play-logoनव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!

पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या संस्कृती, खाण्यापिण्याच्या पद्धती आणि सर्वात मुख्य म्हणजे गायकीचे मला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे आणि या आकर्षणाच्या मुख्य कारणांपैकी एक म्हणजे स्वर्गीय मेहदी हसन खान साहाब. (खानसाब). मला फार काही कळत नसतानापासूनच माझ्या कानावर मेहदीसाहेबांची गायकी बिंबवण्याचे श्रेय माझ्या पहिल्या गुरूंकडे, आजोबांकडे जाते. नित्यनेमाने पाकिस्तान रेडियो ऐकणे आणि जमेल तसे रेकॉर्ड करून ठेवणे या त्यांच्या सवयीमुळे भारतात दुर्मीळ अशा या गायकीचा मी अधिकाअधिक आणि परत परत आनंद घेऊ  शकलो. आज ‘यूटय़ूब’च्या कृपेने खानसाहेबांनी गायलेले सर्व काही एका क्लिकच्या अंतरावर आले आहे. उद्या – १८ जुलैला मेहदीसाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त आजची प्ले लिस्ट डेडिकेटेड टू खानसाब.

धीरगंभीर आवाज आणि तशीच शांत, ‘ठहराव’वाली गायकी, प्रत्येक गझल शास्त्रीय रागावर बांधलेली, रागांच्या नियमांचे पूर्ण भान ठेवून होणारा स्वरविस्तार, रागाबाहेर जायचे.. पण जाणीवपूर्वक, श्रोत्यांना सांगून.. या त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे गजल या प्रकाराला ‘उपशास्त्रीय’ गायकीमध्ये स्थान मिळवून दिले. गझल हा प्रकार आधी मुशायऱ्यांपुरता मर्यादित होता. त्या गायल्या जायच्या पण पूर्णपणे शब्दप्रधान अंगाने, गजल ‘सांगण्या’च्या आविर्भावात. गझल ही त्या त्या शायरच्या नावाने ओळखली जायची. ही गालिबची, ती मीरची गझल असे म्हणण्याचा प्रघात होता. ती गायकाच्या /संगीतकाराच्या नावावर ओळखली जाऊ लागली, ते बहुदा मेहदीसाहेबांपासूनच.

मेहदीसाहेबांच्या सुरुवातीच्या काळातल्या चित्रपटातील गाण्यांमधून तलतसाहेबांची खूप आठवण होते. ती गाणीही गझल टाइपचीच आहेत जसे -‘मुझे तुम नजर से..’ (दोराहा – संगीत – सोहैल राणा) किंवा ‘प्यार भरे दो शरमीले नैन’ (चाहत- रॉबिन घोष). त्यांची गाजलेली ‘रफ्ता रफ्ता वो मेरे हस्ती का सामाँ हो गये’ ही गजलसुद्धा ‘झीनत’ या चित्रपटातली आहे म्हणे. ‘रंजीश ही सही’ ही अहमद फराझ यांची गझलसुद्धा कुठल्याशा चित्रपटासाठीच बनलेली आहे. पूर्वी मुशायऱ्यांमध्ये अनेक शायर जमायचे आणि सगळ्यांना रदीफ आणि काफिया ( गझलमधल्या कडव्याचे /चरणाचे शेवटचे दोन शब्द ज्यात यमक असते)दिले जायचे. प्रत्येक शायर ते दोन शब्द शेवटी येतील अशा पद्धतीने उस्फूर्तरीत्या शेर बनवायचे. याच पद्धतीने अहमद फराझ यांच्या ‘रंजीश ही सही’मध्ये इतरही काही शायरांनी ‘केलीये आ’ या रदीफ काफियाचे शेर सामील केले आहेत. मेहदीसाब हे शेर गाताना नेहमी हे सांगतातच. किंबहुना मेहदीसाब आपल्या मैफिलीत अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला देत असतात. जसे ‘कु ब कु फैल गयी बात..’ (परवीन शाकीर) गाताना दरबारी राग उलगडून दाखवतात तसेच यातल्या कठीण शब्दांचा अर्थ विशद करून गझलचे रसग्रहण करायला शिकवतात. यूटय़ूबवर हे खासगी रेकॉर्डिग उपलब्ध आहे.

