|| राधिका कुंटे

‘माती, पाणी, उजेड, वारा… तूच मिसळसी सर्व पसारा…’ या  ग. दि. माडगूळकर यांच्या ओळी आठवत आहेत का? त्या गीतातल्या असल्या तरी बरंच काही समजावतात. तूर्तास, शब्दांना कल्पनेच्या तीरावरच सोडून वास्तवाचं भान राखायचं असेल तर संशोधन आवश्यक ठरतं. डॉ. मीनल गुणे-साने यातील काही घटकांबद्दल संशोधन करते आहे.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
loksatta kutuhal french computer scientist dr yann andre lecun deep learning and the future of ai zws 70
कुतूहल : यान आंद्रे लकून : डीप लर्निंगचे गॉडफादर
anant ambani and radhika marchant wedding guest will get hand made candle
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगसाठी जामनगरच का निवडले? ‘या’ शहराशी अंबानी कुटुंबाचा आहे जवळचा संबंध

तिच्या घरी वैद्यकीय क्षेत्रातलं वातावरण. आयुर्वेदात मुरलेली सहावी पिढी. खापरपणजोबा, पणजोबा राजवैद्य. त्यांनी त्यांच्या ‘एस. जी. फायटो फार्मा’ या कंपनीत संशोधन केलं होतं. ‘फायटो फार्मा’च्या काही औषधांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला. ही कौटुंबिक पाश्र्वभूमी आहे मीनल गुणे-साने हिची. बारावीत फारसं यश न मिळाल्यामुळे तिला वाटलं होतं की, आयुष्यात मी काही करूच शकणार नाही का? पुढल्या काळात हा प्रश्न कायमचाच मागे पडला तो तिला मिळालेल्या यशामुळे. तिला जिओलॉजी अर्थात भूगर्भशास्त्राची गोडी लागली. कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. दिलीप जोशी यांच्याशी तिने जिओलॉजीविषयी चर्चा केली. त्यांच्या मार्गदर्शनानंतर तिनं जिओलॉजीमध्ये बीएस्सी केलं. पुढे पुण्याच्या फग्र्युसन महाविद्यालयातून एमएस्सी केलं. या काळात तिला जिओकेमिस्ट्री आणि जेमेलॉजी विषय आवडायला लागले. दक्षिणेतील संस्थेतून पीएचडी करायची तिची इच्छा होती. तिथे या क्षेत्रात चांगल्या सोयीसुविधा आणि संधी असल्याची कल्पना तिला आली होती. दरम्यानच्या काळात ती ‘कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मध्ये लेक्चरर होती. तिथल्या डॉ. विदुला स्वामी यांच्या मदतीने तिला आयआयटी मद्रासला जायची संधी मिळाली. तिथे ‘मणिपाल अकॅदमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील डॉ. बालकृष्ण मद्दोडी यांच्याशी भेट झाली. त्यांनी तिची ओळख डॉ. के. बालकृष्ण यांच्याशी करून दिली. त्यांनी तिची मुलाखत घेतली आणि मीनलने तिथे प्रवेश घेतला. तिथे तिला पूर्णवेळ शिष्यवृत्ती होती.

