नवरा-बायको या दोघांना गृहमंत्री मानलं तर घरी काम करणारे बाकीचे उप-गृहमंत्री झाले ना. मंत्री आपणच निवडलेले असतात. त्यांचा मान राखणं आपलं कर्तव्य आहे.
किती धावपळीचं झालंय जगणं. धापा टाकत कामावर पोचायचं आणि तसंच धापा टाकत घरी परत यायचं! पण या दोन्हीच्या दरम्यान जेव्हा आपण काम करतो, तेव्हा सोबत आपले वरिष्ठ, कनिष्ठ, बरोबरीचे सहकारी असतात. त्यांच्याशी विनोद / गप्पा होतात. कधी आपण ऑफिसमधून लवकर निघून सिनेमा / नाटक / प्रदर्शनाला जाऊ शकतो. कधी कुणाच्या वाढदिवसासाठी सरप्राइझ लंचचा बेत ठरवला जातो. कधी अर्धी सुट्टी मिळते. एकुणात दगदग झाली तरी आपला वेळ खेळीमेळीत जातो. आपल्या घरी जी माणसं कामाला येतात त्यांच्यासाठी आपण हा विचार का करू नये? भांडी, झाडू-कटका (मुंबईच्या भाषेत.) स्वैपाकाच्या बाई, ड्रायव्हर, आजारी व्यक्तींची देखभाल करायला ठेवलेले नर्स किंवा मुलांना सांभाळणाऱ्या २४ तास आपल्या घरी राहणाऱ्या मुली. यांच्या भावविश्वाचा आपण कधीतरी विचार करतो का. किंवा त्यांनासुद्धा भावविश्व असू शकेल-असं तरी कुणाच्या मनात येतं का?
अजूनही अनेकदा- वैतागणे, डाफरणे, उपमर्द, पगार कापण्याची धमकी- थोडक्यात कटकट म्हणून आपण या गृहमदतनीसांकडे बघतो. सुट्टी मागितल्याक्षणी- अरे देवा. मागच्या महिन्यात पाय मुरगळल्याची थाप मारून घेतली होतीस की सुट्टी. असा चढा सूरू लागतो आपला. खरं तर आपल्याला म्हणजे नोकरदार लोकांना महिन्याला हक्काच्या चार सुट्टय़ा मिळतात, क्वचित पगारवाढ / बोनस आपल्या वाटय़ाला येतात. पण जिथे आपण बॉस असतो, तिथे मात्र दुसऱ्याच्या हक्कांबाबत / अडचणींबाबत संपूर्ण बेदखल राहतो. मुख्य म्हणजे खोटं बोलण्याची वेळच का येऊ द्यावी कुणावर? काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला महिन्यातून तीन-चार सुट्टय़ा मिळाल्याच पाहिजेत. आपल्याला तरी बँक हॉलिडे, बंद, राष्ट्रीय सण, दहशतवादी धोके- अशा अनेक कारणांमुळे सुट्टय़ा मिळतात- पण या उप-गृहमंत्र्यांनी मात्र जिवाची पर्वा न करता कामावर हजर असावं अशी अपेक्षा कशी करतो आपण. हॅलो, अजून कशी आली नाहीस तू. ऐवजी ‘आज वातावरण तंग दिसतंय- तू येऊ नकोस.’ असा काळजीनं फोन कधीतरी करतो का आपण?
