10 April 2020

News Flash

सदा सर्वदा स्टार्टअप : कल्पनेची स्टार्टअप भरारी

स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनांचा सुकाळ. एखादा क्लिष्ट किंवा जटिल प्रश्न सोडवायच्या कल्पनेवर आधारित केलेल्या व्यवसायाची निर्मिती.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अपूर्वा जोशी

स्टार्टअपसाठीच्या कल्पना मुळात सुचतात कशा? खरं सांगायचं तर आज कल्पनांचाही बाजार मांडला गेला आहे. इंटरनेटवर सर्वोत्कृष्ट १० स्टार्टअप कल्पना या विषयांवर अनेक ब्लॉग्स वाचायला मिळतात; पण कल्पना ते प्रत्यक्ष स्टार्टअप हा एक प्रवास असतो. अशा इंटरनेटवर कल्पना वाचून स्टार्टअप सुरू करता येत नाही.

स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पनांचा सुकाळ. एखादा क्लिष्ट किंवा जटिल प्रश्न सोडवायच्या कल्पनेवर आधारित केलेल्या व्यवसायाची निर्मिती. हे सदर लिहीत असताना मी जेव्हा काही नवयुवकांशी बोलत होते तेव्हा त्यातल्या अनेक जणांनी मला एक प्रश्न विचारला, की स्टार्टअपची नोंदणी, भांडवल, मनुष्यबळ वगैरे तरी पुढच्या गोष्टी झाल्या; पण स्टार्टअपसाठीच्या कल्पना मुळात सुचतात कशा? खरं सांगायचं तर आज कल्पनांचाही बाजार मांडला गेला आहे. इंटरनेटवर सर्वोत्कृष्ट १० स्टार्टअप कल्पना या विषयांवर अनेक ब्लॉग्स वाचायला मिळतात; पण कल्पना ते प्रत्यक्ष स्टार्टअप हा एक प्रवास असतो. अशा इंटरनेटवर कल्पना वाचून स्टार्टअप सुरू करता येत नाही.

कल्पना सुचतात त्या आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनातून, आपण पाहत असलेल्या समस्यांतून. शहरे अक्राळविक्राळ वाढायला लागली, टॅक्सीचालक अपुरे पडायला लागले, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडून पडायला लागली तेव्हा या समस्येतून कोणाला तरी सुचली एक कल्पना, एक मोबाइल अ‍ॅप बनवायची ज्यायोगे तुमच्या भागात उपलब्ध असलेल्या कॅब्स मोबाइलवरच दिसतील, गरज असेल तेव्हा त्या बोलावताही येतील. याच कल्पनेवर चालू झालेली ‘उबेर’ ही जगातील सगळ्यात जास्त व्हॅल्युएशन मिळालेली कंपनी बनली आहे.

गरज हीच शोधाची जननी असते. गरज पडली की माणूस विचार करायला लागतो, समस्या भेडसावायला लागल्या, की तो त्या सोडवायचा विचार करू लागतो, प्रयोग करायला लागतो, बऱ्याचदा प्रयोग फसतात, पण नवीन कल्पना यशस्वी करायला अपयश पाहावंच लागतं. गूगल आणि फेसबुकही या अपयशाचा सामना करण्यापासून चुकले नाहीत. प्रायोगिक तत्त्वावर चालू केलेले गूगल लॅब्स, गूगल व्हिडीओ, गूगल आन्सर्स, गूगल वेव्ह असे किती तरी प्रयोग फसले तरी गूगल प्रयोग करतच राहते. तिथे तुमची आमची काय कथा?

एखादी समस्या जेव्हा आपण पाहतो तेव्हा तीच समस्या अजून कोणाला भेडसावते आहे का याची चौकशी सुरू होते. समस्येमधून संपत्ती निर्माण करायची याचंच नाव तर स्टार्टअप आहे.

अशाच एका माणसाच्या समस्येतून निर्माण झाली ती आजची एक खूप मोठी जागतिक व्हिडीओ स्ट्रीमिंग कंपनी. एकदा रीड हेस्टिंग्ज नावाच्या एका इसमाने अमेरिकेत कोणती तरी एक डीव्हीडी ब्लॉकबस्टर नावाच्या दुकानात जाऊन भाडय़ाने घेतली. ती परत करण्यास त्याला उशीर झाला. नियमाप्रमाणे त्याला अतिरिक्त शुल्क भरावे लागले. खरं तर हा विलंब होण्यास अनेक कारणं होती, पण ते महत्त्वाचं नव्हतं. पहिले तर दुकानात जा, डीव्हीडी घ्या, मग ती पाहा, मग ती वेळेत परत करायला परत दुकानात जा, यात ग्राहकाचा खूप वेळ जात असे.

