वेदवती चिपळूणकर

शास्त्रीय संगीतापासून ते सुगम संगीतापर्यंत सर्व प्रकारांमध्ये लीलया वावरणारा आणि लहानसहान मैफिलींपासून ते अमेरिकेपर्यंत आपली कला सादर करणारा तालप्रेमी कलाकार म्हणजे तरुणाईचा लाडका प्रसाद पाध्ये! पं. अरविंद मुळगावकर आणि पं. योगेश समसी यांच्याकडे तबल्याचे धडे घेतलेला प्रसाद गांधर्व महाविद्यालयाचा ‘विशारद’ आहे.

Pawar family
पवार कुटुंबीयही कौटुंबिक जिव्हाळ्याचं राजकारण करू शकतात…
a story of self confidence chaturang article
जिंकावे नि जगावेही : आपल्या माणसांचं ‘असणं’!
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम

दहावीनंतर नातेवाईकांकडे राहून पुढचं संगीत शिक्षण घेणाऱ्या प्रसाद पाध्येने आपली आवड सोडून धोपटमार्गाने जाण्याचा विचार आजतागायत कधीही केला नाही. आपल्या ध्येयावर ठाम असणाऱ्या आणि त्यासाठी रियाजाला अनन्यसाधारण महत्त्व देणाऱ्या प्रसादने कलेच्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे.

मोठेपणी काय करायचं आहे याबद्दल लहान मुलं नेहमीच स्वप्नं रंगवत असतात. मात्र मोठेपणी मला काय करायचं नाही याबद्दल ठाम असलेला प्रसाद म्हणतो, ‘मला कधीही टिपिकल शाळेचा अभ्यास आवडला नाही. शाळेत असतानाही मी तबला वाजवायचो. शालेय, तालुका, जिल्हा अशा पातळ्यांच्या स्पर्धामध्ये बक्षिसंही मिळवायचो. मोठेपणी मला कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण वगैरे घ्यायची इच्छाच नव्हती. अर्थात या शाळेतल्या बक्षिसांमुळे मला काही स्वत:चं फार कौतुक वाटत होतं असंही नाही, कारण मी स्वत:ला वासरांत लंगडी गाय शहाणी असंच समजत होतो’. मात्र हे तबलाप्रेम त्याच्यात इतकं भिनलं होतं की पुढे शिक्षण घ्यायचं नाही हा त्याचा विचार पक्का होता, असं सांगतानाच तबलाच पुढे शिकायला मी चटकन तयार झालो असं त्याने स्पष्ट केलं. ‘दहावीनंतर कोल्हापूरला मला तबला शिकायला बाबांनी पाठवलं. तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर मात्र मला इतर मुलांकडे बघून थोडा कॉम्प्लेक्स यायचा. माझ्यापेक्षा लहान मुलंपण शास्त्रशुद्ध शिकून उत्तम तबला वाजवतात हे पाहून माझ्यातल्या आवडीला चालना मिळाली आणि तिचं रूपांतर पॅशनमध्ये झालं. माझा तबला ही माझी पॅशन बनल्यावर मात्र मी खरंच मनापासून मेहनत घ्यायला लागलो, असं प्रसाद सांगतो.

शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याच्या प्रेमींमध्ये कायमच श्रेष्ठत्वाची चुरस होत आलेली आहे. प्रसाद मात्र दोन्ही क्षेत्रांत तितकाच आत्मविश्वसाने आणि सहजतेने वावरतो. तो सांगतो, ‘२००२ ते २०१० पर्यंत मी केवळ शास्त्रीय संगीतावर लक्ष केंद्रित केलं होतं. शास्त्रीय गायकांना साथ करणं, त्यात शक्य तितका अधिक रियाज करणं यावरच माझा सगळा फोकस होता. २०१० साली पहिल्यांदा मला ‘बालगंधर्व’ चित्रपटासाठी विचारणा झाली. एकदा सुगम संगीतात प्रवेश केला की रेकॉर्डिग, कार्यक्रम, मैफिली अशा गोष्टी चालू होणार आणि मला कदाचित रियाजाकडे लक्ष देता येणार नाही या भीतीने अनेकांनी मला सुगम संगीताकडे वळण्याबद्दल फेरविचार करण्याचासुद्धा सल्ला दिला’. स्टेज शो आणि माध्यमं यांच्यामुळे मग मला त्या ग्लॅमरची सवय लागेल आणि मी परत शास्त्रीय संगीताकडे वळणार नाही, अशा धास्तीने अनेकांनी आपल्याला परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचेही प्रसादने सांगितले. मात्र मला दोन्ही अनुभव घ्यायचे होते, सगळ्या प्रकारचं संगीत एन्जॉय करायचं होतं आणि सगळ्या प्रकारांत वावरायचं होतं. त्यामुळे मी शास्त्रीय संगीताच्या रियाजाकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घेत चित्रपट करायला होकार दिला. त्या वेळी शास्त्रीय संगीत आणि सुगम संगीत याचा बॅलन्स ठेवणं माझ्यासाठी आव्हान होतं. मात्र मी ते आव्हान स्वीकारायचं ठरवून चित्रपटाच्या रेकॉर्डिगसाठी तयार झालो, अशी आठवण त्याने सांगितली.

