12 August 2020

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य

बन्सल मंडळींनी स्वत:ची ‘फ्लिपकार्ट’ नामक वेबसाइट बनवायला त्यांच्या पदरचा पैसा वापरला.

डॉ. अपूर्वा जोशी

स्टार्टअप ही एक क्लिष्ट संकल्पना आहे, स्टार्टअप म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते नावीन्य आणि नवीन तंत्रज्ञानाची आस घेतलेली तरुणाई. त्यासोबत येतात ती कोटीच्या कोटी उड्डाणे करणारी त्यांची मूल्यांकनं. कंपनीचे मूल्यांकन हजार कोटी झाले असे आपण ऐकतो खरे,  पण बऱ्याचदा ही मूल्यांकनं मृगजळासारखी असतात. प्रत्यक्षात हे हजार कोटी मूल्यांकन हे राहत्या घराचे मूल्य ठरवण्यासारखे असते.  फरक एवढाच आहे की राहते घर आपण सहसा तुकडय़ा तुकडय़ात विकू शकत नाही, पण स्टार्टअपमधला हिस्सा सतत विकला जात असतो. या सततच्या हिस्सा विक्रीला स्टार्टअपच्या दुनियेत ‘फंडिंग राउंड’ किंवा ‘गुंतवणुकीच्या फेऱ्या’ असं  म्हटलं जातं.

मी अनेक  प्रवर्तकांना भेटत असते, ज्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की एकदा गुंतवणूकदाराने पैसे दिले की आपलं आयुष्यच  बदलणार आहे.  रोज सर्वत्र फंडिंग राउंड्सच्या येणाऱ्या बातम्यांमुळे असा समज होणं स्वाभाविक आहे, पण स्टार्टअपच्या विश्वात सतत पैसे उभे करतच राहावे लागतात. प्रत्येक फेरीत वेगळे गुंतवणूकदार आणि वेगळ्या मूल्यांकनाचे वादे केले जातात. प्रत्येक टप्प्यावर गुंतवणूकदारांकडून उद्योजकांविषयी आणि त्यांच्या स्टार्टअप्सबद्दल भिन्न अपेक्षा असतात. अपवादात्मक  परिस्थिती वगळता दर १२ ते १८ महिन्यांनी एका तोड कल्पनेवर आधारित स्टार्टअपला पैसे उभे करत जावेच लागते.  ‘फ्लिपकार्ट’ कंपनीचे संपूर्ण अधिग्रहण होईपर्यंत कंपनीने २२ फेऱ्यांद्वारे तब्बल बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक  उभी केली होती. ‘फ्लिपकार्ट’चं हे उदाहरण मी दर वेळेस देते कारण त्याने बऱ्याच संकल्पना समजायला सोप्या जातात.

बूटस्ट्रॅपिंग

बन्सल मंडळींनी स्वत:ची ‘फ्लिपकार्ट’ नामक वेबसाइट बनवायला त्यांच्या पदरचा पैसा वापरला. बहुतेक स्टार्टअपची सुरुवात ही पदरच्या पैशातून किंवा मित्रमंडळींच्या पैशातून होते. मग त्यातून कल्पनेवर काम केले जाते, एखादी वस्तू अथवा सेवा त्यातून तयार केली जाते आणि मग त्याच्या विक्रीतून जे पैसे येतात ते पुन्हा व्यवसायात गुंतवले जातात. हा सुरुवातीचा  टप्पा  म्हणजे बूटस्ट्रॅपिंग. हा टप्पा अनेक कंपन्या पार करू शकत नाहीत, कंपनी प्रवर्तकांची लढवय्या आणि सर्जनशील वृत्ती यामुळेच हा टप्पा पार करता येतो.

जितका जास्त वेळ संस्थापक बूटस्ट्रॅप करू शकतो तितक्या अधिक प्रमाणात वाटाघाटी करण्याची क्षमता कंपनीकडे निर्माण होत जाते. या टप्प्यावर संस्थापक आपले लक्ष उद्दिष्टावर केंद्रित करतात; आपल्याकडे असणारे पैसे ते अधिक कार्यक्षमतेने वापरायला सुरुवात करतात आणि त्यातून निर्माण होतो तो कंपनीचा आर्थिक इतिहास. आजकाल तर प्रवर्तक आपल्याकडे स्वत:चे पैसे गुंतवणुकीसाठी नसल्यास आपण वैयक्तिक कर्ज काढून  किंवा  क्रेडिट कार्डवर खर्च करून कंपनीचे खर्च भागवतात. या टप्प्यातच अनेक स्टार्टअप नामशेष होतात, अनेक कल्पना मृतप्राय होतात.

