गेल्या आठवडय़ात दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओने सोशल मीडियावर चर्चाचे काहूर उठवले. तरुणांनी या व्हिडीयोबद्दल विविध प्रकारची मतं नोंदवली; पण ही चर्चा होत असतानाच, ‘पिकू’चा ट्रेलरही प्रदर्शित झाला आणि दीपिकाच्या ‘करेक्ट टायमिंग’चं कौतुक कुजबुजीच्या स्वरात होऊ लागलं. एव्हाना सोशल मीडिया हे तरुणाईपर्यंत पोहोचण्याचे प्रभावी साधन आहे याची उपरती बॉलीवूडवाल्यांना झाली आहेच. कमी खर्चीक व्हिडीयो बनवून जाहिरात मोहिमेएवढी प्रसिद्धी होऊ शकते हे आता यूटय़ूब आणि फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडिया वेबसाइट्सने दाखवून दिले. त्यातही यावर एखाद्या सामाजिक विषयावर बोललो, तर सर्वाचंच लक्ष लगेच वेधलं जातं, हे लक्षात आल्यावर बॉलीवूडची तरुण पिढी या माध्यमाकडे वळू लागली.
अर्थात अशा प्रकारचा एखादा सामाजिक संदेश देणाऱ्या व्हिडीओमध्ये काम करणारी दीपिका एकटी किंवा पहिली नाही. याआधी कल्की कोएच्लिन, इम्रान खान, आलिया भट अशा विविध बॉलीवूड सेलेब्रिटीज्नी सामाजिक प्रश्नांवर आधारित व्हिडीओज् मध्ये काम केले आहे; पण हे सर्व व्हिडीओज् पाहिल्यानंतर ‘यापुढे काय?’ हा प्रश्न मात्र कायम राहतो. आतापर्यंत सेलेब्रिटीज्ना हाताशी घेऊन तयार केलेल्या कोणत्याही व्हिडीओमधून चर्चाच्या पलीकडे निश्चित कृती नसल्याने व्हिडीओज् केवळ ‘चर्चाचे गुऱ्हाळ’ बनून राहिले आहेत.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बॉलीवूड सेलेब्रिटीज् या वाहिन्यांसोबत व्हिडीओज् तयार करत आहेत. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच सामाजिक विषयांवर मते मांडण्यासाठी बॉलीवूडची तरुण पिढी या माध्यमाचा उपयोग करते; पण केवळ व्हिडीओ बनविणे यापलीकडे बॉलीवूडकरांना या माध्यमाचा पुरेपूर वापर करून घेता आला नाही किंवा ते इच्छितही नाहीत, हेच आतापर्यंत दिसून आलंय. ‘केवळ प्रसिद्धी’ इतकाच या व्हिडीओज्चा उद्देश दिसून आला. दीपिकाचा व्हिडीओ एका नामवंत फॅशन मॅगझीनच्या ‘एम्पॉवरमेंट’ या मोहिमेंतर्गत तयार करण्यात आला आहे. यापूर्वीही या मासिकाने याच मोहिमेंतर्गत आलियासोबत तरुणींच्या सुरक्षिततेबाबत आणि माधुरी दीक्षितसोबत लहान वयात मुलांच्या भावना दाबून ठेवू नका, असा संदेश देणारे व्हिडीओज् बनविले होते. या मोहिमेचा पुढचा भाग म्हणून मासिकाने नामवंत डिझायनर्सचे कपडे, अ‍ॅक्सेसरीज विक्रीस आणले असून त्यातून जमा झालेला पैसा महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थांना देण्यात येतो; पण हे त्यांच्या कोणत्याही व्हिडीओज्तून समोर आले नाही. त्यांनी विक्रीस काढलेल्या गोष्टींपैकी केवळ २-३ गोष्टींची किंमत ५०० ते ३,००० रुपयांच्या घरात आहे. इतर गोष्टी २०,००० ते १ लाख किमतीच्या आहेत.
भारतीय क्रिकेटर्सपैकी विराट कोहली, सुरेश रैना, रवी शास्त्रींनी मिळून ‘माय चॉइस एशिया’ संस्थेसाठी अशाच प्रकारच्या तयार केलेल्या व्हिडीओच्या शेवटी गरजू महिलांना संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले होते. ‘क्रिएटिव्ह सव्‍‌र्हिस सपोर्ट ग्रुप’नी ‘स्टिल आय राइझ’ हा दिया मिर्झा, शबाना आझमी, कोंकणा सेन शर्मा अशा अभिनेत्रींना एकत्र घेऊन केलेल्या व्हिडीओनंतरची प्रत्यक्ष कृती स्पष्ट नाही. या सामाजिक संस्था ज्या स्त्रियांसाठी काम करतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडीओ इंग्रजीत असल्याने भाषेच्या अडसरीमुळे पोहोचत नाही. त्यामुळे एका विशिष्ट वर्गापर्यंतच हे व्हिडीयोज् अडकून राहतात. कल्कीचा ‘इट्स युअर फॉल्ट’, रजत कपूरचा ‘आय अ‍ॅम नॉट अ वुमन’ या व्हिडीओज्चीपण हीच गत आहे.  खरं तर आपल्या मतांनी चाहत्यांना प्रभावित करून त्यांच्याकडून चांगले काम करून घेण्याची ताकद बॉलीवूड सेलेब्रिटीज्कडे आहे. त्यामुळे केवळ पोकळ चर्चासत्र इतकंच या व्हिडीओज्चं स्वरूप न ठेवता त्यापुढे जाण्याची गरज आता बॉलीवूडला आहे.
मृणाल भगत – viva.loksatta@gmail.com