साडीचं आकर्षण केवळ भारतीयांना आहे असं नाही. पॉपस्टार मडोनापासून ते अभिनेत्री ज्युलिया रॉबर्ट्सपर्यंत कित्येकींना साडी नेसण्याचा मोह आवरला नाही.  इटालियन फॅशन डिझायनर व्हिटो डेलेब्रा साडीतलं सौंदर्यशास्त्र अगदी अचूकपणे हेरतो. त्यानं व्यक्त केलेलं हे साडीप्रेम.
नऊवारीपासून पाचवारीपर्यंत, बंगाली स्टाइलपासून गुजराती स्टाइलपर्यंत, कांजीवरमपासून मॉडर्न साडीगाऊनपर्यंत साडीचं एखादं रूप तरी प्रत्येक भारतीय स्त्रीला भावतंच. जगभरातील स्त्रियांना या साडीने वेड लावलं आहे. गाऊन्सचं मूळ रोमन आणि ग्रीक संस्कृतीत असलं तरी साडीने त्यावर आपली मोहिनी टाकली. जगभरातील कित्येक डिझायनर्सनी साडीपासून प्रेरणा घेत गाऊन्स, ड्रेसेसचे उत्तम कलेक्शन्स सादर केलीत. मेन्सवेअरतील नामवंत ब्रॅण्ड ‘रेमंड’साठी डिझाइन्स करण्यासाठी भारतात आलेला इटालियन डिझायनर व्हिटो डेलेब्रालासुद्धा साडीने मोहिनी घातली. तो साडीकडे केवळ एक पोशाख म्हणून पाहतं नाही, तर एक कलात्मक आविष्कार म्हणून बघतो. साडीमुळे स्त्रीच्या एकूणच देहबोलीला आलेली कमानीयता आणि नजाकत दुसऱ्या कुठल्या पोशाखात येत नाही, असं त्याचं मत आहे.
व्हिटो भारतात आलेला असताना ‘व्हिवा’शी साडी याच विषयावर बातचीत केली. व्हिटो ‘रेमंड’साठी काम करण्यासाठी भारतात आला. यापूर्वी त्याने ‘म्यू म्यू’, ‘जिवाशी’, ‘कॉस्च्युम नॅशनल’ अशा जगप्रसिद्ध ब्रॅण्ड्ससाठी काम केलंय.  त्यामुळे जगभरातील पेहराव संस्कृतीचा अभ्यासही केलाय. याआधी पर्यटनानिमित्त, योगा आणि ध्यानसाधना शिकण्यासाठी तो भारतात आलेला. भारतीय पेहरावातील त्याला पारंपरिक पेहराव अधिक आकर्षित करतो.
भारताने काळानुसार त्यांचा जुन्या परंपरा आणि पेहराव मागे टाकला नाही. विशेषत: स्त्रियांचा पारंपरिक पेहराव त्यातही साडी त्याला अधिक आकर्षित करीत असल्याचे तो सांगतो. ‘मी फॉर्मलवेअर डिझाइन करत असल्यामुळे असेल, पण मला नेहमी वाटायचे, सूट्समध्ये स्त्री सर्वात आकर्षिक दिसते. पण साडीने माझा समज पूर्णपणे पुसून टाकला. साडीमुळे स्त्रियांच्या देहबोलीला येणारी कमनीयता जगभरातील खचितच दुसऱ्या पेहरावाने येते,’ हे तो कबूल करतो. भारतात रंग, टेक्स्टाइल, एम्ब्रॉयडरी यांचं वैविध्य पाहायला मिळतं. या विविधतेमुळे साडीचं रूप खुलण्यात अधिक भर पडल्याचं तो सांगतो. ‘मी पहिल्यांदा भारतात आलो तेव्हा येथील कपडय़ांमधील रंगांची विविधता पाहून थक्क झालो.
vn06साडी हा नुसता पोशाख नाही, तर एक कलात्मक आविष्कार आहे. भारतीय स्त्रीच्या देहबोलीमध्ये जन्मत:च एक लयबद्धता असते, हालचालींमध्ये एक नजाकत असते आणि ती साडीतून उटून दिसते. साडीमुळे स्त्रियांच्या देहबोलीला येणारी कमानीयता क्वचितच दुसऱ्या पेहरावाने येते.    व्हिटो डेलेब्रा
आम्ही युरोपात इतके रंग कधीच वापरत नाही. भारत रंगांचा देश आहे,’ आणि त्यामुळे एकूणच भारतीय पेहरावाला वैविध्य मिळाल्याचे तो सांगतो.
‘भारतीय स्त्रीच्या देहबोलीमध्ये जन्मत:च एक लयबद्धता आहे. अगदी रोजच्या आयुष्यात रस्त्यावर दिसणाऱ्या असंख्य बायकांकडे त्यांच्या हावभावांवर लक्ष दिल्यास लक्षात येईल, की त्यांची चेहऱ्यावरची बट बाजूला सारायची लकब असो किंवा हाताच्या हालचाली त्यांच्यात प्रमाणबद्धता आहे. एक ठेहराव आहे,’ असे सांगताना हाच ठेहराव साडीमुळे अजूनच उठून दिसत असल्याचं तो सांगतो. त्यामुळेच कदाचित पाश्चात्त्य देशांमध्येही साडीबद्दल तितकंच आकर्षण असल्याचं तो कबूल करतो.
भारतीय पोशाखावर काळानुरूप अनेक बदल झाले. नऊवारीपासून आज थेट साडीगाऊनपर्यंत साडीचं रूप पालटतं गेलं. काळानुसार हे होणं गरजेचं आहे, हे व्हिटो सांगतो. आपल्यावर राज्य केलेल्या ब्रिटिशांच्या पेहरावाची झलक आजही भारतीय पेहरावात दिसते.
आजची तरुण पिढी त्या प्रभावातून बाहेर पडत मूळ भारतीय पेहरावाला नवं रूप देतेय. ही उत्तम बाब असल्याचे तो सांगतो. ‘टेक्स्टाइलपासून ते एम्ब्रॉयडरीपर्यंत भारताला पेहरावाची एक उत्तम संस्कृती मिळाली आहे. ती तुम्ही सोडू नका. उलट पाश्चात्त्य आणि भारतीय पेहरावाला एकत्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,’ हे तो सांगतो. साडीचं रूप मात्र कायम ठेवा, हेही तो आवर्जून सांगतो.
मृणाल भगत -viva.loksatta@gmail.com