मुंबईसारख्या शहरात तग धरणं अजिबातच सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खाल्लेल्या खस्तांमधून माणूस खूप काही शिकत जातो. अशा अनुभवांबद्दल प्रसाद म्हणतो, ‘२०१० मध्ये ‘बालगंधर्व’ केल्यानंतर ‘मोरया’, ‘मुंबई-पुणे-मुंबई’, ‘कटय़ार काळजात घुसली’ अशा चित्रपटांच्या ऑफर्स येत गेल्या. मात्र त्याच्या आधीही मी मुंबईतच होतो आणि मला सव्‍‌र्हाइव्ह करायचं होतं. त्यामुळे अगदी लहानसा गाण्याचा कार्यक्रम, कॉर्पोरेट शोज, अगदीच काय तर लग्नसमारंभातही मी तबला वाजवला आहे. याच गरजेतून मी काही काळ ‘आयआयटी मुंबई’मध्ये संगीत शिक्षक म्हणून नोकरीही केली’. ‘आयआयटी मुंबई’मध्ये पहिल्या वर्षांला म्युझिक हा विषय अनिवार्य होता आणि त्यामुळे माझी तिथली नोकरी शाबूत होती. मात्र नोकरी म्हटल्यावर कोणतेही दौरे नाहीत, महत्त्वाच्या कार्यक्रमालासुद्धा सुट्टी घेऊन जाणं शक्य नाही, अशा परिस्थितीत अनेक ऑफर्स सोडाव्या लागत होत्या. त्यामुळे मला कधी एकदा ही नोकरी सोडतोय असं झालं होतं आणि तरीही ती नोकरी मी जवळजवळ आठ वर्ष केली, असं सांगणाऱ्या प्रसादने कला आणि व्यवहारात कलाकाराची होणारी द्विधा मन:स्थिती नेमक्या शब्दांत व्यक्त केली. ‘नोकरी अचानक सोडून दिली तरीही अडचण होणारच होती. एखाद्या महिन्यात काम असेल तर पैसे मिळतील, नसेल तर काहीच मिळणार नाही. अगदी अकाउंटला तीन हजार रुपये आहेत आणि दोन दिवसांत ऐंशी हजार कोणाला तरी द्यायचे आहेत, अशीही परिस्थिती आलेली आहे. मात्र माझं नशीब अशा प्रत्येक अवघड वेळेला चांगलं असल्याने कोणत्या तरी कामाचे येणं असलेले पैसे तेव्हाच आले आणि माझी गरज भागवली गेली. इतक्या वर्षांत कधीही मला कोणाकडेही एक रुपयाही मागावा लागला नाही, हा केवळ माझ्या नशिबाचा भाग असं मी मानतो, हे सांगताना त्याच्या शब्दांतून समाधान झळकल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या बाजूला माझ्या घरच्यांनीही आजतागायत माझ्याकडे कधीही पैसे मागितले नाहीत. मुलाला त्याच्या आवडीचं काम करता येतंय याच समाधानात ते कायम राहिलेले आहेत. माझ्या आजूबाजूची माणसं चांगली होती, म्हणून मला चांगल्या संधी मिळत गेल्या आणि माझी आवड मला जपता आली, असं प्रसाद मनमोकळेपणाने सांगतो.

‘मी ज्या गायकाला साथ करत असेन त्या गायकाला माझ्यासोबत गाताना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे’, अशा विचारांनी प्रसाद पाध्ये त्याच्या कलेला आकार देतो. लोक जशी गाण्याची मैफील तासन्तास ऐकू शकतात तशीच आवड तालवाद्यांचीपण निर्माण झाली पाहिजे, असं त्याला वाटतं. ‘सूर भिडतो तसा ताल भिडला पाहिजे’ हा एकच उद्देश घेऊन प्रसाद पाध्ये कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

कोणतीही कला ही रसिकांशिवाय चिरकाल टिकू शकत नाही. अभिजात संगीत शाश्वत आहे आणि ते कायम राहणारच आहे, मात्र अभिजात संगीत ऐकणारा रसिक श्रोता आपण तयार करतो आहोत का हा मुख्य प्रश्न आहे. आणि सुगम संगीताच्या बाबतीत रेकॉर्डिगच्या पद्धतीत इतके तांत्रिक बदल होत आहेत की येणाऱ्या काळात वादकांची कितपत गरज शिल्लक राहणार आहे हाही एक चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या दोन बाबींचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. – प्रसाद पाध्ये