vv09नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

अमुक अमुक फलंदाज तसा उत्तम आहे, पण अमुक अमुक शॉटमध्ये जरा कमकुवत आहे. अमुक अमुक ठिकाणी बॉल पडला तर मग त्याचा प्रॉब्लेम होतो वगैरे.. सचिनच्या बाबतीत असे काहीच बोलता येत नाही. कुठलाही बॉल यशस्वीरीत्या खेळता येईल असे मजबूत तंत्र त्याच्याकडे आहे. संगीतातसुद्धा असाच एक सचिन होऊन गेला. तो म्हणजे देवाधिदेव सचिन देव बर्मन! सिच्युएशन कुठलीही असो, भाव कुठलाही असो, हिरो-हिरोइन कोणीही असो, ‘एसडी’कडे गाण्याचे काम असणे म्हणजे १०० टक्के निश्िंचती! गाणे त्या ठिकाणी चपखल तर बसणारच, ते हिटसुद्धा तेवढेच होणार. जणू काही परिसच. गायक-गायिका असो वा गाणे, बर्मनदांनी ज्याला हात लावला त्याचे सोने झाले. आजच्या प्ले लिस्टमध्ये उल्लेख करतोय या सचिनच्या काही बेस्ट ऑफ द नॉक्स.

First glimpse of Kiran Gaikwad movie Dev manus released
‘देवमाणूस’ किरण गायकवाडच्या चित्रपटाची पहिली झलक प्रकाशित
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
shweta shinde recall college days memories and connection with kareena kapoor and vivek oberoi
मराठमोळ्या श्वेता शिंदेचं शाहिद कपूर, विवेक ओबेरॉय अन् करीनाबरोबर आहे खास कनेक्शन; म्हणाली, “हे कलाकार तेव्हा…”
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

‘पेइंग गेस्ट’, ‘तेरे घर के सामने’ – देव आनंद म्हणजे साधारणपणे सचिनदांचे जणू वानखेडेच! देवसाब आणि नूतन यांची अफलातून केमिस्ट्री आणि सचिनदांच्या जबरदस्त चाली. ‘पेइंग गेस्ट’ला किशोर, तर ‘तेरे घर के..’ला रफीसाब. देव आनंदला कोणाचाही आवाज सूटच होतो. दीदी आणि आशाताई आणि गीता दत्त आहेतच. ‘पेइंग गेस्ट’मधली ‘छोड दो आँचल’, ‘चाँद फिर निकला’, ‘ओ निगाहें मस्ताना’, ‘माना जनाब ने पुकारा नहीं’ आणि ‘तेरे घर के सामने’मधली रफी साहेबांची ‘दिल का भँवर करे पुकार’, ‘देखो रूठा न करो’, ‘सुनले तू दिल की सदा’, ‘एक घर बनाऊंगा..’ कितीही वेळा ऐका. कंटाळा येतच नाही.

‘प्यासा’, ‘कागज़्‍ा के फूल’ – गुरुदत्त नावाच्या पिचवरसुद्धा बर्मनदांनी रफीसाब आणि गीता दत्तच्या जोडीने चौफेर फटकेबाजी केली आहे. गीता दत्त-रफी साहेबांचे गोड युगल गीत ‘हम आपकी आँखों में’ व खरे तर किशोरदा स्टाइलचे, पण रफीसाहेबांनी धम्माल गायलेले ‘सर जो तेरा चकराए’, जेव्हा दोन दिग्गज एकत्र येतात- ‘जाने वो कैसे लोग थे जिनके’.. हेमंतकुमारजींचा आवाज. ‘ये दुनिया अगर’, ‘जिन्हें नाज है हिन्दपर’, ‘देखी जमाने की यारी’- रफीसाहेबांची हाय व्होल्टेज गाणी, गीता दत्तने गायलेली ‘जाने क्या तूने कही’ आणि मला सर्वात आवडणारे म्हणजे ‘वक्तने किया क्या हसीं सितम’. काय गाणंय! शब्द-तालाचे हळुवार खेळ, पिज़्‍िज़्‍ाकाटो स्ट्रिंग्सचा भारी वापर. अप्रतिम.