ती सांगते की, ‘‘आधी कोर्सवर्क करून मग प्रपोजल मांडायचं होतं. त्यासाठी वर्षभर काम सुरू होतं. हवा, माती आणि पाणी यांच्या सॅम्पल्सचं विश्लेषण करायचं होतं. मग त्याच्याशी निगडित साहित्य वाचलं, अभ्यासलं. त्या काळात तिथल्या वृत्तपत्रात बातमी आली होती की, एका कोळशाच्या थर्मल पॉवर प्लांटचा हवा, माती आणि पाण्यावर परिणाम होतो आहे. त्या परिसरातील लोकांना त्याचा आरोग्य, जनावरांना चारापाणी आणि शेतीदृष्ट्या त्रास होतो आहे. मग सरांशी चर्चा करून प्रपोजल मांडलं. आठ किलोमीटर रेडिएशनच्या परिसरात दर तीन महिन्यांनी या घटकांचं निरीक्षण करायचं ठरलं. त्याच दरम्यान मी  कोलकात्यातील एका कार्यशाळेत सहभागी झाले होते. माझे मार्गदर्शक डॉ. बालकृष्ण यांनी माझं प्रपोजल न्यू यॉर्कमधील तज्ज्ञ डॉ. कुरुन्थाचलम कन्नन यांना दाखवलं. त्यांनी सुचवल्यानुसार मी ऑर्गनिक पोल्युटंटवर अभ्यास सुरू केला. माझं कोलॅबरेशन ‘इंटरनॅशनल जॉइंट रिसर्च सेंटर फॉर परसिस्टंट ऑर्गनिक पोल्युटंटस’ या संस्थेशी झालं. त्यानंतर माझं काम चीनमधल्या ‘हार्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेसोबत सहकारी तत्त्वावर सुरू झालं. त्यांच्याकडून मला मातीचे नमुने गोळा करण्यासाठी काही साधनं पाठवण्यात आली. अशा प्रकारे माझं पॅसिव्ह सॅम्पलिंग झालं. अशा रीतीने सॅम्पलिंग करणाऱ्या भारतात फार कमी संशोधन संस्था आहेत. दोन वर्षं हे नमुने गोळा करत गेले. शिवाय हेवी मेटल आणि मेजर आयर्नचे नमुने गोळा करणंही सुरू होतं. त्यासाठीची साधनं बालकृष्णसरांच्या लॅबमध्ये उपलब्ध होती. तेव्हा मी ‘रॉक मॅग्नॅटिक फिंगर प्रिंट ऑफ सॉइल फ्रॉम अ कोल-फायर्ड थर्मल पॉवर प्लांट’ हा प्रबंध लिहिला. तो इंटरनॅशनल जर्नलमधून प्रसिद्ध झाला.’’

त्यानंतर गोळा केलेल्या हवेच्या नमुन्यांच्या परीक्षणासाठी तीन महिने हार्बिनला गेली. तिचा राहायचा-खायचा खर्च एमआयटीने केला, तर विश्लेषण आणि अन्य गोष्टींचा खर्च हार्बिनने केला. तिला शिष्यवृत्ती होती. तिथले डॉ. वॅन-ली मा हे एअर आणि सॉइल स्पेशालिस्ट आहेत. त्यांनी आणि तिचे मुख्य डॉ. यी फान ली यांनी तिला मार्गदर्शन केलं. वेनलाँग ली या तिच्या सीनिअरने तिला सॅम्पल्सना प्री ट्रीटमेंट कशी करायची याचं प्रशिक्षण दिलं. जवळपास अडीचशे सॅम्पल्स होती आणि फक्त तीन महिन्यांत हे काम पूर्ण करायचं होतं. महिन्याभरात हे काम झालं. नंतर विश्लेषणाचंही काम पूर्ण झालं. तिथल्या कडाक्याच्या थंडीशी दोन हात करता करता तिचा हात फ्रॅ क्चर झाला. तिचा फक्त इन्स्ट्रुमेंट अ‍ॅनालिसिसचा भाग राहिला होता. उपचार सुरू असतानाच ती पुन्हा कामाला लागली. हार्बिनमध्ये केलेल्या कामासंदर्भात तिने लिहिलेला शोधनिबंध इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला.

