स्त्री म्हणजे शक्ती, स्त्री म्हणजे प्रकृती. देवीच्या रूपात आपण स्त्रीत्वाचाच जागर करतो. संकट निवारण्यासाठी, क्लेशापासून सोडवण्यासाठी आपण तिच्याकडे प्रार्थना करतो. पण समाजात घडणाऱ्या काही घटना मात्र याच्या एक्झॅक्टली उलटं काहीतरी सांगतात. आजची स्त्री सुरक्षित आहे की नाही, हा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची आणि गरज पडलीच तर हात उचलण्याचीसुद्धा मुलींनी तयारी ठेवली पाहिजे. याच अर्थाचा संदेश देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरून बराच फिरतोय.
‘स्लॅप’ नावाचा हा व्हिडीओ सोशल नेटवर्कवर शेअर होतोय आणि लक्ष वेधून घेतोय. त्यात असं दिसतं की, बसस्टॉपवर एक मुलगी बसची वाट पाहत उभी आहे. तिच्या मागचा एक मुलगा शिटय़ा वाजवून, गाणी गाऊन तिची छेड काढू पाहतो. सुरुवातीला मागे रागानं कटाक्ष टाकून ती मूकपणे निषेध करते. नंतर मात्र ती मुलगी रागात त्या मुलाच्या कानाखाली ठेवून देते. पण नंतर तिला उमगतं – आपण चुकीच्या मुलाला शिक्षा दिली. कारण तो मूकबधिर आहे! छेड काढणारा मात्र हा प्रकार पाहून तिथून पळ काढतो. चोर सोडून संन्याशाला सुळी देण्याचा हा प्रकार पाहून आपण काही विचार करेपर्यंत तो मूकबधिर मुलगा काही लिहिताना दिसतो. आपल्याला मारणाऱ्या मुलीचा राग करण्याऐवजी तो तिच्या हिमतीला दाद देतो. तिनं (चुकीच्या का होईना पण) त्रास देणाऱ्याविरोधात प्रतिकार करण्याची हिंमत दाखवली याबद्दल तिचं अभिनंदन करतो.
या ‘स्लॅप’ व्हिडीओवर सध्या प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. ‘स्लॅप’चा दिग्दर्शक कौस्तुभ हिले म्हणाला की, ‘मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना पाहता मुलींमध्ये जागरूकता निर्माण व्हायला हवी. मुलींनी स्वतच्या सुरक्षेसाठी स्वत झगडायला हवं, असं सांगण्याचा हेतू यामागे आहे. लोकांच्या विचारसरणीत बदल आणि मुलींच्या सेफ्टीसाठी आवाज उठवण्याचा प्रयत्न स्लॅपच्या माध्यमातून आम्ही केलाय.’
इव्ह टीजिंग होतं, आपण सुरक्षित नाही असं वाटतं हे खरं.
पण आपल्यातल्या किती जणी आवाज उठवतात? तुमची एक तक्रार अजून अनेक जणांना या वाईट अनुभवापासून लांब ठेवू शकते. तुम्ही मागितलेली मदत तुम्हाला आणि इतर अनेक जणांना धडा देऊन जाते. आपल्याला चित्रपटातील ‘मर्दानी’ भावते पण वेळ पडली तर आपण मर्दानी व्हायला हवं हे मात्र आपण विसरतो. पण याचा अर्थ विनाकारण स्त्री असण्याचा फायदा घ्यावा, असंही नाही. संयम असावा पण सहन करू नये. कोणासोबत, कुठे आहोत याचं भान असायला हवं. मुली सोबत असताना मुलांनीसुद्धा मुलींच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यायला हवी. हे सगळेच संदेश या छोटय़ा व्हिडीओच्या माध्यमातून नकळतपणे दिले आहेत आणि ते भिडतातही.
तसाच आणखी एक व्हिडीओ ‘अपॉलॉजी’. हा व्हिडीओसुद्धा अनेकजणांनी शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चार पुरुष ‘आम्ही नाही’, अशी खंत व्यक्त करतात. पण भारतातील स्त्री असणं म्हणजे केवळ निराशा आणि भीती आहे, याला आपणच अर्थात भारतीय पुरुष जबाबदार आहोत, असं ते मानतात. सर्व स्त्रियांची ते माफी मागतात. महिलांच्या असुरक्षिततेबाबत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतातील स्त्रियांनी रस्त्यावरच्या टग्यांची शेरेबाजी ऐकायची आणि नेत्यांनी मात्र स्त्रियांच्या राहणीमानावर, त्यांच्या कपडय़ांवर आणि टी.व्ही., इंटरनेटसारख्या माध्यमांवर बोट ठेवून मोकळं व्हायचं. कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणून मिळणारी दुय्यम वागणूकही पचवायची. लग्नानंतरचे बदल तिनेच स्वीकारायचे. स्त्री केवळ याच गोष्टींना पात्र आहे का? नाही. याहून चांगलं मिळवण्यास स्त्रिया पात्र आहेत आणि ते तुम्हाला मिळत नसेल तर आम्ही त्याला जबाबदार आहोत. आम्ही तुमची माफी मागतो. असं या अपॉलॉजी व्हिडीओत शेवटी म्हटलं जातं.  देवीच्या हातातील पौराणिक शस्त्रांऐवजी आता वेगळी शस्त्रं हातात घ्यायला हवीत असंही ते सुचवतात. समाजातील वाईट वृतींच्या महिषासुराचा वध करण्यासाठी वेळप्रसंगी महिषासुरमर्दिनीचा अवतार घ्यायला काही हरकत नाही त्याने नक्कीच फरक पडेल, हे संदेश विविध माध्यमांतून बाहेर येत आहेत. अनेक तरुण मुलं हे व्हिडीओ बघून शेअर करताहेत आणि त्याला प्रतिसाद देत आहेत.