11 December 2017

News Flash

आली माझ्या घरी

अभ्यंगस्नान. आवळेल तेल. उटणं, फटाके. फराळ. सगळ्याचा संमिश्र वास. नवे कपडे. पणत्या. आकाशकंदील. पैंजण.

सोनाली कुलकर्णी | Updated: November 16, 2012 6:50 AM

अभ्यंगस्नान. आवळेल तेल. उटणं, फटाके. फराळ. सगळ्याचा संमिश्र वास. नवे कपडे. पणत्या. आकाशकंदील. पैंजण. मित्रमैत्रिणी. नातेवाईक. भाऊबीज. घर. तोंडभर हसू. दिवाळी.
आपण मोठे होत जातो. तसे सणांचे, उत्सवांचे रंग बदलत जातात. पण मनातल्या आठवणींचे संदर्भ तस्सेच राहतात. आपण कितीही मोठे झालो तरी लहानपणीची दिवाळीच कशी आपली वाटते? आत्ता आपण जे जगतोय, त्यापेक्षा आठवणीतीले आपण अगदीच वेगळे असतो. निर्भर आणि आनंदी. आता वयानी मोठे. जबाबदीरीनी वागणारे, संसारी, करिअरिस्ट झालो असलो, तरी आपल्यातही एक छोटास्सा मी होता. तो किती अवखळ, मजेदार होता हे आठवल्यानंतर हसू फुलतंच चेहऱ्यावर. मिठाईच्या दुकानात ठेल्यावर बसलेले झुपकेदार मिश्यांचे, जरा रूक्ष वाटणारे चाचा- कधीतरी त्यांची आई करत असलेला लाडू घेऊन धूम पळाले असणार. दिवाळीचे-सीझनचे कपडे मशीनवर झर्र्र नॉनस्टॉप शिवत असलेला कुशल टेलर- लहानपणी मला नवा शर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे असा हट्ट धरून बसला असणार आपल्या बाबांकडे. आज घरोघरी नांदणाऱ्या कुटुंबवत्सल सुगरणी लहानपणी वेण्या उडवत उनाडक्या करत खिदळत फिरत असणार.
मी तर फारफार मज्जेत असायचे. मला मिळालं तसं बालपण खरंच प्रत्येकाला मिळावं. आनंदानी आणि प्रेमानी काठोकाठ भरलेलं. प्रत्येक गोष्टीचा उत्सव असायचा. फराळ, खरेदी, नातेवाईक, फटाके, किल्ला.! माझे आई-बाबा फार हौशी. कसं काय पैशाचं, खरेदीचं प्लॅनिंग जुळवून आणायचे कोण जाणे. पण तेव्हा आम्हाला कशाची फिकीर नसायची. नवीन कपडे प्रत्येकाला. किती स्पेशल वाटायचं!
काऊण्टपर्यंतही डोकं पोचायचं नाही. पण हा फ्रॉक दाखवा. तो दाखवा असं आई म्हणायची. बाबा पैसे देत असायचे तेव्हा अक्षरश: राजकन्या वगैरे असल्यासारखं वाटायचं.
मग आईबरोबर फराळाची तयारी. का कोण जाणे, पहिल्यापासून असं वाटत आलंय. की आम्ही नसतो तर आईनी कसा केला असता फराळ? कुणी मदत केली असती तिला? हा माझाच गोड गैरसमज. आई एकटीनी सगळा घाट घालायची. मी, संदेश किंवा संदीप ह्य़ांपैकी ज्यांना सुट्टी असेल. म्हणजे जे कुणी थाऱ्यावर असतील ते मदतीला उगवणार (मदत.) ह्य़ात मी आवर्जून हजर असायचे ते म्हणजे चिवडय़ाच्या फोडणीला. मला तळलेले खोबऱ्याचे तुकडे प्र.चं.ड. आवडायचे. ते गट्टम करायला मी मनीमाऊसारखी आईच्या जवळ टपून बसलेली असायचे. दादा म्हणजे संदीपचं एक विलक्षण स्वप्न होतं. आमच्याकडे एक जड, काळी, मोठ्ठी कान असलेली कढई होती. ती कढई भरून एक अशी मोठ्ठी चकली असावी असं स्वप्न. म्हणजे चकली पात्रानी कढईतच सुदर्शनचक्र काढत बसायचं गोल गोल. बहुतेक कुठल्यातरी वर्षी त्यांनी तो प्रयोग केलाही होता वाटतं. चकल्यांच्या शेवटी शेव.
