13 December 2019

News Flash

ध्येयाचा प्रवास

स्वप्नवत वाटत होतं सगळं.. ते पाहताना आठवू लागला माझ्या ध्येयाचा प्रवास..

एसआरएच युनिव्हर्सिटी, हायडेलबर्ग, जर्मनी

|| कृतार्थ धामणकर

इथे पहिल्यांदा बर्फवृष्टी बघितल्यावर मी खूपच एक्साइट झालो होतो. पहाटे सव्वापाच वाचता बर्फ पडणार हा अंदाज वाचून तसाच उठलो. एका क्षणी बर्फ पडायला सुरुवात झाली. ते पाहून मी घरी-मित्रांना व्हिडीओ कॉल करून ती बर्फवृष्टी दाखवत होतो. उजाडल्यावर सकाळी ७ वाजता सगळीकडे बर्फाचं साम्राज्य पसरलं होतं. स्वप्नवत वाटत होतं सगळं.. ते पाहताना आठवू लागला माझ्या ध्येयाचा प्रवास..

पुण्याच्या पीव्हीपीआयटीमध्ये मेकॅ निकल इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षांला असताना ठरवलं होतं की, पुढे मास्टर्स करणार. मला मुळात ऑटोमोबाइलची आवड होती. थोडी माहिती काढल्यावर कळलं की युरोप आणि जर्मनीमध्ये ऑटोमोबाइल आणि मेकॅ निकलया विषयांसाठी सुयोग्य संधी आहेत. तिथे मॅन्युफॅ क्च्युरिंगला मरण नाही. मला कोअर मॅन्युफॅ क्च्युरिंगमध्येच काम करायचं होतं. एक परीक्षा देऊन बघू, म्हणून जीआरई दिली होती; मात्र अमेरिकेत जायचा ट्रेण्ड अजिबात फॉलो करायचा नव्हता. महाविद्यालयाच्या चौथ्या वर्षांला असताना बजाजमध्ये नोकरी लागली. ‘एण्डय़ुरन्स टेक्नॉलॉजी लिमिटेड’मध्ये ‘सीनिअर इंजिनीअर इन ऑपरेशन्स’ या पदावर काम करताना जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रिया, मेक्सिको इत्यादी देशांतील सहकाऱ्यांसोबत काम करायची संधी मिळाली. तिथल्या कार्यसंस्कृतीची झलक दिसली. त्या कार्यसंस्कृतीचं आकर्षण वाटल्याने त्या संदर्भात मित्र आणि सीनिअर्सशी चर्चा केली. त्यातही जर्मनीतील ड्रीम कंपनी लक्षात घेऊन तिथे जायचं निश्चित केलं.

परदेशात शिकायला जायचा निर्णय घेतल्यावर लगेच जावं की थोडा अनुभव घेऊन जावं, या दुविधेत होतो. आधी अनुभव घ्यावा, नंतर शिकावं आणि मग नोकरी करावी, हा विचार पक्का झाला. त्यानुसार दोन र्वष नोकरी केली. तिथल्या वरिष्ठांचं चांगलं मार्गदर्शन लाभलं. जानेवारी २०१८ मध्ये अर्ज करायला सुरुवात केली. त्यात जर्मनी आणि युरोपातील देश होते. अभ्यासक्रमाची माहिती काढताना कोअर टेक्निकल नव्हे तर टेक्निकल मॅनेजमेंट शिकायचं मनाशी पक्कं होतं. जर्मनीतील ‘एसआरएच हायडलबर्ग युनिव्हर्सिटी’च्या ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग’ या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमाची माहिती समजली. त्यात इंजिनीअरिंग आणि आंतरराष्ट्रीय उद्योगजगतातील व्यवस्थापन या विषयांचा समावेश होता. मग जर्मनीतल्या काही सीनिअर्सकडून इथल्या तांत्रिक, सार्वजनिक आणि खासगी विद्यापीठांची माहिती समजली. त्यापैकी तीन ठिकाणांसह नेदरलॅण्ड, स्वीडनमध्ये अर्ज केले. हे सगळे अर्ज मंजूर झाल्याने निवडीचा प्रश्न उभा ठाकला. मग भारतीयांचं प्रमाण आणि नोकरीची संधी, फी जास्त आणि शिष्यवृत्ती नसणं, आणखी एक अभ्यासक्रम शिकण्याची अपेक्षा आदी मुद्दय़ांचा विचार करून चार ठिकाणं बाद केली. उरलेले पर्याय होते ‘एसआरएच हायडेलबर्ग’ आणि ‘एसआरएच बर्लिन’. त्यातही ‘एसआरएच हायडेलबर्ग’ ही जर्मनीतली नामांकित युनिव्हर्सिटी आहे. तिथला हा अभ्यासक्रम प्रसिद्ध असून तो इंग्रजीत असल्यामुळे देशविदेशांतील विद्यार्थी आवर्जून त्यासाठी येतात. त्यांचे हायडेलबर्ग आणि हाम अशा दोन ठिकाणी कॅ म्पस असून मी हाम कॅम्पसमध्ये शिकतो आहे.

