viv21सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
बचपन की यादें..
प्रत्येकाच्या मनात असतं एक लहान मूल दडलेलं.. कधी तरी ते मध्येच डोकावू पाहतं नि मग ¦F #90s bachche remember हा हॅशटॅग अव्वल स्थान पटकावतो. नव्वदच्या दशकातल्या लहानपणीच्या आठवणी सांगायची टूम ट्विटरवर चांगलीच गाजली. मग ‘पॉपिन्स’, ‘किसमी टॉफिज’पासून ते ‘डक टेल्स’ कार्टून मालिकेपासून ते व्हिडीओ कॅसेट भाडय़ानं आणून चित्रपट पाहत होतो, इथपर्यंत अनेक आठवणींचा खजिना ट्वीट्सच्या माध्यमातून खुला झाला नि आठवणीत रमायला अनेकांना आवडतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

मॅगी की याद सताए..
दीर्घकाळ मॅगी विरह सहन करणाऱ्यांना एक ‘नुडलदिलासा’ मिळाला तो मॅगीच्या लेटेस्ट व्हिडीओ कॅम्पेननं. ‘यूटय़ूब’वर अपलोड करण्यात आलेल्या या ‘वुई मिस यू टू’ व्हिडीओला मॅगीप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. शिवाय ट्विटरवर #मॅगी हा हॅशटॅग ट्रेिण्डगमध्ये होता. तरुणाईसह अनेक मॅगीप्रेमींनी मॅगीच्या आठवणी शेअर करत इतर नूडल्सना नाकं मुरडली. तर काहींनी चक्कनूडल्स जगतातली आíथक गणितंही मांडून दाखवली. एकुणात काय, काहीही असलं तरीही मॅगी की टेस्ट बेस्ट हे नेटकरांचं म्हणणं होतं..

‘शंकर’तान
‘सूर निरागस हो’ या गाण्यातील ‘शंकर सूरां’नी अनेक नेटकरांवर सध्या गारूड केलंय. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या सुरांच्या मोहिनीनं बिग बी अमिताभ बच्चन यांनाही भुरळ घातलेय. हे गाणं नि शंकर महादेवन यांचं कौतुक करणारं ट्वीट करत त्याचा व्हिडीओही बिग बींनी शेअर केलाय. सुबोध भावे दिग्दíशत ‘कटय़ार काळजात घुसली’ या आगामी चित्रपटातील हे गाणं आहे. त्यातील हे गाणं शंकर महादेवन यांनी गायलं असून ते त्यांच्यावरच चित्रित करण्यात आलंय.

लालबागचा राजा
viv07‘यंदा लालबागच्या राजाचा शाही थाट शीशमहालात. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी एक आगळावेगळा शीशमहाल प्रत्यक्षात साकारलाय. तब्बल २१ लाख बेल्जियम काचांच्या तुकडय़ांपासून शीशमहालाची भव्यदिव्यता उदयपूर आणि मुंबईच्या ८० कलाकारांनी साकारली. कर्जतच्या एनडी स्टुडिओत हा शीशमहाल उभारल्यानंतर आता तो लालबागच्या राजाच्या मंडपात जोडला जातोय.’ अशा आशयाचा मेसेज फोटोसह व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतोय.

‘तोळा तोळा’
‘तोळा तोळा’ या ‘तू ही रे’मधील गाण्याचं अनप्लग्ड व्हर्जनही रिलीज करण्यात आलंय. ते सोशल मीडियावर गाजतंय. सई ताम्हणकर नि तेजस्विनी पंडित या अभिनेत्रींनी गायलेल्या या गाण्याचा झकास व्हिडीओ शेअर होतोय. संजय जाधव यांच्या ‘तू ही रे’ची इतर गाणी सुपरहिट ठरल्येत.

‘गुगल’चा लोगो बदल
सर्च इंजिन म्हणजे ‘गुगल’ असा जणू समानार्थी शब्द व्हावा इतका विस्तार पावलेल्या गुगलनं त्यांचा नवा लोगो लॉन्च केला नि तो ट्रेिण्डगचा टॉपिकही ठरला. या लोगोच्या बदलासाठी अ‍ॅनिमेशनची मदत घेण्यात आल्येय. सुरुवातीचा नवा लोगो पुसून नवीन लोगो लिहिला जातो. १९९९ नंतर ‘गुगल’नं पहिल्यांदाच लोगमध्ये बदल केलाय. त्यामुळं या साऱ्या बदलांची चर्चा नेटकरांमध्ये रंगली होती.