चकलीपात्रातली चकलीची जाळी बदलायची आणि भोकाभोकाची शेवेची जाळी लावायची. ती कुरकुरीत शेव डब्यात निम्मीच जायची. बाकीची आम्ही करताक्षणी फस्त करायचो. पण गंमत म्हणजे आई कधीच करवादलेली आठवत नाही. अशा व्रात्य मुलांवर ती कसं प्रेम करायची कोण जाणे. आम्ही स्वैंपाघरभर नाचायचो, पळून जायचो, शंकरपाळ्या खाऊन टाकायचो. एक ना दोन!
वसुबारस फार छान साजरी व्हायची आमच्याकडे. म्हसकर-सोमण म्हणून कोपऱ्यातलं घर आहे आमच्या कॉलनीत. त्यांचे एक नातलग सूर्यास्तानंतर गाय घेऊन यायचे. काही काही वर्षी गायीबरोबर तिचं वासरूही यायचं. आई फार प्रेमानं पूजा करायची गायवासराची. त्या दिवसापासून दिवाळी सुरू. संध्याकाळी बाल्कनीच्या कट्टय़ावर थोडय़ा थोडय़ा अंतरानी पणत्या ठेवायचो आम्ही. बाबा दिवाळीच्या आधी प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेल्या आदल्या वर्षीच्या पणत्या काढायचे, मातीच्या. तेल झिरपून चिकट झालेल्या. आई त्यात नव्या वाती घालायची. बाबा आकाशकंदील लावायचे. ती वायर, बल्ब लावणे, वळवून घेणे, वर टांगणे हा एक कार्यक्रम असायचा. मग सगळं झाल्यावर ‘लाव बघू बटण’ असं बाबा म्हणाले, की तो दीप्तीमान आकाशकंदील बघताना हरखून जायला व्हायचं. धनत्रयोदशीला बाबा ब्रह्मपूजन करायचे. पूजा करताना, पोथी वाचताना आणि जेवताना ते मौनात असायचे. त्यांना उगीच त्रास द्यायला, बाबा.बाबा. म्हणून हाक मारायला इतकी मज्जा यायची. त्या दिवशी आई उडदाच्या पिठाची पुरी करायची. एरवी कधी ती उडदाची पुरी खाल्ल्याचं आठवत नाही. पण त्या दिवशी येस्स. आणि फार छान लागायची ती. आता ह्य़ातल्या किती गोष्टी करते मी? बऱ्याच कमी. आनंद हा आता जास्त करून खरेदीवरच अवलंबून असतो. जरा आधुनिक होत चाललाय आनंद. भूमिका बदलत चालल्या आहेत. आपल्या पुढच्या पिढीसाठी- म्हणून सौख्य चिंतणारी गृहिणी म्हणून नव्यानी सगळं साजरं करण्याचा उत्साह येतो आहे. स्वत:तला बदल पाहून हसूही येतंय. कारण दिवाळी झाल्यावर आता वेध लागले आहेत ते- उरलेला फराळ नीट संपवण्याचे. काल दही-भाताबरोबर चकली झाली, आज ब्रेकफास्टला उरलेला चिवडा. उद्या आणि परवा असंच बाकीचंही मार्गी लावायचं. एक गाळीव शांत प्रसन्नता भरून राहिली आहे. ती आता तुळशीच्या लग्नापर्यंत तेवत राहील.

First Published on November 16, 2012 6:50 am

Web Title: so kool come to my home