29 January 2020

News Flash

डिझायनर मंत्रा : व्यवसाय आणि फॅशनचा उत्तम मेळ – शंतनु निखिल

दोघा भावांनी व्यवसाय आणि फॅशन या दोघांचा योग्य समन्वय साधत २००० साली ‘शंतनु आणि निखिल’ हा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला.

(संग्रहित छायाचित्र)

तेजश्री गायकवाड

शंतनू आणि निखिल ही फॅशन डिझायनर जोडगोळी म्हणजे सध्याच्या भारतीय फॅशन इंडस्ट्रीमधील सर्वोत्तम नाव. या दोघा भावांनी व्यवसाय आणि फॅशन या दोघांचा योग्य समन्वय साधत २००० साली ‘शंतनु आणि निखिल’ हा फॅशन ब्रॅण्ड सुरू केला.

मेहरा कुटुंबातील एका मुलाने एमबीएचं शिक्षण घेतलं तर एकाने फॅशन क्षेत्रातली पदवी घेतली. फॅशनच्या क्षेत्रात पदवीच्या शेवटच्या वर्षांला शिकत असताना त्यावेळी फॅ शन शो सादर करावा लागतो. या शोमध्ये भावाचे कौतुक झालेले पाहिल्यावर दुसऱ्याने तिथेच आपण दोघांनी काहीतरी एकत्र येऊन काम करायला हवं, असा प्रस्ताव ठेवला. अर्थात दोघांनाही हे मान्य होतं आणि इथूनच ‘शंतनु आणि निखिल’ या ब्रॅण्डची खरी सुरुवात झाली, असं म्हणता येईल.

आपल्या एकत्र येण्याबद्दल शंतनु सांगतो, ‘‘निखिल आणि मी दोघेही १९९५ ते १९९९ पर्यंत अमेरिकेत उच्च शिक्षण घेत होतो. ‘ओहियो स्टेट युनिव्हर्सिटी’मधून मी एमबीए यशस्वीरित्या पूर्ण केले आहे, तर निखिलने लॉस एंजेलिसच्या ‘एफडीआयएम’मधून फॅ शनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. मी निखिलच्या एल. ए.मधील शेवटच्या पदवीपूर्व फॅ शनशोमध्ये त्याने केलेली भारतीय कलाकुसर आणि मॉडर्न टेक्निक याचा प्रभावी वापर बघितला. त्याच्या या कलेक्शनला अगदी स्टॅण्डिंग ओवेशनसुद्धा मिळालं. तिथूनच खरं म्हणजे मला या व्यवसायाची अनोखी संकल्पना सुचली होती, ते चित्र डोळ्यासमोर दिसू लागलं होतं.’’ यानंतर शंतनुने त्याची ओहियोमधील नोकरी सोडली आणि या व्यवसायाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. सहा महिने त्याची एकटय़ाची तयारी सुरू होती. सगळी तयारी झाल्यावर त्याने निखिलला बोलवले आणि इथूनच २००० साली ‘शंतनु आणि निखिल’ या ब्रॅण्डचा जन्म झाला.

शंतनु आणि निखिल यांचा हा ब्रॅण्ड नेहमीच कन्टेम्पररी स्वरूपाचे कलेक्शन सादर करतो. त्यांनी सुरुवातीला पुरुषांच्या कपडय़ांचे कलेक्शन आणले होते. २००१ साली या डिझायनर जोडीने भारतीय फॅ शनवीकमध्ये त्यांचं पहिलंवहिलं वुमेन्स वेअरचं कलेक्शन सादर केलं. त्यानंतर मात्र या बंधूंनी फॅशनमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आणि २००३ मध्ये अशाच प्रयोगातून साकारलेलं आगळंवेगळं कलेक्शन त्यांनी बाजारात आणलं. भारतीय कापड, एम्ब्रॉयड्ररी तेही वेस्टर्न सिल्हाऊट्सबरोबर.. हे असं त्यांचं फ्युजन कलेक्शन जास्त गाजलं. त्यात त्यांनी साडी, स्पोर्ट्सवेअर, ट्राऊजरवर शॉर्ट कुर्ती, बनारसी जॉर्जेट् स्कर्ट्स यांचा समावेश केला होता. या संपूर्ण कलेक्शनमधून भारतीय परंपरा कशी लोकांसमोर येईल, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. त्यांचे हे प्रयोग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही प्रसिद्ध झाले आणि त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

