News Flash

क्षण एक पुरे! : सोशल दंतवैद्य

सामाजिक कार्यही आपल्याच बळावर उभं करायचं यासाठीचे तिचे प्रयत्नही वाखाणण्याजोगे आहेत..

(संग्रहित छायाचित्र)

वेदवती चिपळूणकर

शिक्षणावर भरपूर खर्च करून आपल्याला हव्या त्या क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतरही समाजकार्याची आस मनात बाळगून असलेली मुलं तशी फार कमी दिसतात. भरपगारी नोकरी दूर सारून किंवा स्वत:चा व्यवसाय थाटता येईल, अशी संधी असतानाही केवळ आपल्या मनातील सामाजिक कार्याची आवड पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मधुराचे विचार निश्चितच प्रेरणादायी आहेत. सामाजिक कार्यही आपल्याच बळावर उभं करायचं यासाठीचे तिचे प्रयत्नही वाखाणण्याजोगे आहेत..

खाजगी महाविद्यालयातून तिने बीडीएसचं शिक्षण घेतलं. मात्र डॉक्टर मधुरा शिरसाट हिची ध्येयं सामान्य नव्हती. डेंटिस्ट झाल्यानंतर सगळेजण करतात तशी प्रख्यात डेंटिस्टसोबत तिनेही प्रॅक्टिस केली. पण काही काळानंतर तिला त्यात विशेष रस वाटेनासा झाला आणि तिने ती प्रॅक्टिस सोडली. मधुराने कम्युनिटी सर्व्हिस करायची असा निर्णय घेतला. सरकारी दवाखान्यात पार्ट टाइम प्रॅक्टिस करून तिने इतर कामांसाठी वेळ काढायला सुरुवात केली. एका ट्रस्टशी जोडून घेतलं, स्वत:ची सोशल सर्व्हिस सुरू केली. सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरांतल्या माणसांना डेंटल अवेअरनेस असायला हवा, या ध्येयाने ती सध्या काम करते आहे.

डॉक्टर होण्यासाठी केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचे रिटर्न्‍स कसे मिळवायचे याकडे अगदी स्वाभाविकरीत्या प्रत्येक व्यक्तीचा कल असतो. मधुरानेही अगदी सुरुवातीला हा विचार केला. मात्र घरातूनच समाजकार्याची पाश्र्वभूमी असल्याने तो विचार बाजूला पडला आणि तिच्यासाठी कम्युनिटी सर्व्हिस महत्त्वाची ठरली. या निर्णयापर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाबद्दल मधुरा सांगते, ‘मी एका प्रथितयश डेंटिस्टकडे काम करत होते. मात्र एकदा मी व्यसनमुक्ती केंद्रात गेले होते. तिथे तंबाखूमुळे तोंडाचे अनेक विकार झालेली माणसं मी पाहिली. तेव्हा असं लक्षात आलं की सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा खालच्या स्तरातल्या लोकांना तोंडाचं आरोग्य याबद्दल काहीही कल्पना नाही, त्याचं महत्त्व समजत नाही. कम्युनिटी सर्व्हिस करायची हे माझं बीडीएसला जायच्या आधीपासून जवळजवळ ठरलंच होतं. एमबीबीएसला मी ठरवूनच गेले नव्हते. मात्र या एनजीओच्या भेटीमुळे माझ्या विचारांना दिशा मिळाली आणि माझा विचार अधिक पक्का झाला’. मधुराने ती नोकरी सोडायचं ठरवलं आणि तिने सरकारी क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करून उरलेला वेळ सर्व्हिससाठी वापरायचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाला माझ्या घरच्यांनी अगदी मनापासून पाठिंबा दिला. त्यामुळे मी तो निर्णय लगेचच अमलात आणला, असं मधुरा म्हणते.

डेंटिस्ट म्हणजे लोकांकडून व्यवस्थित पैसे घेऊनच काम करणारा डॉक्टर असा साधारण समज आहे. त्यामुळे साहजिकच मधुराला अनेक ओळखीपाळखीच्या लोकांकडून अनेक प्रश्न वेळोवेळी विचारले गेले, अजूनही विचारले जातात. अशा अनुभवांबद्दल मधुरा म्हणते, ‘मी डॉक्टर झाल्यापासून मला अनेकांनी विचारलं की मी माझं स्वत:चं क्लिनिक कधी सुरू करणार? प्रत्येक वेळी प्रत्येकाला समजावून सांगताना काही जणांना माझं अप्रूप वाटलं, काही जणांना कौतुक तर काहींना चक्क वेडेपणाच वाटला! खाजगी कॉलेजमधून बीडीएस केल्यावर लोकांच्या अपेक्षेप्रमाणे मी एक तर दुसऱ्याच्या क्लिनिकमध्ये काम करून किंवा स्वत:चं क्लिनिक सुरू करून खोऱ्याने पैसा ओढला पाहिजे होता. लग्न ठरल्यावरसुद्धा अनेकांनी मला सांगितलं की लग्न झाल्यावर मी जिथे काम करतेय तिथे ते करत राहता येणार नाही’. लग्न झाल्यावर तरी क्लिनिक काढणार का?, असा प्रश्नही तिला अनेकांनी विचारला. मात्र याबाबतीत तिच्या होणाऱ्या सासरकडची मंडळीही सगळी कम्युनिटी सर्व्हिसची आवड असणारीच मिळाली. त्यामुळे माझ्या सासरचा आणि नवऱ्याचा या कामात मला पूर्ण पाठिंबा आहे. त्यांची मला मदतही खूप आहे, असे तिने सांगितले.

