सचिनच्या ‘गम्मतजम्मत’ या चित्रपटातील ‘मी आले, निघाले, सजले, फुलले, फुलपाखरू झाले..’ या गाण्याची परवा सहज आठवण झाली. त्या वेळी फसफसणाऱ्या उत्साहात वर्षां उसगांवकरने मराठीत पदार्पण केलं होतं. आता हेच गाणं सचिनची मुलगी श्रीया हिला लागू होतंय, हा केवढा योगायोग! सदाबहार रुपडं लाभलेल्या सचिनला चित्रपटात डेब्यू करण्याएवढी मोठी मुलगी असेल, यावर विश्वास बसत नाही, मात्र त्याची ही ‘एकुलती एक’ मुलगी रुपेरी पडदा गाजविण्यासाठी आता सिद्ध झाली आहे, तीही ‘मी आले, निघाले..’ असं उत्साहानं गुणगुणत आहे.

सचिनच्या चित्रपटीय कारकिर्दीचं हे ५०वं वर्ष! (होय, ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटाद्वारे सचिनने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं. या गोष्टीला आता ५० र्वष झाली, या हिशेबाने सध्याच्या अनेक ज्येष्ठ अभिनेत्यांना अगदी अमिताभलाही तो सीनिअर आहे.) कारकिर्दीच्या या सुवर्णमहोत्सवी वर्षांचं औचित्य साधून त्याने एक नवा मराठी चित्रपट निर्माण केला असून तो लवकरच रसिकांच्या भेटीला  येईल. या चित्रपटात मुख्य भूमिकेत श्रीया चमकत आहे. सचिन आणि सुप्रिया ही मराठी प्रेक्षकांची अतिशय लाडकी जोडी. असे आई-बाबा लाभल्याचा तुला या क्षेत्रात खूपच फायदा झाला असेल, तू त्यांच्याकडून नेमकं काय शिकलीस, असं विचारलं असता श्रीया म्हणाली, ‘माझे पपा म्हणजे उत्साहाचं मूर्तिमंत प्रतीक. लहानपणापासून मी त्यांना पाहात्येय, मात्र सेटवरून ते थकून-त्रासून घरी परतल्येत, असं दृश्य मी एकदाही पाहिलं नाही. ते नेहमीच खूप आनंदी असतात. कोणत्याही गोष्टीतून चांगलं ते घ्यायचं, अशी त्यांची वृत्ती. त्यांच्याएवढा सकारात्मक विचार करणारा व आत्मविश्वास असणारा माणूस माझ्या पाहण्यात नाही. हे गुण कदाचित वारसाहक्काने माझ्यात आल्येत, त्यामुळे मीही त्यांच्यासारखीच सकारात्मक विचार करणारी आहे. आईच्या बाबतीत बोलायचं झालं तर तिच्याएवढी प्रेमळ स्त्री मी पाहिली नाही. तिच्या स्वभावाचं वैशिष्टय़ म्हणजे ती नेहमी स्वत:ला प्रश्न विचारीत असते. स्वत:विषयी ती खूपच चिकित्सक आहे, स्वत:ची कोणतीही गोष्ट, कोणतीही भूमिका याचं ती कठोर आत्मपरीक्षण करते. या दोघांचं कॉम्बिनेशन अफलातून आहे, त्यामुळे त्यांच्यातील अनेक चांगल्या गोष्टी मला जन्मत:च मिळाल्यात, असं वाटतं.
पपा एवढे मोठे अभिनेता व दिग्दर्शक, त्यामुळे लहानपणापासून माझ्यावर कलेचे संस्कार झाले नसते तरच नवल. अनेक प्रकारच्या कलांची साधना मी लहानपणापासून करीत आले. मी गाणं शिकले, कथ्थक नृत्य शिकले, लेखनाचीही आवड होती. कॉलेजमध्ये डिबेटमध्येही मी भाग घेत असे. याशिवाय मी चांगली जलतरणपटू आहे, सलग १२ र्वष मी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाल्ये. अभिनयाकडे मात्र मी काहीशी उशिरा वळले, असं म्हणता येईल. अभिनय आणि दिग्दर्शनातील माझी रुची कॉलेजमध्ये असतानाच वाढली. एनसीपीएमध्ये दरवर्षी १० लहान नाटकं सादर केली जातात. त्यात मी ‘फ्रीडम ऑफ लव्ह’ या अवघ्या १० मिनिटांच्या नाटकात अभिनय केला, मात्र त्यात मला तीन पात्रं साकारायची होती. ते आव्हान मी यशस्वीपणे पार केलं असेल, कारण माझ्या त्या अभिनयाची सर्वानी खूप प्रशंसा केली. अर्थात त्यासाठी मी महिनाभर कठोर परिश्रम घेतले होते. त्या वेळी मला जाणवलं की आपल्यातील या कलागुणांना अधिक वाव दिला पाहिजे. योगायोग म्हणजे, पपांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांत ते जी फिल्म करतायत त्यात मला पदार्पण करण्याची संधी मिळाली. हे खूपच टचिंग आहे. मजेशीर बाब म्हणजे, माझ्या आईला पपांनीच ब्रेक दिला आणि आता मलाही त्यांनीच संधी दिलीय. अभिनेत्री होण्यासाठी मी वाटेल ते करणार नाही, हे आताच सांगते. शिवाय अ‍ॅक्टिंग आणि ग्लॅमर मी वेगळं मानत नाही. आपल्यासमोर कोंकणा सेनचं उदाहरण आहे. ती समर्थ अभिनेत्री आहेच, मात्र ती करीना कपूरएवढीच ग्लॅमरसही आहे, त्यामुळे ग्लॅमर हे कशातही असू शकतं. ग्लॅमर म्हणजे स्टारडम नाही, ते चांगल्या अभिनयातूनही दिसू शकतं.
अर्थात, मी माझ्या पपांची मुलगी असल्याने दिग्दर्शन हेच माझं पॅशन आहे. आतापर्यंत काही शॉर्ट फिल्म मी केल्या आहेत. भविष्यात पपांना दिग्दर्शनात तसंच लेखनात सहाय्य करायला मला नक्कीच आवडेल. त्यांच्याप्रमाणेच मल्टिटास्किंग काम करणं मला आव्हानात्मक वाटेल. फिल्ममेकिंग आणि दिग्दर्शन हेच माझं पहिलं प्रेम आहे आणि त्यासाठी झोकून काम करायला मी सज्ज आहे.
aniruddha.bhatkhande@expressindia.com