News Flash

स्वसंरक्षणाय

स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी वाचताना आणि इव्ह टीझिंगसारखे प्रकार अनुभवताना अनसेफ वाटत राहतं. स्वत:चं रक्षण स्वत:च करायला शिकलं पाहिजे, हे लक्षात येतं.

| February 21, 2014 01:10 am

स्त्रियांवरच्या अत्याचारांविषयी वाचताना आणि इव्ह टीझिंगसारखे प्रकार अनुभवताना अनसेफ वाटत राहतं. स्वत:चं रक्षण स्वत:च करायला शिकलं पाहिजे, हे लक्षात येतं. त्यासाठीच जगप्रसिद्ध सेल्फ डिफेन्स ट्रेनरनी सुचवलेल्या काही युक्तीच्या गोष्टी.
सध्या सिक्वेलसारख्या घडणाऱ्या स्त्रियांच्या अत्याचारांच्या घटना ऐकताना, इव्ह टीिझगचे सर्रास घडणारे प्रकार पाहताना आणि प्रत्यक्षात अनुभवतानाही सतत फक्त एकच प्रश्न उभा राहतो, स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी उचलायची तरी कशी. मग नेहमीसारखीच उत्तरं येतात ती म्हणजे, सोबत मिरची पूड ठेवा, पेपर स्प्रे ठेवा, चाकू-सुरी ठेवा, अ‍ॅन्ड्रॉईडवरचे अ‍ॅप्स वापरा इत्यादी. ते चुकीचे आहेत असं नाही. पण या बरोबरच थोडे वेगळे उपाय सुचवलेत सेल्फ डिफेन्सची जगप्रसिद्ध प्रशिक्षक डेबी स्टिव्हन हिने.
डेबी स्टिव्हन – मूळची ब्रिटिश. वयाच्या अकराव्या वर्षी स्वत: बलात्काराची बळी ठरलेली डेबी स्वतंत्रपणे कमावू लागल्यावर तिनं कराटेचे प्रशिक्षण घेतलं आणि त्यानंतर  स्त्रियांना मोफत प्रशिक्षण देऊ लागली. ‘अ‍ॅक्शन ब्रेक्स सायलेन्स’ ही तिची संस्था आहे. या संस्थेतर्फे ती सध्या जगभर स्त्रियांना स्वसंरक्षणाचे धडे देत फिरतेय. मुंबईत येस बँकेतर्फे डेबी स्टिव्हनचं वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं. त्यानिमित्त तिच्याशी संवाद साधायची संधी मिळाली.
डेबी तीन वर्षांपूर्वी प्रथम भारतात आली. आता तिनं याच देशात जास्त काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सेल्फ डिफेन्ससंदर्भातली तिची १४ वर्कशॉप्स मुंबईत तर ४ वर्कशॉप्स दिल्लीत झाली आहेत. आतापर्यंत तिने चार ते पाच हजार मुलींना प्रशिक्षण दिलंय. भारतभर घडणाऱ्या स्त्रियांच्या अत्याचारांबाबत विचार करताना ‘मी स्वत:च्या संरक्षणासाठी काय करू शकते?’ हाच प्रश्न प्रत्येकीच्या मनात होता. याबद्दल बोलताना डेबी सुरुवातीलाच म्हणाली की, मुळात इव्ह टीिझग किंवा एकूणच स्त्रियांवरचे अत्याचार हे शारीरिकच असतात असं नाहीये, ते मानसिकसुद्धा असतात. आणि म्हणूनच ते सहन करण्यासाठी आणि त्यांचा प्रतिकार करण्यासाठी तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा खंबीर होणं तितकंच गरजेचं आहे. या प्रशिक्षणाची ओळखदेखील ‘अ‍ॅक्शन ब्रेक्स सायलेन्स’ या टॅगलाइनमध्येच दडलेली आहे, असंही ती म्हणाली. हे प्रशिक्षण मोफत देण्यामागचा तिचा मूळ उद्देश भारतातील ग्रामीण आणि अविकसित भागातील मुलींना याबाबत प्रात्यक्षिक ज्ञान देऊन जागृत करणे हा आहे, असं तिनं सांगितलं.
डेबीला भारत आणि ब्रिटनमधल्या स्त्रियांच्या संरक्षणाबाबतचा फरक काय, असं विचारल्यावर ती म्हणाली की, परिस्थिती हाच सगळ्यात मोठा फरक आहे. भारतातील स्त्रियांची परिस्थिती आजही बिकट आहे. पण सेल्फ डिफेन्स वर्कशॉपसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून ती सुधारण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी असे कार्यक्रम शाळा – कॉलेजमध्ये कंपल्सरी झाले तर जास्त चांगले आहेत, असंही ती म्हणाली. हे सगळं प्रत्यक्षात अवलंबण्यासाठी आणि प्रतिकार करण्यासाठी मात्र तुमचं मन तितकंच खंबीर आणि कणखर असणं गरजेचं आहे, असंही डेबी म्हणाली. आणि ते जर कणखर नसेल तर मात्र तुम्ही काहीही करू शकणार नाही. म्हणून स्वत: मनाने खंबीर व्हा, कारण सेल्फ डिफेन्स इज द ओन्ली एंजल!

