social-logoसोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

शाहीद का रिसेप्शन
शाहीद कपूरच्या लग्नाचा नेट फिवर अजूनही कायम आहे. मुंबईतल्या त्याच्या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नि ट्रेण्डिंगचा टॉपिक ठरले. या रिसेप्शनला अनेक बडय़ा कलाकारांनी उपस्थित राहून मि. अँण्ड मिसेस कपूरना शुभेच्छा दिल्या.

अमेठी में रेहान!
जी हां, ठीक ही पढा आपने. राहुल नहीं रेहान.. प्रियांका गांधीचा मुलगा रेहान वढेरानं सध्या अमेठीत ठाण मांडलंय. रेहान नि त्याची बहीण याआधीही अनेकदा अमेठीत आलेले आहेत. पण या वेळी मात्र त्यांचं येणं सोशल मीडियावर झळकलेलं दिसतंय. रेहानला राजकारणात रस असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळंच गावातील राहणीमान आणि रीतिरिवाज शिकण्यासाठी त्याला अमेठीत पाठवलं जात असावं. त्याला पाहण्यासाठी गावकरी उत्सुक असतात. त्याच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती. रेहाननं गावकऱ्यांसोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.

विम्बल्डन स्टार्स
विम्बल्डनमधल्या चुरशीच्या सामन्यांचं प्रतिबिंब सोशल मीडियावरही पाहायला मिळाल्यानं #विम्बल्डन फायनलसारखे हॅशटॅग टॉपट्रेण्ड ठरले. यंदाची ही स्पर्धा आपल्यासाठी स्पेशल ठरलेय कारण सानिया मिर्झानं विम्बल्डन कोर्टवर ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलेय. सानियानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलंय. सानियाचं हे पहिलंच विम्बल्डन ग्रँडस्लॅम असून हा पराक्रम करणारी ती पहिलीच भारतीय टेनिसपटू ठरलेय. लिएंडर पेसनंही मार्टिनासोबत मिश्र दुहेरीत आणि ज्युनिअर गटात सुमित नागलनं नाम हाँग लीसोबत विजेतेपद पटकावलंय. सेरेना विल्यम्सनं आपला फॉर्म कायम राखत विम्बल्डनचं सहावं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलंय. तेहतिसाव्या वर्षी या स्पर्धेत एकेरीचं जेतेपद पटकावणारी ती पहिलीच टेनिसपटू ठरलेय. विम्बल्डन जेतेपदासह २८ सलग ग्रँडस्लॅममध्ये विजय मिळवण्याचा विक्रम सेरेनानं केलाय. तर नोव्हाक जोकोविचनं रॉजर फेडररला हरवून तिसऱ्यांदा विम्बल्डन जिंकलंय. त्याच्या करिअरमधलं हे नववं ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

अझीम दानत
अधिक महिना कालच संपला. त्यावरून फिरणारे जोक्स नि माहिती फॉरवर्ड होत असली तरीही प्रत्यक्षात अधिकाचे अर्थात आपल्याजवळच्या वस्तू किंवा पैशांचं दान गरजूंना किती दिलं गेलं ते माहिती नाही. पण एक दान मात्र उजेडात आलं नि त्याबद्दलचा #अझीम प्रेमजी हा टॉप ट्रेण्डमध्ये होता. विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी विप्रोतील अर्धी मालमत्ता समाजसेवी संस्थांना दान देऊ  केलेय. विप्रो देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी आहे. अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्सनी एक उपक्रम हाती घेतलाय. त्याअंतर्गत त्यांनी ‘जगभरातील श्रीमंत व्यक्तींनी त्यांच्या संपत्तीतील काही भाग समाजसेवी संस्थांना दान द्यावा’ असं आवाहन केलंय. त्यानुसार अझीम प्रेमजी हे गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करणारे पहिले भारतीय ठरलेत.

‘बाहुबली’ची सत्ता
या ना त्या कारणानं सतत टॉप ट्रेण्डमध्ये असणाऱ्या ‘बाहुबली’ या चित्रपटानं रिलीज झाल्यावर सगळे रेकॉर्डस् मोडीत काढलेत. त्यानं पहिल्याच दिवशी ५० कोटींचा गल्ला जमवला. २०० कोटींचं बजेट असणारा ‘बाहुबली’ देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा आहे. तो एकाच वेळी जगभरात चार हजार चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला. त्यात प्रभास, राणा दग्गुबाती, रम्या कृष्णा, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटियाची भूमिका आहे. दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या या चित्रपटानं तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, फ्रेंच या भाषांमध्ये मिळून एका दिवसात ५० कोटींचा गल्ला जमवला. त्याच्या निर्मितीसाठी तीन वर्षे लागली होती. सोशल नेटवर्किंग साइट्सवर सध्या या सिनेमाची जोरदार हवा आहे.

