.

एकदा तो सहज बोलून गेला की आता एम. ए. हडपसरहून नाही करणार. मग पुणे विद्यापीठात चौकशी केली. अर्ज केला. प्रवेश मिळाल्याचं कळल्यावर हॉस्टेलच्या सोयीची विचारणा केली. सुदैवाने ती झालीही. दुसरीकडे एमपीएससीची तयारी सुरूच होती.  पुणे विद्यापीठातली अभ्यासाची सोय बघता पीएसआय होऊ शकेन अशी आशा त्याला वाटत होती. ‘त्या टप्प्यापर्यंत मला कधीच वाटलं नाही की मी एम. ए.नंतर पीएचडी करणार आहे. एम.ए. करायचं कारण इथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास होतो हेच होतं. एम.ए.ला अनेक शोधनिबंध सादर केले. एक होता ‘व्यवहारातील शब्द आणि त्याला पर्यायी शब्द’. त्यासाठी अर्थशास्त्रातील काही शब्द लक्षात घेतले होते. तो शोधनिबंध माझ्या लक्षात राहील असा झाला होता. दुसरा ‘आपला झालेला अपमान’ हा शोधनिबंध उत्तम झाल्याच्या प्रतिक्रिया मिळाल्या. दरम्यान, माझे कौशल्य आणि ज्ञानाचा अंदाज असलेल्या एका मैत्रिणीने पेट परीक्षा द्यायला सांगितली. मला तसं अजिबात वाटत नसल्याने फीचे पैसे वाया का घालवावेत, असा माझा विचार होता. ती ऐकेचना. तिच्या मताला मित्रानेही दुजोरा देत शेवटच्या दिवशी फॉर्म आणि पैसे भरले. मैत्रिणीच्याच नोट्सवरून परीक्षेचा अभ्यास केला; परंतु त्याने समाधान झालं नाही. प्रबंधलेखनाच्या पद्धतीवर अधिक प्रश्न येणार होते. त्यासाठी पेपरच्या, आदल्या दिवशी तिनेच खटाटोप करून पुस्तक उपलब्ध करून दिलं. तेव्हा पीएचडी आणि एम. फिल. अशा दोन्ही पेट परीक्षा दिल्या. निकाल बघायचं माझं धाडस झालं नाही. फॉर्म भरला त्या मित्रानेच कळवलं की एम. फिलला नापास, पण पीएचडीला पास.‘हितचिंतकांचं म्हणणं होतं की पेट परीक्षा पास झाला असलास तरी पीएचडीला निवड होणार नाही. कारण सेट-नेट असल्याशिवाय पीएचडीला प्रवेश नाही. शिवाय मुलाखतीतही तुझी निवड होणार नाही. मी कुणाला उत्तरं द्यायच्या फंदात पडलो नाही. मी माझ्या परीनं प्रयत्न करायचे ठरवलं’, असं राजकु मार सांगतो.

त्याच्या पीएचडीचा विषय निश्चिात कसा झाला याचा किस्सा चित्रपटाच्या कथेत शोभेल असा. खरंतर तो त्याच्याच तोंडून ऐकण्यासारखा, पण शब्दमर्यादेमुळे इथे संक्षिप्तपणे सांगते. त्याने  डॉ. विकास आमटे लिखित ‘आनंदवन प्रयोगवन’ हे पुस्तक वाचलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे पुस्तक किंवा अशा प्रकारच्या पुस्तकांत फक्त वास्तव अनुभवविश्वातल्या गोष्टी आहेत. थोडा अधिक विचार केल्यावर जाणवलं की हेच खरं साहित्य आहे. महाराष्ट्रातील समाजसेवकांनी लिहिलेल्या पुस्तकांवर प्रबंध लिहिता येऊ शकतो का?, असं त्याने पुणे विद्यापीठातील मराठीचे प्राध्यापक डॉ. मनोहर जाधव यांना विचारलं. त्यांच्या होकारामुळे त्याला हुरूप आला. त्या काळात ‘तू हे करू नको, स्पर्धा परीक्षेची तयारी कर’, असे ‘हितचिंतकां’चे सल्ले त्याला मिळत होतेच.

