vv14सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
ट्रेन धडकने दो..
चर्चगेट स्टेशनवर बफर-एण्डला लोकलनं धडक दिली, या बातमीनं अनेकांचा रविवार पार व्यापून टाकला होता. #चर्चगेट हा हॅशटॅग टॉप ट्रेण्डमध्ये होता. चूक कुणाची या मूळ मुद्दापासून ते एकुणातली भारतीय रेल्वे या मुद्दय़ापर्यंत नेटकरांनी आपापले मुद्दे हिरिरीनं मांडले. या अपघाताच्या फोटोजपासून ते व्हिडीओपर्यंतचं शेअिरग सोशल मीडियावर व्हायरल झालं. एवढं सगळं होताना नेटकरांनी त्यावर तिरकस कॉमेंट न केली, तरच नवल. त्यामुळं मग ‘हमेशा अनाउन्समेंटही सुनी थी.. आज पहली बार ट्रेन प्लॅटफॉर्म पे आयी हैं’ किंवा ‘आता ही अफवा कुणी पसरवली की, ती ट्रेन सलमान खान चालवत होता.’ असे जोक्स व्हायरल होताहेत.
सेल्फी विथ डॉटर
या वेळच्या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतर अनेक मुद्दे मांडतानाच चक्क सेल्फीचं आवाहन केलं. आपल्या मुलींबरोबर सेल्फी काढून ते  #SelfieWithDaughter   हा हॅशटॅग वापरून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या स्लोगनसहित ट्वीट करण्याचं आवाहन केलं. हरयाणातील जिंद जिल्हय़ामध्ये बीबीपूर ग्रामपंचायतीनं ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. स्त्रीभ्रूण हत्या आणि मुलींबद्दल समाजात सकारात्मकता निर्माण करण्याच्या दृष्टीनं आयोजलेल्या या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी हा उपक्रम राबवणाऱ्यांची स्तुती केली. ‘यातील काही उत्तम स्लोगन असलेले सेल्फी मी रीट्वीट करेन’, असंही पंतप्रधानांनी देशवासीयांना सांगितलं. या आवाहनाला अनेक नेटकरांनी लगोलग प्रतिसाद देत आपल्या लाडकीसोबतचे सेल्फीज शेअर केले. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून सर्वसामान्यांपर्यंत समावेश होता. तर काहींनी या आवाहनाच्या संदर्भात थोडी चर्चा करणं पसंत केलं. ‘मी माझ्या मुलीसोबतचा सेल्फी शेअर करीन, पण तो कुणाच्या सांगण्यावरून नव्हे. असा फोटो शेअर करून मुली वाचतील का?’, असा सवाल विचारला गेला. तर अभिनेत्री श्रुती सेठनं ट्वीट केलंय की, ‘डिअर पीएम, लेकींकडं दुर्लक्ष करणाऱ्यांच्या फोनला सेल्फी कॅमेरा नसतो.’ जस्ट सेल्फी शेअर करायची की, आपल्या बेटीसोबत भोवतालच्या होतकरू बेटींना सपोर्ट करून शिकायला मदत करायची, हे जरूर तुमच्या बेटीशी डिस्कस कराच.
ट्विटरबाजी
काही वेळा ट्विटरवर काही वेगळ्या बाजाचे ट्रेण्ड्स टॉपला असतात. आता खरं तर शाळा सुरू होऊन महिना होतोय, पण #स्वीट स्कूल मेमरीज हा ट्रेण्ड फॉलो केला गेला. मग नेटकर शाळेतल्या फुलपाखरी दिवसांचं वर्णन करण्यात जराही मागं पडले नाहीत. हस्तलिखितं, वहीचं शेवटचं पान, मागचा बाक, खडूचे तुकडे, आवडते-नावडते शिक्षक, बेंच डिव्हाइड करणं, कट्टीबट्टी, विज्ञानस्पर्धा, स्पोर्ट्स डे, धमाल-मस्ती नि शिक्षा अशा अनेक रंगी आठवणींसह काहींनी आपले शाळकरी फोटोही शेअर केले. दुसरा ट्रेण्ड ‘#मिसटेक्स इंडियन्स मेक’मध्ये भारतातली शिक्षणव्यवस्था, जाती-धर्मव्यवस्था, मीडियावरचा आंधळा विश्वास, क्रिकेटर्सना देव मानणं, प्रशासनचा ढिसाळ कारभार आदी मुद्दे चर्चेत होते. तर ‘#मोस्ट हिअरिंग लाइज’मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट, ऑन द वे, आय अ‍ॅम सो हॅप्पी, आय अ‍ॅम फाइन आदी वादे किंवा विधानांचा समावेश होतो. या ट्रेण्डमध्ये अनेक ट्वीट्स दाक्षिणात्य भाषेतही केल्या गेल्या होत्या.
सतरंगी रे..
