X

चल‘ती’ का नाम गाडी

आजही आपल्याकडे टॅक्सीचालक म्हणून रस्त्यांवरच्या गाडय़ांमध्ये पुरुषांची मक्तेदारी दिसून येते.

सौदी अरेबियातील स्त्रियांना आता वाहन चालवण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. इतक्या वर्षांनी आपल्याला गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला याबद्दल तेथील स्त्रियांच्या मनात आनंदीआनंद धावू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे स्त्रियांना हा अधिकार असताना किती जणी मनापासून गाडी चालवण्याचा आनंद घेतात? कधी तरी कामाशिवाय गाडी काढून लाँग ड्राइव्हला जाण्याची कल्पना पुरुषांइतकीच स्त्रियांच्या मनातही रुंजी घालते का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा हा प्रयत्न..

‘शेजारी बाई गाडी चालवतेय रे, जरा लांबूनच चालव’, ‘गाडी ठोकली का? नक्की बाईच चालवत असणार गाडी’. असे संवाद आपल्या कानावर पडतच नाही असं म्हणणं फार धाष्टर्य़ाचं ठरेल. व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या विनोदांमध्ये स्त्रियांचं गाडी चालवणं हा तर अनेकांचा आवडता विषय आहे. ‘बाई’ने गाडी चालवणं खरं म्हणजे आपल्या देशात फार मोठी गोष्ट राहिलेली नाही. गावखेडय़ातून उच्चभ्रू वस्तीपर्यंत सगळ्या जणी गाडय़ा चालवतात. केवळ मोटरगाडय़ा नाही तर बस, रेल्वे, विमानही उडवतात. आणि तरीही त्यांचं वाहनकौशल्य हा अजूनही चेष्टेचाच विषय ठरतो. याविषयी एरवी खासगीतली कुजबुज एवढय़ावरच स्त्रियांमध्ये आपापसात बोललं जातं. पण आज ही गोष्ट तीव्रतेने चर्चा करावीशी वाटतेय त्याला तशीच एक घटना कारणीभूत ठरली आहे. सौदी अरेबियातील स्त्रियांना आता वाहन चालवण्यासाठी परवाना देण्यात येणार आहे. गेली अनेक र्वष त्यांना गाडी चालवण्यावर र्निबध घालण्यात आले होते. अर्थात ही बंधनं सुटण्यासाठी त्यांना पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागणार असली तरी आपल्याला गाडी चालवण्याचा अधिकार मिळाला याबद्दल तेथील स्त्रियांच्या मनात आनंदीआनंद धावू लागला आहे. या पाश्र्वभूमीवर आपल्याकडे स्त्रियांना हा अधिकार असताना किती जणी मनापासून गाडी चालवण्याचा आनंद घेतात? कधी तरी कामाशिवाय गाडी काढून लाँग ड्राइव्हला जाण्याची कल्पना पुरुषांइतकीच स्त्रियांच्या मनातही रुंजी घालते का?, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा हा प्रयत्न..

