दसरा झाला. सीमोल्लंघनाचा आनंद आहेच, पण ओलांडणाऱ्या सीमेच्या आत असलेल्या सगळ्या काळासाठी आहे अपार कृतज्ञता. सोन्यासारख्या जुन्यासाठी.
मागच्या वेळी मी पुढचा टप्पा म्हणाले. तो म्हणजे नव्या गाडीच्या आगमनाचा. दरम्यान थोडी चिडचिड, बरेच वाद, निर्धार, वॉक ऑऊटची धमकी. अशा काही गोष्टींपाशी आपण ठेचकाळतो. पण मग सगळं येतं जमून. त्या माणसांना तर कार विकायचीच असते आणि आपल्यालाही घ्यायचीच असते. बाराशेपन्नास सह्य़ा आणि चारशेवीस झेरॉक्स कॉप्या आपण आसमंतात वाटून टाकतो. शेवटचा प्रयत्न म्हणून. प्लीज अमुक तारखेला मिळेल का गाडी. असं म्हणून बघतो. तो असफल ठरतो. गाडी यायची तेव्हाच येते. शोरूममधून फोन येतो. ‘‘गाडी तयार आहे. कधी येता घेऊन जायला?’’
हा फोन येण्यापूर्वीचे काही दिवस आपण फार व्याकुळ होऊन जातो. मला तर जवळजवळ नव्या गाडीची आतुरताच उरत नाही. असं वाटत राहतं. नवी गाडी मिळणार असल्याचा फोन येऊच नये. नवीन काही घडूच नये. आत्ताच्या जुन्या गाडीबरोबरचे सगळे दिवस, महिने, र्वष आठवायला लागतात. सगळे पावसाळे, सगळे रस्ते, आठवणी. वेडय़ावाकडय़ा क्रमानी डोळ्यासमोरून धावायला लागतात.
ज्या दिवशी गाडी घरी आणली तेव्हा घरच्यांनी मिळून केलेलं गाडीचं स्वागत आठवतं. बाबांनी बॉनेटवर स्वस्तिक काढून गाडीसमोर नारळ वाढवला होता. हार घातला. आईनी गाडीला ओवाळलं होतं. एखाद्या माणसाचं करावं तसं स्वागत झालं होतं गाडीचं. सगळ्यांचे एकत्र फोटो आहेत. त्या वेळी जे होते त्या ड्रायव्हरचा पण हातात किल्ली घेऊन तोंडभर हसतानाचा फोटो आहे. मित्रमैत्रिणींच्या प्रतिक्रिया आठवतात. वाऊव्ह. सही. क्लास. आई ग्ग. भारी. खरं म्हणजे आपणकाही रोल्स रॉईस घेतलेली नसते, पण प्रत्येकाच्या कौतुकानी आपण खुशालून गेलेले असतो. बाबा म्हणतात. ‘‘केवढी जागा आहे गाडीत.’’ आई म्हणते. ‘‘बाप रे एवढी किंमत!’’ तेव्हा आपला ऊर अभिमानानी भरून येतो. बास. हाच आनंद बघायचा होता तुमच्या चेहऱ्यावर. आता भरून पावलं. नवीन गाडीची कोणाकोणाबरोबर चक्कर. कुणाला स्वत: चालवून बघायची असते. कुणाला गाडीची पार्टी हवी असते. एखाद्या कार्यक्रमाला जाताना आपल्या अमुक एका सरांनी किंवा बाईंनी आपल्याला ह्य़ा गाडीतून उतरताना बघावं, असं सुप्तपणे आपल्याला वाटून गेलेलं असतं. त्याबद्दल ओशाळल्यासारखंसुद्धा वाटून जातं. पण त्यापेक्षा काहीतरी अजूनच चांगलं घडतं. कार्यक्रमानंतर त्यांना गाडीतून घरी सोडायला जायची संधी मिळते. पाठीवर शाबासकी मिळते.
