महिला सुरक्षेसाठीचे अॅप्स डेव्हलप होतानाच तिकडं व्हॉट्सअॅपवर तरुणानं आत्महत्या करणं, ‘सेल्फी’ची वाढलेली क्रेझ आणि ‘बकेट चॅलेंज’चं सोशल नेटवर्किंगमधून व्हायरल होणं.. सरत्या वर्षांत सोशल मीडियाचं जग कितीतरी वेळा घुसळलं गेलंय.
लहानपणी वाटायचं सांताबाबाच्या पोतडीत असतं तरी काय काय.. चॉकलेटस्, खेळणी नि कायबाय.. पण नंतर ही सांताक्लॉजची कॉन्सेप्ट थोडीशी उलगडली नि वाटू लागलं, अरेच्चा.. या सांताबाबाच्या पोतडीत भरलेल्या असतात का वर्षभराच्या घटना ठासून.. म्हणूनच का तो वाहतो ती पोतडी वाकून वाकून.. हे म्हणजे असं झालं का की जुनं द्या नि नवीन घ्या.. आता जुनं म्हणावं तरी ते काही अॅण्टिक नव्हे.. या घटना तर असतात याच वर्षभरातल्या.. पण आत्ता या वर्षांच्या शेवटच्या टप्प्यावरून त्या वाटतात लई जुन्यापान्या.. वर्ष तरी कशाला हो, आपलं लाइफच एवढं फास्टमफास्ट झालंय की कालचा दिवसही फार लांबच्या हातावर होता, असं वाटू लागलंय आताशा.. याच स्पीडनं सकाळ, दुपार, संध्याकाळच्या चक्राची काही काळानं अशीच गती होईल की काय असंही वाटू लागलंय आताशा..
vv25तर आता मांडव्याशा वाटताहेत काही बेरजा-वजाबाक्या.. काही भागाकार – काही गुणाकार.. काही स्वप्नं झाली साकार नि काही साकारायच्या आधीच झाली असावीत भार.. अगदी महिना टू महिन्याचे हिशेब मांडणार तरी कसे.. डिजिटल जगात होईल ना आठवणींचे हसे.. कोणकोणते वाहिले बदलाचे वारे..
 यंगिस्तानच्या जगामधले कसकसचे तांत्रिक कारनामे..  अन्याय, अत्याचार, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांविरुद्धचे नारे. सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळचा ओसंडणारा उत्साह नि राज्यातल्या निवडणुकीच्या वेळचं बदललेलं तरुण मन.. महिलांच्या सुरक्षेचा यंदाही ऐरणीवर असलेला प्रश्न नि निर्भया प्रकरणाला दोन वर्षे होतानाच घडलेली उबेरची घटना.. मलेशियन विमानाचं गायब होणं नि रजनीकांतनं ट्विटरवर लॉगइन करणं..
नोकियाचा अस्त होतानाच मायक्रोसॉफ्टचा पहिला स्मार्ट फोन लॉन्च होणं नि ऑर्कुटला अलविदा म्हणतानाच इतर सोशल मीडिया साइट्सचा बोलबाला वाढणं.. महिला सुरक्षेसाठीचे अ‍ॅप्स डेव्हलप होतानाच तिकडं रँगिंगमुळं विद्याíथनीनं आत्महत्या करणं.. भारतीयांसाठी मानाच्या ठरलेल्या मंगळ मोहिमेचं यश आणि फुटबॉल वर्ल्डकपचा चढता फिव्हर.. आलिया भट नि आलोकनाथवरच्या पीजेंचा महापूर नि सेल्फीचं वाढतं फॅड, एवढं की या शब्दाचा ऑक्सफर्डच्या डिक्शनरीत झालेला समावेश.. आयफोन-६चं लॉिन्चग नि फेसबुकवरचे मेंबर्स अ‍ॅक्टिव्हिटी वाढवणारे आइस बकेट, राइस बकेट, बुक बकेट चॅलेंज नि या चॅलेंजेसमुळं काही प्रकाशझोतात आलेल्या व्यक्तींची सकारात्मक कामगिरी.. वन डे इंटरनेट बंदची फसलेली हाक नि ऑनलाइन शॉिपगचा वाढता ट्रेण्ड.. यू टय़ूबवरच्या व्हिडीओजचा वाढता बोलबाला नि व्हॉट्सअ‍ॅप या अव्वल आवडीच्या अ‍ॅपपाठोपाठ हाइक, इन्स्टाग्राम, स्नॅॅपचॅटसारख्या अ‍ॅप्सची चलती होती. कारण त्यांचा वापर केवळ मनोरंजनासाठी न होता तो अभ्यास नि सोशल लाइफसाठीही केला गेला. फेसबुकपेक्षा ट्विटरला प्रेफरन्स द्यायचं प्रमाण वाढलं.
याच नव्या माध्यमांतून यंगस्टर व्यक्त होऊ लागलेत.. सर्जनशीलपणं. कलाकार म्हणून त्यांना मिळालंय एक व्यासपीठ, ज्याचा वापर सकारात्मकतेनं होऊ शकतो, हे त्यांना कळलंय. याच माध्यमाचा उपयोग करत सामाजिक जाणीव विकसित करणारे ग्रुप्स कनेक्टेड झाले नि प्रत्यक्ष सामाजिक जबाबदारी उचलायचं भान तरुणांना आलं. डोंगरदऱ्यांमध्ये भटकतानाच मुक्त-स्वच्छंद न होता सामाजिक जबाबदारीचं भान राखलं गेलं. मग ती पाडय़ावरची मदत असो किंवा बालरुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी केलेली धडपड असो. भाषा, संस्कृती, संगीत, कलाजाणिवा आपापल्या परीनं समृद्ध करण्याकडं तरुणाईचा कल होता.
या सगळ्यात काही नकारात्मक घटना घडल्या असल्या नि त्या डिजिटल यंत्रांत फिड झाल्या असल्या तरी आपल्या आठवणी सहसा चांगल्या असाव्यात, असंच प्रत्येकाला वाटतं. त्यामुळं गतवर्षांचा धांदोळा मांडताना तुम्हाला आणखी काही घटना नक्कीच आठवतील.. पण आपण इथे त्या न उल्लेखलेल्या बऱ्या. नव्या वर्षांच्या स्वागतासाठीचं उत्साही वातावरण आहे. बघा, सांताबाबा तर कालच येऊन गेलादेखील. आता वेळ आल्येय बाय बाय २०१४ नि वेलकम २०१५.. म्हणण्याची.. केशवसुतांच्या ओळींचा आधार घ्यायचा तर, जुने जाऊ द्या मरणालागून, जाळूनि अथवा पुरुनि टाका.. सावध ऐका पुढल्या हाका!