08 March 2021

News Flash

काहीही हं..

मराठी मालिकांच्या पुढं न सरकणाऱ्या भागांवर अलीकडं सोशल मीडियावर चिक्कार टीका होतेय. त्यामुळं सध्या पुन्हा एकदा नेटकरांच्या रडारवर ‘होणार सून मी हय़ा घरची’ची जान्हवी आलेय.

| August 14, 2015 12:44 pm

सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट
जान्हवीचं बाळंतपण..
मराठी मालिकांच्या पुढं न सरकणाऱ्या भागांवर अलीकडं सोशल मीडियावर चिक्कार टीका होतेय. त्यामुळं सध्या पुन्हा एकदा नेटकरांच्या रडारवर ‘होणार सून मी हय़ा घरची’ची जान्हवी आलेय. तिच्या बाळंतपणावरून अनेक विनोद पसरवले जाताहेत. त्यात आता नेतेमंडळींच्या घोषणांची भर पडलेय. पंकजा मुंडे, उद्धव ठाकरे, असदउद्दीन ओवेसी, नारायण राणे, राज ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि नेटकरांचे लाडके कवी रामदास आठवले हे त्यांच्या त्यांच्या स्टाइलनं या डिलिव्हरीबद्दल कशी स्टेटमेंटस् करतील, याचं कल्पनाचित्र रेखाटणारे फोटोज व्हायरल होताहेत.

इंटरनॅशनल कॅट डे
मांजर आवडणारे नि मांजर न आवडणारे असे आणि या दोन्हीशी फारसं सोयरसुतक नसलेले अशा सगळ्याच नेटकरांना वाघाच्या मावशीचं दर्शन दिवसभर घ्यावं लागलं. कारण ट्विटरवर #इंटरनॅशनल कॅट डे हा टॉपिक ट्रेण्डिंगमध्ये होता. आपापल्या लाडक्या मांजरींचे फोटो किंवा त्यांच्यासोबतचे सेल्फी ट्विटरकरांनी अपलोड केले होते. शिवाय काही मार्जारप्रेमींनी मांजरांबद्दल विस्तृत माहिती देत इतरांच्या ज्ञानात भरही घातली.

कपिल‘वर’
‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’फेम कपिल शर्माचं लग्न अशा टॅगलाइनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नि नेटकरांनी दणादणा कॉमेंट्स करायला सुरुवातही केली. त्याच्या या ‘सो कॉल्ड छुप छुप के ब्याह का’ खुलासाही सोशल मीडियावरून दुसऱ्या दिवशी झाला. हे म्हणे त्याचं खरंखुरं लग्न नव्हेच. त्याच्या ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काढले गेलेले फोटो होते. त्यात कपिल वराच्या पोशाखात दिसतोय. लोग कोई भी बात का बतंगड बना देते हैं, बस..

इरफान नि एआयबीची पार्टी
#एव्हरी बॉलीवूड पार्टी साँग हा अभिनेता इरफान खान नि ‘एआयबी’चा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. बॉलीवूडमधले चित्रपट हिट होण्यासाठी पार्टी नि रॅपसाँग असं मिक्समॅच बरेचदा केलं जातं. त्या अनुषंगानंच या व्हिडीओमध्ये रॅप नि पार्टी साँगची खिल्ली उडवण्यात आलेय. या उपरोधिक व्हिडीओत एआयबीच्या टीमसोबत आहे इरफान खान. त्याचा हा नवा अवतार नि ही पार्टी नेटकरांनी चांगलीच एन्जॉय केलीय.

कटप्पा नि बाहुबलीचा प्रश्न
सध्या सोशल मीडियावरच्या चर्चेतला एक विषय आहे तो – कटप्पानं बाहुबलीला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर शुद्ध देसी एण्डिंगच्या टीमनं त्याच्या व्हिडीओत शोधण्याचा प्रयत्न केलाय. त्यावरच्या कमेंट्समध्ये तो आणखी मोठा हवा होता, असं अनेकांनी म्हटलं असून अनेकांनी त्याला पॉर्नबंदीशी रिलेट केलंय. एकुणात नेटकरांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिलाय. शिवाय या चित्रपटाचे लेखक के. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची मुलाखतही गाजतेय. शेवटच्या सीनमध्ये बाहुबलीला मारणारा कटप्पाच असेल असं नाही, असा गुगली त्यांनी टाकलाय. त्यामुळं मग तो कोण, या प्रश्नावरच्या चर्चेला ऊत आलाय. त्यांनी फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप व्यापून टाकलंय. ‘बाहुबली भाग २’ रिलिज होईपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार असं दिसतंय.

गायक सलमान
‘मैं हूँ हिरो तेरा’ या चित्रपटात भाईजान सलमान खाननं एक गाणं गायलंय. त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाच्या टीझर रिलिजच्या आधी त्यानं या गाण्यासंबंधी ट्वीट केलं आणि तो ट्रेण्ड अव्वल ठरला. या ट्वीटमधल्या त्याच्या लुकनं अनेकांना भुरळ घातली. दुसऱ्या चित्रपटात गायची त्याची ही पहिलीच वेळ असून याआधी त्यानं स्वत:च्या ‘वॉण्टेड’ नि ‘किक’साठी गाणं गायलंय.