मोलकरणींना शिळे अन्न वाढणे, कायम आपले फाटके कपडे, जुन्या साडय़ा देणे, दिवाळीला दुप्पट पगार देताना काचकूच करणे, अपमानास्पद / दुय्यम दर्जाची वागणूक देणे- हा आता गया जमाना झाला. त्याउलट काही नवे विचार स्वागतार्ह वाटतात. उदा. आपल्या घरी मदतनीस असतील तर शिळा घास इतर कुटुंबीयांनाही वाटून घेऊन, मदतनीस ताजेही अन्न घेईल हे लक्षपूर्वक पाळणे. जुने कपडे आपल्याला नको असल्यामुळे आपण दुसऱ्याला घरी न्याल का असं विचारतो. त्यात दातृत्वाची भावना नसून आपली गैरसोय दूर केल्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. आपल्या टीमला क्वचित एखादी नवी वस्तू भेट द्यावी. त्याहीपेक्षा वाढती महागाई बघता वस्तूंपेक्षा रोख रक्कम द्यावी. ड्रायव्हरना कसे ओव्हरटाइमचे जादा पैसे द्यावे लागतात, तसंच उप-गृहमंत्र्यांनासुद्धा जास्त पोळ्या केल्याबद्दल, फर्निचर हलवून स्वच्छता केल्याबद्दल दखल ठेवून चार पैसे जास्त द्यावे कधीतरी. आपण वापरून जुना झालेला शर्ट कदाचित मापाला बसणार नाही किंवा चक्क आवडला नाही. पण त्याऐवजी पन्नास शंभर रुपये दिले तर फॉर अ चेंज घरी जाताना रिक्शा करता येते.. आवडीची चप्पल घेता येते.
त्याचबरोबर या घरगुती टीमच्या तब्येतीची आपण जरा तरी काळजी घ्यायला पाहिजे. बायको, बाळ, आई-वडील, यांच्याबद्दल आपण सतर्क असतो. हॉस्पिटलच्या खर्चासाठी हात सढळ ठेवतो.. मग आपलं रोजचं जगणं सुलभ, आनंदी करणाऱ्या या बाकी जिवांचाही विचार केलाच पाहिजे. पॉलिसी इ. घेतल्यामुळे अनेकांना वैद्यकीय सुविधा अल्प दरात मिळतात. घरगुती टीमला आपण किमान औषधाचा खर्च किंवा डॉक्टरची फी तरी देऊ करावी. माणुसकी, पगारवाढ, वैद्यकीय मदत, मुलाबाळांच्या शिक्षणाची चौकशी, उपयुक्त सल्ले.. हे आपण जाणीवपूर्वक जपलं तर आजच्या काळातसुद्धा आपण एकत्र कुटुंबासारखं वातावरण टिकवू शकतो. आपल्या प्रत्येकात एक छुपं नेतृत्व असतं. फक्त संकोच! आळशीपणा यामुळे आपण त्या वृत्तीला बाहेर डोकावू देत नाही. पण घरातल्या घरात लीडर झालो तर जितकी जबाबदारी घ्यावी लागते ती आपल्या डाव्या हातच्या खेळाइतकी सोपी असते. शिवाय त्याचे फायदेही कितीतरी असतात.
कधी कधी आपण पुढाकार घेतल्यामुळे किंवा सहज भुणभुण लावल्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडतात. कुणी शिक्षण पूर्ण करतं. कुणाची वाईट संगत सुटते. कुणी जास्त पैसे कमवायला लागतं. कुणाचं लग्न ठरतं. भांडणं मिटतात. नातेवाईक, जवळचे मित्र, सहकारी यांच्या भावविश्वात आपल्याला स्थान असतं ना. तसंच ते उपगृहमंत्र्यांच्या मनातही असतं. त्याची बूज राखून आपापलं भावविश्व समृद्ध केलं. तर एखादा अंगावर येऊ पाहणारा, आपल्याला अगतिक करून सोडणारा दिवस नकळत सुसह्य़ होतो. घरी आल्यावर दार उघडणारा मदतनीस समजुतीचं हसतो, स्वैपाकात आवडीची भाजी असते, आपल्या धकाधकीच्या आयुष्यात किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
अनेकदा नुसतं पाच मिनिटं गप्पा मारल्यानी घरातल्या सहकाऱ्यांना बळ मिळणार असतं. नुसतं तंगडय़ा पसरून चहाऽऽऽ कॉफीऽऽऽ अशा ऑर्डर सोडण्याचे दिवस गेले आता. तसं करायचं असेल तर मजबूत पैसे मोजून हॉटेलमध्ये जावं लागतं आणि वर टीप देऊन चांगली वागणूक दिल्याबद्दल आभार मानावे लागतात! माइण्ड वेल.