‘‘एलजीबीटी’ (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर) प्राइड मंथ’च्या निमित्तानं फेसबुकवर इंद्रधनुष्य विराजमान झालंय. इंद्रधनुष्यातले सात रंग हे समलैंगिकतेचं प्रतीक मानले जातात. अमेरिकेतील सर्व स्टेट्समध्ये समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयाचं व्हाइट हाऊसपासून अनेकांनी स्वागत केलंय. व्हाइट हाऊसचा दर्शनी भाग इंद्रधनुष्याच्या सप्तरंगांनी न्हाऊन निघाला. विकास आणि समानतेसाठी आमची बांधीलकी दर्शवण्यासाठी व्हाइट हाऊस सप्तरंगात उजळून टाकल्याचं व्हाइट हाऊसतर्फे सांगण्यात आलंय. फेसबुकवर एलजीबीटी संदर्भातलं निवेदन मार्क  झुकेरबर्गनं दिलंय. त्यासाठी ‘सेलिब्रेट प्राइड पेज’ क्रिएट करण्यात आलंय. मात्र हे सतरंगी सेलिब्रेशन नेमकं कशासाठी आहे, ते जाणून न घेताच अनेकांनी आपले ‘पीपीज’ (प्रोफाइल पिक्चर्स) एक ट्रेण्ड म्हणून सतरंगी केलेत. त्यांची काहींनी खिल्लीही उडवली. सो, ट्रेण्ड फॉलो करा, पण तो नेमका का, कशासाठी आहे, ते जाणून घ्या.
फेसबुकचा भाव वधारला
शेअर बाजारात ‘फेसबुक’चं बाजारमूल्य वाढल्यानं ‘फेसबुक’ आता वॉलमार्टपेक्षा मोठं ठरलंय. जगातील सर्वात मोठी ऑनलाइन सोशल नेटवर्किंग साइट असणाऱ्या ‘फेसबुक’च्या या कामगिरीमुळं शेअर बाजारात सर्वोच्च भागभांडवल असणाऱ्या पहिल्या दहा कंपन्यांच्या यादीतून ‘वॉलमार्ट’ बाहेर पडलेय. अमेरिकी शेअर बाजारात सध्या ‘अ‍ॅपल’, ‘मायक्रोसॉफ्ट’ नि ‘गुगल’ या सर्वाधिक भागभांडवल असणाऱ्या कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. आता त्यात ‘फेसबुक’चा समावेश होईल. कंपनीचं सध्याचं बाजारमूल्य हे कंपनीचे सध्याचे चलनातील शेअर्स आणि बाजारातील वर्तमान किंमतीचा गुणाकार करून काढलं जातं. ‘फॅक्टसेट’च्या आकडेवारीनुसार, ‘फेसबुक’चं बाजारमूल्य २३८ अब्ज डॉलर झालं आहे. सो, समस्त फेसबुककरांनी आपली कॉलर टाइट करून घ्यायला हरकत नाही. जियो मार्क झुकेरबर्ग..
किंगखानचा ट्रेण्ड कायम
बॉलीवूडमध्ये येऊन किंग शाहरूख खानच्या पदार्पणाला तब्बल २३ र्वष झालीत. त्यानं साइन केलेला पहिला ‘राजू बन गया जंटलमन’ हा सिनेमा नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याआधी २५ जूनला त्याचा ‘दीवाना’ पडद्यावर झळकला होता. पहिल्या सिनेमापासूनच हिट भूमिका साकारणाऱ्या शाहरुखला कधीही चॉकलेटी हिरोच्या भूमिका करणं पसंत नव्हतं. त्यामुळं त्यानं सुरवातीला ‘डीडीएलजे’ची ऑफर धुडकावली होती. तोवर त्याचे ‘बाजीगर’, ‘डर’ इत्यादी सिनेमे सुपरहिट झाले होते. ‘चमत्कार’, ‘दिल आशना है’ इत्यादी आपटले होते. पहिल्याच सिनेमात पुरस्कार पटकावून शाहरुखने धमाकेदार एंट्री केली होती. २३ वर्षांनंतरही शाहरुख सिनेमांच्या पिचवर नाबादच आहे. त्यामुळं  #23GoldenYearsOfSRK  हा हॅशटॅग ट्रेडिंगमध्ये होता. पन्नाशीच्या शाहरुख सध्या तीन सिनेमाचं शूटिंग एकत्र करतोय. शाहरुखच्या फॅन्सना आशा आहे की, शाहरुख बॉलीवूडमध्येही आपली पन्नाशी पूर्ण करेल. यंदा त्याचे ‘रईस’ आणि ‘फॅन’ हे सिनेमे रिलिज होणारेत. दरम्यान #दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेचाही ट्रेण्ड होता. १९९५मधल्या या सिनेमातला ट्रेनचा सॉलिड गाजलेला सीन आगामी ‘दिलवाले’मध्येही घेतला जातोय. हा ‘दिलवाले’ कसा असेल ही उत्सुकता ‘एसआरके फॅन्स’ला लागलेय.
सावधान@वेबकॅम चॅट
केवळ सेलेब्रिटीच नव्हे तर सामान्यांचेही प्रायव्हेट चॅटिंग लिक होऊन ते पॉर्नसाइटवर टाकले जाऊ  शकतात. या संदर्भात एक व्हिडीओ इंडिव्हायरल या यूटय़ूब चॅनलनं नेटकरांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी तयार केलाय. त्यात पर्सनल चॅटिंग करणाऱ्यांना सावधान केलं गेलंय. ‘वेबकॅम चॅट-शॉकिंग क्लायमॅक्स’ या नावाची ही एक शॉर्ट फिल्म आहे. त्यात आपण जे काही बोलतो, आपला चेहरा आणि शरीराचा काही भाग एक्स्पोज केला तर पॉर्न साइटवर अपलोड होऊ  शकतो. वेबकॅम हॅकिंग किंवा फोन हॅकिंगद्वारे आपले खासगी चॅटिंग पॉर्न साइटवर हॅक होऊ  शकते, ते दाखवण्यात आलंय. या व्हिडीओला सहा दिवसांत २,७५९,४२३ व्ह्य़ूज मिळालेत.
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com