सौरभ करंदीकर
‘व्यासोच्छिष्ट्म जगत सर्वम’ हे वाक्य लहान असताना कानावर पडलं होतं. बहुदा माझ्या आजोबांनी ते कुठल्या तरी संदर्भात म्हटलं असावं. त्याचा अर्थ समजायचं तर सोडाच, ते कुठल्या भाषेत आहे, तेदेखील समजायचं माझं वय नव्हतं. परंतु ते वाक्य लक्षात राहिलं खरं. कालांतराने चौकशी केली असता त्याचा अर्थ समजला. तो अर्थ उत्साह वाढवणारा होताच, परंतु हताश करणारादेखील होता. ‘महाभारत’ या महाकाव्याची रचना ज्यांनी केली त्या व्यास मुनींबद्दल असं म्हटलं जात असे की त्यांनी संपूर्ण जग ‘उष्टं’ केलं होतं. म्हणजेच जगात असा कुठलाच विषय नव्हता, ज्याचं ज्ञान त्यांना नव्हतं. त्या एकाच व्यक्तीने या जगातले सर्व अनुभव मिळवले होते.

या वाक्याचा दुसरा अर्थ असाही होतो की, दुसऱ्या कुणालाही ते शक्य नाही!  हे समजल्यानंतर मी उलटा सवाल केला, का म्हणून? आज मानवी ज्ञानाच्या सीमारेषा सर्वदूर पसरल्या आहेत. या ब्रह्मांडातील बरंचसं ज्ञान आपल्याला प्राप्त होण्यासारखं आहे. मग एका व्यक्तीच्या सर्वज्ञानी असण्याचा आणि बाकीच्यांनी नसण्याचा हा पौराणिक नियम कशासाठी? त्यावर मला मिळालेलं उत्तर : असं म्हणतात की, व्यास मुनी ४०० र्वष जगले. जगाच्या अध्ययनासाठी तो वेळ तेव्हा पुरेसा होता. आज गूगल आणि विकिपीडियासारख्या वेबसाइट्स आपल्यासमोर हवी ती माहिती घेऊन येतात. परंतु आपण आयुष्यभर वाचत राहिलो तरी ते माहितीचं जाळं संपणारं नाही. उलट आपण वाचता वाचता त्यात नवीन माहितीची भरच पडत राहील. मग त्या गोष्टींचा अनुभव घेणं ‘जगाला उष्टं करणं’ वगैरे न बोललेलंच बरं!

आरोग्यविषयक तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी मानवाची वयोमर्यादा शंभर वर्षांहून अधिक असलेली अपवादानेच आढळते. ‘४८ तासांचा दिवस असता तर मी काय काय करून दाखवलं असतं’ अशा वल्गना दिवसभराच्या कामाने थकून बिछान्यावर पडताना आपण अनेकदा करतो. ‘४०० वर्षांचं आयुष्य नको, परंतु दिवसामध्ये करता येतात त्यापेक्षा अधिक गोष्टी करता आल्या तरी पुरे,’ असं आपण म्हणतो.

आयरिश लेखक अ‍ॅलन ग्लेन याच्या २००१ साली लिहिलेल्या ‘द डार्क फिल्ड्स’ नावाच्या विज्ञानकथेवर आधारित ‘लिमिटलेस’ या नावाचा एक चित्रपट २०११ साली प्रसिद्ध झाला. या काल्पनिक कथेचा नायक, एडी मोरा, एक अयशस्वी लेखक असतो. कर्मधर्मसंयोगाने त्याच्या हातात ‘एनझीटी -४८’ नावाचं मानवी मेंदूची क्षमता वाढवणारं एक प्रायोगिक औषध पडतं. या औषधाच्या दुष्परिणामांबद्दल पुरेशी माहिती नसतानाही एडी ते औषध घेऊ लागतो. त्याचा मेंदू शक्तिशाली बनतो. प्रचंड माहिती तो क्षणार्धात आत्मसात करू लागतो. आपल्याला प्राप्त झालेल्या नवीन शक्तीच्या बळावर तो आपलं पुस्तक लिहून संपवतो, शेअर बाजारात धुमाकूळ घालतो. प्रचंड संपत्ती जमा करतो. यादरम्यान त्या औषधाचे दुष्परिणाम होऊ लागतात. त्या औषधाचे निर्माते, काही खलपुरुष आणि इतर पेशंट या साऱ्यांच्या जाळ्यात सापडलेल्या एडीची काय अवस्था होते, ते सांगून मी उत्सुक प्रेक्षकांचा रसभंग करू इच्छित नाही. मात्र हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या हातातदेखील ‘एनझीटी – ४८’ सारखं एखादं औषध पडावं, असं प्रेक्षकांना कुठे तरी वाटत राहतं.