माझ्या प्रत्येक गाडीबरोबर माझं हे चक्र झालेलं आहे. नवी गाडी इज इक्वल टू प्रगती ह्य़ा भावनेनं मी आणि माझ्या सुहृदांनी नम्र अभिमान वाटून घेतला. आत्ताच मी एक नवी गाडी घेतली. तेव्हा सेम असंच झालं. पण जेव्हा नवं वाहन येतं तेव्हा जुनं काढावंच लागतं. एकतर जागेचा प्रश्न. शिवाय एक्सचेंजमध्ये चांगली किंमतही येते. त्यामुळे कधीना कधी जुनी गाडी देऊन टाकावीच लागणार असते. आपण इतके गुंतलेले असतो आपल्या वाहनामध्ये. ती कारच असायला पाहिजे असं काही नाही. आपली स्कूटर, मोटारसायकल, रिक्षा, टेम्पो, सायकल काहीही. जुनं  देऊन नवं घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही. माझी पहिली मारुती विकून मी फोर्ड आयकॉन घेतली. तेव्हा मी पुन:पुन्हा वळून माझ्या पहिल्यावहिल्या गाडीकडे बघत होते. रडवेली झाले होते. नव्या गाडीची डिलिव्हरी घेताना शेवटी संदेश चेष्टेत म्हणाला. काय गं हे? थोडा तरी आनंद झालाय ना तुला नवी गाडी घेताना? आणि मी बळेबळेच डोळे पुसले.
आत्ताही तसंच झालं. आत्ताच्या गाडीच्या किती आठवणी! आमचे ड्रायव्हर- सुजित, हेअर ड्रेसर- अनिता, मेकअपमन- श्रीधर, असिस्टंट-विजय आणि मी- आम्ही भारतभर फिरलो- किती सिनेमे, शूटिंग्ज, इव्हेंटस्, कार्यक्रमांसाठी. माझ्या दोघी भाच्या कायम डिकीतच बसायच्या मज्जा म्हणून. आईबाबा आणि मी किती फिरलो ह्य़ा गाडीतून. किती गडांच्या पायथ्याशी गेली ही गाडी, किती सुंदर मंदिरं पाहिली. मला आनंद व्हावा म्हणून दुबेजी ऐटीत ह्य़ा गाडीतून यायचे. किती चांगल्या माणसांपर्यंत पोचवलं ह्य़ा गाडीनी मला. माझ्या लग्नाची सगळी खरेदी ह्य़ाच गाडीत ठेवली होती. माझी बक्षिसं, स्क्रिप्टस्, पैसे, डाएटचे डबे, कॉस्च्युम्स् सगळं न तक्रार करता तिनी वाहवलं. प्रत्येक पुणे-मुंबई प्रवासात ती माझ्याबरोबर आली. माझ्या सगळ्या भावनांना तिनं सन्मान्य मोकळीक दिली. खासगीपणा दिला. माझ्या बाळाला हॉस्पिटलमधून पहिल्यांदा घरी ह्य़ाच गाडीनी आणलं. मी दक्षपणे तिचं सव्‍‌र्हिसिंग करून घ्यायचे आणि तिनीही कधी त्रागा/ बाऊ केला नाही. मला वेळेवर कुठेही घेऊन जाण्यासाठी ती अविरत सज्ज असायची.
तिला नव्या शोरूमसमोर मी पार्क केलं. आत जाऊन सह्य़ा, नव्या गाडीला हार, पेढे, फुलं इ. कार्यक्रम झाला. नव्या गाडीत बसून घरी निघण्यापूर्वी मी माझ्या जुन्या गाडीपाशी गेले आणि कवटाळलंच तिला. ती अर्थातच माझ्या कवेत मावण्यासारखी नव्हती. पण आवंढा गिळता येईना आणि डोळ्यातलं पाणी थांबेना. घसाच दुखायला लागला. ती तिचा आब राखत उभी होती, पण निमूटपणे. घरातलं जनावर विकताना घरधन्यांना जसं कासावीस वाटत असणार तसंच झालं मला. तिला मनात म्हटलं. तू खूप इमानानं सोबत केलीस सखे. फार दिलगीर वाटतंय तुला देऊन टाकण्याबद्दल. काही चुकलंमाकलं असेल तर पोटात घाल. माझ्या पुढच्या प्रवासाला  शक्ती दे. तुलाही पुन्हा चांगली माणसं लाभोत. तुझ्यासाठी मनात आहे फक्त आणि फक्त कृतज्ञता. आदियोस अमिका.