मुन मुन लाइक्स
नेटकर केवळ सेलेब्रेटींबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात असं नाही, तर अंतराळातल्या घडामोडींवरही त्यांचं तितक्याच बारकाईनं लक्ष असतं. त्यामुळं ‘एपिक व्ह्य़ू ऑफ मुन’ हा अ‍ॅनिमेशन व्हिडीओ तितक्याच उत्सुकतेनं पाहिला नि शेअर केला गेला. सरत्या आठवडय़ात तो ट्रेण्डिंग टॉपिक ठरला होता.

‘शानदार’ नि ‘सिंग’चे लुक
विकास बहेल दिग्दर्शित आलिया भट नि शाहिद कपूरच्या बहुचर्चित ‘शानदार’ची चर्चा ट्विटरवर सुरू होती. त्यामुळं चाहत्यांच्या आग्रहाला मान देत शाहिदसह टीम शानदारनं ट्विटरवर ‘शानदार’च्या फर्स्ट लुकचा टीझर रिलिज केला.
अक्षयकुमार नि एमी जॅकसनचा ‘सिंग इज ब्लिंग’चा ट्रेलर सोशल मीडियावर हिट ठरतोय. प्रभुदेवा दिग्दर्शित या चित्रपटाविषयी अक्कीप्रेमींची उत्सुकता वाढतेय.

मिनिअन्सचा डान्स
‘मिनिअन्स’ या अ‍ॅनिमेटेड चित्रपटाची सॉलिड धूम सध्या आहे. त्याअनुषंगानं विविध प्रॉडक्टस् मार्केटमध्ये येताहेत. मग त्यात नेटकरांनी तरी मागं का राहावं. मिनिअन्सचा अपिरिअन्स आणि दादा कोंडके यांचं लोकप्रिय गाणं ‘ढगाला लागली कळ’ असं हटके कॉम्बिनेशन असणारा व्हिडीओ सध्या यूटय़ूबवर व्हायरल होतोय. गाण्याचे बोल नि मिनिअन्सचे बोलके हावभाव यांची चांगली सांगड या व्हिडीओत घालण्यात आलेय.

इलेक्ट्रिक ट्रॅफिकचे डुडल
जगभरातील वाहतुकीस शिस्तीचं वळण लावणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नलला १०१ र्वष पूर्ण झाली. ‘गुगल’नंही ‘डुडल’मार्फत या ऐतिहासिक घटनेचं स्मरण केलं. सोशल मीडियामध्येही ट्रॅफिक सिग्नलची चर्चा होती. या डुडलमध्ये सिग्नलचे जुन्या काळातील ‘टी’ मॉडेल होतं. ‘डुडल’वर क्लिक करताच जगातील पहिल्या ट्रॅफिक सिग्नलचा शोध कधी लागला त्याचं उत्तरही मिळतं.

फॉरवर्डेड –
हॅप्पी गटारी
कोणत्याही दिवसामागं ‘हॅप्पी’ लावून तो सेलिब्रेट करायची पद्धत नेटकारांमध्ये रूढ आहे. तोच नियम गटारी अमावास्येला लावला गेला नि त्यासंबंधीचे फोटो व्हायरल झाले. काही सालाबादप्रमाणं तेच ते होते तर काहींत थोडंसं नावीन्य होतं. तर काहींनी या दिवसाचा नेमका अर्थ काय ते शब्दांतून सांगण्याचाही प्रयत्न केला.

आई मला भूक लागली
‘आई मला भूक लागली’ या नावाचं हॉटेल आहे, असा फोटो सध्या फिरतोय. नावातच वेगळेपण असणारं हे हॉटेल पुण्यातलं आहे, अगदी अप्पा बळवंत चौकातलं आहे. अशी त्यावर चर्चा घडतेय. खरं-खोटं पुणेकरच जाणोत. पुणेकर.. कळवा आम्हाला.

गणेश बोले
गणेशोत्सव महिन्याभरावर आलेला असताना गणेशाच्या मनीचे बोल सध्या एका व्हिडीओतून व्हायरल होताहेत. खरंतर व्हिडीओपेक्षा त्याला ऑडिओ म्हणणं अधिक योग्य ठरेल. भक्त कायमच देवाकडून नाना अपेक्षा करतात, त्या आपल्याला माहितीही असतात. पण बाप्पांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची पूर्ती करणं आता भक्तांच्या हाती आहे.

भारतीय लष्कर लोकप्रिय
सोशल मीडियावर भारतीय सेना या वेबसाइटनं फेसबुक रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलंय. पीपल टॉकिंग अबाऊट दॅट रँकिंगमध्ये भारतीय लष्कराच्या फेसबुक पेजला दुसऱ्यांदा पहिलं स्थान मिळालंय. या साइटनं नासा, सीआयए, एफबीआयसारख्या लोकप्रिय सरकारी साइटना मागं टाकलंय. केवळ फेसबुकच नाही तर भारतीय सेनेच्या अधिकृत वेबसाइटचे लाइक्सही आठवडय़ागणिक वाढताहेत. लष्कराचे ट्विटर फॉलोअर्सदेखील साडेचार लाखांहून अधिक आहेत.
viva.loksatta@gmail.com
– राधिका कुंटे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2015 12:44 pm

Web Title: social news digest 11
टॅग : News
Next Stories
1 तिरंगी मेक-अप
2 स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य
3 रानवाटेने लळा लाविला असा
Just Now!
X