परदेशी शिक्षणाचा निर्णय झाल्यावर बाबांची प्रतिक्रिया सकारात्मक होती. त्यांनी चटकन होकार दिला. त्यांना पुढच्या संधी माहिती होत्या. आईने माया, काळजी, प्रेमापोटी थोडं थांबवून पाहिलं; पण मी तिला सगळी माहिती देऊन राजी केलं. विद्यापीठाला मी होकाराचा ईमेल मे २०१८ मध्ये केला आणि अभ्यासक्रम ऑक्टोबरमध्ये सुरू होणार होता. पूर्वकल्पना देऊन मी नोकरी सोडली. विविध कागदपत्रांची पूर्तता करायच्या मागे लागलो. व्हिसासाठी कागदपत्रं दिल्यावर कळवण्यात आलं की, त्यातलं एक डॉक्युमेंट मिळत नाही. कारण तिथल्या कर्मचाऱ्यांना हायडेलबर्गचा एक कॅम्पस हाममध्ये आहे, हेच माहिती नव्हतं. ते स्पष्ट करणारं पत्र त्यांना हवं होतं. एवढं होईपर्यंत जुलै उजाडला. प्राध्यापकांशी संपर्क साधून प्रुफ ऑफ अ‍ॅकोमोडेशनचं पत्र द्यायची विनंती केली. त्यांनी पाठवलेल्या कागदपत्रांनिशी पुन्हा सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. काही दिवसांनी व्हिसा मिळायच्या प्रोसेसमध्ये आहे, अशा आशयाचा ईमेल आल्यावर तिकीट काढलं. जायच्या आधी जेमतेम आठ दिवसआधी व्हिसा मिळाला. मग खरेदीची धामधूम उडालीच. दरम्यान व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवरील मित्रांसह हाममधलं घर निश्चित केलं.

इथल्या डय़ुसेलडर्फ विमानतळावर पोहोचलो. पहिल्यांदाच एकटा बाहेर राहणार होतो. काहीसा एकटेपणा, जबाबदारीची जाणीव आणि थोडीशी उत्सुकता अशा संमिश्र भावना मनात होत्या. सामान लावताना पूर्ण ब्लँक होतो. काहीच सुचत नव्हतं. पुढचा अख्खा दिवस एकटा कसा घालवणार, हे कळत नव्हतं. घरी आईला म्हणायचो की, ‘थोडं मला एकटय़ाला राहू दे.’ आता तो एकटेपणा अनुभवण्याची खरी वेळ आली होती. भारतात ‘ए२’ लेव्हलपर्यंत जर्मन शिकलो होतो. माझ्या मित्राची ‘मॅक्सम्युलर’ची ‘बी१’ लेव्हल झाली होती. शिवाय त्याने जर्मनीतला महिन्याभराचा जर्मन अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामुळे भाषेचा प्रश्न आला नाही. आईने दोन महिने पुरेल एवढं सामान दिलं होतं. इथे आल्यावर पंधरवडय़ात #आईचं प्रेम असा व्हिडीओ पोस्ट केला समाजमाध्यमावर. माझ्या जेवणाखाण्याच्या काळजीपोटी आई डिसेंबरपर्यंत दर महिन्याला कुरिअर करत होती. कालांतराने घरून येणारं कुरिअर मित्रांच्या विनोदाचा – चर्चेचा विषय झालं होतं. त्या कुरिअरचे फोटोही मी शेअर केले वेळोवेळी. मला मुळात घरी काम करायची सवय होती. आता मी अनेक पाककृती करू शकतो. तरीही कुरिअर पाठवणं, हे शेवटी आईचं प्रेम आहे. इथे येऊ न मी अधिक चांगले पदार्थ करायला लागलो. आता मीच आईला चार गोष्टी सांगतो रेसिपीबद्दल!

