13 December 2019

News Flash

तंत्रज्ञानाची घोडदौड

गेल्या दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगतीचा घेतलेला धावता आढावा

|| सौरभ करंदीकर

सध्यातरी आपण एकविसाव्या शतकाची पहिली वीस वर्षं पार करतोय. गेल्या दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगती चित्तचक्षुचमत्कारिक नसली तरी काही प्रमाणात आश्चर्यचकित करणारी, समाधानकारक आणि क्वचित प्रसंगी अंतर्मुख करणारी आहे.

अहो २०२० उजाडेल आता! कुठे आहेत तुमच्या उडत्या गाडय़ा? कुठे आहे तुमची मंगळावरची मानवी वसाहत?, असे प्रश्न कुणी विचारले तर नवल वाटायला नको. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधी मानवी कल्पनाशक्ती आपल्याला भविष्याकडे घेऊन जात असते. अनेक प्रसिद्ध विज्ञान – लेखकांनी एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात काय होईल याच्या विविध कल्पना रंगवल्या आहेत. आर्थर सी क्लार्क यांनी लिहिलेल्या ‘स्पेस ओडिसी २००१’, आणि ‘२०१०’ या कथा मानवाला गुरु ग्रहाच्या कक्षेत नेऊन ठेवतात. रे करझवाईल आणि इतरांच्या मते २०२९ किंवा २०५१ साली टेक्नॉलॉजिकल सिंग्युलॅरिटी – म्हणजेच सर्व वैज्ञानिक शोधकार्याचा अंत अवतरेल. ज्या ज्या गोष्टींचा शोध लागायचा त्या सर्वांचा एकाच क्षणी शोध लागेल आणि त्यापुढे मानवी जीवनच बदलेल, असं त्यांचं म्हणणं आहे.

सध्यातरी आपण एकविसाव्या शतकाची पहिली वीस वर्षं पार करतोय. गेल्या दशकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेली प्रगती चित्तचक्षुचमत्कारिक नसली तरी काही प्रमाणात आश्चर्यचकित करणारी, समाधानकारक आणि क्वचित प्रसंगी अंतर्मुख करणारी आहे.

उडत्या गाडय़ा?

१८८२ साली अल्बर्ट रॉबिदा नावाच्या कलाकाराने २०१८ मध्ये उडत्या गाडय़ांचा नुसता शोधच लागणार नाही तर त्यांचा सुळसुळाट असेल असं भाकित केलं होतं. ‘उबर’ आणि इतर तत्सम टॅक्सींचा सुळसुळाट सध्यातरी आपल्या रस्त्यावरच आहे, पण रस्त्यांची आणि ट्रॅफिकची अवस्था पाहता उडत्या गाडय़ा असत्या तर बरं झालं असतं, असं वाटतं! असो. ‘उबर’ खरोखरच उडत्या गाडय़ांची प्रायोगिक तत्वावर चाचणी करत आहे. दुबई, डॅलस फोर्ट वर्थ आणि लॉस एंजेलिस या शहरांमध्ये २०२० साली उबरच्या ‘एलेव्हेट’ नावाच्या उडत्या टॅक्सी अवतरतील असं कंपनीचे प्रवक्ते म्हणाले आहेत.

परग्रहांवर वस्ती

नासाच्या १९९६ मधील अहवालानुसार (स्पेस स्टडीज बोर्ड अ‍ॅन्यूअल रिपोर्ट) आपण २०१८ मध्ये मंगळावर कायम स्वरूपी वसाहत स्थापन करायला हवी होती. मंगळावर काय, चंद्रावर देखील आपण आपली वसाहत निर्माण करण्यात अयशस्वी ठरलो आहोत. अतोनात खर्चाचं कारण देत २०१० च्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ‘नासाची २०२० मधली चंद्र-मोहीम रद्द करू’, अशी घोषणा केली होती. ‘स्पेस शटल’ कार्यक्रम देखील याच दशकात गुंडाळण्यात आला. राजकीय पाठबळाशिवाय हे सारं संपुष्टात येतंय की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु, सर रिचर्ड ब्रॅन्सन यांची ‘व्हर्जिन गॅलॅक्टिक’ आणि इलॉन मस्क यांची ‘स्पेस एक्स’ या खासगी अंतराळ-संस्था ही सारी गणितं बदलताना दिसत आहेत. २०१२ साली स्पेस एक्सने प्रक्षेपित केलेले ‘ड्रॅगन’ नावाचं यान आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकापर्यंत जाऊ न पोहोचणारं पहिलं खासगी अवकाशयान ठरलं. व्हर्जिन गॅलॅक्टिकने या किंवा पुढच्या वर्षी सर्वसामान्य पर्यटकांना अवकाशाची सहल घडवायचं ठरवलं आहे. इलॉन मस्क यांनी मंगळावर मानवजातीला घेऊ न जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली असली तरी या गोष्टीला अजून किती दशकं जातील ते सांगता येत नाही.

