vv12सोशल नेटवर्किंग साइट्सवर धुमाकूळ घालणारे व्हिडीओज कोणते, सोशल नेटवर्किंगवरचा लेटेस्ट बकरा कोण, ट्विटरवर काय गाजतंय सध्या? यू टय़ूबवर ट्रेण्डिंगमध्ये काय आहे? या सगळ्याचा आढावा घेणारं साप्ताहिक सदर. सोशल न्यूज डायजेस्ट

‘कोर्ट’ची ऑस्करवारी

विविध चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांनी नावाजलेल्या चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित ‘कोर्ट’ या चित्रपटाचं भारतातर्फे ऑस्करसाठी नामांकन झालं. या निवडीच्या बातमीमुळं सोशल मीडियावर नेटकरांनी टीम कोर्टचं भरभरून अभिनंदन केलं. केवळ प्रेक्षकच नव्हे तर अनेक मान्यवर कलाकारांनीही आपल्या अभिनंदनाच्या पोस्ट शेअर केल्या. त्यापाठोपाठ ऑस्कर समितीतले वाद उघड होत असून नेटकरांमध्ये चर्चा सुरू आहे.

‘फेसबुक’च डी इफेक्ट

‘फेसबुक’नं थ्री डी व्हिडीओची अनुभूती देणारे आणि ३६० अंशांत फिरणारे व्हिडीओ सादर केलेत. ‘स्टार वॉर्स’मधील एक दृश्य प्रात्यक्षिक म्हणून फेसबुकवर शेअर करण्यात आलंय. ‘फेसबुक’च्या व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी आणण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. ‘स्टार वॉर्स’च्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओला ३६०अंशांत फिरविण्याची सुविधा देण्यात आलेय. अवघ्या ५६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये व्हिडीओ सुरू असतानाच माऊसच्या किंवा मोबाइलद्वारे पाहत असल्यास स्क्रीन टचच्या साहाय्यानं व्हिडीओ ड्रॅग करून कोणत्याही अंशांमध्ये फिरविता येत होता. त्यामुळं थ्री डी इफेक्ट जाणवत होता.

डिजिटल इंडिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा विविध कारणांनी सोशल मिडियावर चर्चिला जातोय. त्यापैकी तरुणाईच्या जिव्हाळ्याचे मुद्दे आहेत ते त्यांची टॉप आयटी कंपन्यांच्या प्रमुखांशी होणारी भेट. फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गची भेट नि त्यानंतर डिजिटल इंडियाच्या सपोर्टसाठी मार्कनं त्याचा ‘डिपी ’ बदलणं हे नेटकरांसाठी भारी होतंच. मग त्याच्या पाठोपाठ नेटकरांनी https://www.facebook.com/supportdigitalindia  या लिंकच्या साहाय्यानं आपापले ‘डिपी’ लगेचच बदलले. मोदी यांच्या गुगलच्या ऑफिसला भेट द्यायच्या पाश्र्वभूमीवर गुगलकडून खास डुडल तयार करण्यात आले. नरेंद्र मोदींचे गुगलमध्ये स्वागत आहे, असा संदेश गुगलच्या होमपेजवर झळकत असून त्याच्या बाजूलाच भारतीय संस्कृतीचं प्रतीक असणाऱ्या झेंडूच्या फुलांचं तोरणही लावण्यात आलंय. त्याखेरीज मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांच्या सोबतची चर्चा, #मोदी डिसरिपेक्टस् ट्रायकलर, #मेक इन इंडिया, #मोदी इन युएसए, #मोदींचं युनोमधील भाषण या हॅशटॅगवर नेटकरांची चर्चा रंगली होती.

‘बिग बी’चा नया अंदाज

अमिताभ बच्चन यांनी सोशल साइटवर व्हिडीओ नि फोटोज शेअर केलेत. या व्हिडीओत ‘बिग बीं’चा एकदम फ्रेश नि न्यू लूक दिसतोय. लिफ्टमध्ये उभं राहून ते थोडय़ाशा डान्स स्टेप्स करताहेत. हा आहे ‘स्टार प्लस’वर सुरू होणाऱ्या ‘आज की रात हैं जिंदगी’ या कार्यक्रमाचा ट्रेलर. त्यानिमित्तानं ‘बिग बीं’च्या चाहत्यांना पुन्हा एकदा छोटया पडद्यावर पाहता येणारेय.

ख्वाडाचा टिझर

आशयसंपन्न मराठी चित्रपटांच्या चर्चेतल्या भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘ख्वाडा’चा टीझर रिलीज झालाय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे पोस्टर प्रसिद्ध डिझायनर किरण चांदोरकरांनी साकारलंय. पिढय़ान्पिढय़ा शेतकरी असणारे भाऊराव कऱ्हाडे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलादिग्दर्शक चंद्रशेखर मोरे चित्रपटाचे प्रेझेंटर आहेत. चित्रपटात मुख्य भूमिका शशांक शेंडे साकारत असून, भाऊसाहेब शिंदे, रसिका चव्हाण, योगेश डिंबळे, वैष्णवी ढोरे आदींनी विशेष भूमिका साकारल्यात.