महाविद्यालय सुरू झाल्यावर कळलं की, आमच्या कॅ म्पसवरच्या या अभ्यासक्रमाला सगळे भारतीयच आहेत.  एका मोठय़ा हॉलमध्ये मुख्य संचालक मंडळ, प्राध्यापक आणि आम्ही विद्यार्थी हजर होतो. सगळ्यांची ओळख झाली. आमच्यासाठी एकेक बडी अर्थात स्थानिक विद्यार्थी मार्गदर्शक महाविद्यालयातर्फे नेमण्यात आला होता. त्याच्या मदतीने आपापल्या समस्यांचं निवारण करणं अपेक्षित होतं.  महाविद्यालयाच्या वेबसाइटवरून सगळी माहिती मिळते. सगळे प्राध्यापक मस्त शिकवतात.

जानेवारीपासून मॅकडोनाल्डमध्ये अर्धवेळ नोकरी करायला लागलो. तिथे जर्मन, बांगलादेशी, पाकिस्तानी आदी लोकांशी ओळख झाली. आता ही नोकरी सोडली आहे. आमचा वर्क व्हिसा मिळाल्याने दुसरीकडे नोकरी शोधता येणार आहे. सहा महिन्यांनी घर बदलल्यावर सध्या एक भारतीय आणि दोन जर्मन मित्रांसह राहतो आहे. त्यांना भारतीय संस्कृतीबद्दल खूपच कुतूहल वाटतं. त्यांच्याशी खाद्यपदार्थ, फिरस्तीची ठिकाणं, क्रि केटविषयी गप्पा होतात. ते आपले पदार्थ आवर्जून खातात. उदाहरणार्थ – एकदा पिठलं केलं होतं. ते त्यांनी आवडीने खाल्लं. काही वेळा थोडे कटू अनुभवही वाटय़ास आले. एका दुकानात आमच्यासारखेच गिऱ्हाईक म्हणून आलेल्या एका गृहस्थांनी भारतीय का, असं विचारलं. आमचा होकार आल्यावर त्यांनी त्यांच्या भारतातल्या आठवणी सांगताना मुंबईविषयी नकारार्थी बोलायला सुरुवात केली. त्यावर आम्ही आमचे मुद्दे मांडले, ते त्यांना फारसे पटले नाहीत.