मानवी मेंदूची क्षमता वाढवणारी औषधं आणि उपचारपद्धती खऱ्या अर्थानं अस्तित्वात येण्याआधी मेंदूचं कार्य आणि त्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रक्रियेची खडान्खडा माहिती मिळणं आवश्यक आहे. इसवी सनपूर्व १७०० वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये मेंदूचं कार्य काय? याचा तपास घेतला गेल्याचे दाखले आहेत. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या संशोधनामुळे मेंदूला झालेल्या इजांमधून आणि काही मानसिक आजारांपासून वैद्यकशास्त्राने अनेकांना वाचवलं आहे. अल्झायमर्स, पार्किन्सन्स, डिमेन्शियासारख्या व्याधींवर आपण काही प्रमाणात नियंत्रण मिळवू शकलेलो आहोत, परंतु मेंदूच्या कार्यप्रणाली शोधण्यासाठी निघालेला कोलंबस अजूनही किनाऱ्यावरच उभा आहे आणि समोरच्या अथांगाचा नुसता ठाव घेऊ लागला आहे, असं खेदानं म्हणावं लागेल.

मानवी मेंदू आणि मानवी मन, मनुष्याचा आत्मा, जीव, इत्यादी विषय विज्ञानाच्या अखत्यारीत न राहता भक्ती, संस्कृती, धर्म या वैचारिक प्रांतांत गेलेले आहेत. इजिप्तमध्ये मेंदूला डोक्यात भरलेला कुचकामी पदार्थ समजत असत. मानवी मनाची, संवेदनांची खरी जागा ही हृदयात आहे, असा तेव्हा समज होता. ग्रीक वैद्यक हिपोक्रिटस याने मात्र मानवी संवेदनांचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे असं मत मांडलं. अ‍ॅरिस्टॉटल आणि सॉक्रेटिस इत्यादी विचारवंतांची या बाबतीत भिन्न मतं होती. या साऱ्यातून वाट काढत काढत आपण सरतेशेवटी मेंदूच्या कार्याबद्दल ठोस विधानं करू शकलो आहोत. परंतु त्यासाठीच हजारो वर्षांचा काळ खर्ची पडला आहे.

विज्ञान म्हणजेच प्रयोगातून सिद्ध होणारं ज्ञान. प्रयोग, निरीक्षण आणि त्यावरून मांडलेले निष्कर्ष याशिवाय विज्ञानात इतर विचारपद्धतींना थारा नाही. मग ती घटना असो किंवा दुर्घटना. आपल्या मेंदूचा कुठचा भाग काय काम करतो, याचा शोध एका भयंकर अपघातामुळे सुरू झाला. १३ सप्टेंबर १८४८ रोजी अमेरिकेतील कॅव्हेंडिश, व्हरमाँट येथे फिनिअस गेज नावाचा रेल्वे कामगार आपल्या सहकाऱ्यांबरोबर नवीन रूळ बसवायचं काम करत होता. रेल्वेच्या मार्गावर एका ठिकाणी स्फोट घडवून आणायचा होता. त्याची तयारी करताना स्फोटक पदार्थानी अचानक पेट घेतला. एक लोखंडी तुळई फिनिअस गेजच्या गालात शिरली आणि त्याच्या मेंदूच्या एका भागाला विच्छिन्न करून डोक्याच्या वरच्या भागातून आरपार निघून गेली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेज जिवंत राहिला! या अपघातामुळे मेंदूच्या रचनेबद्दल आपलं ज्ञान कसं वाढलं, आज हे संशोधन कुठं पोहोचलं आहे आणि उद्या मेंदूच्या क्षमतेत काय बदल घडू शकतील, याचा आढावा पुढच्या लेखात.

viva@expressindia.com