‘बंदिनी’, ‘सुजाता’ – बिमल रॉय, नूतन. ‘काली घटा छाये मेरा जिया तरसाये’ (हे गाणे नक्की गीता दत्तने गायलेय की आशाताईंनी? का दोघींनी? इंटरनेटवरची माहिती फसवी आहे. जरा.. तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावे), ‘नन्ही कली सोने चली’, ‘अब के बरस भेजो’, ‘तुम जियो हजारो साल’, ‘सुन मेरे बंधु रे’ आणि ‘ओ रे माझी’ (म्हणजे स्वत:च्याच बॉलिंगवर बॅटिंग!) माझी सर्वात आवडती दोन गाणी म्हणजे तलतसाहेबांचे ‘जलते है जिसके लिए’ आणि दीदींचे ‘मोरा गोरा अंग लैले’. ‘बंदिनी’मधली बाकी सगळी गाणी शैलेन्द्र यांनी लिहिली आहेत. ‘मोरा गोरा अंग’ हे एकच मात्र त्यांनी एका गॅरेजमध्ये काम करणाऱ्या संपूर्ण सिंह नावाच्या तरुणाकडून लिहून घेतले. त्या गीतकाराला आपण आज गुलजार असेही संबोधतो! गुलजारसाहेबांचे हे पहिले गाणे.

‘गाइड’ आणि ‘ज्वेलथीफ’ – पुन्हा एकदा देवसाब, विजय आनंदसाब. या वेळी रंगीत जमाना आणि पुत्र राहुल देव बर्मन यांच्या संगीत संयोजनाची साथ. त्यामुळे केवळ चालीच नाही, तर निर्मितीमध्येपण श्रीमंत अशी सगळी गाणी. या दोन अल्बम्समधले प्रत्येक गाणे माझे सर्वात आवडते असेच आहे, तरी दीदींचे ‘रुला के गया सपना’, ‘होटोपे ऐसी बात’ (ज्याच्या सारखे संगीत संयोजन पुन्हा होणे नाही), ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘पिया तोसे नैना लागे रे’ (या गाण्यातला तबला ज्येष्ठ संतुरवादक शिवकुमार शर्मा यांनी वाजवलाय म्हणे) आशाताईंचे ‘रात अकेली है, रफीसाहेबांची ‘तेरे मेरे सपने’, ‘क्या से क्या’, ‘दिन ढल जाए हाय’, किशोरदांची ‘ये दिल न होता’, ‘आसमाँ के नीचे’ व खुद्द गायलेले ‘वहा कौन है तेरा’ ही गाणी जरा जास्तच जवळची.

‘आराधना’ – अजून एक अजरामर अल्बम.. लता-किशोर. ‘मेरे सपनोकी रानी’, ‘बागोमें बहार है’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘कोरा कागज था’, ‘चंदा है तू’, ‘गुनगुना रहे है भवरे’ आणि ‘काहे को रोये..’ प्रत्येक गाणे हिटच नाही तर सुपरहिट!

हृषिदा – आपल्या शेवटच्या काही सिनेमांपैकी- ‘चुपके चुपके’ (चुपके चुपके चल दी पुरवैया, अब के सजन सावन में, सा रे ग म माँ सा रे ग), ‘मिली’ (आये तुम याद मुझे, मैंने कहा फूलोंसे) आणि ‘अभिमान’!

‘मिली’ हा चित्रपट करून हा सचिन आपल्या जगातून रिटायर झाला. एक गंमत माहितीये का तुम्हाला? सचिन तेंडुलकर याचे आजोबा ‘एसडी’चे फार मोठे फॅन होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या नातवाचे नाव सचिन ठेवले!

 हे  ऐकाच.. भावोत्कट आणि प्रयोगशील

किशोर अणि सचिनदांची फारच चांगली गट्टी होती. ‘मिली’मधल्या ‘बडी सुनी सुनी है’च्या तालमीच्या वेळी सचिनदांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यातच ते गेले. त्यामुळे हे गाणे प्रत्यक्षात सचिनदा गेल्यावर रेकॉर्ड झाले. या दृष्टिकोनातून हे गाणे ऐकून बघितले तर अंगावर शहारा येतो. किशोरदांनी भावोत्कटतेची वेगळीच पातळी या गाण्यात गाठली आहे.

दुसरे म्हणजे ‘अभिमान’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेलच, पण यातल्या गाण्यांच्या आणि गायकांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला दिसली आहे का? मलापण नव्हती दिसली. मला माझ्या बाबांनी निदर्शनास आणून दिली. चित्रपटातल्या कथेमध्ये जसजसा अमिताभ भरकटत जातो, मागे पडत जातो, त्याप्रमाणे सचिनदांनी त्याला दिलेला आवाजही बदलत ठेवला आहे. म्हणजे आधी किशोर (मीत ना मिला रे मन का), मग रफीसाब (तेरी बिंदिया रे), मग मनहर उधास (लुटे कोई मन का नगर) आणि शेवटी वाट सापडलेला बच्चन पुन्हा किशोरच्या आवाजात (तेरे मेरे मिलन की ये रैना) म्हणजे कोणता गायक जास्त चांगला हा मुद्दा नाहीये, तर बच्चनला कोणाचा आवाज जास्त शोभून दिसतो यानुसार हे बदल केले आहेत. हे लक्षात घेऊन ही गाणी पुन्हा ऐका. वेगळीच मजा येईल.
जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com