मधुराला स्वत:च्या विचारांनी आणि स्वत:च्या तत्त्वांनीच काम करायची इच्छा असल्यामुळे आतापर्यंत कोणत्याही एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्था यांच्याशी स्वत:च्या प्रोजेक्टबद्दल तिने जोडून घेतलेलं नाही. त्याबद्दल ती सांगते, ‘माझ्या प्रोजेक्टला, स्वप्नांना आणि ध्येयाला आर्थिक बळाची गरज आहे हे जरी खरं असलं तरी कामाच्या बाबतीत तडजोड न करता हे होणं गरजेचं आहे. एकटय़ा व्यक्तीला सोशल सर्व्हिस करण्यासाठी आर्थिक मदत मिळण्याची सोय नाही. त्यामुळे त्याचा ट्रस्ट करून किंवा एखाद्या संस्थेच्या सोबतीनेच माझा प्रोजेक्ट पुढे न्यावा लागेल. मात्र गरजूंना निम्न शुल्कात इलाज आणि दंत आरोग्याबद्दल जागृती करणं हा उद्देश साध्य होणं हे माझं पहिलं ध्येय आहे. त्यामुळे याच्याआड येणाऱ्या कोणत्याही बंधनात मला माझा प्रोजेक्ट अडकू द्यायचा नाही’, हे तिने स्पष्ट केलं. त्यामुळे अजूनपर्यंत कोणत्या संस्थेशी तिचा टाय-अप वगैरे होऊ  शकलेला नाही. ‘थोडी धडपड करावी लागेल, नकार पचवावे लागतील, पण माझ्या टम्र्सवरच काम करायचा माझा निश्चय पक्का आहे. माझी पहिल्यापासून हेच करायची इच्छा होती. त्यामुळे आज ना उद्या, कुठून तरी त्याला काहीतरी भक्कम आधार नक्की मिळेल’, असा विश्वासही मधुरा व्यक्त करते.

मधुराने स्वत:च्या प्रोजेक्टच्या आर्थिक मदतीसाठी काहीसा युनिक मार्ग शोधून काढला आहे. स्वत:च्या बळावरच आता प्रोजेक्ट उभा करावा लागणार आहे असं समजून तिने हातपाय मारायला सुरुवात केली आहे. स्वत:च्या प्रयत्नांबद्दल तिला जास्त बोलायला आवडत नाही. तरीही ती म्हणते, ‘मला पेंटिंग, स्केचिंग अशा गोष्टींची आवड आहे, मी कॅलिग्राफीही शिकले आहे. विरंगुळा म्हणून मी सहज काही पेंटिंग्ज केली आणि तेव्हा माझ्या काही मित्रमैत्रिणींनी माझ्याकडून ती विकत घेतली. त्यावरून मला ही कल्पना सुचली की आपल्या हातात थोडीफार कला आहे, त्याचा उपयोग आपल्याच कामांसाठी करून घेता येईल’. या गणेशोत्सवादरम्यान मधुराने गणपतीच्या शेल्यांवर कॅलिग्राफी केली होती, ते फोटो इन्स्टाग्रामवर टाकले होते आणि त्यासाठी तिला भरपूर ऑर्डर्स मिळाल्या. या सगळ्यातून काही फार मोठी रक्कम उभी राहील असं नाही, याची जाणीव तिला आहे. मात्र मी जिथे जिथे सर्व्हिस द्यायला जाते तिथे इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रचंड अभाव असतो. त्यामुळे माझी स्वत:ची पोर्टेबल चेअर जरी मला यातून घेता आली तरी मला ट्रीटमेंटसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे. बाकीच्या आर्थिक सपोर्टसाठी माझे प्रयत्न चालू राहतील, पण माझ्याच कलेतून जे होऊ  शकेल ते करण्याचा मी प्रयत्न करतेय, असे ती ठामपणे सांगते.

मधुरा आता नवरात्रीसाठी हॅन्ड पेंटेड कुर्तेही करते आहे. तिच्या धडपडीतून ती उभ्या करत असलेल्या तिच्या प्रोजेक्टमुळे आरोग्य क्षेत्रात नक्कीच मोलाची भर पडेल.

‘पेंट युअर ओन कॅनव्हास! कधीही कोणीही आपल्यासाठी उगीच काही करत नाही. दुसरं कोणी आपल्यासाठी धडपड करेल, आपल्याला मदत करेल आणि मग आपण आपलं काम करू या कल्पनेत राहून आपलं काम कधीच पूर्ण होत नाही. आपलं स्वप्न हे आपलं स्वत:चं असतं आणि त्याच्यासाठी जे गरजेचं असेल ते सगळं आपल्यालाच करावं लागतं. त्यामुळे तुमच्या चित्रात कोणी दुसरं येऊन रंग भरेल अशा भ्रमात न राहता आपल्याला आवडतील, पटतील, जमतील आणि कॅनव्हासला गरजेचे असतील ते रंग आपल्याला आपल्याच धडपडीने भरायचे आहेत.’ – डॉ. मधुरा शिरसाट

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 12:09 am

Web Title: social dentist madhura shirsat community service abn 97
Next Stories
1 टेकजागर : किशोरवयीनांचे ‘सोशल’प्रेम
2 फिट-नट : अमित भानुशाली
3 जगाच्या पाटीवर : बांधणी स्वप्नांच्यामनोऱ्याची
Just Now!
X