07 December 2019

News Flash

टिप टिप फॅशन

रेनकोटप्रमाणे छत्र्यांमध्येही छोटे छोटे बदल करत नवीन काही ना काही बाजारात उपलब्ध झालं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण जेवढा कपडय़ांचा, फॅशनचा विचार करत नाही तेवढा जास्त पावसाळ्यात मात्र करावाच लागतो. कारण तो विचार जर नाही केला तर आपली फॅशनेबल तारांबळ नक्कीच उडते.

फॅशनमेरे बस की बात नाही, मी काय फॅशन करत नाही, असं कितीही कोणीही बोललं तरी प्रत्येक जण आपापल्यापरीने फॅशन करतच असतो. रोज बाहेर पडताना तुम्ही आज कोणते कपडे घालावे, या शर्टवर ही पॅन्ट छान दिसेल का किंवा यात मी जाड तर दिसत नाहीये ना असा विचार तर नक्कीच करता. म्हणजेच काय तुम्ही फॅशन करताच, फॅशनचा विचारही करताच. प्रत्येक ऋतूनुसार आपली फॅशन बदलत असते किंवा ती बदलावीच लागते. अगदी  ट्रेण्डिंग कपडे वगैरे तुम्ही घालत नसाल तरी कोणत्या ऋतूमध्ये कोणते कपडे घालावेत याचा विचार करावाच लागतो. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण जेवढा कपडय़ांचा, फॅशनचा विचार करत नाही तेवढा जास्त पावसाळ्यात मात्र करावाच लागतो. कारण तो विचार जर नाही केला तर आपली फॅ शनेबल तारांबळ नक्कीच उडते. यंदाचा पावसाळा तसा उशिरा सुरू झाला आहे आणि नाही नाही म्हणता म्हणता चांगल्याच पावसाच्या धाराही कोसळू लागल्या आहेत. मग अशा वेळी पावसाळ्यात खासकरून वापरल्या जाणाऱ्या गोष्टींमध्ये काय ट्रेण्डिंग आहे हे तर जाणून घ्यायलाच हवं.

रेनकोट

पावसाळी फॅशनचा अविभाज्य भाग म्हणजे रेनकोट. रेनकोटमध्ये नवीन फॅशन म्हणजे रंगबदल होतो इतकंच असा अनेकांचा समज आहे, परंतु यंदा वेगवेगळ्या डिझाइनचे रेनकोट बाजारात दाखल झाले आहेत. पावसाळ्यात बाईक, स्कुटी अशा टू-व्हीलरवर वापरण्यासाठी पोंचो रेनकोट बाजारात आलेले आहेत. तुम्हाला मुलींच्या कपडय़ांच्या फॅशनमधला केप हा प्रकार माहिती असेल. हुबेहूब तसाच प्रकार म्हणजे पोंचो. केपप्रमाणे वरून घालायचा आणि खांद्यावर तर तो सहज व्यवस्थित सेट होतो. यामध्ये तुमच्या हाताला मोकळीक जास्त मिळते म्हणून तुम्ही गाडी चालवताना कोणत्याही अडचणीशिवाय सहज गाडी चालवू शकता. हे रेनकोट मुला-मुलींसाठी सेमच प्रकारात आहेत. गडद ते फिक्कट आणि प्लेन ते प्रिंट अशा सगळ्याच डिझाइन आणि रंगात हे रेनकोट्स ऑनलाइन आणि दुकानातही उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी डक रेन कव्हर म्हणून बाजारात रेनकोट उपलब्ध झाले आहेत. वरून टोपी आणि खांद्याच्या वरून छत्रीसारखा याचा आकार आहे. मुलांना आवडतात त्या कार्टूनच्या डिझाइनमध्ये हे रेनकोट उपलब्ध आहेत. याला ‘अम्ब्रेला कॅप’ असंही नाव दिलेलं आहे.

