वापरलेल्या डेनिम्सचा वापर करून भटक्या कुत्र्यांसाठी रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट बनवण्याचं पुण्यातल्या तरुणांच्या एका गटानं सुरू केलेलं काम आता देशभर पोचलंय. रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी त्यांची ‘मोटोपॉज’ मोहीम कौतुकाचा विषय झाली आहे.

प्राण्यांची आवड असलेले आपल्यापैकी असंख्य असतील. काहींच्या घरीदेखील पाळीव प्राणी असतील, पण रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांसाठी काम करणारे मोजकेच लोक असतात. ‘टच हार्ट’ हा तरुणांचा ग्रुप या मोजक्यांपैकी एक. या ग्रूपची मोटोपॉज ही मोहीम सध्या जोशात सुरू आहे. शांतनू नायडू या २३ वर्षीय इंजिनिअरच्या प्राण्यांविषयीच्या आवडीतून मोटोपॉज (ट३स्र्ं६२) ही मोहीम सुरू झाली. वापरलेल्या डेनिमच्या (जीन्स) कपडय़ातून भटक्या कुत्र्यांसाठी चमकणारे रिफ्लेक्टिव्ह कॉलर बेल्ट बनविण्याचे काम त्याने सुरू केलं आणि पाहता पाहता हे काम भारतभर जाऊन पोचलं.
शांतनू सांगतो, ‘पुण्यात जवळजवळ ४४ हजार भटके कुत्रे आहेत. दररोज कुठल्या ना कुठल्या वाहनाच्या धडकेने त्यांना इजा होते, ते मरतात आणि त्यांच्यामुळे वाहनांनाही अपघात होतात. ते होऊ नये म्हणून मोटोपॉजचा जन्म झाला. पाळीव प्राण्यांची आवड असल्यामुळे असे काहीतरी करावे याचा विचार आला. रात्री बरेचदा कुत्रा अचानक गाडीसमोर आल्याने अपघात होतात. अंधारात ते दिसत नाहीत, हा प्रश्न असतो. म्हणूनच वापरलेल्या डेनिम्स आणि ३एम रिफ्लेक्टिव्ह टेप यांच्या साहाय्याने आम्ही या कुत्र्यांसाठी कॉलर बेल्ट बनविण्याचं काम सुरू केलं. फेसबुक पेज आणि पोस्ट्समुळे आमच्या मोहिमेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्या कॅम्पेनमध्ये आम्ही ३०० कुत्र्यांना हे बेल्ट बांधले होते. त्यानंतर गेल्या १५ ऑगस्टला झालेल्या मोहिमेत पुणे आणि बंगळुरू मिळून ५०० कुत्र्यांना हे कॉलर बेल्ट बांधण्यात आले आणि हे काम वाढत गेलं. हे कॉलर बेल्ट्स १५० मीटर लांबून दिसतात. त्यामुळे रात्रीचे अपघात टळू शकतात.’
शांतनू इंजिनीअर असून टाटा कंपनीमध्ये नोकरीला आहे. त्याचं हे काम रतन टाटा यांच्या कानावर गेलं आणि त्यांनीदेखील या कामाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्या पाठिंब्यामुळे २६ जानेवारीपासून भारतातील १० शहरांमध्ये मोटोपॉजचं काम सुरू झालं. यामध्ये जम्मू, गोवा, मुंबई, दिल्ली, बंगळुरू, कलकत्ता आदी शहरांचा समावेश आहे. ‘आमचा १५ जणांचा ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणांहून डेनिम्स कलेक्ट करतो आणि पुण्यात या कॉलर बेल्ट्स बनवण्याचं काम केलं जातं. या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा बघून रस्त्यावरील लोकदेखील त्यांना पाळीव समजून त्यांच्या सोबत गैरवर्तन करत नाहीत’, असंही शांतनू म्हणाला.
