आपण आपल्या कलेचा व्हिडीओ स्वत:च शूट करायचा आणि तो सोशल नेटवर्किंग साइटवर अपलोड करायचा, हा ट्रेंड आता कॉमन होतोय. गायिका अनघा ढोमसे हिनं स्वत:च्या गाण्याचा केलेला सेल्फ शूटेड व्हिडीओ सध्या गाजतोय आणि या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या स्ट्रगलर्सना हा ‘शूट, शेअर, लाइक ’चा फंडा अजमावायला भाग पाडतोय. ‘सेल्फी’च्या पुढे नेणारा हा ट्रेंड आहे.
‘व्हाय दिस कोलावेरी कोलावेरी दी?’ म्हणत धनुषनं तरुणाईची मनं जिंकली, तर कोरिअन गंगनम स्टाइल डान्सच्या व्हिडीओवर तरुणाईची पावलं थिरकली. असे अनेक व्हिडीओज यूट्यूब-फेसबुकवर तुफान लोकप्रिय होतातही, परंतु अगदी थोडय़ाच अपवादात्मक व्हिडीओज्ना तरुणाईच्या आयुष्यात अढळ स्थान प्राप्त होतं. तसं पाहायला गेलं तर कोलावेरी दी काय किंवा गंगनम स्टाइल काय. यामध्ये अक्षरश: डोक्यावर घेऊन नाचण्याइतपत काही नाहीये असंही वाटू शकतं! मग त्यांच्या पॉप्युलॅरिटी मागे नक्की काय झोल आहे याचा जरा सारासार विचार केला तर सोशल मीडियाचा व्हिजिबल असून इनव्हिजिबल भासणारा रोल आहे हे लक्षात येतं. क्लिक-लाइक-शेअर..बास्स. याभोवतीच जग फिरतंय सारं!!

टेक्नॉलॉजिकली  क्रिएटिव्ह
आपण स्वत:च मोबाइलच्या कॅमेऱ्यानंदेखील व्हिडीओ बनवू शकतो. यूट्यूब-फेसबुक  अशा सोशल साइट्सवर अपलोड केला की त्यामुळे डायरेक्ट रिस्पॉन्स तर मिळतोच, वर प्रमोशनचा खर्चही वाचतो आणि हल्ली व्हॉट्सअ‍ॅपसारख्या मेसेंजरमुळे तर शेअिरग अजूनच सोप्प झालंय. आता टेक्नॉलॉजी-गॅजेट्समुळे तुम्हाला ही संधी जरी मिळाली असली तरी
क्वालिटी मेंटेन करणंही तितकंच गरजेचं आहे बरं का दोस्तांनो! उगाच काहीही शूट करून अपलोड करत बसलो तर त्यातली मजा निघून जाईल. पण जर क्रिएटिव्हिटी आणि टॅलेंटचा योग्य मेळ घातला तर सोशल मीडिया हे मोठ्ठ व्यासपीठच तयार होईल..!!

सुरुवातीला कितपत जमेल असं वाटलं होतं, परंतु त्याचबरोबर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू मी स्वत:च चांगल्या प्रकारे प्रेझेंट करू शकते हे जाणवलं आणि मग कॅमेऱ्याच्या अँगल्सचा अभ्यास करून मी स्वत:च व्हिडीओ शूट केला. सोशल मीडियावर खूप लाइव्ह रिस्पॉन्स मिळतो, लोकांना आवडलं किंवा नाही आवडलं ते तुम्हाला थेट कळतं. त्यामुळे पॉप्युलॅरिटी मिळत असली तरी लोकांपर्यंत चांगलं पोहोचणं गरजेचं आहे, याचं भान ठेवणंही गरजेचं आहे.
अनघा ढोमसे, गायिका

या सोशल मीडिया आणि गॅजेट्स-स्मार्टफोन यांच्या नावाने कित्येक जण अगदी टाहो फोडत असले तरी या साऱ्याची खूप मोठी पॉझिटिव्ह बाजूही आपण लक्षात घेतली पाहिजे. हे वाईट आहे- ते अ‍ॅडिक्टिव्ह आहे- सगळं मायाजाल आहे- फसवं आहे वगरे वगरे अनेक गोष्टी आपण ऐकतो आणि चर्चा झोडताना गप्पांच्या ओघात नाव ठेवून मोकळेही होतो, पण त्याचबरोबर शेवटी आपण कशाचा, कसा आणि किती वापर करतो यावर सारं अवलंबून असतं हे सोयीस्करपणे विसरून जातो. जर ठरवलं तर सोशल मीडियाचा वापर अतिशय क्रिएटिव्ह आणि इफेक्टिव्ह पद्धतीनं होऊ शकतो हे सांगणारा एक व्हिडीओ नुकताच लाँच झाला.
स्वत:च्या ‘हळुवार अंतरीच्या..’ या गाण्याचा हा सेल्फ शूटेड व्हिडीओ अनघा ढोमसे या गायिकेने बनवला आहे. म्हणजेच या व्हिडीओची डायरेक्टर-सिंगर-सिनेमॅटोग्राफर सर्व काही तीच आहे !! मुख्य म्हणजे हा व्हिडीओ तिने स्वत:च्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात शूट केला आहे. तिचं गाणं आवडल्याने दिग्दर्शक रवी जाधवने तिला ही आयडिया दिली आणि शूटनंतर व्हिडीओ आवडल्याने स्वत:च्या बॅनरचं नावंही दिलं. यापूर्वी मोबाइलवर शूट केलेल्या शॉर्ट फिल्म आपण पाहिल्या, परंतु अशा प्रकारे गाण्याच्या अल्बमचा प्रयोग पहिल्यांदाच झाल्याचा दावा केला जातोय. काही क्रिएटिव्ह आणि इनोवेटिव्ह करण्याच्या ऊर्जेनेच हा व्हिडीओ तयार झालाय आणि त्याला प्रचंड प्रतिसाद देऊन अ‍ॅप्रिशिएटही केलं जातंय.
एरव्ही अल्बम बनवणं खर्चीक काम असतं आणि गुड क्वालिटी अल्बम बनवण्यासाठी तर दीड-दोन लाखांपर्यंत खर्च येतो. नवीन-होतकरू, संधीच्या शोधात असणाऱ्या स्ट्रगलर्सना इतका खर्च परवडणारा नसतो. अशा स्ट्रगलर्ससाठी ही मस्त आयडिया आहे आणि मुंबई-पुण्यातल्या तरुणांना फक्त एक्सपोजर मिळतं आम्हाला नाही, अशी ओरड असणाऱ्यांसाठी तर नक्कीच हे वर्कआऊट होईल. आपल्याजवळ जे आहे (म्हणजे मोबाइलचा कॅमेरा आणि लोकेशन) त्यातूनच आपलं बेस्ट द्यायचं, शेअर करायचं बस्स!!