पुढे मीनलला केप टाऊनमधल्या इंटरनॅशनल जिओलॉजिकल काँग्रेसमध्ये पोस्टर प्रेझेंटेशनसाठी सहभागी व्हायची संधी मिळाली. त्यासाठी ‘इंटरनॅशनल स्टुडण्ट ट्रॅव्हल ग्रँट अवॉर्ड बाय द डिपार्टमेंट ऑफ सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ची ग्रँट मिळाली. परतल्यावर भाभा अणुसंशोधन केंद्राची (बीएआरसी) परिषद होती. त्यासाठीही फुल ग्रँट मिळली. तिला दर सहा महिन्यांनी विविध तज्ज्ञांसमोर प्रोग्रेस रिपोर्ट सादर करायला लागायचा. त्यानंतर त्यांचं मार्गदर्शन मिळायचं. हार्बिनमधले मार्गदर्शकही वेळोवेळी सूचना द्यायचे. काही आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सादरीकरण केल्यानंतर काही जणांना ते आवडलं, पटलं, काहींनी चांगल्या सूचनाही दिल्या. विविध परिषदा आणि कार्यशाळांमधल्या सहभागामुळे या क्षेत्रातील देशविदेशांतील तज्ज्ञांशी संपर्क साधता येतो, संवाद होतो आणि अनेकदा मौलिक मार्गदर्शनही मिळतं, असं तिला वाटतं. मीनल सांगते की, ‘‘मला अगदी सुरुवातीच्या काळात फार त्रास झाला प्रपोजल मांडताना, कारण विषयाचं नावीन्य आणि त्याचा समाजाला उपयोग हवा, त्याचे संदर्भही मिळायला हवे, या साऱ्या गोष्टी अनिवार्य होत्या. त्यामुळे विषयनिश्चिती करताना अवघड गेलं खूप. तेव्हा मी त्या थर्मल प्लांटला बाबांसोबत जाऊन आले. तिथल्या लोकांना त्यांच्या अडीअडचणी विचारल्या, क्षेत्रनिश्चिती केली. सॅम्पलिंगसाठी त्यांनी मला खूप मदत केली. पहिलं प्रपोजल नाकारलं गेलं. त्यात सुधारणा सुचवली गेली. हवेच्या नमुन्यांमध्ये हवेचा रोख कळणं, हे फार महत्त्वाचं आहे. राख किती, कुठपर्यंत वाहते हे पाहायला लागतं. दीड वर्षांच्या या काळात अशा अनेक बारीकसारीक मुद्द्यांचा अभ्यास करावा लागला. उडुपीमध्ये भाषेचा प्रश्न होता. तिथे तुळू बोली असल्याने फक्त इंग्रजीचा आधार होता. टॅक्सी ड्रायव्हर वासुदेव रावकाकांनी ही अडचण सोडविण्यासाठी खूप मदत केली. त्यांच्या मदतीने स्थानिकांच्या शंकांचं निरसन केल्यावर त्यांची सर्वतोपरी मदत मिळाली. स्थानिकांनी हवा, पावसाचं पाण्याचे नमुने चांगल्या रीतीनं गोळा केले होते.’’ एमआयटीने तिच्या या विषयाचं खूप कौतुक केलं. तसंच मंगलोर युनिव्हर्सिटीचे डॉ. बी. आर. मंजुनाथ आणि  एमआयटीचे डॉ. एच. एन. उदयशंकर यांनीही मीनलला मौलिक माहिती देत साहाय्य केलं. नंतरचं काम चटचट झालं. दोन हजार सॅम्पल्सचं विश्लेषण करताना प्रसंगी रात्ररात्र जागावं लागलं. लॅब टेक्निशियनवर अवलंबून न राहता यंत्रांच्या बाबतीतही स्वावलंबी व्हायला हवं, असं तिच्या मार्गदर्शकांचं मत होतं. ते मीनलने प्रमाण मानून प्रत्यक्षात आचरलं. यांत्रिक गोष्टींमध्ये अडकून न राहाता त्यातून मार्ग शोधायला शिकली. त्या काळात आई-बाबा-भावाचं डोकं खूप खाल्लं. मन रमवायला कल्पनारम्य, प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन करायची. तिला संगीत आवडतं. ती कथक शिकली असून पोस्ट डॉकला असताना तिने हार्बिनमध्ये नृत्य सादर केलं होतं. तिला पेंटिंगचीही आवड होती, असं ती सांगते.