प्री सीड फंडिंग

या टप्प्यात व्यावसायिक आणि संस्थात्मक भांडवलांची भूमिका फारशी नसते. प्री सीड फंडिंग मिळवण्यासाठी अनुदान किंवा व्यावसायिक स्पर्धा असतात. भारतात आयआयएम, आयआयटीपासून ते विविध मोठय़ा शैक्षणिक संस्था या स्पर्धा भरवतात आणि  सुरुवातीचा निधी (अर्ली फंडिंग) व्यवसायात गुंतवतात. ही रक्कम साधारण एक ते  दहा लाख रुपयांच्या आसपास असते.

या स्टार्टअप स्टेजवरील बहुतेक पैसा मित्र आणि कुटुंबीयांकडूनसुद्धा बऱ्याच वेळेस येतो. आपल्या जवळच्या कुटुंबातील आणि मित्रांकडे ही क्षमता आहे असे आपल्याला वाटत नसले तरीही त्यांचे मित्र आणि कुटुंब आणि त्यांचे मित्र कदाचित हे करू शकतात. तुमचे सर्कल पुरेसे पुश केले तरीही गुंतवणूक करण्याची क्षमता आणि स्वारस्य असलेले लोक तुम्हाला दिसतील. तुम्ही  कोणास इक्विटी/ समभाग देत आहात आणि या टप्प्यावर तुम्ही किती नियंत्रण सोडून देत आहात याबद्दल फक्त सावधगिरी बाळगा.

सीड स्टेज फंडिंग

जेव्हा स्टार्टअप्ससाठी फंडिंग राउंड कसे कार्य करतात?, हा अभ्यास तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला हे लक्षात येईल फंडिंग अधिक औपचारिक होण्यास या टप्प्यात सुरुवात होते. उद्योजक अद्याप या टप्प्यावर मोठय़ा प्रमाणात स्टार्टअप आयडिया पिच करण्यावर जोर देतात. स्टार्टअप प्रवेगक (अ‍ॅक्सलरेटर – हे शिक्षण, मार्गदर्शन आणि वित्तपुरवठा या माध्यमातून प्रारंभिक टप्प्यात, वाढ—चालित कंपन्यांचे समर्थन करतात) या टप्प्यावर माफक निराकरण आणि सहा आकडय़ांच्या पटीत भाग घेऊ शकतात.

या फेरीमध्ये अधिक चांगल्या अटी मिळविण्याकरता बरेच फंड्स स्टार्टअप शोधत असले तरीही सर्वसामान्यपणे  गुंतवणूकदार हा या टप्प्यातला ‘एंजल इन्व्हेस्टर’ असतो. या टप्प्यावर गुंतवणूक करणे गुंतवणूकदारांसाठी एक मोठी जोखमेची बाब आहे. ते जोखीम पाहून तुमच्या इक्विटीचा तितकाच ‘आकारमान’ (साइझेबल) तुकडा घेतील. तुमचे वैयक्तिक नेटवर्क, तुमच्या नातेसंबंधांची ताकद आणि पिच डेक तुम्हाला ही फेरी पार करायला मदत करेल.

सीरिज ए फंडिंग

जेव्हा तुम्ही स्टार्टअप्ससाठी फंडिंग राउंड्सच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करत आहात, तेव्हा स्टार्टअप फंडिंगचा अधिक काळजीपूर्वक वापर करणे आणि त्यावर देखरेख करणे, हे या टप्प्यात सुरू होते असे लक्षात येईल. तुम्ही आधीच जमा केलेल्या पैशांचा चांगला वापर करत आहात  हे दाखवणं इथे आवश्यक आहे ; तुमच्याकडे तुमचं सोल्यूशन कार्यरत आहे, त्याला चांगली मागणी आणि चांगला अभिप्राय आहे याचा पुरावा इथे देणं जरुरीचं असेल. तुमच्याकडे असा डेटा ठेवा जो संभाव्य गुंतवणूकदार पाहू शकतात, मागोवा घेऊ शकतात आणि मूल्यमापन करू शकतात. या फेरीमध्ये उभे केलेले पैसे तुम्हाला तुमच्या स्टार्टअप कन्सेप्टचा प्रभावी वापर (ऑप्टिमाइझ), पॉलिश आणि सुसूत्रता (सिस्टमाइझ ) करण्यात मदत करतील. या टप्प्यात विविध प्रकारचे गुंतवणूकदार सहभागी होऊ शकतात. त्यात एंजल ग्रुप्स, फॅमिली ऑफिसेस, प्रायव्हेट इक्विटी आणि कॉर्पोरेट व्हेंचर कंपन्यांचा समावेश असू शकतो.

क्रमश:

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2020 1:35 am

Web Title: startup funding round how funding rounds work for startups 70
Next Stories
1 ‘आपली’ गोष्ट
2 परीक्षा ‘लॉक’डाऊन  की ‘अन’लॉक?
3 रंजनापलीकडचे मूकनाटय़
Just Now!
X