आमचे प्राध्यापक त्या त्या विषयातली तज्ज्ञ आणि अनुभवी मंडळी आहेत. त्यामुळे आम्ही अपडेट राहतो. इन्व्हेस्टमेन्ट विषयाचे प्राध्यापक काही कंपन्यांचे गुंतवणूक विश्लेषक असल्याने ही संकल्पना सुस्पष्ट शिकता आली. त्या विषयांतली गोडी अशा गोष्टीमुळे वाढते. कारण केवळ पुस्तकी ज्ञान शिकायचं म्हटल्यास ते रटाळ वाटू शकतं. विशेषत: इंजिनीअर्सना व्यवस्थापनातल्या गोष्टी शिकवणं, ही प्राध्यापकांसाठी अवघड गोष्ट असावी; पण ते ती सहजगत्या करतात. एखादी संकल्पना शिकवल्यावर त्यावर ग्रुप प्रेझेंटेशन करावं लागतं. छोटे प्रोजेक्ट दिले जातात. एकेका कंपनीचं विश्लेषण पीपीटीवर द्यावं लागतं. ‘बिझनेस रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅनालिसिस’ असा विषय होता. त्यात उद्योगविस्तार करण्यासाठी कोणतं धोरण आखलं पाहिजे, असा मुद्दा अभ्यासायचा होता. आमचं गूगल कंपनीच्या ‘व्हीआरआयओ’ संकल्पनेवरचं प्रेझेंटेशन सगळ्यांना आवडलं होतं. त्यात मला वन पॉइंट मिळाला होता. इथे वन म्हणजे सगळ्यात छान आणि ५ म्हणजे कमी असं मानलं जातं. ‘बिझनेस स्टार्टअप’ या विषयात एक काल्पनिक कंपनी स्थापन करून तिचा विस्तार दाखवायचा होता. आमचं ते प्रेझेंटेशनही चांगलं झालं होतं. मध्यंतरी आम्ही प्लास्टिक मोल्डिंग करणाऱ्या एका कंपनीला अभ्यासभेट दिली होती. भेट संपल्यावर जर्मन भाषेत कंपनीतल्या लोकांच्या आभाराचं भाषण कोण करेल, असं आमच्या प्राध्यापकांनी विचारलं. पुण्यातल्या पुरुषोत्तम आणि फिरोदिया एकांकिका स्पर्धामधल्या सहभागामुळे मी सभाधीट आहे. त्यामुळे मी पटकन आभारप्रदर्शन केलं. त्या लोकांना माझी जर्मन भाषेत बोलण्याची धडपड आवडली. इथले सगळे प्राध्यापक वेळेचे पक्के आहेत. त्यांनी ठरवलेल्या वेळापत्रकानुसारच शिकवलं जातं. त्यामुळे वेळेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं. नोकरीचा अनुभव गाठीशी असल्याने फरक पडतो. व्यवस्थापनातले विषय आम्ही प्रत्यक्षात वापरले, अनुभवले असल्याने ते समजायला सोपे जातात. तुलनेने फ्रेशर्सना ते समजायला थोडंसं कठीण जातं.

इथल्या आखेन शहरात क्रिकेट लीग होते. आम्ही महाविद्यालयातर्फे त्यात सहभागी होऊन सेमी फायनलपर्यंत पोहोचलो होतो. पुढच्या सेमिस्टरमध्ये आणखी काही इव्हेंट्स होणार आहेत. अद्याप चर्चेत असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तानचा सामना आम्ही महाविद्यालयाच्या सभागृहात प्रोजेक्टवर पाहायची परवानगी मागितली होती आणि ती मिळालीदेखील. इथे प्रत्येक ठिकाणी चार प्रकारच्या कचरापेटय़ा असतात. तसा कचरा टाकायची हाताला सवयच लागली आहे. जर्मन लोक फिटनेसप्रेमी आहेत. जिम, व्यायाम, धावणं आदी ठरलेल्या गोष्टींत अजिबात हयगय करत नाहीत. माझा जर्मन रूममेटही काहीही झालं तरी जिमला जातो. माझी फिटनेसची आवड इथे दुणावली. इथल्या रंगभूमीशी अजून तोंडओळख झालेली नाही. एखाद्या नाटकाचा प्रयोग बघितला नाही; पण तोही बघायचा आहे. शिवाय हायकिंग आणि सायकलिंग या गोष्टीही करायच्या आहेत. माझा अभ्यासक्रम संपल्यावर इथे नोकरी शोधून थोडा अनुभव घेणार आहे. त्यानंतरचा विचार पक्का झालेला नाही, पण भारतात परत यायचा विचार आहे. पहिल्या काही दिवसांत स्वप्नवत वाटलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आकाराला येऊ  लागल्या आहेत. स्वप्नांचा प्रवास आत्ताशी सुरू झाला आहे..

कानमंत्र

  • एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर ठाम राहा.
  • जर्मन भाषा शिकून आलात तर गोष्टी सुकर होतील.

शब्दांकन : राधिका कुंटे

viva@expressindia.com

First Published on August 2, 2019 12:05 am

Web Title: srh university heidelberg mpg 94
Just Now!
X