01 June 2020

News Flash

कसोटी सह्याद्रीतली!

गोड गुलाबी थंडीला सुरुवात झाली की सह्य़ाद्रीतल्या भटकंतीला वेग येतो.

(संग्रहित छायाचित्र)

दीपेश वेदक

गोड गुलाबी थंडीला सुरुवात झाली की सह्य़ाद्रीतल्या भटकंतीला वेग येतो. अशा वेळी सह्याद्रीच्या कुशीत वर्षभर भटकंती करणारी मंडळी मात्र वेगळ्याच मोहिमेवर निघतात. ही मोहीम असते रेंज ट्रेकची. महाराष्ट्रातील दुर्गभ्रमण वर्षभर चालू असते, मात्र थंडीमधले वातावरण या भटकंतीसाठी साजेसे असल्याने अनेक भटके दोन ते तीन दिवसांचे रेंज ट्रेक करण्याला पसंती देतात. नवखे ट्रेकर आपली क्षमता तपासण्यासाठी तर अनुभवी ट्रेकर आपले साहस आजमावण्यासाठी रेंज ट्रेकला निघतात. तर अनेकांसाठी रेंज ट्रेक हे एक स्वप्न असते आणि ते पूर्ण करण्यासाठी ही मंडळी थंडी सुरू  होण्याची वाट पाहत असतात. जाणून घेऊ या सह्य़ाद्रीतल्या अशाच काही रेंज ट्रेक बद्दल..

एएमके  ट्रेक

वेळ : तीन ते चार दिवस

प्रदेश : इगतपुरी, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्यामुळेच प्रसिद्ध असा रेंज ट्रेक म्हणजे एएमके ट्रेक. अलंग, मदन, कुलंग असे सह्यद्रीतले तीन अभेद्य किल्ले या ट्रेकमध्ये भटके सर करतात. हा ट्रेक करायचा, हे सह्य़ाद्रीची भटकंती करणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न असते. आणि पावसाळा संपून थंडी सुरू झाली की हा ट्रेक करायला अनेकजण निघतात. या ट्रेकची सुरुवात समरद गावातून होते. खासगी गाडीने सकाळी समरद गाव गाठायचे. सकाळची न्याहारी उरकून अलंग किल्लय़ाच्या दिशेने चालायला सुरुवात करायची. साधारण दीड तास चालले की अलंगच्या सोंडेपर्यंत तुम्ही येऊ न पोहोचता. इथून खऱ्या अर्थाने तुमचा ट्रेक सुरू होतो. सोंडेच्या उजव्या बाजूने ट्रेक सुरू केला की वाट घनदाट जंगलातून पुढे जाते. पुढे पाण्याची वाट तुमच्या नजरेस पडते, इथून वर चढत पठारावर पोचले की अलंग किल्ला नजरेच्या टप्प्यात येतो. पुढे चालत गेलात की तुम्हाला लोखंडी शिडी दिसते, ती चढून वर आलात की तुम्ही किल्लय़ाच्या दरवाज्यात उभे असता. इंग्रजांनी हा दरवाजा दगडांनी बंद केला आहे, त्यामुळे उजव्या बाजूने चढून तुम्हाला अलंग किल्लय़ावर पोहोचता येते. साधारण साडे तीन-चारच्या सुमारास तुम्ही या किल्लय़ावर येऊन पोहोचता. वर गुंफा आहे. इथे तुम्ही मुक्कामाला थांबू शकतात. गुहेपासून वर किल्लय़ावर जाऊन जुने अवशेष, शिळा, शंकराची पिंड पाहता येते. दुसऱ्या दिवशी सकाळी येथून सूर्योदय पहावा. पुढे मदनच्या दिशेने उतरणाऱ्या दगडी पायऱ्या उतरायला सुरुवात करायची. या पायऱ्या आकाराने अगदी लहान असल्याने दोर लावून खालच्या गुहेत उतरता येते. गुहेत एका वेळी सात ते आठजण सहज राहू शकतात. मात्र गुहेच्या पुढे उतरायला काहीच मार्ग नाही. अशा वेळी पुन्हा दोर लावून तुम्हाला साधारण ४५ फूट खाली उतरायचे आहे. इथे उतरलात की अलंग आणि मदनच्या दरीत चालत जावे लागते. इथे सावली असल्याने तुम्ही पटापट चालत पुढे जातात. किल्ले मदनला चढण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. त्या चढून तुम्ही किल्लय़ाला एक प्रकारे फेरी मारता. या पायऱ्या एका कडय़ाजवळ येऊन संपतात. हा २५ फूट उंचीचा कडा दोर लावून चढायचा. वर मुक्कामाला गुहा आहे. दुपारी साधारण तीनपर्यंत पोहोचलात की मग आराम करायचा. दुसऱ्या दिवशी पुन्हा हा कडा उतरून दगडी पायऱ्या उतरून घ्यायच्या. किल्ले कुलंगकडे जायला आपण सज्ज होतो. इथून चार तास चालले की कुलंगच्या दगडी पायऱ्यांशी पोहोचतो. इथून तासाभरात किल्ला सर करणे सहज शक्य आहे. इथेही गुहा असल्याने वर मुक्काम करता येतो. शेवटच्या दिवशी पायथ्याजवळचे आंबेवाडी गाठून परतीचा प्रवास सुरू होतो.