तिच्या या संशोधनामध्ये भारतातील कोळशावर चालणाऱ्या औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राबाहेरच्या परिसरातील बहुवलयी अ‍ॅरोमॅटिक हायड्रोकार्बनचे (ढअऌ)) विविध सारण्यांमधील संभाव्य स्रोत आणि त्यांच्यात काळाप्रमाणे होणारा फरक याचा अभ्यास करण्यात आला. तिचा हा प्रबंध स्वीकारला गेल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत डॉ. यी फान ली यांनी तिला पोस्ट डॉकसाठी हार्बिन इन्स्टिट्यूटमध्ये येण्यासाठी पत्र पाठवलं. प्रोव्हिजनल सर्टिफिकेटवर तिला हार्बिनच्या ‘इंटरनॅशनल जॉइंट रिसर्च सेंटर फॉर परसिस्टंट ऑर्गनिक पोल्युण्टटस्’मध्ये प्रवेश मिळाला. तिथे तिला पूर्ण वेळ शिष्यवृत्ती होती. त्यानंतर सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात जवळपास सहा महिने गेले. डॉ. यी फान ली यांनी तिला पाच वर्षांचा आर व्हिसा (हाय लेव्हल टॅलेंट कॅटॅगरी ए) दिला आणि दोन वर्षांचा डोमेस्टिक व्हिसा दिला . ती सांगते, ‘‘मी ‘हार्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील डॉ. ली यी फॅन आणि डॉ. झँग झिंफेंग, डॉ. वॅन-ली मा आणि चीनमधील ‘इंटरनॅशनल जॉइंट सेंटर फॉर आक्र्टिक एन्व्हायर्नमेन्ट अ‍ॅण्ड इकोसिस्टम’ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘अकरन्स, डिस्ट्रिब्युशन ऑफ फार्मासिटिक ल अ‍ॅण्ड पर्सनल के अर प्रॉडक्ट्स इन अ‍ॅण्ड अराऊण्ड गंगा, यलो अ‍ॅण्ड यांगत्से रिव्हर बेसिन अ‍ॅण्ड इट्स इम्पॅक्ट ऑन द सेडिमेन्ट्स, रिव्हर वॉटर अ‍ॅण्ड ह््युमन हेल्थ’ हा शोधनिबंध लिहीत असून तो भारत आणि चीनमधील संयुक्त प्रकल्प आहे. डॉ. ली यी फॅन २०१६ मध्ये पटना विद्यापीठात आले असताना डॉ. सिन्हा यांच्या साहाय्याने त्यांनी गंगा नदीच्या गाळाचे नमुने गोळा केले होते. तसंच चीनमधील यलो आणि यांगत्से नद्यांच्या गाळाचे नमुनेही गोळा करून ठेवले होते. चीनमध्ये गेल्यावर माझं पोस्ट-डॉक्टरल रिसर्चसाठीच्या प्रपोजलचं रायटिंग सुरू झालं. याच दरम्यान २०१९ आणि २०२० मध्ये माझ्या पीएचडीसाठी केलेल्या कामावर लिहिलेले आणखी दोन शोधनिबंधही प्रसिद्ध झाले. प्रपोजल पूर्ण झाल्यावर या नुमन्यांच्या प्री-ट्रीटमेंटचं काम सुरू झालं. आठ महिन्यांमध्ये मी जवळपास पाचशे नमुन्यांचं परीक्षण केलं. त्यासाठीची साधनं कशी वापरायची, याचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. डॉ. झँग यांनी याबाबत अनेक गोष्टींसाठी विशेषत: लॅबवर्कमध्ये मार्गदर्शन केलं. गंगा, यांगत्से आणि यलो रिव्हर यांची तुलना करता गंगेची स्थिती पुष्कळ चांगली दिसून आली. आपल्याकडे फार्मासिटिकल्सचा वापर खूप होतो, तर चीनमध्ये पर्सनल केअर प्रॉडक्ट््सचा वापर जास्त होतो. याखेरीज तिथल्या नद्यांमध्ये कॉस्मॅटिक्समधल्या घटकांचं प्रमाण अधिक आढळतं. त्या तुलनेत गंगा नदीमध्ये अशा घटकांचं प्रमाण तुलनेनं कमी आढळलं. आपलं सांडपाणी व्यवस्थापन अजून प्रभावी कसं करता येईल आणि सांडपाण्यामध्ये आढळणाऱ्या हानिकारक के मिकल क म्पाऊंडचे प्रमाण अजून नियंत्रित कसे करता येईल, याचा अभ्यास सुरू आहे. फार्मासिटिकल्स आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट््सशी संबंधित या विषयावर एकूणात कमी काम झालं असून ते सध्याचे ऐरणीवरचे प्रश्न आहेत. त्याविषयी जागरूकता व्हायला हवी.’’ भारतात अशा पद्धतीचं शिक्षण देणारा अभ्यासक्रम सुरू व्हावा आणि देशातल्या या क्षेत्रात बरंच काही करता यावं, असं तिला मनापासून वाटतं. त्यासाठीचा सध्याचा निधी अपुरा असून यंत्रणांचे अडथळे चिक्कार आहेत. हे सगळं बदलायला हवं, असं ती तळमळीने सांगते.

