03 March 2021

News Flash

चित्रभाषेत रमणारा श्रीहरी

क्षण एक पुरे!

|| वेदवती चिपळूणकर

‘कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आर्ट्स, न्यू यॉर्क’ इथून ‘एम. एफ. ए. इन फिल्म’ केलं आणि त्याचं करिअर अर्थशास्त्र सोडून चित्रपटाच्या वाटेवर चालायला लागलं. २०१४ या वर्षी त्याने संपूर्णत: त्याची असलेली पहिली फीचर फिल्म केली आणि त्याचं नाव भारतातही अनेक पुरस्कारांवर कोरलं गेलं.

बारावीपर्यंतचं त्याचं शिक्षण मुंबईतच झालं. इकॉनॉमिक्स हा आवडीचा विषय आणि सोबतीला फिल्म स्टडीज त्याने घेतलं. अभ्यासाचं असं कॉम्बिनेशन त्याला ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन अरबोर इथे सापडलं. बारावीनंतरच भारताबाहेर शिक्षण घ्यायचा निर्णय घेऊन त्याने उड्डाण केलं. मात्र तिथे गेल्यावर इकॉनॉमिक्सपेक्षा ‘फिल्म स्टडीज’ हा विषय त्याला जास्त जवळचा वाटायला लागला. इकॉनॉमिक्स सोडून फिल्ममध्ये त्याने ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन अरबोर’मधून ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन फिल्म’ आणि ‘बॅचलर ऑफ आर्ट्स इन ग्लोबल मीडिया अ‍ॅण्ड कल्चर’ केलं. त्यानंतर त्याने ‘कोलंबिया युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ आर्ट्स, न्यू यॉर्क’ इथून ‘एम. एफ. ए. इन फिल्म’ केलं आणि त्याचं करिअर अर्थशास्त्र सोडून चित्रपटाच्या वाटेवर चालायला लागलं. २०१४ या वर्षी त्याने संपूर्णत: त्याची असलेली पहिली फीचर फिल्म केली आणि त्याचं नाव भारतातही अनेक पुरस्कारांवर कोरलं गेलं. जगभरातली फिल्म फेस्टिव्हल्स गाजवलेला हा तरुण म्हणजे श्रीहरी साठे.

मुंबईत लहानाचा मोठा झालेला आणि सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई इथून बारावीपर्यंतचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेला श्रीहरी साठे अर्थशास्त्राची आवड म्हणून अमेरिकेत गेला. मात्र अर्थशास्त्र सोडून देऊन ‘फिल्म स्टडीज’ या विषयात त्याने पदवी घेतली. अर्थशास्त्र सोडून देण्याचा निर्णय त्याच्यासाठी खूप मोठा आणि महत्त्वाचा ठरला. अर्थशास्त्र सोडून फिल्म्समध्ये वाढत गेलेल्या इंटरेस्टविषयी बोलताना तो म्हणतो, ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन अरबोर’मध्ये मला खूप सारे विषय एक्स्प्लोअर करायला मिळाले. अ‍ॅस्ट्रॉनॉमी, बायोलॉजी, लिंग्विस्टिक्स असे विषयही मी तिथे थोडेफार शिकलो, त्यांची माहिती घेतली. मुख्यत: मी अर्थशास्त्रावर लक्ष ठेवून माझी डिग्री घेणार होतो. मात्र अभ्यास करायला लागल्यावर मला हे जाणवायला लागलं की माझं अर्थशास्त्रात काही विशेष लक्ष लागत नाहीये आणि मला त्यात विशेष छान मार्क्‍स वगैरेही मिळत नव्हते. थोडक्यात, माझा इकॉनॉमिक्समधला परफॉर्मन्स काही फार चांगला नव्हता. मायक्रो-इकॉनॉमिक्स हा प्रकार काही माझ्या विशेष पचनी पडत नव्हता, मात्र मॅक्रो-इकॉनॉमिक्स मला चांगलं जमत होतं. पण त्यातच नंतर मेजर करायचं असेल तर मला सगळंच यायला हवं होतं. उलट, मला माझा दुसरा विषय, फिल्म स्टडीजमध्ये प्रचंड रस निर्माण व्हायला लागला होता. मुंबईत असतानाही मी कॉलेजमध्ये अशा अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये असायचो. त्यामुळे माझं दुसरं ध्येय होतं फिल्म्सचं ते आता माझं पहिलं ध्येय बनलं’.

केवळ एखाद्या विषयाची आवड असणं आणि त्यात संपूर्ण करिअरचं स्वप्न पाहणं ही सोपी गोष्ट कधीच नसते. इकॉनॉमिक्ससारखा खात्रीशीर नोकरी देणारा विषय सोडून फिल्म्समध्ये काहीतरी करायची ऊर्मी बाळगणं आणि प्रत्यक्षात तशी निवड करणं ही श्रीहरीसाठी त्याच्या करिअरसाठीची पहिली पायरी होती. या निर्णयाविषयी त्याने सांगितलं, ‘ज्या उद्देशाने यू.एस.ला गेलो तो उद्देश ३६० अंशात बदलला. अर्थशास्त्र हा आवडता विषय म्हणून मी निवडला होता आणि प्रत्यक्ष शिकताना माझी आवड बदलली. मात्र ती बदललेली आवड प्रत्यक्षात आणण्यासाठी थोडीशी हिंमत करावी लागणार होती’. आईबाबांचा त्याला पूर्ण सपोर्ट होता. पण या क्षेत्रात शाश्वत काहीच नसतं. त्यामुळे तुझी हार्डवर्क करायची तयारी असेल तर या वाटेला जा असं मात्र मला आईबाबांनी सांगितलं होतं. फिल्म्सच्या माझ्या निवडीसाठी माझ्याइतकेच तेही उत्साही होते. करून बघितल्याशिवाय आपल्याला जमतंय की नाही हे कसं कळणार?, हा प्रश्न मी स्वत:ला विचारून या क्षेत्रात पुढे जायचं ठरवलं, असं श्रीहरी सांगतो.

