दीपेश वेदक

बालपण आणि खेळणी या दोन अविभाज्य गोष्टी. लहानपणी बाजारात किंवा एखाद्या मित्राकडे एखादं नवं खेळणं दिसलं, की ते आपल्यालाही मिळावं म्हणून आम्ही मुलं बाबांकडे हट्ट करत असू; पण त्यातील अनेक खेळणी आता कालबाह्य़ झाली असतील, हे माहिती होते. मात्र आताची मुलं नेमकं काय खेळतात? त्यांच्या हातात असलेल्या नवीन वस्तू कोणत्या आहेत, हे डोकावून पाहिलं तर थक्क व्हायला होतं. आम्ही खेळत होतो, तीच खेळणी किंवा त्याच वस्तू आता नव्या रूपात, अधिक अद्ययावत पद्धतीने उपलब्ध झाल्या आहेत. जुन्या गोष्टींनी धारण केलेला हा नवा अवतार एकाच वेळी जुन्याची सय मनात दाटून आणणारा आणि नव्याचा विचार करायला लावणारा आहे हेच खरं..

डिजिटल स्लेट

लहानपणी मुळाक्षरांची ओळख झाली ती दगडी पाटीवरच, असे सांगणारे अनेक जण तुम्हाला भेटतील; पण सध्याच्या मुलांना मात्र मुळाक्षरांची ओळख व्हावी, म्हणून नवीन पाटी बाजारात आली आहे. ही पाटी दिसायला अगदीच आपल्या जुन्या पाटीसारखीच असली तरी ही नवी पाटी बाजारात प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. डिजिटल स्लेट म्हणून ओळखली जाणारी ही पाटी म्हणजे साधारण सात ते बारा इंचाचा एलईडी डिस्प्ले आहे. या पाटीच्या एका कोपऱ्यात एक छोटे बटण आहे. हे दाबले की पाटीवर लिहिलेले सगळे पुसले जाते. महत्त्वाचं म्हणजे पाटीवर लिहायला आपला खडू नाही, तर एक पेन सोबत दिलेला असतो. हा पेन वापरून तुम्ही हवं ते या पाटीवर लिहू शकतात. इतर पेनांनी लिहायचा प्रयत्न केला तर मात्र काहीही दिसत नाही. अशा या डिजिटल स्लेटची सध्या बाजारात चांगलीच चलती दिसते. अगदी अडीचशे रुपयांपासून ते दीड-दोन हजारांपर्यंत या डिजिटल स्लेटची किंमत असून अनेक पालक आणि लहान मुलं या पाटीला पसंती देतात.

ड्रोन

‘थ्री इडियट्स’मधल्या रँचोने तयार केलेला ड्रोन आपण सगळ्यांनी पाहिला आहे, पण लहान मुलांना खेळायला हे एक उत्तम खेळणे असू शकते हे मात्र त्यानिमित्ताने अनेकांच्या लक्षात आले. लहान मुलांपासून मोठय़ांपर्यंत अनेकांच्या मनात या ड्रोनने एक वेगळंच स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे काही ठरावीक उंचीपर्यंत उडणारे लहानमोठे अनेक ड्रोन बाजारात उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरा असलेले, वेगवेगळ्या उंचीवर उडणारे, वेगवेगळ्या वयोगटांसाठी मिळणारे अनेक ड्रोन बाजारात सहज मिळत आहेत. अगदी हजार रुपयांपासून ते लाखांपर्यंत किंमत असणारे हे ड्रोन घेताना पालकांचा खिसा मात्र रिकामा होताना दिसतो आहे.