रीड हेस्टिंग्जला त्यातून एक कल्पना सुचली. डीव्हीडी घरपोच देण्याची, चित्रपटांची माहिती इंटरनेटद्वारे मिळवण्याची. ही नुसती कल्पना नव्हती तर त्याने लगेच या कल्पनेवर काम सुरू केलं, आपल्या भागीदारांशी बोलणी सुरू केली, ती कल्पना त्यांनी जोपासली, मोठी केली आणि त्यातून उभी राहिली ती आज भारताच्या व्हिडीओ स्ट्रीमिंगमध्ये धुमाकूळ घालणारी ‘नेटफ्लिक्स’. जगभरात बघितल्या जाणाऱ्या व्हिडीओपैकी सरासरी ८ टक्के व्हिडीओ हे एकटय़ा ‘नेटफ्लिक्स’ प्लॅटफॉर्मवर बघितले जातात.

कल्पना सुचणे ही काही एका दिवसाची प्रक्रिया नाही. त्याच्या मागे असते ती दीर्घ तपस्या. कल्पना सुचल्यावर त्याचा अभ्यास करायला लागतो, ग्राहकांच्या मानसिकतेचा अभ्यास करावा लागतो, कच्च्या मालाचे पुरवठादार शोधावे लागतात. अनेकांच्या गळ्यात तुमच्या तंत्रज्ञांची कल्पना अक्षरश: उतरवावी लागते. त्यासाठी संवाद हे फार प्रभावी माध्यम असते, पण मराठी माणूस भिडस्त असतो आणि म्हणूनच फार मराठी माणसांची नावं स्टार्टअपसोबत जोडलेली दिसत नाहीत.

मी एक गोष्ट मराठी माणसांमध्ये पाहिली आहे, आपण आपल्या कल्पना लोकांशी बोलायला घाबरतो. याची दोन कारणं असतात – एक म्हणजे आपण टीकेला घाबरतो आणि दुसरं म्हणजे आपली कल्पना कोणी तरी चोरेल अशी भीती असते; पण कल्पनेतून स्टार्टअपकडे वाटचाल करत असताना टीकाकार अनन्यसाधारण भूमिका बजावतात. आपल्या देशात स्टार्टअप सुरू होऊन काही दिवसांत त्याचा गाशा गुंडाळला जाण्याचं प्रमाण प्रचंड आहे, म्हणून आपल्याला स्टार्टअपचे टीकाकार भेटले तर ते योग्यच समजावे. कल्पनाचौर्याची भीती हा मात्र एक भ्रमच असतो. आपण आपली कल्पना सांगितली की, लगेच कोणी तरी त्यावर काम चालू करून आपली कल्पना पळवेल अशी भीती असणारे अनेक युवक मी आज पाहते. प्रत्यक्षात वास्तव काही वेगळेच असते. अनेक जण ज्यांच्याशी आपण आपल्या कल्पना बोलतो त्यातले खूप जण आळशी असतात, काही खूप व्यग्र असतात, तर काही जण आपल्या कल्पनेवर आपल्या इतके प्रभावितच झालेले नसतात. कल्पना बोलत गेल्याने त्या परिपक्व होत जातात आणि स्टार्टअप क्षेत्रात असं म्हणतात, की त्या बोलत गेल्याने तुम्हाला गुंतवणूकदारदेखील मिळायची शक्यता वाढते.

आज आपल्या देशात इतके प्रश्न आहेत, की त्या प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर शोधाल तर हजारो नवीन कल्पना मिळतील; पण ती कल्पना जोपासावी लागते, त्या कल्पनेचं स्वप्नात रूपांतर व्हावं लागतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कष्ट करावे लागतात. आज कल्पना विलासात रमणारे अनेक विद्यार्थी दिसतात, त्यांना मला सांगावेसे वाटते, निव्वळ कल्पना करणे हा वेळेचा अपव्यय आहे. मित्रांनो, कल्पना असतील तर जागे व्हा, प्रयत्न करायला लागा आणि ध्येयपूर्ती झाल्याशिवाय थांबू नका.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2020 4:17 am

Web Title: startup imagination flight abn 97
Next Stories
1 तरुण ‘अर्थ’नीती
2 संशोधनमात्रे : बों व्हायाज
3 बुकटेल : हरवलेलं चीज शोधताना..
Just Now!
X