हाय! माझे वय २२ वर्षे आहे. मी ‘बीसीएस’ची स्टुडंट आहे. माझी उंची ५.४ फूट असून वर्ण गोरा आहे. मी लातूरला राहते. मला कुठली ड्रेसिंग स्टाइल सूट होईल आणि कुठला रंग चांगला दिसेल?  – सोनी
प्रिय सोनी,
ड्रेसिंग स्टाइल हा खूप वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व, त्याची आवडनिवड, प्राधान्यक्रम यानुसार त्या व्यक्तीची ड्रेसिंग स्टाइल असते. ड्रेसिंग स्टाइलवरून माणूस ओळखला जातो, हे खरे आहे. तुम्ही प्रत्यक्षात कसे आहात आणि लोकांना तुमच्याकडे बघून काय वाटले पाहिजे, हे प्रत्येकाला माहिती असते आणि त्यानुसारच प्रत्येक व्यक्ती आपली ड्रेसिंग स्टाइल ठरवत असते. माझ्या मते, तुम्ही असेच कपडे घातले पाहिजेत ज्यामध्ये तुम्ही स्वत: कम्फर्टेबल असाल. ज्या ड्रेसमध्ये तुम्हाला आत्मविश्वासाने वावरता येईल, त्याला प्राधान्य दिले पाहिजे. मुळात आपण घातलेले कपडे, मग ते आधुनिक असोत की पारंपरिक, त्यामध्ये तुम्ही स्वत: बावचळून जाऊन वावरत असाल तर तो ड्रेस कधीच तुम्हाला चांगला दिसणार नाही.
तुझ्या ड्रेसिंग स्टाइलच्या प्रश्नाबाबत विचार करताना, तू तुझे वजन किंवा शरीरयष्टी सांगितलेली नाहीस. तुझी उंची तू सांगितलीस, पण त्यातून तुझ्या शरीरयष्टीचा अंदाज येऊ शकत नाही. तू बारीक आहेस की जाड आहेस की मध्यम बांध्याची आहेस ते कळायला मार्ग नाही. त्यामुळे अमुक एक ड्रेस तुला चांगला दिसेल, असे मला सांगता येणार नाही.
ड्रेसिंग स्टाइल कशी असावी असे विचारलेस तर ती तुझ्या वयाच्या मुलीसाठी ट्रेंडी असावी, असे मी म्हणेन, कारण तू अजून कॉलेजला जातेस. याच वयात सगळ्या प्रकारच्या स्टाइल करून घेता येतात आणि चांगल्या दिसतात. तुझ्या कॉलेजच्या मुली कुठली स्टाइल जास्त करतात ते बघून तुला लेटेस्ट ट्रेंड काय याचा अंदाज सहज येईल.
रंग या गोष्टीचा विचार केला तर तुझा वर्ण गोरा असल्याचे तू सांगितले आहेस. त्यामुळे तुझ्यावर सगळेच रंग सूट होतील, असे मला वाटते. फक्त लाइट टॅन, बेज, क्रीम कलर टाळायला हवेत. हे रंग तुमच्या त्वचेच्या रंगात मिसळून जातील आणि कपडे उठून दिसणार नाहीत. त्यामुळे हे रंग टाळून कुठलेही रंग वापरायला हरकत नाही.
याखेरीज स्टाइल म्हणजे तुम्ही तुमचा ड्रेस कॅरी करता, तुम्हाला किती आत्मविश्वास आहे यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे तुला शुभेच्छा!
तुमचे प्रश्न पाठवा
तुमच्या फॅशनविषयीच्या शंका आमच्याकडे पाठवा. फॅशन स्टायलिस्ट मृण्मयी मंगेशकर त्यांना या सदरातून उत्तर देतील. सब्जेक्टलाईनमध्ये फॅशन पॅशन लिहायला विसरू नका. आमचा आयडी- viva.loksatta@gmail.com