तोरणा ते राजगड

वेळ – दोन ते तीन दिवस

प्रदेश – पुणे, महाराष्ट्र

प्रचंड ऐतिहासिक महत्त्व असलेले हे दोन किल्ले खरंच पाहण्यासारखे आहेत. गडावरील प्रत्येक वास्तू तुमच्यासमोर इतिहास जागा करते. पण हे किल्ले पाहायचे तर निदान प्रत्येक किल्ल्यासाठी एक तरी दिवस हाती हवा. पण या हिवाळ्यात तुम्ही या किल्लय़ांना भेट देणार असाल तर तोरणा ते राजगड हा रेंज ट्रेक करायला हरकत नाही. हा ट्रेक करायचा तर बस किंवा खासगी गाडीने सकाळी वेल्हे गाव गाठायचे. वेल्हे गावातून चढायला सुरुवात केली की साधारण तीन – साडेतीन तासात आपण तोरणा किल्लय़ाच्या महादरवाज्यापाशी येऊ न पोहोचतो. पुढे किल्ला पहायला दिवस पुरेसा आहे. सोबत टेन्ट नेला असेल, तर कोकण दरवाज्याजवळ थंड हवेत झोपण्याची मजा काही औरच. टेन्ट नसेल, तर मेंगाईदेवीचे मंदिर हा उत्तम पर्याय. पहाटे लवकर उठून चहा-नाश्ता उरकून घ्यावा. सूर्योदय होण्यापूर्वी बुधला माची गाठावी. उगवत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेऊन दूरवर दिसणाऱ्या राजगडाच्या दिशेने चालायला सुरुवात करावी. तोरणा आणि राजगड यांना जोडणारी ही साधारण २२ किमी लांब डोंगररांग पार करणे हा एक साहसी अनुभव आहे. साधारण सहा तासांचा हा प्रवास थंडीमध्ये करणे सोपे जाते. सूर्य डोक्यावर येईपर्यंत तुम्ही राजगडाच्या संजीवनी माचीवर पोहोचता. अशा वेळी पद्मवती माचीवर जाऊन मंदिरात दुपारचे जेवण उरकून घ्यायचे. थोडी विश्रांती घेतली की राजगड पहायला सुरूवात करायची. रात्री टेन्ट असेल तर बालेकिल्लय़ात मुक्कामाला जायचे. नाही तर पद्मवती देवीच्या मंदिरात झोपायचे. सकाळी उठून उरलेला किल्ला पहायचा आणि राजगड उतरायला सुरूवात करायची.