छत्री

रेनकोटप्रमाणे छत्र्यांमध्येही छोटे छोटे बदल करत नवीन काही ना काही बाजारात उपलब्ध झालं आहे. अनेक वर्ष जास्तीत जास्त प्लेन रंगात असलेल्या छत्र्यांची जागा आता प्रिंटेड छत्र्यांनी घेतली आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. स्वत:च्या हाताने छत्री रंगवण्याची मज्जा अनेकांनी घेतली आहे. घरीच प्लेन रंगाची छत्री आणून त्यावर आपली चित्रकला साकारत कस्टमाईज्ड छत्र्यांच्या वापराचा हा खेळ चांगलाच रंगला आहे. याखेरीज यंदा अशाचपद्धतीने कस्टमाईज्ड छत्रीसुद्धा रंगवून दिल्या जात आहेत. शिवाय, डूडल, फ्लॉवर्स प्रिंट, अ‍ॅनिमल प्रिंट, चेक्स अशा प्रिंटच्या छत्र्या लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. छत्र्यामध्ये इन्व्हर्टेड छत्र्याही चांगल्याच ट्रेण्डमध्ये आहेत. हटके हॅण्डल असलेल्या या छत्र्या तरुणाईच्या खूप पसंतीस उतरत आहेत. घोडय़ाच्या तोंडाचा आकार, एखाद्या पक्ष्याच्या तोंडाचा आकार, नाजूक नक्षीकाम असलेला, लहान मुलांसाठी कार्टूनच्या आकाराचा दांडा असलेल्या छत्र्याही ट्रेण्डमध्ये आहेत.

फुटवेअर

पावसाळ्यात रेनकोट आणि छत्रीबरोबर आपली रोजची सोबती म्हणजेच आपली चप्पल. पावसाळ्यात चप्पल आपली मज्जाच बघयला असते की काय असं कित्येकदा आपल्याला वाटतं. पावसाळ्यात चुकून जरी आपल्या या लाडक्या सोबतीची निवड चुकली तर भर पावसात आपली चांगलीच फजिती होते. क्लॉगज (Clogges) हे मुलांच्या पावसाळी फुटवेअरमधील सगळ्यात ट्रेण्डिंग प्रकार आहे. पुढच्या बाजूने शूजसारखे दिसणारे हे फुटवेअर तुम्ही अगदी फॉर्मल ड्रेसवरही सहज घालू शकता. टिपिकल काळा, ग्रे, डार्क निळा अशा रंगांबरोबरच स्काय ब्लू, लाइट पिंक, लाल, पांढऱ्या, निऑन, चॉकलेटी रंगातही ते उपलब्ध आहेत. लेडीज फुटवेअरमध्ये जेली फ्लॅट्सला (jelly flats) मुलींची जास्त पसंती आहे. हे फुटवेअर ट्रान्स्परन्ट पासून ते अगदी पॉप रंगांपर्यंत बाजारात उपलब्ध आहेत. सोबतच फ्लिपफ्लॉप हा प्रकारही गेल्या काही वर्षांपासून ट्रेण्डमध्ये आहे.

बॅग्ज

बॅग्ज आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाची वस्तू. आणि पावसाळ्यातील तर अतिमहत्त्वाची वस्तू. कुठेही जायचं म्हटलं की छत्री, रेनकोट, फोन, पाकीट, मनी बँक अशा अगदी बेसिक गोष्टी ठेवण्यासाठी तरी छोटीशी बॅग कॅरी करावीच लागते. यासाठी अगदी बँकपॅकपासून ते सॅक, पर्सेस, स्लिंग बॅग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्ज वॉटरप्रूफ कापडामध्ये उपलब्ध आहेत. बेसिक काळया-पांढऱ्या रंगापासून, अगदी फंकी रंगापर्यंत या बॅग्ज तुम्हाला पाहायला मिळतील. ट्रान्स्परन्ट बॅग्जचाही ट्रेण्ड बाजारात नुकताच येऊ  लागला आहे. त्यामुळे तुम्ही तोही एक पर्याय नक्कीच वापरून पाहू शकता.

पाऊस आणि फॅशन हे समीकरण जुळवून आणणं फार महत्त्वाचं असतं. कारण पावसाळ्यात आपण जरा जरी चुकलो की गोंधळ होतोच. खरं म्हणजे पावसाळ्यातले कपडे हाही एक पूर्ण वेगळा विषय आहे. त्याविषयीही लवकरच जाणून घेऊ या. कारण, कपडे, बॅग, चप्पल किंवा छत्री-रेनकोट यातल्या एखाद्या गोष्टीचीही निवड चुकली तरी आपल्या फॅ शनचे तीनतेरा वाजतात. त्यामुळे या सगळ्या मुलभूत गोष्टींची व्यवस्थित काळजी घेत ट्रेण्डिंग पावसाळी फॅ शनचाही आनंद घ्यायलाच हवा!

viva@expressindia.com

First Published on July 19, 2019 1:54 am

Web Title: rending in the monsoon season abn 97
Just Now!
X