social-logoसोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

इमोजी अ‍ॅण्ड वेल्फी

#वर्ल्ड इमोजी डे हा १७ जुलैला जगभरात सेलिब्रेट करण्यात आला. स्मायली, इमोटिकॉन्स याचा जपानी अवतार इमोजी. टेक्स्ट चॅटिंग सुरू झालं तेव्हा निव्वळ हसरा नि रडका चेहरा माहीत असणारे आपण आताशा सर्रासपणं कित्येक प्रकारच्या इमोजीजचा वापर करतो. हा वापर एवढा वाढलाय की, त्यामुळं ‘इमोजी के बिना भी क्या जिना’ अशी भावना निर्माण झाली तर त्यात काय नवल?

#वेल्फी हा ट्रेण्ड ट्विटरवर टॉपला होता. वेल्फी म्हणजे एक प्रकारचा सेल्फी व्हिडीओ. सध्या वेल्फीचा ट्रेण्ड आलाय. त्यामुळं ‘आता सेल्फी विसरा’ किंवा ‘२०१४ वॉज सेल्फी नि २०१५ #वेल्फी’ अशी वेल्फीची क्रेझ सध्या आलेय. तसे ट्वीट्स केले जाताहेत.

बर्थ डे नि धार्मिक सण-सोहळे

बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ नि प्रियांका चोप्रा यांच्या वाढदिवसाबद्दल त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्यावर केलेला शुभेच्छांचा वर्षांव ट्रेण्डमध्ये होता. कुंभमेळा, ईद आणि जगन्नाथ पुरीचा रथोत्सव या धार्मिक सोहळ्यांनिमित्त भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा देत त्याचे फोटो अपलोड केल्यानं हे सण-सोहळे ट्रेण्डिंगचा विषय ठरले होते.

बजरंगी रॉक्स

‘हिट अँण्ड रन’ प्रकरणाच्या सुनावणीनंतर प्रदर्शित झालेला सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट तुफानी हिट ठरला. विविध कारणांमुळं आणि हॅशटॅगसह सतत सोशल मीडियावर टॉप ट्रेण्डिंगमध्ये असणारा ‘बीबी’ बॉक्स ऑफिसवरही हिट ठरलाय. # बजरंगी भाईजान, # बजरंगी भाईजान मास्टरपीस, #तुफानी अशा हॅशटॅगसह ‘बीबी’ सध्या ट्रेण्डिंगवरही हिट ठरतोय. सलमानच्या चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षांव नि सल्लूभय्याचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट अपलोड होताहेत.

हम पाँच..
सुजाण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचा ‘मांझी : द माऊंटन मॅन’चा ट्रेलर यू-टय़ुबवर व्हायरल झाल्यावर त्याला काही मिनिटांतच लाखो हिट्स मिळाल्यात. अभिनेत्री राधिका आपटे त्याच्या बायकोच्या भूमिकेत आहे. डोंगर फोडून रस्ता तयार करण्याच्या सत्यकथेवर हा केतन महेता दिग्दर्शित चित्रपट आधारलाय. रस्ता काढल्यावर सुरू होतो आणखी एक नवा संघर्ष.

‘बाजीराव मस्तानी’चा फर्स्ट लुक रीलिज झाल्यावर ट्रेण्डिंग टॉपिकवर चर्चेचा विषय ठरला. रणवीर, दीपिका नि प्रियांका या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत असल्याच्या बातम्या फिरत होत्याच. ट्विटरवर हे फोटो रीलिज करण्यात आले नि रणवीरनंही आपल्या चाहत्यांशी चॅट केलं. ट्विटरकरांनी मोठय़ा संख्येनं ट्वीट्स करून या टीमला शुभेच्छा दिल्या असल्या, तरी काहींनी फोटो पाहून थोडीशी नाराजीही व्यक्त केली. कुणी दीपिका ‘मस्तानी’ वाटत नाहीये, असं ट्वीट करत होतं, तर कुणी हा ‘देवदास पार्ट’ आहे का? असा सवाल करत होतं.

‘प्यार करनेवाले कभी डरते नही’ हे लोकप्रिय गाणं असणाऱ्या सुभाष घईंच्या मूळ ‘हिरो’ची आठवण करून देणारा नव्या ‘हिरो’चा ट्रेलर रीलिज झालाय. सुनील शेट्टीची मुलगी अथिया नि आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज यांचं या ‘हिरो’तून पदार्पण होतंय. ट्रेलरमधून झळकणारं म्युझिक, अ‍ॅक्शन, ड्रामा नि लव्हस्टोरी या चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करताहेत.