आताही शंतनु आणि निखिलने नुकतेच ‘व्होग वेडिंग शो’मध्ये एक आगळंवेगळं कलेक्शन सादर केलं आहे. त्याबद्दल ते म्हणतात, ‘‘आमच्या ब्रॅण्डचं जे वैशिष्टय़ आहे ते आमच्या या कलेक्शनमध्येही दिसते आहे. अतिशय सुंदर आणि सहज ब्लेंड करत आम्ही हे कलेक्शन सादर केलं आहे. ‘राजकुमारी’ या आमच्या कलेक्शनमध्ये भारतीय पुरुष आणि स्त्रीचा नवीन चेहरा तेही पोशाखाबरोबरच मूल्यांमधील परंपरेचे भानही सुटणार नाही, याची आम्ही काळजी घेतली आहे. नव्या पिढीतील ‘राजकुमारी’ अर्थात नववधू ही अत्यंत उत्साही आणि महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे तिच्यासाठी नेहमीचे ठरावीक रंग बाजूला ठेवत आम्ही नवीन रंगाच्या पॅलेटसोबत या कलेक्शनसाठी काम केलं आहे.’’ वेडिंग ड्रेसचं कलेक्शन बनवताना शंतनु आणि निखिलने पंचतंत्रातील रंगीबेरंगी कथांमधून प्रेरणा घेतली आहे, असं ते सांगतात. लग्न म्हणजे भावनिक गोष्ट आहे, त्यातही लग्नाच्या वेळी नववधू जो ड्रेस परिधान करते, त्याच्याशी तिच्या असंख्या भावभावना जोडल्या गेलेल्या असतात. त्यामुळे या नाजूक भावभावना कपडय़ांमधून, त्यांच्या रंगांमधूनही जपल्या गेल्या पाहिजेत आणि तरीही तिचा लूक नवीन, थोडासा आधुनिक भासेल, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.

शंतनु आणि निखिलचे कपडे फक्त भारतीयच नाही तर आंतरराष्ट्रीय सेलेब्रिटीही आवर्जून घालतात. अमिताभ बच्चन, ग्लेन मॅकग्रा, स्टीफन फ्लेमिंग, झहीर खान, सैफ अली खान, लिअ‍ॅन्डर पेस, इरफान पठाण, हृतिक रोशन, शाहरुख खान, नेहा धूपिया, दीया मिर्झा, ए.आर. रहमान, शिल्पा शेट्टी, कुणाल कपूर, बिपाशा बासू, सुष्मिता सेन यांसारख्या नामांकित बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील सेलेब्रिटींचा त्यांच्या ग्राहकांच्या यादीत समावेश आहे. व्यवसाय करण्याचे अचूक ज्ञान आणि भारतीय कापड, कलाकुसर यांची योग्य सांगड घालण्याची कला याच्या जोरावर या दोन भावांनी मिळून ‘शंतनु आणि निखिल’ हा ब्रॅण्ड उभा आहे, असं नक्कीच म्हणता येईल. हातात फॅशनची उत्तम कला असलेला शंतनु या क्षेत्रात येऊ  पाहणाऱ्यांना सांगतो की केवळ वेगळं, सर्जनशील आणि चांगलं काहीतरी निर्माण करण्याच्या उद्देशाने सतत काम करत राहिलं पाहिजे. तर निखिल त्याच्या पद्धतीने यशाचा वेगळा मंत्र सांगतो. त्याच्या मते संधी दररोज आपलं दार ठोठावत असते, आपण फक्त दार उघडायला शिकलं पाहिजे.. या दोघांनी अनुभवातून दिलेले हे शहाणपण केवळ फॅशनच्या नव्हे तर प्रत्येक क्षेत्रात चपखल लागू पडणारे आहे.

First Published on August 16, 2019 12:53 am

Web Title: shantanu and nikhil brands fashion industry abn 97
Next Stories
1 टेकजागर : जिओची पेरणी
2 फिट-नट : सुयोग गोरे
3 जगाच्या पाटीवर : आय कॅनडू इट