खरे तर खानसाहेबांना ऐकायचे असेल, तर अशा खासगी मैफिलींमधूनच जास्त ऐकायला हवे. समोर मोजकेच, पण दर्दी श्रोते असताना त्यांची गायकी अजूनच फुलून येते. तरीही त्यांच्या जाहीर कार्यक्रमातली, पाकिस्तान टीव्हीवरची रेकॉर्डिग्स पण ऐकण्यासारखीच आहेत. काही उदाहरणे म्हणजे – ‘गुंचा ए शौक लगा है..’ शायर-वजीह इरफानी. ‘जिंदगी में तो सभी प्यार किया करते है..’- कतील शिफाई, तसेच ‘भैरवी’मधली ‘यारो किसी कातील से कभी.’, फैजम् अहमद फैजम् यांच्या – ‘गुलो मे रंग भरे’ आणि ‘आए कुछ अब्र..’ अन्वर मिरझापुरीची – ‘मै नजर से पी रहा हूँ’, सागर सिद्दिकी यांची ‘चराग ए तूर जलाओ.’

खानसाहेबांच्या मला अत्यंत जवळच्या वाटणाऱ्या आणखीन काही गझला म्हणजे बहादूर शाह जफरची (हा शेवटचा मुघल सम्राट. याच्या दरबारी फैजम् आणि गालिबसारखे शायर होते; याने ‘अभी तो मैं जवान हूँ’सुद्धा लिहिली आहे) ‘बात करनी मुझे मुश्कील..’, असघर सलीम यांची ‘गुलशन गुलशन शोला ए गुल की’, अहमद फराजची ‘शोला था जल बुझा हूं’, मीरच्या ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’ आणि ‘देख तो दिल के जान से उठता है..’

१३ जून १०१२ ला ‘मुहोब्बत करने वाले कम ना होंगे तेरी मेहफिल मे लेकिन हम ना होंगे’ असे म्हणत खानसाहेबांनी आपल्याला अलविदा केले. त्या दिवशी मी अहमद फराझ यांची ही एकच गझल दिवसभर ऐकत होतो

अबके हम बिछडम्े तो, शायद, कभी ख्वाबों में मिलें

जिस तरह सूखे हुवे फूल किताबों मे मिलें!

हे  ऐकाच..

‘पत्ता पत्ता’ आणि ’केसरिया बालम’

गझल या प्रकाराला जुन्या काळात कॉपी-राइट वगैरेंची भानगड नसल्याने अनेक वेळा असे दिसून येते की, एकाच गझलेला दोन किंवा अधिक संगीतकार/ गायकांनी साज दिलेला आहे. उदाहरणार्थ गालिबची ‘दिल-ए-नादान तुझे हुवा क्या है’ ही गझल मेहदीसाहेबांबरोबरच जगजीतजी – चित्रा सिंग आणि आबिदा परवीन यांनीसुद्धा गायली आहे. आबिदानेच फरहात शेहजाद यांची ‘एक बस तू ही नहीं’ ही गझल मेहदीसाहेबांच्या आवाजात प्रसिद्ध आहे. नुसरतसाहेबांनी आपल्या कव्वाली-स्टाइलमध्ये ‘आए कुछ अब्र’ ही गझल गायलेली आहे, जी मेहदीसाहेबांनीसुद्धा गायली आहे. ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’ ही गझल मेहदीसाहेबांबरोबरच आपल्या रफीसाहेब आणि लताजींनी चित्रपटात गायली आहे. हरिहरनजींनीसुद्धा ही गजल नुकतीच एका आल्बममध्ये त्यांच्या अनोख्या अंदाजात गायली आहे. अनेक गायकांनी गायलेले ‘केसरिया बालम’ हे राजस्थानी लोकगीत मेहदी साहेबांनीदेखील गायले आहे. सगळे गायक लावतात तसे टिपेचा आवाज न लावता मेहदी साहेबांच्या खर्जयुक्त खालच्या पट्टीतही या गाण्याची गोडी तीळमात्र कमी होत नाही. उलट गाण्यातला एक वेगळाच भाव समोर येतो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या कलाकारांनी गायलेली एकच गझल एकामागून एक ऐकताना त्या गझलचे वेगवेगळे रंग आपल्यासमोर येतात. हा प्रयोग नक्की करून बघा..मजा येईल.

जसराज जोशी – viva.loksatta@gmail.com