कृत्रिम मानवदेह आणि अमरत्व

कृत्रिम अवयवांची निर्मिती आणि त्यांचं संरोपण ही काही नवीन गोष्ट नाही. २०१० साली ब्रिटिश शास्त्रज्ञांनी प्रथमच पॉलिमरच्या साहाय्यानं कृत्रिम रक्तवाहिन्या तयार केल्या, तर २०१३ साली कृत्रिम यकृत आणि कृत्रिम रक्तपेशींची निर्मिती प्रयोगशाळेत करण्यात आली. मानवाचा एखादा अवयव काम करेनासा झाला किंवा अपघातात त्याचं नुकसान झालं तर जसा बदलला जाऊ  शकतो तसंच मानवी जनुकांमध्ये (मानवी देहाची जडण घडण ठरवणारी प्रत्येक पेशीत असलेली द्रव्यं) काही दोष असतील तर तेही आता बदलता येऊ  लागले आहेत. वार्धक्याशी संबंध असलेल्या जनुकांमध्ये फेरफार करून मानवी आयुष्य मर्यादा वाढवता येईल का?, याबद्दलचं संशोधन आजच्या घडीला सुरु आहे. जनुकांमध्ये फेरफार करण्याचं CRISPR  नावाचं तंत्रज्ञान वापरून २०११ साली काही उंदरांना व्याधीमुक्त करण्यात आलं. आज या तंत्रज्ञानामुळे अनुवांशिक व्याधींचा येणाऱ्या पिढीला सामना करावा लागणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. थोडक्यात, मानवी आयुष्याची मर्यादा वाढावी आणि कदाचित या मर्यादेचाच अंत व्हावा, ही स्वप्नं सत्यात आणण्याचा मार्ग या दशकाने दाखवला आहे.

ऊर्जा स्रोत आणि पर्यावरण संरक्षण

या दशकात सौर आणि वायू ऊ र्जेच्या क्षेत्रात अनेक सुधारणा होत असल्या तरीही खनिज तेलांवरची आपली मदार आपण आजही दूर सारू शकलेलो नाही. कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण आजही जगाला भेडसावणारी समस्या आहे. पृथ्वीचं सरासरी तापमान गेल्या पाच वर्षांत सुमारे ०.९८ सेल्शियसने वाढत आहे. ऊर्जेचे नवे स्त्रोत शोधणं आणि ते वापरात आणणं हे आता आपलं प्रथम कर्तव्य आहे. २०१० साली स्वित्झरलँडचं ‘स्विस सोलार इम्पॅक्ट’ या नावाचं विमान केवळ सौर उर्जेवर तब्बल २४ तास उडलेलं पहिलं विमान ठरलं. याच वर्षी होंडाने हायड्रोजनवर चालणारी पहिली गाडी ग्राहकांसमोर ठेवली. इलॉन मस्क यांच्याच ‘टेस्ला’ या कंपनीच्या, तसेच इतर कंपन्यांच्या विद्युतशक्तीवर चालणाऱ्या गाडय़ा अधिक विकसित झाल्या, ही बाब आनंदाची आहे. पण आजही अशी वाहनं सामान्यांच्या खिशाला झेपणारी नाहीत.

आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी)

२०१६ च्या नोटबंदीने जनसामान्यांच्या जीवनात डिजिटल – कॅ शलेस व्यवहार आणले. पैसे दिसले नाहीत तरी त्यांचा इंटरनेटवर वापर करता येतो हे आता सर्वाच्या अंगवळणी पडलं आहे. परंतु असा पैसा तरीही देशाच्या अर्थव्यवस्थेला अनुसरूनच वापरला जातो. त्याला ‘रुपये’ आणि ‘पैसे’ म्हणूनच ओळखलं जातं. २००८ साली कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला झुगारून, कुठल्याही बँकेच्या आधाराशिवायचं एक चलन अस्तित्वात आलं, ते म्हणजे बिटकॉईन. २२ मे २०१० पर्यंत बिटकॉईन केवळ तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारे काही जण इंटरनेटवरच्या लहान सहान उलाढालींसाठी वापरत असत. परंतु लास्लो हनयेझ नावाच्या एका तंत्रज्ञाने या दिवशी दहा हजार बिटकॉईन मोजून एक ‘पापा जोन्स पिझ्झा’ विकत घेतला. त्या दुकानदाराने केवळ गंमत म्हणून बिटकॉईन स्वीकारले असतील, परंतु त्या दिवसानंतर आजपर्यंत बिटकॉईन आणि त्यासारख्या इतर क्रिप्टोकरन्सी एक पर्यायी अर्थव्यवस्था म्हणून जगभर धुमाकूळ घालत आहेत. एका बिटकॉईनची किंमत आजच्या घडीला सुमारे आठ लाख वीस हजार भारतीय रुपये इतकी आहे. गुन्हेगारी आणि दहशतवादी कारवायांमध्ये क्रिप्टोकरन्सी वापरल्या जातात हे कारण पुढे करून आपल्या आणि इतर अनेक देशांच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या वापरावर निर्बंध आणले आहेत.

कृत्रिम विचारशक्ती (आर्टिफिशल इंटेलिजन्स)

१९५०च्या दशकात ‘विचार करणारी यंत्र’ विकसित करण्याची सुरुवात झाली. खरं तर स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणा असलेले रोबोट केवळ विज्ञान कथांमध्येच सापडतात, परंतु विचारांचा आभास घडवणाऱ्या कं प्यूटर प्रणाली या दशकात नावारूपाला आल्या. आयफोनमधली आपल्या कोणत्याही प्रश्नांचं (बहुतांश) बरोबर उत्तर देणारी ‘सिरी’ २०११ साली जन्माला आली. त्याचवर्षी  ‘आय बी एम वॉटसन’ या प्रणालीने ‘जेपर्डी’ नावाची प्रश्नमंजुषा जिंकली. २०१४ साली अलेक्सा आपल्या सेवेसी रुजू झाली. २०१७ साली गूगल डीपमाईंडच्या ‘अल्फा-गो’ नावाच्या प्रणालीने ‘गो’ नावाच्या कोरियन खेळामध्ये जगज्जेत्या ली सीडॉल याला ४ – १ असं हरवलं.

पुढे काय

आज तंत्रज्ञानाचे विविध पैलू आपलं आयुष्य संपन्न करत आहेत तसंच नवनवीन अडचणीही निर्माण करत आहेत. ड्रायव्हरशिवाय चालणाऱ्या गाडय़ा असोत की सेकंदाला लाखो गणितं सोडवणाऱ्या प्रणाली असोत, एका बाजूला नोकरी-धंद्याच्या नवीन शक्यता निर्माण करत आहेत, तर दुसऱ्या बाजूस बेरोजगारीला आमंत्रण देत आहेत, मनुष्याचं आयुष्य वाढवत आहेत, परंतु मनुष्याच्या समोरची आव्हानंच संपवून मनुष्याला निष्क्रीय बनवत आहेत. या सर्वाचा समतोल कसा साधला जाईल, हा पुढच्या दशकासमोरचा खरा यक्षप्रश्न आहे.

(लेखक युजर एक्सपीरियन्स आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात कार्यरत आहेत.)
karandikar@gmail.com

First Published on July 25, 2019 11:55 pm

Web Title: science and technology mpg 94
Just Now!
X