05 August 2020

News Flash

फॅन्सचे फॅनॅटिक किस्से

मराठीतील तारे-तारकांच्या फॅन्सचे अनुभव कसे आहेत त्याविषयी त्यांना बोलतं केलं.

शाहरूख खानचा ‘फॅन’ चित्रपट आज प्रदर्शित होतोय. शाहरूख प्रमोशनच्या वेळी आपल्या चाहत्यांबाबतचे अनुभव त्यानिमित्त शेअर करतोय. मराठीतील तारे-तारकांच्या फॅन्सचे अनुभव कसे आहेत त्याविषयी त्यांना बोलतं केलं.

‘हुश्श, सुटला बाबा रणबीर त्या कतरिनाच्या कात्रीतून! आता माझा मार्ग मोकळा झाला!’ एक मोठ्ठा हशा.

‘दीपिका काय मस्त दिसत्ये यार बाजीराव मध्ये.. कलिजा खल्लास!’
‘एऽऽ शाहरूखबद्दल काहीही बोलायचं नाही. मी खपवून घेणार नाही. कसाही असो मी त्याची डाय हार्ड फॅन आहे.’
‘शाहरुखपेक्षा सल्लू बेस्ट आहे याऽऽर’
असे संवाद मित्र-मैत्रिणींच्या कंपूत अगदी कॉमन असतात. आपापल्या आवडत्या हिरो- हिरॉइनवरून होणारी भांडणं तर नित्याचीच. हा असा तो तसा, हाही आवडतो आणि तोही असं म्हणणारे असतात. पण अभिनेत्यांचे डाय हार्ड फॅन असणारेही बरेच आहेत. एखादा नवा सिनेमा येणार असेल तर त्यातल्या हिरो-हिरॉइन्सच्या फॅन्सची फडफड आजूबाजूला लगेच जाणवते. या ‘फॅन’चीच गोष्ट घेऊन मनीष शर्मा हा दिग्दर्शक येत आहे. ‘फॅन’मध्ये शाहरूख खान प्रमुख भूमिकेत असेल. प्रत्यक्षातही शाहरूखची फॅन मंडळी प्रचंड आहेत. त्याचे अनुभवही तो चित्रपटाच्या प्रमोशन्सच्या निमित्ताने सांगतोय. मराठीतील तारे-तारकांच्या फॅन्सचे अनुभव कसे आहेत त्याविषयी त्यांना बोलतं केलं.
नवीन चित्रपट, मालिका अभिनेत्यांना एका दिवसात स्टार बनवतात आणि स्टारमागचे असंख्य फॅन्सही तयार होतात. या फॅन मंडळींचे वेगवेगळे प्रकार असतात. शाहरूख खानचं एकदा दर्शन व्हावं, म्हणून बरेच लोक त्याच्या ‘मन्नत’समोर मन्नत मागत उभे असतात. अमिताभ बच्चन, सलमान खान यांच्या घरांसमोरही कायम चाहत्यांची गर्दी असते. पूर्वी सही घेण्यासाठी धडपडणारे फॅन्स हल्ली सेल्फी घ्यायची धडपड करतात. सोशल मिडिया वरची फॅन पेजेस, लाइक्स, शेयर्स यांना तर उधाण आलेलं असतं. मराठी अभिनेत्यांच्या वाटय़ाला अशी पॅन इंडियन लोकप्रियता येत नसली, तरीही त्यांच्याजवळ फॅन्सचे भरपूर किस्से असतात.

स्पृहा जोशी
‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ मालिकेला लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतलं. अगदी भरभरून प्रेम आम्हाला मिळालं. त्यावेळी ‘हाइक’वर आमचे स्टिकर्स आले होते. खूपच वेगळा आणि मस्त अनुभव होता हा. प्रेक्षक पात्रांशी खूप कनेक्ट होतात, त्याचा spruhaमला पहिला अनुभव आला ‘उंच माझा झोका’ मालिकेच्या वेळी. कुठल्यातरी एका एपिसोडमध्ये ‘स्वत:’ बाहेर जाताना रमाबाईंकडे मुखवास मागतात असा सीन दाखवला गेला होता. एका आजींनी मला गिफ्ट पाठवलं- त्यात सौभाग्यवाणासहित एक मुखवासाची पुडी होती. त्याबरोबर एक चिठ्ठी होती. त्या आजी त्यात म्हणाल्या होत्या, ‘तुमच्या शूटिंगच्या लंच ब्रेकमध्ये तुझ्या स्वत:ना हा मुखवास दे.’ प्रेक्षक स्वत:ला त्या पात्राशी खूप जोडून घेतात. त्यांच्या ठायी असलेला आपलेपणा यातून मला जाणवला आणि हा प्रसंग अगदी लक्षात राहिला.