 मॅन्स वर्ल्डचा ट्रेलर

‘मॅन्स वर्ल्ड’चा ट्रेलर सध्या यू टय़ूबवर गाजतोय. स्त्रीला पुरुषांसारखी नि पुरुषांना स्त्रियांसारखी वागणूक मिळाली तर.. या तरचीच झलक या ट्रेलरमध्ये दिसतेय. परिणिती चोप्रा, कल्की कोएचलीन, सोनी राजदान, प्रीतीश नंदी, भूमी पेडणेकर, मिस् मालिनी, सायरस साहुकार आदी अनेक सेलेब्रेटीज या ट्रेलरमध्ये दिसताहेत.

तमाशा, दंगल, अँग्री बर्ड

दीपिका पदुकोण नि रणबीर कपूर हे एके काळचे लव्हबर्डस् ‘तमाशा’मध्ये एकत्र आलेत. इम्तियाझ अली दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्यातून या केमेस्ट्रीची झलक दीपिका नि रणबीरच्या चाहत्यांना पाहायला मिळतेय आणि त्यामुळं चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढतेय.

मि. परफेक्टशनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानच्या कुस्तीपटू महावीर फोगटच्या जीवनावर आधारलेल्या ‘दंगल’ या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालंय. कुस्तीच्या आखाडय़ातल्या मातीनं रंगलेला आमिरचा चेहरा नि ‘आज से दंगल शुरू’ या टॅगलाइनमुळं चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढतेय. त्यामुळं #दंगल नि# आमिर हे टॉपिक ट्रेण्डिंगमध्ये आहेत.

अँग्री बर्ड

#द अँग्री बर्ड्स, होय करेक्ट वाचलंत तुम्ही. स्मार्टफोनवरच्या या लोकप्रिय खेळावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. त्यात रेडला आवाज दिलाय जॅसन सुडेइकिसनं. Jason Sudeikis अँग्री बर्डच्या गेमबाज चाहत्यांना अर्थातच या चित्रपटाविषयी कुतुहूल वाटतंय.

मिशन मंगळाची वर्षपूर्ती

भारताच्या मंगळयानानं अवकाशात उड्डाण केल्याच्या घटनेला २४ सप्टेंबरला वर्ष पूर्ण झालं. भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं अर्थात इस्रो मंगळयानाचं उड्डाण करत इतिहास घडविला होता. त्यामुळं सोशल मीडियावर #मिशन मार्स, #इस्रो, #मिशन मंगळ आदी हॅशटॅग ट्रेण्डमध्ये होते. इस्रोनं प्रसिद्ध केलेल्या ‘मार्स अ‍ॅटलास’मध्ये मंगळयानावर असलेल्या मार्स कलर कॅमेरानं काढलेल्या मंगळाच्या फोटोंचा नि आणि आतापर्यंत झालेल्या संशोधनाचा समावेश आहे. भारतानं आपल्या पहिल्याच प्रयत्नात अत्यंत कमी खर्चात ही मोहीम राबविली होती.

किंगखानच्या फेसबुक चाहत्यांत वाढ

किंगखान शाहरुख खानच्या फेसबुकवरील चाहत्यांची संख्या दीड कोटींवर पोचलेय. हा आनंदाचा क्षण सेलेब्रेट करण्यासाठी शाहरुखनं एक व्हिडीओही शेअर केला होता. शाहरुखनं आपल्या चाहत्यांसाठी शेअर केलेल्या व्हिडीओला जीवनशिक्षण किंवा ज्ञान आणि जीवनकौशल्ये शिक्षण असं नाव दिलंय. यामध्ये शाहरुखनं आपल्या चाहत्यांना काही टिप्स दिल्यात. असे १५ व्हिडीओज शेअर करणार असल्याचे म्हटलेय.

पुढल्या वर्षी लवकर या..

अनंत चतुर्दशीला श्रीगणेश अर्थात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना असंख्य गणेशभक्तांचे डोळे पाणावले होते. विसर्जनाच्या मिरवणुकीतला जल्लोष, संस्कार भारतीच्या कलात्मक रांगोळ्या आणि सोबत असणारे बाप्पा.. या सगळ्या माहोलाचा फिलै वेळोवेळी सोशल मीडियावर अपडेट केला जात होता. मिरवणुकीतील ‘सेल्फी स्टिक’ची हजेरी लक्षणीय दिसत होती.

‘निघालास बाप्पा.. ठीक आहे. चल, आवराआवर कर. जाता जाता जमलंच तर, मला थोडं लहान कर.’ अशा आशयाच्या भावपूर्ण कविता आणि बाप्पाचे फोटोज-व्हिडीओज शेअर होत होते. विसर्जन सोहळ्याच्या बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांच्या व्यथा व्यक्त करणारे ‘मजबुरी असते मनुष्याच्या अवतारात, नाही तर राम वनवासात, कृष्ण कारावासात आणि मी, बंदोबस्तात, कशाला अडकलो असतो’ ही चारोळीही फॉरवर्ड होत होती.
राधिका कुंटे – viva.loksatta@gmail.com