मॅजिक लॅपटॉप

नव्वदीच्या शतकात जन्म झालेल्या अनेकांना ‘छय्या छय्या’वाला फोन नक्कीच लक्षात असेल. घरोघरी फोन आणि मोबाइल यायला सुरुवात झाली होती आणि लहानग्यांनाही आपला स्वत:चा फोन हवा होता. अशा वेळी बाजारात ‘छय्या छय्या’वाला फोन आला होता. वेगवेगळी बटणं दाबली की वेगवेगळी गाणी यामध्ये लागायची. सध्याचा बाबा फोनपेक्षा लॅपटॉपवर काम करताना जास्त दिसतो. अशा वेळी मुलांनाही आपला लॅपटॉप हवा आहे. त्यामुळे मुलांसाठी खास छोटेखानी लॅपटॉप बाजारात आले आहेत. यातही वेगवेगळ्या बटनांना वेगवेगळी इंग्रजी बालगीते लागतात. काही लॅपटॉपना तर छोटेखानी स्क्रीन असून त्यात वेगवेगळी मुळाक्षरे, रंग, आकार, प्राणी, पक्षी यांची माहितीही मुलांना मिळते. पाचशे ते हजार रुपयांत उपलब्ध होणारे हे लॅपटॉप आता अनेक मुलांना आपल्या ताफ्यात हवे आहेत.

पब जी गन्स

लहानपणी बंदूक म्हटली की ती फक्त दिवाळीमध्ये हातात यायची. त्यात टिकल्या टाकून फोडण्यात वेगळीच मजा होती. सध्याच्या लहान मुलांमध्ये मात्र पब जी या व्हिडीओ गेमचे वेड मोठय़ा प्रमाणात दिसून येते. हेच हेरत बाजारात अनेक नव्या बंदुका दाखल झाल्या आहेत. पब जी खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक बंदुकीची हुबेहूब छोटेखानी प्रतिकृती बाजारात उपलब्ध झाली आहे. पब जीमध्ये बंदुकीला लावण्यात येणारी अनेक साधनेसुद्धा तुम्हाला बंदुकीसोबत घेता येतात. अगदी दोनशे रुपयांपासून सुरू होणारी या बंदुकीची किंमत दोन ते तीन हजारांच्या घरातही जाते. अर्थात, या खेळाचं वेड लक्षात घेता अनेक लहान मुलांना ही बंदूक हवीच असते.

बबल गन

पूर्वी जत्रेत फिरायला गेल्यावर बुडबुडेवाल्याकडे लहान मुलांची गर्दी जमायची. एका छोटय़ा डबीत साबणाचे पाणी भरलेले असायचे. त्यात प्लास्टिकची काडी बुडवून त्यावर फुंक मारली ही हवेत बुडबुडे उडायला लागायचे. हे बुडबुडे बघून अनेक लहान मुलं आईवडिलांकडे हट्ट करायची. असेच बुडबुडे तयार करणारी बबलगन आता बाजारात उपलब्ध झाली आहे. याच्यात साबणाचे पाणी आणि सेल भरले की काम झाले. बंदुकीचे बटण दाबले की ही बंदूक हवेत बुडबुडे सोडायला लागते. साबणाचे पाणी तोंडात जाण्याची भीतीही इथे नसते. त्यामुळे अनेक पालक या बबलगनला पसंती देतात. अगदी शंभर ते दोनशे रुपयांत ही बबलगन बाजारात सहज उपलब्ध आहे.

बुद्धिबळ, ल्युडो,सापशिडीचे वेड कायम

लहानपणी बुद्धिबळ, ल्युडो, सापशिडी खेळून मोठय़ा झालेल्या अनेक पिढय़ा आपल्या मुलांना मात्र हे खेळ बाजारात जाऊन आणून देत नाही; पण त्यामुळे या खेळांचे वेड मात्र जराही कमी झालेले दिसत नाही. अशा वेळी हे खेळ मात्र मोबाइलवर उपलब्ध झाले आहेत. तेव्हा मोबाइल सुरू केला, की हे खेळ अनेक मुलांना तिथेच खेळता येतात. त्यासाठी बाजारात जाऊन तो खेळ विकत घेण्याची गरज अनेकांना वाटत नाही.