कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश करताना तरुण मुली आपल्या दिसण्याबाबत जास्तच जागरूक होतात आणि ब्युटी प्रॉडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सचा मारा सुरू होतो. टीनएजर्ससाठी कुठल्या  ट्रीटमेंट्स सेफ आहेत, याबाबत काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
पावसाळा येताच जसं सृष्टीला नवा बहर येतो, तसं कॉलेज कॅम्पसमध्येसुद्धा नव्याचा अर्थात फ्रेशर्सचा बहर असतो. कॉलेजजीवनात नव्याने पदार्पण करताना प्रत्येक तरुण मुलगी मोरपंखी स्वप्न घेऊन येते. स्वत:कडे, स्वत:च्या दिसण्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं याच काळात. आपण अधिकाधिक सुंदर दिसावं यासाठी सगळा खटाटोप सुरू होतो. ब्युटी पार्लरची पायरी चढली जाते, स्पाचा अनुभव घेतला जातो. नवनवी ब्युटी प्रॉडक्ट्स वापरून पाहिली जातात. परंतु याच वयात त्वचा अगदी सेन्सिटिव्ह झालेली असते. आपल्या त्वचेला सूट न होणारं प्रॉडक्ट किंवा न झेपणारी ट्रीटमेंट घेऊन आयुष्यभर पस्तावायची वेळ येऊ शकते. टीनएजर्ससाठी कुठल्या पार्लर ट्रीटमेंट्स सेफ आहेत, काय करणं टाळावं हे प्रश्न घेऊन काही तज्ज्ञांशी चर्चा केली.
त्वचेची काळजी
मान्सूनमधलं वातावरण खूप आल्हाददायक असतं परंतु त्याचबरोबर त्वचा आणि केसांच्या दुष्परिणामांना कारणीभूत असतं. डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. माधुरी अग्रवाल यांच्या मते या काळात योग्य आहार आणि नियमित व्यायाम हेच तुमच्या त्वचेचा बॅलन्स सांभाळण्यासाठीचे उत्तम उपाय आहेत. इतर उपचार वरवरचे ठरतात. तेलकट त्वचेवर हवेच्या आद्र्रतेमुळे जास्त ओलसरपणा दिसून येतो, त्यामुळे ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स, मुरमं लवकर येतात. अशा वेळी घरगुती उपाय म्हणजे ओट्समध्ये कच्च दूध मिक्स करून चेहऱ्याला लावावे याने पिम्पल्स कमी होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कच्चा बटाटा किंवा गुलाबपाणी काळपटपणा घालवण्यास मदत करतात, असंही माधुरी यांनी सांगितलं.
ओरिफ्लेमच्या ब्युटी आणि मेक-अप एक्स्पर्ट आकृती कोचर यांच्या मते, टीनएजर्सने फेशिअल करण्यापेक्षा बेसिक क्लिंझिंग करावे आणि त्यात अ‍ॅलोव्हेरा (कोरफड), ग्रीन टी असणारे होममेड फेसपॅक वापरावे. घरगुती उपायासाठी त्यांनी दही, टॉमेटो, गुलाबपाणी यांचा सल्ला दिला आहे. पिंपल्स जाण्यासाठी चंदन आणि हळद पावडर यामध्ये गुलाबपाणी मिक्स करून लावावे व टी-ट्री असलेली प्रॉडक्ट्स वापरावीत. ती सेफ असतात किंवा जेल असलेले फेसवॉश वापरावे. याने बॅक्टेरिया मरतात व आपली त्वचा नितळ होते.डॉ. यशश्री बुधकर यांनीदेखील पावसाळ्यात क्लिंझिंग करणं आवश्यक असल्याचं सांगितलं. टीनएजर्सनी डीप क्लिंझिंग करावं. त्याने ब्लड सक्र्युलेशन चांगले होते व हिट कमी झाल्यास पिंपल्सही कमी होतात.
केसांची काळजी
तुम्हाला पाऊस आवडत असेल, पण तुमच्या केसांना नाही. दमटपणा हा केसांच्या गळण्याला निमंत्रण देतो. तसेच केसात कोंडा जमा व्हायला आणि केस रुक्ष व्हायला कारणीभूत ठरतो. पावसाळ्यात जास्त हेअर ट्रीटमेंट घेऊ  नये. परंतु हेअर स्पा घेणं चांगलं. गरम तेलाचा वापर करावा, अँटीडँड्रफ् श्ॉम्पूचा वापर करावा आणि केस कोरडे आणि स्वच्छ ठेवावेत. आजकलच्या पिढीत केस लवकर पांढरे होण्याचा प्रकार आढळून येतो. डर्मेटॉलॉजिस्ट डॉ. माधुरी अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार केस लवकर पांढरे होण्यामागे बदललेली लाइफस्टाइल हेच कारण आहे. केसांच्या आरोग्यासाठी योग्य आहार आवश्यक आहे. जंक फूड टाळावं. तसेच पांढऱ्या केसांना हेअर डाय लावणंही टाळावं. त्यापेक्षा नॅचरल हेअर कलर लावावा. डॉ. यशश्री बुधकर यांच्या सल्ल्यानुसार एक ग्रॅम तिळाचं तेल आणि एक ग्राम अरोमा यांचं मिश्रण केसाला लावावं, त्यामुळे जंतू मरतात व पावसाळ्यात वातावरणामुळे वाढलेली चिडचिड अरोमाच्या सुगंधाने कमी होण्यास मदत होते.
पायांची काळजी
पावसाळ्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो पावलांवर. पावसाळ्यात संसर्गापासून बचाव करण्यासाठी बाहेरून आल्यावर पाय स्वच्छ धुवावेत आणि बंद बूट घालणं टाळावं. त्याने फंगल इन्फेक्शन होतं. भेगांसाठी घरगुती सोपा उपाय म्हणजे व्हेजिटेबल ऑईल भेगांना लावून त्यावर मोजे घाला आणि रात्रभर ठेवा. याशिवाय डॉ. माधुरी सांगतात, आंघोळ झाल्यावर ड्राय फ्रूट पावडर किंवा अँटी फंगल डस्टिंग पावडरचा वापर करावा व महिन्यातून दोनदा पेडिक्युअर करावं.

घरगुती उपचार
* चेहऱ्यावरचे मुरुम कमी होण्यासाठी घरगुती उपाय करायचा झाल्यास पपई आणि लोणी यांचाही वापर करू शकता. बाजारात रेडीमेड मिळणाऱ्या फेशिअल क्रीमपेक्षा ताज्या फळांचा रस उत्तम.
* दोन केळी आणि मध यांचं मिश्रण केसाला एक तास लावल्यामुळे केस सॉफ्ट होतात आणि मोइश्चराइज्डदेखील होतात.
*  तुळशीच्या पानांचा रस आणि त्रिफळा यांचा काढा करावा. त्याच्या पाव भागाएवढी मुलतानी माती त्यात मिक्स करावी आणि हे मिश्रण केसाला लावावं.
अमृता अरुण-viva.loksatta@gmail.com