इंद्राणी उवाच
‘हे कथानक काल्पनिक असून त्याचं वास्तव जीवनातील व्यक्तींशी साधम्र्य आढळल्यास योगायोग समजावा,’ असं मालिका, चित्रपटांच्या सुरुवातीस एक निवेदन येतं. हे निवेदनही फिक्कं पडून समोर आलेल्या कथानकावर उद्या एखादी मालिका अथवा चित्रपट निघाला तर त्याचं नवल वाटणार नाही.. अशा आजिबोगरीब हकिगती शीना बोरा हत्या प्रकरणात बाहेर येताहेत. शीनाची आई इंद्राणी मुखर्जी, तिचे तीन नवरे, मुलं-बाळं नि संपत्ती यांचे धागेदोरे उकलले जात असतानाच सोशल मीडियात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळं या कोडय़ाची उकल होता होता त्यावरचे जोक्स-कमेंट नेटकरांनी पास केले. या नातेसंबंधातले घोळ लक्षात यावेत म्हणून त्यांची फॅमिली ट्री तयार केली गेली. शिवाय ‘काल रेल्वे स्टेशनवर चौकशी करताना इंद्रायणीचं बुकिंग विचारलं तर दहा तोंडं माझ्याकडं बघू लागली’ इथपासून ते ‘मिस्ट्री सॉल्व्हड.. बाहुबली भी इंद्राणी मुखर्जी का पूर्व पती था। और इंद्राणी के कहने पर ही कटप्पाने बाहुबली की हत्या की थी..’ असे मेसेजेस फॉरवर्ड होताहेत. प्रसंगी ‘यूपीएसपी’त किंवा मग ‘केबीसी’त प्रश्न विचारला जाऊ शकतो की, ‘इंद्राणी के इन पतियों को पहले से बाद के क्रम में लगाएँ।’

शुभेच्छांचा वर्षांव
शिक्षक दिन आणि कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षांव झाला नि हे टॉपिक्स ट्रेण्डिंगमध्ये होते. शिक्षकांप्रतिचा आदरभाव व्यक्त करणारे ‘माझे पहिले गुरू आई-वडील, मला शिक्षण देणारे माझे सर्व अध्यापक, मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे माझे हितचिंतक-मित्र आणि माझे आध्यात्मिक सद्गुरू यांना विनम्र अभिवादन! मातृदेवो भव! पितृदेवो भव! गुरुदेवो भव!’ या मेसेजपासून ‘घरी म्हणायचे – शाळेत हेच शिकवतात का? आणि शाळेत म्हणायचे – घरच्यांनी हेच शिकवलं का? तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!’ असे थोडेसे खटय़ाळ मेसेजेसही फॉरवर्ड झाले.
कृष्णजन्मानिमित्तानं बाळकृष्णापासून ते गीता सांगणाऱ्या श्रीकृष्णापर्यंतचे फोटो नेटवर झळकले. सोबतच शेअर केले गेले दहीहंडी फोडतानाचे फोटो. नऊवारी नेसून दहीहंडी फोडणाऱ्या गोपिकांपासून बच्चेकंपनीचे फोटो अधिकांश होते. शिवाय मराठी मनोवृत्तीवर भाष्य करणारा ‘दहीहंडी हा एकच असा उत्सव आहे की, ज्यामध्ये मराठी माणूस आपल्याच माणसाचे पाय खेचत नाही, तर त्याला वर जाण्यास मदत करतो!’ हा मेसेजही फॉरवर्ड होत होता.

कांद्याचा वांदा
viv08अजूनही कांद्याच्या चढय़ा भावावर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेजेस फॉरवर्ड होताहेत. त्यात त्याच्या किमतीवरचे एक सो एक शेरे वाचण्याजोगे नि प्रसंगी बघण्यासारखेही आहेत. या भाववाढीमुळं ‘कांदा हेअरकट’पासून ते ‘कांद्याच्या अंगठी’पर्यंत नेटकरांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळतोय. शिवाय ‘बेटा – पापा, ये जैन लोग इतने अमीर कैसे होते है. पापा- वो प्याज नहीं खाते बेटे..’ किंवा ‘कांदा-भज्यांच्या फोटोवर कमेंट केलेय की, एक एफडी मोडावी लागली..’ किंवा ‘ब्रेकिंग न्यूज.. अ‍ॅडमिनला दादर मार्केटमध्ये कांदे चोरताना अटक.’ असे अनेक मेसेज फिरताहेत.

क्यूट गाय अ‍ॅलर्ट
हा आहे आवडण्याच्या प्रांतातला अ‍ॅलर्ट. दिल्लीत एका मुलीनं तिथल्या एमजी रोडवर एका मुलाला पाहिलं नि तो तिला आवडला. त्याचा फोटो तिनंFa #cuteguyalert या हॅशटॅगनं ट्वीट केला. त्याची नि माझी भेट घडवा, असं या मुलीचं म्हणणं आहे. हा टॉपिक ट्रेण्डिंगमध्ये आहे. काहींनी तिला धीर दिलाय. तर काहींनी आपल्याला आवडलेल्या हिरो-मुलांचे फोटोज् शेअर केलेत. काही मुलग्यांनी मात्र याला आक्षेप घेतलाय. हे असं मुलींनी केलेलं चालतंय, पण मुलांनी केलं असतं तर, असा थेट सवालच त्यांनी केलाय. पण ही पोस्ट दिवसभर नेटकरांमध्ये चघळली जात होती हे नक्की.

फॉरवर्डेड
‘औरंगजेब मार्ग’ को बदलकर ‘कलाम मार्ग’ कर दिया गया है! बहोत अच्छा किया।
पर मुझे कोई ये तो बतायें की कलाम के मार्ग पर चलेगा कौन?

कट्टप्पाची मुले –
मोठा मुलगा – एक टप्पा
दुसरा मुलगा – दोन टप्पा
तिसरा मुलगा – तीन टप्पा
आणि मुलीचे नाव..
सरपटी ……….!

राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com