मी २४ वर्षांची असून माझी उंची ५ फूट ३ इंच आणि वजन ४५ किलो आहे. मी तशी बरीच सडपातळ आहे. मला जीन्स घालायला आवडतात आणि फॉर्मल टीशर्ट्स. तसंच पंजाबी सूटही मी घालते. माझ्या अंगयष्टीला कुठले कपडे फॉर्मल वेअर आणि पार्टी वेअर म्हणून शोभून दिसतील ते सांगा.
प्रविणा साळवी

प्रिय प्रविणा,
तुझ्या वर्णनानुसार, तू बारीक असावीस असं वाटतंय. तुझ्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे बारीक व्यक्तींना बहुतेक सगळे आऊटफिट्स सूट होतात. त्यामुळे खरं तर प्रॅक्टिकली तू काहीही तुला आवडेल ते घालू शकतेस. तुला जीन्स आवडत असतील तर स्ट्रेट कट जीन्स घालू शकतेस किंवा ट्राऊझर्सदेखील घालू शकतेस. टी -शर्ट हे जनरली फॉर्मल्सच्या पठडीत बसत नाहीत. पण तुला टी-शर्ट वापरायचेच असतील तर फुलर स्टाइलचे पातळ नसतील अशा जाड कापडाचे टी-शर्ट तू घालू शकतेस. फुलर स्टाइल म्हणजे बटन्स किंवा गॅदर्स किंवा प्लिट्स, काऊल्स असलेले टॉप्स. रॅगलन आणि बॅटविंग पॅटर्नचा सध्या ट्रेंड आहे. असे टॉप्स तू घालू शकतेस. तुला बलून पॅटर्नसुद्धा सूट होतील. बल्की किंवा जाड कापडाचे टॉप्स म्हणजे निटेड फॅब्रिक-ज्यूट, लोकर, कॉट्सवूल किंवा फ्लॅनेलचं कापड त्यासाठी योग्य आहे.
पंजाबी सूटमध्ये लेगिंग्ज घालणं शक्यतो टाळ. कारण त्यानं तू आणखी बारीक दिसशील. त्याऐवजी पतियाला, हायरम्स किंवा धोती पँट्स ट्राय कर. कुर्त्यांला पिन टक्स, गॅदर्स किंवा छातीपर्यंत प्लिट्ससारखी डिझाइन्स तुला शोभून दिसतील. यामुळे तू खूप बारीक वाटणार नाहीस. कॉलरवाले कुर्तेसुद्धा तुला आवडत असतील तर तू वापरू शकतेस.
कोणतं कापड शोभेल याचा विचार करत असशील तर सिंथेटिक कापड शक्यतो वापरू नकोस. ते तुझ्या अंगाला चिकटून बसतं आणि त्यामुळे तू हडकुळी दिसू शकशील. हेवी कॉटन, लीनन किंवा ज्यूटसारखं कापड वापर. त्याचे ड्रेस चांगले दिसतील.

एक्सपर्ट अ‍ॅडव्हाइस : या फंक्शनला कुठला ड्रेस घालावा, कुठला रंग उठून दिसेल, या ड्रेसमध्ये जाड तर दिसणार नाही ना.. असे नाना प्रश्न आपल्याला पडत असतात. प्रत्येक वेळी खास ड्रेस डिझायनर गाठणं काही जमत नाही आणि परवडत नाही. तुमच्या फॅशनविषयीच्या शंकांना या कॉलममधून डिझायनर मृण्मयी मंगेशकर उत्तरं देतील. आपला प्रश्न व्यवस्थित वर्णनासह आमच्याकडे ५्र५ं.’‘२ं३३ं@ॠें्र’.ूे या आयडीवर पाठवा. सोबत तुमचं नाव, वय आणि आपले राहण्याचे ठिकाणही आम्हाला सांगा. सब्जेक्ट लाइनमध्ये फॅशन पॅशन असा उल्लेख करायला विसरू नका.