vv09‘नेट न्यूट्रॅलिटी’च्या नावानं चांगभलं
सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

व्होट फॉर ‘नेट न्यूट्रॅलिटी’
इंटरनेट आपल्या प्रचंड सवयीचं झालंय. नेटपॅक संपल्यावर आपण अस्वस्थ होऊन जातो. त्यामुळंच असेल कदाचित, पण इंटरनेटच्या वापरावर येणारे र्निबध, त्यासाठी मोजाव्या लागणाऱ्या अ‍ॅडिशनल चार्जेसच्या विरोधात नेटकर पुढं सरसावताना दिसताहेत. फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप, ट्विटर, स्काइप इत्यादी काही लोकप्रिय अ‍ॅप्ससाठी वेगळे पैसे मोजावेत का, या मुद्दय़ावर ‘ट्राय’नं लोकांकडून सूचना मागवल्यात. http://www.savetheinternet.in या साइटवर आपलं मत नोंदवायचंय. सगळ्या सोशल मीडियावर नेट न्यूट्रॅलिटी हा ट्रेण्ड वरचढ आहे. नेट रिलेटेड अ‍ॅप्ससाठी वेगळे पैसे मोजायला लागू नयेत, असाच साधारण कौल दिसतोय. सर्वसामान्यांसोबत बॉलीवूडकरही या मोहिमेत सामील झाल्येत. श्रुती सेठ नि दानिश अस्लमचा व्हिडीओ फेसबुकवर लाइक केला जातोय, तर ट्विटर नि यूटय़ूबवर ‘एआयबी’चा व्हिडीओ व्हायरल होतोय. नेटकरांचा ग्राहक म्हणून हक्क काय, त्यातले तांत्रिक आणि आर्थिक मुद्दे कोणते यांचा विचार व्हिडीओत खास ‘एआयबी स्टाइल’मध्ये मांडला गेलाय. त्याला एका दिवसात ९,६७,९४२ व्हय़ूज मिळालेत. त्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=mfY1NKrzqi0&feature=youtu.be

देव-देवता नि हेल्मेट
आपल्या देव-देवतांच्या काळातही सेफ्टीचा विचार होत असे. त्या दृष्टीनं असेल, पण देव वाहनावरून प्रवास करताना हेल्मेट वापरत, अशा आशयाची अ‍ॅड सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. देव-देवतांचा मुकुट म्हणजे त्याचं हेल्मेट होतं, असं यात दाखवलं गेलंय. विष्णू, दुर्गा, गणपती आपापल्या वाहनांवरून निघतात नि क्षणभर जागीच थबकतात. मग त्यांच्या डोक्यावर मुकुटाच्या स्वरूपातलं हेल्मेट येतं नि ते पुढं निघतात. त्याच सेकंदाला जे तुम्हाला वाचवतात, तेदेखील स्वत:च्या डोक्याचं रक्षण करतात. तेव्हा तुम्हीही त्यांना फॉलो करा, असं वाक्य फ्लॅश होतं. हेल्मेटचं महत्त्व लोकोंच्या मनावर बिंबवण्याचा एक वेगळा प्रयत्न आहे ही जाहिरात. त्याची ही लिंक – https://www.youtube.com/watch?v=AkRiOEqb1f8

असीन का मॅरेज?
लाल-सोनेरी लहंगा-कुर्ता, हाताला मेहंदी अशा वेशातल्या असीनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. होय, ही तीच ती असीन, ‘गजनी’मधली. फोटो पाहून वाटतंय की.. और एक हिरॉईन का पत्ता कट.. पण सॉरी गाईज. यू आर राँग. हा फोटो आहे, तिच्या ‘ऑल इज वेल’ या फिल्ममधला. त्यातल्या तिच्या लग्नाचे लीक झालेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेत. या सिनेमामध्ये असीनची जोडी अभिषेक बच्चनसोबत असून त्यात ऋषी कपूरही आहे. मध्यंतरी याच फिल्ममधील अभिषेक बच्चन नि ऋषी कपूरचा लुक रिलीज झाला होता. त्यापेक्षाही असीनच्या फोटोची चर्चा जास्त रंगलेय, हे बरीक खरंय!

