social-logoसोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
कोण आहे तिकडे?
‘तू कुठे राहतोस किंवा राहतेस?’ या साध्या प्रश्नाच्या पृथ्वीवर असल्या तऱ्हेवाईक पण तेव्हा खऱ्या असणाऱ्या उत्तराला अनेक जण लहानपणी सामोरे गेले असतील. पृथ्वीचा उल्लेख करून मग क्रमाक्रमानं आपल्या घराच्या क्रमांकापर्यंत येण्याच्या या उत्तराला छेद गेलाय तो एका नवीन संशोधनानं. ग्रहांचा शोध घेणाऱ्या केप्लर दुर्बिणीनं पृथ्वीशी अत्यंत साधम्र्य असलेल्या पृथ्वी २.० या नव्या ग्रहाचा शोध घेतल्याचा दावा अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्था अर्थात नासानं केलाय. केप्लर-४५२ बी असं या नव्या ग्रहाचं नामकरण करण्यात आलंय. या माहितीच्या अनुषंगानं सोशल मीडियावर #अर्थ, #नासा हे हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये होते, तर याच संदर्भातले फोटोही आवर्जून शेअर केले जात होते.

चेतनचं नवीन पुस्तक
आतापर्यंत नाना कल्पनांचे किल्ले लढवत बेस्ट सेलर पुस्तकं लिहिणाऱ्या चेतन भगतचं नवीन पुस्तक येतंय. त्याच्या या नॉन फिक्शन पुस्तकाचं नाव आहे ‘व्हॉट यंग इंडिया वॉण्ट’. देशापुढच्या समस्या नि त्यांची उत्तरं आपणही कशी शोधू शकतो, असा काहीसा बाज या पुस्तकाचा असून त्या संदर्भातला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलाय.

दो सच का साथ
सत्यमेव जयते असं ब्रीद सांगायला, बोलायला, लिहायला मोठं छान वाटत असलं तरी, ते नेहमीच खऱ्या गोष्टी किंवा आपली चूक मान्य केली जातेच, असं नाही. हाच मुद्दा पकडून #दो सच का साथ – ‘गिव्ह ट्रथ चान्स’ हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डिंगमध्ये होता. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या प्रसंगाचं सादरीकरण या व्हिडीओत केलं गेलंय नि ‘किनले’ची ही जाहिरात असली तरी सत्याची कास सोडू नका, हाच यातला खरा संदेश अनेकांना भावलाय, हेही तितकंच खरं आहे.

‘बंगिस्ताना’त ‘मौला’
रितेश देशमुखच्या ‘बंगिस्तान’ या आगामी चित्रपटातलं ‘मौला’ हे गाणं सोशल मीडियावर गाजतंय. राम संपथ यांचं संगीत, पुनीत क्रिश्ना यांचं शब्द आणि रितूराज मोहंती व राम संपथ यांच्या सुरांचा साज या गाण्याला मिळालाय.

पैचान कौन?
आपल्या आवडत्या नट-नटय़ांबद्दलचे सगळे अपडेट्स त्यांच्या फॅनफॉलोअर्सना असतात. त्यामुळं असेल कदाचित पण आपल्या आवडत्या व्यक्तीला चारचौघांमधून शोधणं सोप्पं असतं. हेच ओळखून व्हॉट्स अ‍ॅपवर सध्या या हिरॉईन्स ओळखा असा एक फोटो फिरतोय.

 लग्नाला यायचं..
‘लग्न मुंबईत होणारेय की पुण्यात होणारेय’, यावर अद्याप घमासान चर्चा चालू असताना नोव्हेंबरमधल्या ‘आमच्या लग्नाला यायचं हं’, असं आमंत्रण खुद्द भावी वधू-वरांनी दिलंय. ‘मुंबई-पुणे’ या उल्लेखावरूनच चाणाक्ष प्रेक्षक-वाचकांनी ओळखलं असेलच की हा आहे ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटाचा ट्रेलर. मुक्ता बर्वे नि स्वप्निल जोशीची भूमिका असणारा ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्याच्याच पुढच्या भागाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यालाही चांगला प्रतिसाद मिळालाय. प्रेक्षकांना नेहमीच काही वेगळं द्यायचा प्रयत्न करणाऱ्या सतीश राजवाडेचे दिग्दर्शन नि मुक्ता-स्वप्निलच्या अभिनयाची जुगलबंदी याविषयी अनेकांची उत्सुकता ताणली गेलेय.