फुटबॉल नि कबड्डी
#मुंबई फुटबॉल क्लब हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये होता. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामासाठी १० खेळाडूंच्या लागलेल्या बोलीत प्रमुख स्ट्रायकर सुनील छेत्री आणि युजिन्सन लिंगडोहवर एक कोटीची बोली लागली होती. छेत्रीला एक कोटी २० लाख रक्कम मिळाली नि मुंबई फुटबॉल क्लबनं त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. पण त्याच्या ८० लाख या मूळ रकमेच्या तुलनेत त्याला लागलेली बोली कमीच असल्याची चर्चा झाली. तिकडं प्रो कबड्डीचे वारे घुमू लागलेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचं प्रमोशनल साँग ‘ले पंगा हे’ अमिताभ बच्चन यांनी गायलंय. #लेपंगा हा हॅशटॅग ट्रेण्डमध्ये असून त्यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मेरी, बातें, जिंदगी, फॅन
‘ब्रदर्स’मधल्या ‘मेरा नाम मेरी’ हे गाणं ट्रेण्डिंगमध्ये गाजतंय. संगीतकार अजय-अतुल यांचं संगीत या गाण्याला लाभलंय. ‘जत्रा’मधल्या ‘ये गो ये’ या गाण्याची चाल ‘मेरा नाम मेरी’ला देण्यात आली असून हे गाणं करिना कपूरवर चित्रित करण्यात आलंय. ‘ऑल इज वेल’मधलं अरिजित सिंगच्या आवाजातलं ‘बातों को तेरी’ हे गाणंही अनेकांच्या पसंतीस उतरलंय. ‘जिंदगी कुछ तो बता’ हे बहुचर्चित ‘बजरंगी भाईजान’मधलं अदनान सामीनं गायलंय. याच चित्रपटाचा #५डेज टू बीबी हा ट्रेण्डही टॉपमध्ये होता.

बॉलीवूड किंग शाहरूख खानच्या ‘फॅन’चा टिझर रिलीज झालाय. ‘दुनिया का सबसे बडे सुपरस्टार का सबसे बडा फॅन’ हा डायलॉग यात आहे. त्यामुळं चित्रपटाच्या कथेविषयीची उत्सुकता वाढतेय. मनीष शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात वानी कपूर, इलियाना डिक्रूझ यांच्याही भूमिका आहेत.

अगर इंटरनेट ना होता
#थ्री इज क्राऊड हा हॅशटॅग ट्विटरवर टॉपवनला होता. जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त रडकछच्या विद्यार्थ्यांनी हे व्हिडीओज तयार केले होते. या दोघांत तिसरी व्यक्ती आल्यानं काय होतं, ते या विद्यार्थ्यांनी परिणामकारक रीतीनं दाखवलं. त्यावर ‘ग्रेट मेसेज’, ‘हिलेरिअस व्हिडीओ’, ‘इनोव्हेटिव्ह व्हिडीओ’ आदी ट्विट्स होते.

अधूनमधून एकमेकांना सवाल करायची नेटकरांची सवय जुनीच आहे. तसाच एक प्रश्न ट्रेण्डिंगमध्ये होता- ‘अगर इंटरनेट ना होता’. त्यावर ‘वाचन वाढलं असतं’, ‘झोप काढली असती’, ‘जीवनात यश मिळालं असतं’, ‘लाइव्ह स्कोअर कळला नसता’ नि ‘आता मी हे ट्विट केलंच नसतं’ असे ट्विट्स करण्यात येत होते.

सपना भवनानीची स्टोरी
सपना भवनानीनं ‘ह्य़ूमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवर रेपबद्दल पोस्ट केलंय. तिनं लिहिलंय की, ‘वडिलांच्या निधनानंतर मी शिकागोमध्ये गेले, तिथं मला माझ्या पद्धतीनं जगण्याचं स्वातंत्र्य मिळालं. एका ख्रिसमसला नशेत मी रात्री उशिरा बारमधून एकटीच निघाले. मी तेव्हा २४ वर्षांची होते तेव्हा. तिथल्या मुलांच्या ग्रुपनं माझ्या डोक्याला बंदूक लावून गँगरेप केला. ही भयानक घटना विसरण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:ला सावरलं. नंतर एका मित्राशी लग्न केलं. पण कौटुंबिक हिंसाचारामुळं त्याला घटस्फोट दिला. मला सांगायचंय की, मार खाण्याची, बलात्कार होण्याची कोणालाही इच्छा नसते. ही घटना सांगण्यासाठी मला २० वर्षे लागली. पण अनेक जणींची अशा गोष्टी सांगण्याची कधीही हिंमत होत नाही, कारण त्यांच्याकडं चॉइस नसतो. पण सगळ्यांनी त्यांचा मान राखायला हवा.’ सपना प्रसिद्ध हेअरस्टायलिस्ट आहे. ती ‘बिग बॉस’चा सहावा सीझन आणि ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ आणि ‘अगली और पगली’मध्येही दिसली होती.

राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com