खरं तर स्त्रिया कुठेही मागे नाहीत. त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत वगैरे बोलणं चावून चावून आपण चोथा केला आहे, असं वाटत असताना जगाच्या पाठीवर एखाद्या देशात जिथे स्त्रियांना त्यांच्या मूलभूत अधिकारांसाठीही घरातील पुरुष पालकांची (वडील, भाऊ, नवरा) परवानगी घ्यावी लागते. तिथे त्यांना चक्क गाडी चालवण्याचे आणि त्यासाठी कोणत्याही पुरुषाची परवानगी घेण्याची गरज नाही, असे सांगणारा क्रांतिकारी निर्णय जाहीर केला जातो तेव्हा आपल्याकडे जिथे स्त्रियांना शिक्षणापासूनचे सगळे मूलभूत अधिकार फार पूर्वीच मिळाले आहेत तिथे गाडी चालवण्याचे हे स्वातंत्र्य नेमक्या कुठल्या पद्धतीने घेतले जाते, याबद्दल उत्सुकता वाटली नाही तरच नवल. आजही आपल्याकडे टॅक्सीचालक म्हणून रस्त्यांवरच्या गाडय़ांमध्ये पुरुषांची मक्तेदारी दिसून येते. पचापच पिचकाऱ्या मारत रस्ते लालबुंद करणारे चालकच (५०% चालक अर्थातच याला अपवाद आहेत) जास्त दिसतात. टॅक्सी किंवा कॅबचालक असा विचार करता शहरांमध्ये (मुंबई-ठाणे) हल्ली अनेक ठिकाणी महिलाचालक दिसून येतात. ‘प्रियदर्शिनी’सारख्या केवळ महिलाचालकांच्या हातात सारथ्य देत व्यावसायिक चालक म्हणून त्यांच्यावर मोहोर उमटवणाऱ्या अनेक कंपन्या-संस्था आज आजूबाजूला आहेत. त्यामुळे मुंबईत ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी ड्रायव्हर म्हणून स्त्रिया दिसणं हे नवीन नाही. ‘ओला-उबर’सारख्या कंपन्यादेखील यात मागे नाहीत. पण तरीही किती जणी आज आवड म्हणून या क्षेत्राकडे पाहतात? अगदी उपजीविकेचा प्रश्नही बाजूला ठेवला तरी अधिकार असूनही आज किती महिला स्वत: गाडी शिकून ती चालवत आहेत. उच्चभ्रू वर्ग, मध्यमवर्गीयातील उच्चभ्रू वगळता महिला घरात गाडी असूनही फार कमी प्रमाणात स्वत: गाडी चालवताना दिसतात. हौसेपोटी गाडी शिकणं आणि गरज नसताना उगीच फेरफटका मारायला म्हणून लाँग ड्राइव्हला जाणं किती जणी करतात? याचं सर्वेक्षण करता अजूनही अशा महिलांचं प्रमाण फार कमी असल्याचंच लक्षात येतं. इथे त्या गाडय़ा का चालवत नाहीत? त्यांना दिलेल्या अधिकाराचा काय उपयोग?, अशा गोष्टींची चर्चा करायची नाही. पण मुळातच स्त्रियांची गाडी चालवण्याविषयीची अनास्था पाहता त्यामागच्या मानसिकतेचा शोध घ्यावासा वाटतो.

वर म्हटल्याप्रमाणे रोजगारासाठी गाडी चालवताना मनात न्यूनगंड, भीती असे अनेक प्रश्न उठणं स्वाभाविक आहे. पण त्यातही स्त्रिया आता अनेक अडचणींना मागे टाकत हे धाडस करतायेत हे देखील वाखाणण्याजोगं आहे. पण मग घरात गाडी असणाऱ्यांचं काय? ‘चल ना, मला थोडं सामान आणायचं आहे, गाडी काढ’ किंवा ‘तू जातोयस तर मला अमुक अमुक ठिकाणी सोड म्हणजे मला गाडी न्यायला नको’ असे संवाद आजही कित्येक घरांतून ऐकायला मिळतात. गाडी चालवायची की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे पण अधिकार मिळूनही आपण त्याचा किती वापर करतो हा प्रश्न मनात घोळत राहतो. गाडी चालवायचा रीतसर परवाना घेतलेल्या मीनल जाधवला तिच्या गाडीविषयी विचारल्यानंतर ती तिचा अनुभव सांगते. ‘मी ड्रायव्हिंग स्कूलला जाऊन व्यवस्थित गाडी शिकले आणि परवाना मिळाल्यावर एकदा माझी गाडी घेऊ न हौसेने चालवायलाही घेतली. मात्र दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वेगवान गाडय़ा, ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकत असताना ट्रेनरकडे अर्धा कंट्रोल असलेली गाडी आणि इथे पूर्ण माझ्या ताब्यात असलेली गाडी यातला फरक मला पचवता आला नाही. यामुळे माझा गोंधळ उडाला आणि मी गाडी अक्षरश: भर रस्त्यात मधोमध उभी केली. त्या प्रसंगानंतर परवाना असूनही मी भर रस्त्यावर गाडी चालवण्याचं धाडस कधीच केलं नाही. रात्री सगळीकडे शुकशुकाट असताना मी फार फार तर घरापासून एक दोन किलोमीटरच्या अंतरावर जाते, मात्र त्यापलीकडे मी इतक्यात जाईन असं मला वाटत नाही.’ मीनलसारखीच भयकथा अनेकींकडे आहे. शिवाय, दिवसेंदिवस रस्त्यांवर वाढत चाललेलं ट्रॅफिक हे त्यांच्या गाडी न चालवण्यासाठीच्या बहाण्यात आणखी भर घालणारं कारण ठरतं आहे. ट्रॅफिकमुळे चूल, मूल आणि काम हे गणित साधून ये-जा करणं शक्यच होत नाही. त्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक बरी म्हणून अनेक महिला त्याचा वापर करताना दिसतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्वत:चं वाहन घेऊन जाणाऱ्या स्त्रिया आजही तुलनेने कमीच आहेत.