ललित प्रभाकर
मला फक्त ‘आदित्य’ म्हणून किंवा ‘कबीर’ अशा माझ्या भूमिकांच्या नावाने ओळखणाऱ्या चाहत्यांपेक्षा ललित म्हणून मी कसा आहे ते जाणून घेणारे चाहते मला आवडतात. माझ्या दोन्हीही मालिका जुळून येती रेशीमगाठी आणि दिल दोस्ती adityaदुनियादारीमुळे फॅन फॉलोइंग वाढलं. माझे चाहते माझ्याविषयी जाणून असतात, हे बघून बरं वाटतं. मी पुस्तकं वाचतो, कविता करतो, चित्र काढतो हे बऱ्याच चाहत्यांना माहिती असल्याने ते याच्याशी निगडित काही मला भेट द्यायचा प्रयत्न करायचे. तुझं काम आम्हाला खूप आवडतं आणि मला तुझ्यामुळे काम करायचं इन्स्पिरेशन मिळतं, अशी पत्र, मेसेजेस येतात तेव्हा मला सगळ्यात जास्त आनंद होतो. राज्ञी म्हणून एक मुलगी माझ्या वाढदिवसाला माझ्या सेटवर भेटायला आली होती आणि तिनी दिलेलं गिफ्ट हे खूपच अनयुज्वल होतं. तिनं माझ्या नावानी काही आश्रमांमध्ये डोनेशन दिलं होतं. अर्थातच मला सगळ्यात आवडलेलं हे गिफ्ट.
एकदा पृथ्वी थिएटरला मी नाटक पाहायला गेलो होतो. तिथे मला एक मावशी भेटल्या. ऑस्टीनमधून त्या आल्या होत्या. मला तुझं काम खूप आवडतं वगैरे त्यांनी मला सांगितलंच आणि मला चार्ली चॅपलिन आवडतो म्हणून चार्ली चॅपलिनची ऑटोबायोग्राफी आणली होती. त्यांनी एक लेटरसुद्धा लिहिलं होतं. ही माझ्यासाठी खूपच लक्षात राहिलेली गोष्ट आहे.

वैभव तत्त्ववादी
आपलेही चाहते असावेत, आपल्या भोवतीही फॅन्सचा घोळका असावा असं मला खूप वाटायचं आणि तसा अनुभव ‘कॉफी आणि बरंच काही’नंतर एका कॉलेजमध्ये अनुभवायला मिळाला. मी तिथे पाहुणा म्हणून गेलो होतो आणि फॅन्सचा अक्षरश vaibhavगराडा पडला. आणखी एक किस्सा. एकदा नागपूरला मी काही कामानिमित्त जाणार होतो. आईला फोन करून तसं कळवलं आणि बाहेर कुठेही सांगू नको म्हणून सांगितलं. आईनीसुद्धा कुठेही सांगितलं नव्हतं. अचानक दाराची बेल वाजली आणि आईनी दर उघडलं तर एक ८० वर्षांचे अजोबा दारात होते. ते माझ्या आईला म्हणाले ‘आज वैभव येणार आहे ना? मला फक्त त्याच्याबरोबर एक फोटो काढायचाय’. आजोबा अक्षरश काठी टेकत आले होते. मग आम्ही एक फोटो काढलाच.

अमेय वाघ
‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेमुळे आम्हा सगळ्यांनाच खूप फॅन्स मिळाले. लोकांनी खूप कौतुक केलं आणि मोठय़ांबरोबर अगदी लहान लहान मुलांनाही आम्ही आपलेसे वाटायला लागलो, आवडायला लागलो. एकदा आमची ‘डी३’ची कॉन्सर्ट होती. त्या वेळी आमच्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक होते, कारण प्रचंड लोक आले होते. ameyया गर्दीतच एक लहान मुलगी खूप रडत होती. तिला ‘कैवल्य’ला भेटायचं होतं. तिचं रडणं बघून तिला शेवटी आमच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आणलं गेलं आणि तिनं मला कडकडून मिठी मारली. मी तिला विचारलं तुला काय गिफ्ट देऊ मी, तर म्हणाली, ‘काही नको. मला फक्त तुला भेटायचं होतं.’ एकदा आम्ही ‘दळण’चा पुण्यात प्रयोग करत होतो. तेव्हाही एका लहान मुलीचा असाच अनुभव आला. तिने पायाला घट्ट मिठीच मारली. मग मीसुद्धा तिला जुनी ओळख असल्यासारखं कडेवर घेतलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2016 1:18 am

Web Title: stories of celebrities and their fans
टॅग Celebrities
Next Stories
1 वन इन ‘मिनियन’!
2 ‘च्युईज’च्या चवीच्या जिभा गुलाम!
3 लोणचं
Just Now!
X