|| प्रियांका वाघुले

एखादी गोष्ट फक्त फायदा होतो म्हणून करत राहिलो तर कालांतराने त्यातून समाधान मिळणे कठीण होऊन जाते, असे म्हणणारी अभिनेत्री रुपाली भोसले साध्या साध्या गोष्टीतून मिळणारा आनंदही आपल्याला शोधता आला पाहिजे, असे ठामपणे सांगते. आपण करत असलेल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टी आपल्या मनावर परिणाम करत असतात. त्यामुळे आपण करीत असलेल्या गोष्टी या शरीर आणि मनावर चांगला परिणाम करणाऱ्या असाव्यात, असं ती म्हणते.

मराठी मालिका-चित्रपट आणि हिंदी मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेल्या रुपालीच्या मते फिट राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असते ते म्हणजे आपल्या मनाचा आणि शरीराचा समतोल. त्यामुळे अनेकदा अनेकजण फिटनेससाठी योग, जिम करतात. परंतु त्यातील अनेकांना ठरावीक जागेत रोज व्यायाम करण्याचा कंटाळा येत असतो. आपणही अशा प्रकारे एकाचजागी व्यायाम करण्याचा कंटाळा असलेल्यांपैकी एक आहोत, हे ती मनमोकळेपणाने कबूल करते.

त्यामुळे फिटनेससाठी रूपाली आणि तिच्या काही मैत्रिणींनी मिळून ग्रुप तयार केला आहे. हा ग्रुप ‘ओपन प्लेस एक्सरसाईझ’चा पर्याय उत्तम असल्याचे मानतो. ही काही पूर्णत: वेगळी संकल्पना नाही. म्हणजे जिममध्ये जसे व्यायाम केले जातात. त्याच प्रकारचे व्यायाम किंवा जिम एक्सरसाईज उपलब्ध साधनांच्या मदतीने कधी समुद्रकिनाऱ्यावर जाऊन मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात करण्याला ती प्राधान्य देते.

यामध्ये प्लँक, पुश अप्स, कार्डिओसारख्या गोष्टी सहजपणे करता येतात. उलट असे व्यायाम करताना मोकळ्या वातावरणात जीव घुसमटत नाही, असेही ती म्हणते. जिममधील वेट मशीन इथे वापरता येत नसल्या तरी प्रत्येकाने त्या वापरणे गरजेचेच आहे असे नाही. त्यामुळे त्याचा विशेष फरक पडत नाही असंही ती सांगते.

उलटपक्षी सर्वसाधारण स्रियांना किंवा व्यायाम करणाऱ्या कोणालाही या मशिन्स जाचक वाटतात आणि त्या मग जिमला जायचेच टाळतात. पण त्याऐवजी असा मैत्रिणींसोबत ओपन प्लेस एक्सरसाईझ करणे अगदी कोणालाही आवडू शकण्यासारखे असल्याचे तिने सांगितले. त्यामुळे आवश्यक गोष्टींपासून सरळ पळ काढण्यापेक्षा आपल्या सोयीने त्यात बदल करता येईल का हेही आपण पाहायला हवे. फिटनेसच्या संदर्भात तर ते आवश्यकच आहे, असे रूपाली आवर्जून सांगते.

viva@expressindia.com