प्राइम टाइमची ‘शोभा’
मल्टिप्लेक्समध्ये प्राइम टाइम मराठी चित्रपटांसाठीच राखून ठेवण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्यावर त्यावरून प्राइम टाइमलाच नव्हे, तर आठवडाभर सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. मनोरंजन क्षेत्रातील काही तरुण कलावंतांनी या निर्णयानंतर चांगली कला सादर करून ती लोकांपर्यंत पोहोचवायची आपली जबाबदारी वाढल्याच्या पोस्ट केल्यात. या संदर्भातल्या बातम्यांमुळं #मराठी हा हॅशटॅग ‘ट्विटर’च्या इंडिया ट्रेण्डच्या यादीत झळकला होता. त्याखेरीज #शोभा डे, #शिवसेना आदी हॅशटॅगचाही ट्रेण्ड होता. या आदेशानंतर लेखिका शोभा डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हुकूमशहा संबोधत ट्विट केलं. ‘ट्विट’मध्ये त्यांनी मराठी पदार्थाची खिल्ली उडवली होती. त्यावरून गदारोळ झाला. विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला जाणार हे कळल्यावर त्यांनी सारवासारवी करणारं ट्विट केलं. दरम्यान ‘शोभा’ नावावर अनेक कोटय़ा नि फोटो पोस्ट करत नेटकरांनी आपापली मतं शेअर केली.

यूटय़ूब टॉप टेन मुव्ही ट्रेलर्स
आपल्याकडच्या सिनेमावेडय़ा फॅन्सच्या नव्या सिनेमाविषयीचं कुतूहल ‘यूटय़ूब’वरचे ट्रेलर्स पाहून थोडंसं शमत असावं किंवा मग वाढत असावं. ट्रेलर ‘यूटय़ूब’वर यायचा अवकाश की, त्या त्या मूव्हीजचे फॅन्स ते दणक्यात फॉलो करतात. मग तो सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालतो न चालतो ही झाली पुढची गोष्ट, पण त्याच्या व्ह्य़ूजचे आकडे बरंच काही सांगून जातात. ‘यूटय़ूब’नंच जानेवारी २०१५ ते मार्च २०१५ या काळातल्या ‘टॉप १० मूव्ही ट्रेलर्स’ची लिस्ट जाहीर केल्येय. त्यात ‘एक पहेली लीला’ला सर्वाधिक व्ह्य़ूज मिळालेत. पाठोपाठ ‘हंटर’चा नंबर लागलाय. आगामी ‘बॉम्बे वेल्वेट’ तिसरा असून त्यानंतर ‘शमिताभ’, ‘दम लगा के हैश्शा’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्क्षी’, ‘मिस्टर एक्स’चा ऑफिशियल ट्रेलर, ‘गब्बर इज बॅक’चा ऑफिशियल ट्रेलर एचडी, ‘पिकू’चा ऑफिशियल ट्रेलर आणि ‘दिल्लीवाली जालीम गर्लफ्रेंड’चा ट्रेलर यांना चांगली व्ह्य़ूअरशिप मिळालेय.

ट्विटर्स अ‍ॅडिशन
‘ट्विटर’नं रिट्विट करताना मूळ मजकुराशिवाय अ‍ॅडिशनल ११६ अक्षरं लिहिण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेय. यामुळं रिट्विट करत असलेला मूळ मजकूर नि फोटोमध्ये काहीही फरक पडणार नाही, अशी माहिती ट्विटरनंच ट्विट करून दिलेय. सुरुवातीला ही सुविधा डेस्कटॉप आणि आयफोन युजर्ससाठी उपलब्ध असेल. लवकरच अँड्रॉइडसाठीदेखील ही सुविधा देण्यात येणारेय. अनेक ट्विटरकरांना १४० शब्दांच्या मर्यादेत ट्वीट करायची सवय लागली असणारच. तरीही या अ‍ॅडिशनचा सहारा नवीन ट्विटरकरांना मिळेल नि जुन्या ट्विटरकरांना आपली मतं आणखी जोरकसपणं मांडायला हुरूप येईल.

मोदी सेल्फी
पंतप्रधान मोदी यांचा जर्मनी, फ्रान्सचा दौरा नेटकरांमध्येही औत्सुक्याचा होता. फ्रान्सकडून तयार स्थितीतील ३६ राफेल ही लढाऊ जेट विमानं भारत खरेदी करणार आहे. या संदर्भातले #३६ राफेल, #पॅरिस आदी ट्रेण्ड ट्विटरसह इतर सोशल साइट्सवर वरचढ होते. या विमान खरेदीसह विविध प्रकारच्या १७ करारांवरही या वेळी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या चर्चेदरम्यान संरक्षण, अणू, आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक मुद्दय़ांवर चर्चा झाली. त्याखेरीज मोदींनी स्थानिकांसोबत काढलेल्या सेल्फीजची चर्चाही त्यांच्या याआधीचे दौरे नि सेल्फीजप्रमाणं रंगली.