‘मला गाडी चालवायला प्रचंड आवडते. मी गाडी चालवताना जेव्हा आजूबाजूची चार माणसं माझ्याकडे बघतात तेव्हा मला माझ्या या कौशल्याचा अभिमान वाटतो. मला हवं तेव्हा, हवं तिथे जाता येतं. पण हल्ली ट्रॅफिक खूप वाढलं आहे. ब्रेक-क्लच मारून मग गाडी चालवणं कंटाळवाणं वाटतं. लांब पल्ला किंवा मग नॅशनल हायवे असेल तर गाडी चालवण्याची मजा काही औरच वाटते. आणि तो अनुभव मला प्रचंड आनंद देतो,’ असं कौतुकाने सांगणाऱ्या ठाण्याच्या स्वाती चिटणीससारख्या तरुणी फार कमी भेटतात. दुचाकी चालवण्याच्या बाबतीत मात्र स्त्रिया आघाडीवर आहेत. पुण्यात तर अशा स्कार्फवाल्या हेल्मेटशिवाय गाडी चालवणाऱ्या अनेक ‘रायडर्स’ अगदी गल्लीबोळापासून ते महामार्गावर सहज पाहायला मिळतात. ट्रॅफिकपासून काही प्रमाणात सुटका आणि अगदी ‘हॅण्डी’ वापरता येतात म्हणून दुचाकींचा वापर स्त्रिया मोठय़ा प्रमाणावर करतात. पुण्याची अपर्णा तिला पुण्यात गाडी चालवण्यासाठी स्त्रियांचा उत्साह दिसून येतो का?, असं विचारल्यावर ‘आम्ही तिघी बहिणी आहोत आणि आम्हा तिघींकडे स्कूटी आहेत. पुण्यात सर्रास सगळ्यांकडे दुचाकी आहेत. उलट इथे दुचाकी चालविण्यात मुलांपेक्षा मुलींचं प्रमाण जास्त आहे. पुण्यातलं ट्रॅफिक, शहराचा आवाका आणि अंतर याचा विचार करता दुचाकी सोयीस्कर ठरते. मात्र चार चाकी गाडय़ा चालवण्यासाठी इथे फार कमी जणी उत्सुक असतात,’ असं सांगते.

खरं तर गाडी चालवता येणं हे पोहायला आणि सायकल चालवायला येण्याइतकं महत्त्वाचं आहे. आयुष्यात कोणता प्रसंग केव्हा येईल आणि आपल्या कौशल्याचा वापर कधी होईल सांगता येत नाही. पण ते कौशल्य सतत वापरात आणलं पाहिजे. असं म्हणतात जोपर्यंत एखादी गोष्ट आपल्याकडे असते तोवर आपल्याला त्याची किंमत कळत नाही. म्हणजे आपल्याला या अधिकाराचं महत्त्व कळलेलं नाही हे म्हणणं नाही. पण या अधिकाराचा सोईसाठी आणि छंदासाठीही जास्तीत जास्त वापर करणं महत्त्वाचं आहे. आपल्यावर होणाऱ्या कोटय़ा, शेरे, न्यूनगंड सगळ्यांना धाब्यावर बसवत कामासाठी, हौसेसाठी किंवा आवड म्हणून जसं वाटेल तसं हे ‘व्हील’ हातात घेऊन ‘विल’फुली चाकांवरची ही सफर अनुभवायला हवी. आणि जर दिवसाच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवणं कंटाळवाणं वाटत असेल तर एक छोटासा उपाय सांगते पण तो फक्त आपल्यातच ठेवा.. रात्री जेव्हा सारं जग झोपतं तेव्हा गाडी चालवायला निघा. मुंबईत मरिन ड्राइव्ह, कोल्हापुरात रंकाळा, पुण्यात शनिवारवाडा तुमची मोठय़ा दिमाखात वाट पाहत असेल. रात्रीची निरव शांतता, जुनी मधुर गाणी आणि चांदण्यांखाली शांत पहुडलेल्या निसर्गात तुमची गाडी तुमची मैत्रीण ठरेल. तुमच्या मनातलं नकाराचं मळभ दूर करून सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या या मैत्रिणीचा हात हातात घेऊन तर बघा!

viva@expressindia.com

First Published on: October 6, 2017 12:38 am
Outbrain