किंग खानच्या ‘रईस’विषयी त्याच्या चाहत्यांमध्ये सॉलिड उत्सुकता निर्माण झालीय. या क्राइम फिल्ममध्ये खुद्द शाहरुख खानखेरीज फरहान अख्तर, नवाजुद्दीन सिद्दिकी नि पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खान झळकणारेत. हा फर्स्ट लुक झळकण्याआधी नि नंतरही ट्विटरवर टॉप ट्रेण्डमध्ये होता.

Revenant या एपिक वेस्टर्न थ्रिलरपटात लिओनार्दो डि कॅप्रियो, टॉम हार्डी, विल पॉल्टर आणि डॉमनल ग्लेसन अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमुळं थ्रिलर आवडणाऱ्या प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागलीय.

तुम ही हो..
‘आशिकी२’मधलं अरिजितसिंगच्या आवाजातलं ‘तुम ही हो’ गाणं अद्यापही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतं. त्यामुळेच असेल कदाचित, आपल्या भावी वधूसाठी हे गाणं गाऊन कॅनडाच्या फ्रँकनं भारतीय सिमरन का दिल फिर से जित लिया. फ्रँक आणि सिमरन यांच्या लग्नसोहळ्यातील हा व्हिडीओ व्हायरल झाला. त्याच्या ‘तुम ही हो’ गाण्यातल्या इमोशन्सना अनेकांनी मनापासून दाद दिली नि हा व्हिडीओ ट्रेण्डिंगचा विषय ठरला. त्याच्या मनापासून केलेल्या मेहनतीला दाद देताना खुद्द सिमरन नि सोहळ्याला उपस्थितांच्या डोळ्यांत क्षणभरासाठी आनंदाश्रू तरळले.. कदाचित भावी प्रेमवीरांसाठी हा एक प्रेमपाठच ठरला असावा.

कबड्डी कबड्डी
‘कबड्डी कबड्डी’ म्हणत सुरू झालेली ‘प्रो कबड्डी लीग’ ट्रेण्डिंगमध्ये आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला सादर झालेलं ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या स्वरातलं राष्ट्रगीत, ‘यु मुंबा’ला चिअर अप करणारे प्रेक्षक आणि ‘यु मुंबा’चा ‘जयपूर पिंक पँथर्स’ नि ‘बंगळुरू बुल्स’वर विजय यांची सोशल मीडियावर चर्चा झाली.

काय म्हणावं याला..
मुलीनं प्रेमविवाह केल्यानं वडिलांनी तिचा जिवंतपणीच दशक्रिया विधी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोशल मीडियावर मोठय़ाच चर्चेचा विषय ठरतेय. धुळ्यातील जागरूक नागरिक, अंनिस नि पोलिसांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न अयशस्वी झाला. या दशक्रिया विधीच्या बॅनरची पोस्ट व्हॉट्सअपसह इतर सोशल मीडियावर फिरत होती.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दरड कोसळून झालेल्या अपघाताची बातमी आणि छायाचित्रंही पटापट व्हॉट्स अ‍ॅपवर व्हायरल झाली. मात्र या माहितीमुळं अनेकांनी या मार्गावरून प्रवास करणं टाळलं किंवा इतर पर्यायांचा वापर केला.

तो परतलाय..
तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षा नि दुराव्यानंतर पाऊस परताय. याचा एकीकडं आनंद मानत ‘आज मौसम कितना खुशगंवार हो गया, खत्म सभी का इंतजार हो गया, बारिश की बुंदे गिरी कुछ इस तरह से, लगा जैसे आसमान को जमीन से प्यार हो गया’ अशा शायरीनं नि पावसाचेच त्याचेच फोटो फॉरवर्ड करून स्वागत केलं गेलं. मात्र अनेकांच्या नशिबी पुन्हा एकदा पावसामुळं वाहतूक कोलमडणं नि पाणी साचण्यासारखे हालबेहाल होतेच. व्यवस्थेला दुषणं देत ‘मुंबई स्पिरिट’नं पाऊसपाण्याचा सामना केलाच.

फॉरवर्डेड चिमटे
‘मी प्रतिज्ञा करतो की, ज्या दिवशी आमदार, खासदारांना त्यांच्या कँटिनमधील भोजनात सबसिडी मिळणे बंद होईल, फुकटचे वीज बिल, फोन बिल, बंगले, सिलेंडर आणि रेल्वे-विमान प्रवास सोडतील.. त्या दिवशी मी पण लगेचच एलपीजी सबसिडी सोडून देईन..’

खऱ्याखुऱ्या वाघांच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न अद्याप सुटले नसले, तरी सोबतच्या चित्रातले वाघ मोजा, असा मेसेज फिरत होता होता.

राधिका कुंटे