तोरणा ते रायगड

वेळ – तीन ते चार दिवस

प्रदेश – पुणे ते रायगड, महाराष्ट्र

स्वराज्याचा पहिला किल्ला तोरणा ते स्वराज्याची राजधानी रायगड असा अभूतपूर्व ट्रेक करायला अनेक भटके थंडीमध्ये निघतात. खासगी वाहनाने किंवा एसटीने पहाटे वेल्हे गाठून तोरणा किल्ला चढायला घेतात. साधारण तीन-साडेतीन तासात तुम्ही तोरणा किल्लय़ावर पोहोचता. किल्ला पाहून दुपारी बुधला माची गाठायची. सोंडेतून खाली उतरून उजव्या हाताला जाणारी पाऊ लवाट पकडायची. ही वाट थेट समोर दिसणाऱ्या डांबरी रस्त्यापाशी जाते. डांबरी रस्ता लागला की थोडे पुढे जाऊन मोहरी गाव विचारायचे. बाजूला कच्च्या रस्त्याने मोहरी गाव सहज गाठता येते. साधारण रात्री आठपर्यंत तुम्ही या गावात येऊन पोहोचता. इथेच मुक्काम करायचा. सकाळी न्याहारी उरकून बोराटय़ाच्या नाळेच्या दिशेने चालत प्रवास सुरू करायचा. इथून पुढे जाताना रस्ता माहिती असलेला एखादा अनुभवी भटक्या किंवा स्थानिक वाटाडय़ा सोबत असायला हवा. सोबत नवखे भटके असल्यास गिर्यारोहणाची सामुग्रीसुद्धा जवळ ठेवावी. साधारण संध्याकाळी चारच्या सुमारास तुम्ही पानेगावात दाखल व्हाल. पुढे तासभर चाललात की वाघेरी गाव लागेल. इथे तुमच्या जेवणाची आणि मुक्कामाची सोय होईल. मात्र रायगडावरून सूर्योदय पहायचा आहे, म्हणून अनेकजण रात्रीच रायगडाच्या दिशेने प्रवास सुरू करतात. या डांबरी रस्त्याने दोन ते तीन तासांत तुम्ही रायगडाच्या पायथ्याला येऊन पोहोचता. चित्त दरवाज्याने रायगड चढून तुम्ही सूर्योदय पाहण्यासाठी सज्ज असता. पुढे दिवसभर गड पाहून तुम्ही गडावर मुक्काम करता. पुढल्या दिवशी गड उतरून परतीचा प्रवास सुरू करू शकता.

मंगळगड ते चंद्रगड ते आर्थर सीट पॉईंट

वेळ – तीन ते चार दिवस

प्रदेश – रायगड ते महाबळेश्वर, महाराष्ट्र

हा रेंज ट्रेक करायचा तर निदान तीन दिवस हाताशी हवेत. हा ट्रेक करायचा तर सकाळी लवकर पोलादपूर जवळील पिंपळवाडी गाव गाठावे. सकाळची न्याहारी आटोपून मंगळगड चढायला सुरुवात करावी. अतिशय सोपा असा किल्ला तुम्ही सहज चढाल. किल्ला पाहून पलीकडल्या धवळे गावात उतरायचे. मंगळगड ते धवळे चालायला अंतर अधिक असल्याने अनेक जण पिंपळवाडी गाठून तिथून बस किंवा गाडीने धवळे गाठतात. या दिवशी रात्रीचा मुक्काम धवळेमध्येच. सकाळी उठून चंद्रगड चढायला सुरुवात करावी. चंद्रगड पाहून पुढे भैरीच्या घुमटीच्या दिशेने प्रवास सुरू करावा. ही पाऊलवाट घनदाट जंगलातून जाते. त्यामुळे सोबत वाटाडय़ा असेल, तर उत्तम. मंगळगडावरून भैरीची घुमटी गाठेपर्यंत दिवस मावळतीला येईल. मावळतीचा सूर्य पाहायचा असेल, तर ही उत्तम जागा. भैरीच्या घुमटीला टेन्ट लावून ही रात्र तिथेच घालवावी. सकाळी आर्थर सीटच्या दिशेने प्रवास सुरू करावा. पावसाळ्यानंतर रंगबेरंगी फुलांनी खुलून आलेला हा परिसर तुम्हाला मोहून टाकतो. काही तासांची पायपीट करत दुपारी तुम्ही महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंटला येऊ न पोचता. येथून तुम्ही पाहिलेले किल्ले आणि जावळीचे संपूर्ण खोरे तुमच्या नजरेस पडते. आणि तुमच्या शेजारी उभ्या असलेल्या पर्यटकाला तुम्ही वीर भावनेने ट्रेक करत आपण इथे कसे पोहोचलो, हे सांगत असता.