डेबी स्टिव्हनच्या काही टिप्स
डेबीच्या म्हणण्यानुसार बरेच लोक स्वसंरक्षणाबाबत जागृत असतात. पण मार्शल आर्ट्स म्हणजेच फक्त संरक्षण असं नाही. स्वत:चं संरक्षण हे किक मारणं किंवा पंच मारणं याहूनही वेगळ्या प्रकारे करता येऊ शकतं, ज्याबाबत आपण जागृत नसतो.

नखांचं शस्त्र
एखाद्या वेळी आपल्याला समोरच्याच्या आक्रमकतेमुळे हाता-पायांची थोडीशीसुद्धा हालचाल करणं शक्य नसतं. अशावेळी स्वत:ची नखं अगदी आक्रमक पद्धतीने वापरा. ही १० हत्यारंसुद्धा तुमचं रक्षण करू शकतात, असं डेबी म्हणते. समोरच्या माणसाला नखांनी ओरबाडा, त्याचे कान खेचा, डोळे खेचा. त्यामुळे त्याला सगळ्यात जास्त वेदना होऊ शकतात. पुरुषांच्या छातीवर मारल्याने फारसा फरक पडत नाही. उलट त्यामुळे ते जास्तच बिथरतात. त्याऐवजी  हातांनी जोरजोरात त्याच्या चेहऱ्यावर थपडा मारा. इतकं की त्याला श्वास घेणंही मुश्कील होईल.
स्पर्शज्ञान आवश्यक
आपण असं मानतो की , आपलं हक्काचं घर हे सर्वात जास्त सुरक्षित असतं. पण काही घरातूनही अत्याचाराचे प्रकार उघडकीला येतच असतात. अशा परिस्थितीत पालकांनी आपल्या मुलांना सजगतेने सगळ्या गोष्टींबाबत जागृत करणं, त्यांना स्पर्शज्ञान देणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असंही डेबी म्हणाली.
हल्लेखोराला बधिर करा
 तुम्ही स्वत:जवळ चाकू बाळगत असाल तरीही तो वापरायचा कसा हेदेखील माहीत असणं गरजेचं आहे. नाही तर कधीकधी पोकळ वाराने पुरुषाला इजा होत नाही उलट तो जास्तच चेतावतो. अशावेळी त्याच्या मानेच्या पाठी आणि कानांखालील शिरांवर जोरात मारा. त्यामुळे तिथून मेंदूकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांतील रक्तप्रवाह बंद होईल आणि डोके बधिर झाल्याने तो काहीही करू शकणार नाही. हे करण्याआधी मात्र तुम्हाला अजून काही टिप्स फॉलो कराव्या लागतील असं डेबी म्हणाली. तिच्या म्हणण्यानुसार ही स्टेप उचलण्याआधी एकदम आक्रमक होऊ नका. त्या पुरुषाच्या मानसिकतेचा अंदाज घ्या. त्याला बेसावध ठेवा. तुम्ही घाबरला आहात असं दाखवा. त्याला तुमच्या जवळ येऊ द्या आणि त्यानंतर योग्य संधी साधून तुम्ही तुमचा पवित्रा घ्या आणि वर सांगितल्यानुसार त्याला जोरात मारा. मारताना तुमचा आवाजही तितकाच ताकदीचा हवा. त्याच्या कानांत जोरजोराने ओरडा, त्याने तो अजूनच बधिर होईल आणि काहीही करू शकणार नाही.
शाब्दिक प्रहार
गर्दीमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये इव्ह टीिझगचे अनेक प्रकार घडतात. अशा वेळी शाब्दिक प्रहार जास्त फायदेशीर ठरतो. तुम्ही स्पष्ट शब्दांत आणि मोठय़ा आवाजात त्या पुरुषाला बोलू शकता की मला हात लावू नकोस. त्याउपर तो पुरुष काहीही करू शकणार नाही.
तोंडावर आणि मानेवर हल्ला
एखाद्या वेळी ५-६ पुरुष एकत्र येऊन छेडछाड करण्याचा प्रयत्न करत असतील तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, त्या टोळीमध्ये नेहमी एकाचंच वर्चस्व जास्त असतं. आणि बाकी सगळे जण त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागत असतात. पण असा प्रसंग आल्यानंतरही मुलींनी वर सांगितलेल्या टिप्स फॉलो कराव्यात. त्याच्या तोंडावर, मानेवर जोरात मारावे. आणि त्याला खाली पाडल्यास त्याच्या पायांवर जोरात उडी मारावी.
छाया : अमित महाजन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2014 1:10 am

Web Title: self defence
टॅग : Girl,Ladies
Next Stories
1 बी सेफ ऑन रोड
2 व्हिवा वॉल : सिनेमा सिनेमा
3 लिव्ह वेल डाएट
Just Now!
X