शांतनूच्या उपक्रमाला तरुणाईकडूनही दाद मिळाली आणि अनेक प्राणीप्रेमी यात सामील झाले. ‘टच हार्ट ग्रुप’चा मेंबर निनाद तांबे सांगतो, ‘शांतनू मित्र असल्यामुळे आणि प्राण्यांविषयी मला आवड असल्यामुळे मी या कॅम्पेनशी जोडलो गेलो. भटक्या कुत्र्यांसाठी इतक्या वेगळ्या पद्धतीने विचार करणंच फॅसिनेटिंग वाटलं. बरेचदा लोक रस्त्यावरची कुत्री म्हटली की घाबरतात. पण या कुत्र्यांना प्रेमाने अप्रोच केलं तर ते काहीच करत नाहीत. ‘टच हार्ट’च्या ग्रुपमधली प्रत्येक व्यक्ती या उपक्रमात वेगवेगळी जबाबदारी सांभाळते. त्यामध्ये डेनिम्स गोळा करण्यापासून ते टेलरकडून हे कॉलर्स शिवून घेणं आणि इतर शहरांमध्ये पाठविण्यापर्यंत सर्वच आलं. आम्ही नुकतंच यामध्ये नारिंगी रंगाचं कापड वापरायला सुरुवात केली आहे. फ्लोरोसंट कलर्स असल्यामुळे ते लगेच लक्षात येतात. पुण्यातील कोरेगावपार्क भागात वरद मोरे यांच्या शोरूमबाहेर आम्ही डोनेशन बॉक्स ठेवलेला आहे. त्यामध्ये वापरलेल्या जीन्स लोक स्वत:हून टाकतात आणि आम्हाला मदत करतात.’
आतापर्यंत मोटोपॉजने एकूण ३५०० कुत्र्यांना या कॉलर्स लावल्या आहेत. हे इतक्या मोठय़ा प्रमाणावर कसं शक्य झालं? यावर‘ टच हार्ट’ची कार्यकर्ती वर्षां प्रकाश सांगते, ‘फेसबुक आणि सोशल मीडिया नसतं तर कदाचित आम्ही हे सगळं करूच नसतो शकलो. आजही आम्हाला कॅम्पेनमध्ये जॉइन होण्यासाठी आणि मदतीसाठी अनेक मेसेजेस येत आसतात. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर केला की नक्कीच काही चांगलं घडू शकतं. लोकांना कॅम्पेनबद्दल कळलं की ते बघायला येतात. बरेचदा मदतही करतात आणि शाबासकीही देतात.’
याच ग्रुपमधला सुकृत टेणी सांगतो, ‘टीमवर्कशिवाय काहीच होत नाही. आम्ही सगळेच यंगस्टर्स आहोत. कुणी विद्यार्थी तर कुणी जॉब करणारा. वेगवेगळ्या पाश्र्वभूमीचे असलो तरीसुद्धा प्राणीप्रेमापायी आम्ही एकत्र आलो आणि आता मिळून मोठं काम करणार. भटके कुत्रे असल्यामुळे लोकांना त्यांची घाण वाटते, पण आम्ही त्यांना स्वच्छ करतो, त्यांच्यावर अन्टिबॅक्टिरिअल पावडर टाकतो. त्यांना प्रेमाने वागवलं की ते आपल्याला प्रेमाने वागवतात. आम्ही त्यांना बिस्कीट खायला देतो. प्रेमाने गोंजारतो. मग तेही ही कॉलर बांधून घेतात. आतापर्यंत या कुत्र्यांनी टीममधल्या कुणावर अटॅक केलाय, असं एकदाही झालेलं नाही.’
शांतनू आणि त्याची टीम भटक्या कुत्र्यांसोबतच वयानं मोठय़ा आणि कधी कधी सोडून दिलेल्या पाळीव कुत्र्यांसाठीदेखील ‘प्रॉमिस कॅम्पेन’ चालू करणार आहेत. बरेचदा विदेशात शिफ्ट होताना किंवा इतर काही कारणांमुळे वयस्क, आजारी पाळीव कुत्र्यांना मालक सोडून देतात. रस्त्यावरच्या वातावरणाची या कुत्र्यांना सवय नसल्यामुळे त्यांचे हाल होतात. अशा कुत्र्यांसाठी काहीतरी करण्याची आमची इच्छा आह, असंदेखील शांतनू सांगतो.
भारतभरात पोहोचलेल्या या मोटोपॉज कॅम्पेनमुळे अनेक भटक्या कुत्र्यांचा जीव वाचला आहे. हे काम पुढे नक्कीच सुरू राहील, असा विश्वास संपूर्ण टीमने दाखवला.