रतनगड ते कात्राबाई ते हरिश्चंद्रगड

वेळ – तीन ते चार दिवस

प्रदेश – इगतपुरी, महाराष्ट्र

हरिश्चंद्रगड आणि रतनगड हे दोन किल्ले कोणत्याही मोसमात पहावेत. प्रत्येक वेळी इथे ट्रेक करायची मजा वेगळीच असते. पण हे दोन किल्ले एकाच वेळी पाहायचे ठरवले जाते, तेव्हा मात्र सह्य़ाद्रीतल्या भटक्यांची कसोटी लागते. मात्र ते जिद्दीने हा ट्रेक पूर्ण करतात. खासगी गाडीने पहाटे सामरद गाव गाठायचे. गावात सकाळची न्याहारी आटोपून चालत सांधण दरीच्या बाजूने रतनगडाचा कल्याण दरवाजा गाठायचा. साधारण दोन तासात तुम्ही येथे पोचता. तिथून कातळ पायऱ्या चढल्या की अर्ध्या तासात नेढे लागते. निसर्गाने केलेली ही किमया पाहून पुढे किल्ला पाहून घ्यायचा. किल्ला पाहून रतनवाडीच्या दिशेने उतरायला घ्यायचे. या पाऊलवाटेत हरिश्चंद्रगडाच्या दिशेने जायच्या वाटेचा फलक तुम्हाला दिसेल. ही वाट धरून थोडे पुढे गेलात की एका बाजूला पाण्याची वाट आणि मोकळी जागा लागेल. तिथे जेवण उरकून घ्यायचे. समोर दिसणारा कात्राबाईचा डोंगर चढायला घ्यायचा. दगड रचून तयार केलेल्या पायऱ्या चढलात की वर कात्राबाईच्या छोटेखानी मंदिरापाशी येऊन तुम्ही पोहोचता. तिथून हरिश्चंद्रगडाच्या दिशेने उतरायला घ्यायचे. इथून गड तुमच्या नजरेस पडतो. दिवेलागणीपर्यंत तुम्ही मुठा नदीजवळ येऊन पोहोचता. तिथे टेन्ट लावून मुक्काम करायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी चालायला सुरुवात केली की वाटेत एक आदिवासी पाडा लागेल, तिथे न्याहारी उरकून पुढे चालायला सुरुवात करावी. वाटेत एक धबधबा लागेल, तिथून तीन तास चालत तुम्ही हरिश्चंद्रगड किल्ल्यावर पोहोचता. मग दिवसभर किल्ला पाहून रात्री कोकणकडय़ांवर मुक्काम करायचा. सकाळी सूर्योदय पाहून न्याहारी उरकून किल्ला उतरायला सुरुवात करायची.

रेंज ट्रेकला कोणी जावे?

रेंज ट्रेकला कोणीही जाऊ शकते, मात्र पदराशी सह्य़ाद्रीतल्या भटकंतीचा थोडा फार अनुभव असावा. अनेकदा तीन ते चार दिवसांत ट्रेक करताना लागणारे आपले सामान आपल्यालाच घेऊन जावे लागते. संपूर्ण प्रवास पायीच करायचा असतो. त्यामुळे हे सामान पाठीवर घेऊन सलग दोन ते तीन दिवस चालण्याची क्षमता असावी. काही ठिकाणी गिर्यारोहणाच्या पद्धती वापरून चढावे वा उतरावे लागते. त्याचा पूर्वानुभव असेल, तर ट्रेक अजून सोपा जातो. अनुभव नसेल, तर पहिल्यांदा प्रयत्न करण्यासाठी उत्सूकता असावी.

रेंज ट्रेकला जाताना काय काय घ्यायचे?

मोठी रकसॅक

जेवणाचे मुबलक सामान

वाटेत खायला सुका खाऊ

पाण्याची बाटली

इलेक्ट्रल पावडर / ओआरएस

प्रथमोपचाराची पेटी (फर्स्ट एड बॉक्स)

थंडीचे कपडे

ट्रेकिंगचे शूज

झोपायला पांघरूण किंवा स्लीपिंग बॅग

राहायला तंबू (टेन्ट)

टॉर्च (बॅटरी)

नियमित रोजची औषधे (घरी घेत असल्यास)

कॅमेरा (हवा असल्यास)

गिर्यारोहणाची साधने (गरज असल्यास)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 4:01 am

Web Title: sahyadri trekking fourt abn 97
Next Stories
1 निवडणुकांची भातुकली
2 क्षण एक पुरे! : तंदूर चहाचा जनक
3 टेकजागर : कोसळणारा भारत संचार मनोरा..
Just Now!
X