गेल्या जानेवारीत (२०२०) चिनी नववर्षानिमित्त सुट्टी सुरू झाली, तेव्हा मीनल दीड महिन्याची सुट्टी घेऊन घरी परतली. नंतर करोना संकटाची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे ती सध्या इथेच आहे. तिथे असताना तिची सर्वतोपरी काळजी घेतली गेली, तिला चांगल्या सुविधा पुरवल्या गेल्या. मे २०२० मध्ये तिच्या पोस्ट डॉकच्या प्रबंधाचं ऑनलाइन परीक्षण झालं, त्यात ती यशस्वी ठरली. अलीकडेच मीनलने ‘अकरन्स, डिस्ट्रिब्युशन ऑफ फार्मासिटिक ल अ‍ॅण्ड पर्सनल के अर प्रॉडक्ट्स इन इंडियन अ‍ॅण्ड चायनीज रिव्हर वॉटर्स’ या विषयावरील शोधनिबंध पूर्ण केला आहे. तो ‘एन्व्हायर्नमेन्टल मॉनिटरिंग असेसमेन्ट’ या जर्नलमध्ये पाठवला असून तो लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. या शोधनिबंधातील विश्लेषणातून फार्मासिटिकल्स आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सची, त्यांनी निर्माण केलेल्या गाळामुळे होणारी हानी समजून घेता येईल. या रसायनांमुळे होणारे परिणाम अत्यंत संथ असले, तरी एका ठरावीक पातळीनंतर हे परिणाम कधीच फिरवता येत नाहीत. चीन आणि भारत हे अशा प्रकारच्या वस्तूंचे प्रचंड उत्पादन करणारे देश आहेत. हे देश या वस्तूंच्या वापरामध्ये जगात अनुक्रमे तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत.

मीनल ‘हार्बिन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील ‘थीमॅटिक नेटवर्क ऑन पीओपीज अ‍ॅण्ड के मिकल्स ऑफ इमर्जिंग कन्सर्न इन द एशियन आक्र्टिक ऑफ २०२०’ या ऑनलाइन कार्यशाळेत सहभागी झाली होती. ती नेटची परीक्षा देणार असून त्यासाठी ईव्हीएस अकॅ डमी एनटीए यूजीसी – एनईटी कोचिंग फॉर एन्व्हायर्नमेन्टल सायन्स इन्स्टिट्यूट’च्या मार्गदर्शनासह ऑनलाइन अभ्यासवर्गांना हजेरी लावते आहे. अलीकडेच डॉ. अतुल साने यांच्याशी तिचं लग्न झालं असून ती आता पुण्याला स्थायिक झाली आहे. पुण्याच्या ‘आगरकर इन्स्टिट्यूट’मधील डॉ. कार्तिक बी. तिला ‘डाएटॉम्स अ‍ॅण्ड मायक्रो प्लास्टिक अकरन्स इन रिव्हर वॉटर’ या प्रकल्पावर काम करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तिच्या या प्रवासात तिला दोन्ही कु टुंबियांकडून भक्कम पाठिंबा मिळतो आहे.

viva@expressindia.com