फग्र्युसन महाविद्यालयातील प्रा. सिद्धार्थ आगळे सौंदर्यशास्त्र शिकवण्यासाठी पुणे विद्यापीठात येतात. एकदा त्यांची गाडी पंक्चर झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याशी राजकुमारची भेट झाली. गाडी दुरुस्तीसाठी मदत करताना त्यांनी त्याची विचारपूस केली. पीएचडीचा विषय कळल्यावर त्यांनीही विषय चांगला असल्याचं सांगितलं. काही काळाने तो मुलाखतीला गेला. खेळीमेळीच्या सुरात प्रश्नांना सुरुवात होत विषयासंदर्भात विचारणा झाली. मग प्रबंध लिहिण्याविषयीच्या वाचनाबद्दल सांगायला सुरुवात केल्यावर परीक्षकांना कळलं की त्याला जास्ती माहिती नाही. पुढचा प्रश्न आला, ‘मराठी साहित्याला वाहिलेली मासिकं कोणती?’ तो उत्तरला – अभिरुची आणि अशी बरीच आहेत, आणखी आठवत नाहीत. मुलाखत संपवून बाहेर पडल्यावर वाटलं आपली निवड होणं काही शक्य नाही. एक दिवस यादी लागल्यावर कळलं की त्याची निवड झाली. आधी विश्वाासच बसला नाही, पण ते खरं होतं. तो विषय सादरीकरणाच्या तयारीला लागला. तो सांगतो की, ‘सादरीकरणाच्या वेळी विषय सांगितल्यावर एक परीक्षक म्हणाले, ‘समाजसेवक ही संकल्पनाच अस्तित्वात नाही’. तो विषय तिथेच संपला. मग प्रा. जाधव सरांची भेट घेऊन सादरीकरणाच्या वेळी घडलेली गोष्ट सांगितली. त्यांच्यासह आणखी दोन-तीन शिक्षकांनी विषयाला मान्यता दिली. दुसऱ्या एका विद्याथ्र्याच्या बाबतीत असंच घडलं आणि नंतर मदत मिळून त्याचा विषय मान्य झाल्याचं कळलं. मीही मदत मागितल्यावर ती नाकारण्यात आली. मग आणखी एका प्राध्यापकांकडे गेलो. सगळं सविस्तर सांगून म्हटलं की आतापर्यंत विभागाने मला नेहमी सहकार्य दिलं आहे, पण आता असं होत असेल तर माझ्या हक्कासाठी बंडाचा झेंडा उभारावा लागेल. दुसऱ्या दिवशी माझा विषय मंजूर झाला. अजूनही हितचिंतकांचा धोशा कायम होताच की विषय मंजूर झाला तरी पुणे विद्यापीठाच्या आरआरसी (रिसर्च अँड रिकॉग्निशन कमिटी)मध्ये विषय मंजूर होऊ शकणार नाही. काही महिन्यांनी कळलं की माझा विषय मंजूर झाला आहे. या टप्प्यावर वाटलं की आता सेट – नेट दिली तर प्राध्यापक होता येईल. मैत्रिणीच्या नोट्सचा अभ्यास करत या परीक्षा देत राहिलो, पण अगदी थोडक्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागत होते. तेव्हा ठरवून स्वत:च्या नोट्स काढल्या. तेच वाचत राहिलो आणि दोन्ही परीक्षा पास झालो. मग ठरवलं नेट जेआरएफ मिळवायची. चार पैसे कमावण्यासाठी लघुउद्योग सुरू असल्याने अभ्यासाला फारसा वेळ मिळाला नाही. स्वत:च्या नोट्स वाचून परीक्षा दिली आणि नेट जेआरएफसह पहिला क्रमांक पटकावला. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला होता, अशी आठवण त्याने सांगितली.

घरच्यांसह ऋषिकेश खंडाळे आणि दिनेश टेंगळे या मित्रांनी त्याला सर्वतोपरी पाठिंबा दिला. विद्यापीठातील मित्रमंडळी, सहविद्यार्थी, सहकारी, प्राध्यापक यांचं कायम सहकार्य मिळालं.  नेट जेआरएफ मिळाल्यानंतर लगेच लॉकडाऊन लागला. त्या काळात त्याच्या मनात आलं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्याच विचारांतून ‘यशाच्या पाऊलवाटा’ हे पुस्तक गावाला घरी राहून लिहिलं असून ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तिमत्त्वांचे प्रेरणादायी विचार आणि त्याचं स्पष्टीकरण लिहिलं आहे. त्याची मोटिव्हेशनल स्पीकर व्हायची तयारी सुरू असून इंदापूरमधल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन व्याख्याने द्यायचा विचार मनात घोळतो आहे.

‘महाराष्ट्रातील समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचे साहित्य – एक अभ्यास’ या विषयाचा एकूण कालावधी पाच वर्षांचा असून पैकी तीन वर्षं वाचन व लिखाण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे जितकी पुस्तकं उपलब्ध आहेत तितकी विकत घेतली आहेत. त्याने जवळपास ३९ पुस्तकं निवडली असून सध्या २५ पुस्तकं मिळाली आहेत. या अभ्यासात जाणवलं की, ते वास्तवावर आधारित आहे. ते भारतीय राज्यघटनेनुसार स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव याचा विचार करायला शिकवतं. तरुणांना दिशा द्यायचं, प्रेरणा द्यायचं काम ते करतं. त्याचे पीएचडीचे मार्गदर्शक हनुमंतराव जाधव असून त्यांचं  मोलाचं मार्गदर्शन मिळतं. पुणे विद्यापीठात स्टायपेंडच्या संदर्भात २२ दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलन व उपोषणात जाधव सर कोणत्याही दबावाला न जुमानता कायम त्याच्यासोबत ठामपणे उभे राहिले. या लढ्याला यशही मिळालं. सध्या स्टायपेंड मिळत असला तरी त्याचे नोकरीसाठी प्रयत्न सुरू आहेत. पुढील वाटचालीसाठी त्याला अनेक शुभेच्छा.

viva@expressindia.com