२०१४ या वर्षी श्रीहरीने संपूर्णत: स्वत:ची असलेली ‘एक हजाराची नोट’ ही फीचर फिल्म प्रदर्शित केली. तिच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षांव झाला. केवळ भारतातच नव्हे तर इटली, स्पेन, फिजी अशा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्येही वेगवेगळ्या पुरस्कारांनी या फिल्मला गौरवण्यात आलं. ही फिल्म त्याच्यासाठी यशाची एक महत्त्वाची पायरी ठरली. आता ही फिल्म नेटफ्लिक्सवरही ‘१००० रुपी नोट’ या नावाने पाहता येऊ  शकते आहे. या फिल्मच्या संदर्भात बोलताना तो म्हणतो, ‘कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये आम्हाला फिल्ममेकिंगमधील केवळ थिअरी न शिकवता त्याची तांत्रिक बाजूही सखोलपणे शिकवली गेली. एडिटिंग, प्रॉडक्शन, फोटोग्राफी या सगळ्याच गोष्टी अगदी बारकाईने आम्ही शिकलो. त्यामुळे स्वत:च्या बळावर संपूर्ण फिल्म बनवण्याचा आत्मविश्वास येत गेला. या फिल्मचं शूटिंग आम्ही पुण्यात साडेतीन आठवडे करत होतो. ही फिल्म माझी एकटय़ाची असली तरी त्याचं संपूर्ण श्रेय माझं एकटय़ाचं नाही. त्यात श्रीकांत बोजेवार यांचा खूप मोठय़ा प्रमाणावर सहभाग आहे. एखादी फिल्म बनणं ही एक मोठी प्रोसेस असते आणि ते टीमवर्क असतं. त्यामुळे चांगले कोलॅबोरेटर्स मिळण्याच्या बाबतीत मी स्वत:ला नशीबवान समजतो.’

अनिश्चित असलेल्या या क्षेत्रात येताना ‘टेक रिस्क’ हाच मंत्र महत्त्वाचा असल्याचं श्रीहरीचं मत आहे. ‘जोपर्यंत आपण करून पाहत नाही तोपर्यंत आपल्याला स्वत:च्या क्षमता समजणार नाहीत’, असं तो म्हणतो. ‘सतत काम करत राहणं हेच या क्षेत्रात सर्वात महत्त्वाचं असतं. मात्र सतत काम करताना त्याच चुका पुन्हा पुन्हा होत नाहीत ना याकडे लक्ष दिलं तर हळूहळू आपलं काम सुधारत जातं. इन्स्टंट यश मिळणं हे कोणत्याच क्षेत्रात होत नाही, या क्षेत्रात तर नाहीच नाही. त्यामुळे आपली चिकाटी आणि पेशन्स या जोरावरच आपण प्रगती करू शकतो’, असं तो आग्रहाने सांगतो. चुका झाल्या तर त्यातून शिकून पुढे जाण्यातच शहाणपण आहे. स्वत:वरचा विश्वास जितका महत्त्वाचा आहे तितकाच महत्त्वाचा आहे तो म्हणजे इतरांवरचा विश्वास! फिल्म हे टीमवर्कचं उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या साथीदारांवर आपला विश्वास असणं ही या क्षेत्रातील खूप गरजेची बाब आहे. या सगळ्याच बाबतीत स्वत:ला हळूहळू डेव्हलप करावं लागतं, असंही त्याने सांगितलं.

कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून स्वत: शिकून तिथेच शिकवणाऱ्या श्रीहरी साठेला जगभरातून गेस्ट लेक्चरर म्हणून बोलावलं जातं. जगभरात पोहोचलेल्या या तरुण मराठी नावाबद्दल निश्चितच सर्वाना अभिमान वाटेल!

आपल्यासारखा विचार करणारी माणसं आपल्या आजूबाजूला असतातच असं नाही. पण आता सोशल मीडियाने संपूर्ण जग जवळ आणलं आहे. त्यामुळे आपल्या विचारांची माणसं शोधणं तितकंसं अवघड राहिलेलं नाही. जेव्हा आपले विचार आपल्या आसपासच्या माणसांना पटत नाहीयेत असं वाटतं तेव्हा आपल्यापासून दूर असलेल्या पण विचारांनी समान असलेल्या माणसांना शोधावं. त्यांच्याबरोबर विचारांची देवाणघेवाण होते आणि आपल्याला मानसिक बळही मिळतं. आपल्या निवडीला सूट होतील अशा माणसांच्या संपर्कात राहिल्याने आपण आपल्या निवडीवर ठाम राहू शकतो.’  – श्रीहरी साठे

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 7:52 pm

Web Title: srihari
Next Stories
1 स्त्री
2 भार्गवी चिरमुले
3 तंत्रज्ञान, संशोधन आणि बरंच काही
Just Now!
X