‘आयर्न मॅन’ मिलिंद
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणनं जगातील एकदिवसीय खेळांपैकी सर्वात कठीण समजली जाणारी ‘द आयर्न मॅन ट्रायथलॉन’ शर्यत यशस्वीरीत्या पूर्ण केलेय. पोहणं, सायकल चालवणं नि धावणं या तीन टप्प्यांत पार करावी लागणारी सव्वा दोनशेहून अधिक किलोमीटर लांबीची ही शर्यत मिलिंदनं पन्नाशीत १५ तास १९ मिनिटांत पूर्ण करण्याचा विक्रम केलाय. ही शर्यत १७ तासांत पूर्ण करण्याचं लक्ष्य स्पर्धकांपुढं असतं. फिटनेसफेम मिलिंदसाठी ‘आयर्न मॅन’ शर्यत जिंकण्याचं मोठंच आव्हान होते, ते त्यानं आत्मविश्वास, मेहनत नि चिकाटीच्या जोरावर पार केलं. त्याचं अभिनंदन करणारे फोटो व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल होत होते.

बाहुबली गिनीज बुकात
विविध कारणांमुळं चर्चेत असणाऱ्या बाहुबलीच्या भव्य पोस्टरची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नं घेतलेय. एकावन्न हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या आकाराचं हे पोस्टरही असंख्यांच्या कुतूहल नि चर्चेचा विषय ठरलेय. या पूर्वीच्या पोस्टरचा विक्रम होता पन्नास हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा. या विक्रमामुळं #गिनीज नि #बाहुबली पोस्टर हे हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये होते.

विराट-अनुष्का
व्होग ब्युटी अवॉर्ड्सच्या समारंभात प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहली नि अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघं पहिल्यांदाच जाहीररीत्या कपल म्हणून समोर आले. त्यांच्या नात्याबद्दल आतापर्यंत होणारी चर्चा, त्यांचे फोटो, त्यांच्यावरचे जोक्स सोशल मीडियात गाजले होतेच. आता या घटनेमुळं ‘विराट कोहली’ हा ट्रेण्ड फेसबुकवर होता.

‘अहल्या’ व्हायरल
सुजॉय घोषच्या ‘अहल्या’ या शॉर्ट फिल्मचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या १४ मिनिटांच्या व्हिडीओत सौमित्र चॅटर्जी, टोटा रॉय चौधरी नि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्याची ‘बेसिक स्टोरीलाइन’ काय आहे, हे प्रत्यक्ष पाहून ठरवा..

‘आर्ची’चा कर्ता गेला..
‘आर्चीज अँड्रय़ुज’ या साध्यासुध्या बोलक्या पात्राभोवतालचं जग जिवंत करणारे ‘आर्ची’ कॉमिक्सचे कार्टुनिस्ट टॉम मूर यांचं निधन झालं. काल्पनिक शहरातल्या युवकांच्या मानसिकतेचा वेध घेत त्यांनी असंख्यांचं बालपण समृद्ध केलं. त्यांनी आर्चीला अमेरिकेतील टिपिकल टीनएजर म्हणून सादर केला असला तरी तो केवळ अमेरिकेपुरता कधीच मर्यादित राहिला नाही. त्यांच्या कॉमिक्सचा आणि त्यानंतर त्यावर आलेल्या टीव्हीवर आलेल्या कॉमिकपटांचा आनंद आर्चीच्या जगभरच्या चाहत्यांनी घेतला. मूर यांच्या निधनाच्या बातमीची सोशल मीडियावरील तरुणाईनं आवर्जून दखल घेत त्यांना मन:पूर्वक श्रद्धांजली वाहिली.

‘सलमानी’ ट्विट
मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेननच्या फाशीवरून गेले काही दिवस सोशल मिडियावर चर्चा चालू होतीच, त्यातच याकूबच्या फाशीबद्दल सलमान खाननं वादग्रस्त ट्विट केलं नि त्यावर नेटकरांनी टीकास्त्र सोडलं. या प्रकरणाच्या ट्विटस् नि पोस्टमध्ये ‘आता सलमान म्हणेल की, ट्विटर हँडलर ड्रायव्हरकडं होता’ इथपासून ते ‘खरंतर मी बजरंगी भाईजान पाहायचं ठरवलं होतं, पण आता तो मुळीच पाहाणार नाही,’ इथपर्यंतची मतं व्यक्त केली गेली. त्याच्या या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा होऊ लागल्यावर माफी मागत सलमान खाननं वादग्रस्त ट्विटस् मागं घेतले.
viva.loksatta@gmail.com